अजून किती दिवस...? 

ऋता बावडेकर
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

संपादकीय
 

दुर्दैवाने अपघात आपल्याला नवीन नाहीत. पण हे अपघात किती आणि का व्हावेत, याला काही मर्यादा नकोत का? क्वचित कधी होणारा - होऊ शकणारा अपघात हा अपघातच असावा. कुठल्याही मानवी चुकीमुळे तो होऊ नये; क्वचित तसे होऊही शकते, पण त्याचे प्रमाण अगदीच नगण्य असावे... ही अपेक्षा चूक कशी म्हणता येईल? 

काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर असाच एक अपघात झाला. त्यामध्ये पुण्यातील डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर व त्यांच्या गाडीच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. डॉ. खुर्जेकर हे पुण्यातील संचेती रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे प्रमुख होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. खुर्जेकर हे त्यांच्या सहकाऱ्यांसह रविवारी एका कॉन्फरन्ससाठी मुंबईला गेले होते. तेथून त्याच रात्री परतताना अकराच्या सुमारास त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. ड्रायव्हरने गाडी सर्व्हिस रोडवर घेतली आणि तो टायर बदलू लागला. डॉक्टर त्याला मदत करत होते. त्याच वेळी मागून भरधाव आलेल्या बसने डॉक्टरांच्या गाडीला धडक दिली. त्यात डॉक्टरांसह चालक विलास भोसले डागीच ठार झाले. त्यांचे दोन सहकारी गंभीर जखमी झाले. प्रवाशांनी भरलेली बस तिथेच सोडून बसचालक पळून गेला. असे अपघात, अशा घटना दुर्दैवाने आपल्याला नवीन नाहीत. पण अशा घटना अजून किती दिवस होत राहणार? किती दिवस माणसे अशी जिवाला मुकणार? हे प्रकार कधीतरी थांबणार आहेत की नाहीत? किती दिवस आपण असेच बेफिकिरीने बेफाम गाड्या चालवत राहणार? 

या अपघातात डॉ. खुर्जेकर गेले. मणकाविकारासंदर्भात ते तज्ज्ञ होते. अनेक शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. एमएस ऑर्थोपिडीक्समध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवले होते. मणकाविकाराशी संबंधित अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. मणक्यातील कशेरुदंडाच्या बाजूच्या वक्र भागातील शस्त्रक्रियेसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र केवळ ते प्रसिद्ध डॉक्टर होते आणि अपघातात ते गेले, म्हणून ही घटना वाईट आहे असे नव्हे. तर ते कोणाचे तरी पुत्र होते, पती होते, पिता होते, मित्र होते; अनेक रुग्णांचे आधार होते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माणूस होते. एका माणसाचा, त्याची काहीही चूक नसताना असा हकनाक बळी का जावा? हा खरा प्रश्‍न आहे. कारण या अपघातात त्यांचा चालकही मृत्युमुखी पडला आहे. तोही कोणाचा तरी कोणीतरी होताच. त्यालाही नातलग, मित्रमंडळी आहेतच आणि त्याची तरी काय चूक होती? 

आता सगळे कसे ‘फास्ट’ झाले आहे. कोणाला थांबायला वेळ नाही. जगाचीच ही रीत आहे. त्यामुळे वीस मिनिटात मुंबई, तासात दिल्ली वगैरे म्हणून अनेक फास्ट ट्रेन्स वगैरेंची चर्चा होत आहे. लोकांचा वेळ जाऊ नये म्हणून अशा कितीतरी योजना पुढे येऊ लागल्या आहेत. रस्ते चांगले होऊ लागले आहेत. पण या आपल्या नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या सुविधा आहेत. त्याचा आपण गैरफायदा घेता कामा नये. रस्ते रुंद, गुळगुळीत झाले (सध्या रस्ते खूपच खराब झालेत, तरीही वेग कमी होत नाही. बेपर्वाई कमी होत नाही); म्हणून गाड्या सुसाट सोडायच्या असे नाही. वेगमर्यादा जरी वाढवली असली तरी तिचा उपयोग तारतम्यानेच व्हायला हवा. कारण कितीही अत्याधुनिक वाहन असले, तरी ते मशीन आहे. तुम्ही चालवाल तसे ते चालते. अतिरेक झाला तर त्यात बिघाडही होऊ शकतो, ते बंदही पडू शकते. याचे भान सगळ्यांनी ठेवायला हवे. ‘मला सवय आहे’ ‘माझा कंट्रोल आहे’ वगैरे गमजा मारू नयेत. घरी आपली कोणीतरी वाट बघत असते, याचे भान ठेवतानाच रस्त्यावरील प्रत्येकाला असे घर असते, त्यांचीही वाट बघणारी माणसे असतात; याचेही भान ठेवले पाहिजे. एक्सप्रेस वे किंवा कोणताही रस्ता, आपली रेसिंगची हौस पुरी करण्यासाठी नाही. त्यासाठी वेगळे पर्याय आहेत, याचे भान ठेवायला हवे. 

वेगाप्रमाणेच पुढे जाण्याचीही एक नशा असते. त्या धुंदीत लेन कटिंग, चुकीच्या दिशेने - चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केले जाते. रस्त्यावर एका वेळी लहान, मोठी, मध्यम अशी सर्व आकाराची - प्रकाराची वाहने असतात. रस्ता वळणावळणाचा, घाटांचा असू शकतो. ओव्हरटेक करताना अनेकदा एका वाहनापुढे किती वाहने आहेत दिसत नाही. अंदाज चुकू शकतो. आपल्याबरोबरच इतरांनाही ते धोकादायक ठरू शकते, याचे भान ठेवले तर खूप गोष्टी सोप्या होतील. पण एवढा विचार करण्याची कोणाची तयारी नसते. तेवढी फुरसतच त्यांच्याकडे नसते. एका धुंदीत ते वावरत असतात. असा एखादा अपघात तरी त्यांना भानावर आणतो की नाही, तेच जाणे. अशा गोष्टींमुळे आपण प्रवास करताना किंवा आपला कोणी जवळचा माणूस प्रवास करताना परत येईपर्यंत जिवात जीव नसतो. याचा अर्थ गाडी चालवणारा प्रत्येक जण निष्काळजी असतो, बेपर्वा असतो असे नाही. पण मूठभर लोकच असा प्राण कंठाशी आणतात. 

यात बदल व्हायला हवेत. आपल्या जिवाची काळजी तर घ्यावीच कारण वेळ कोणावरही येऊ शकते. पण इतरांचीही काळजी घ्यावी. आतापर्यंत अशा अपघातांत किती जण हकनाक गेले. जगाच्या दृष्टीने ती किती मोठी होती, हा मुद्दाच नाही; तर ती माणसे होती आणि जनावरांचा जीव घेण्याचाही आपल्याला अधिकार नसताना आपल्या हातून अशी माणसे कशी मारली जाऊ शकतात? याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. पण अजून किती दिवस आपण हेच बोलत राहणार, कधीतरी हे थांबायला हवे ना! 

संबंधित बातम्या