लेक लाडकी... 

ऋता बावडेकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

संपादकीय
 

आपल्या समाजात मुलींपेक्षा मुलग्यांचे महत्त्व अधिक आहे, हे कोणीही मान्य करेल. त्याला कारण म्हणजे ‘वंशाचा दिवा’ ही आपल्या मनातील ठाम कल्पना होय. आपला वंश चालवायचा, तर एकतरी मुलगा हवाच मुलगी काय, बोलून चालून परक्याचे धन; आपल्या घराला तिचा काय उपयोग, हे ऐकायला प्रचंड विचित्र वाटले, तरी आपल्याकडे मुलींबद्दल अगदी अनेक सुशिक्षित घरांतही हीच भावना आहे. त्यात भर म्हणजे, तिच्या लग्नाला येणारा खर्च! त्यामुळे शक्यतो मुलगी नकोच असा बहुतांश कुटुंबांचा कल असतो, विशेष म्हणजे त्यात महिलाही असतात. पण हळूहळू या परिस्थितीत बदल होतो आहे, असे वाटू लागले आहे. याचे कारण महाराष्ट्रात वाढलेला मुलींचा जन्मदर होय. 

गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्रात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढताना दिसते आहे. राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे हे चित्र आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. मुलांच्या (मुलगे) तुलनेत मुलींच्या जन्माची संख्या सरासरीने हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. 

मुलींच्या जन्माचे लिंगप्रमाण २०१३ मध्ये एक हजार मुलांमागे फक्त ९०० होते. २०१३-१४ मध्ये ते ९१४ झाले. पण २०१५ मध्ये हे प्रमाण परत कमी होऊन ९०७ वर पोचले. २०१६ आणि २०१७ मधील जन्मनोंदणीचे प्रमाण अनुक्रमे ९०४ आणि ९१३ होते. २०१८ च्या ताज्या अहवालानुसार हे प्रमाण ९१६ वर सुधारले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शहरी भागात हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२० होती. ग्रामीण भागात ही संख्या ९०३ होती. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या (सीआरएस) आकडेवारीनुसार कोकणातील सिंधुदुर्गात मुलींच्या जन्माचे प्रमाण ९६५ असू याबाबतीत हा जिल्हा राज्यात अव्वल आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या नंदुरबारमध्ये हजार मुलांमागे ९५४ मुला जन्माला येतात. रत्नागिरीतही ९५३ ही संख्या आहे. स्त्री जन्मदराच्या तळाशी असलेल्या जिल्ह्यांमध्ये बुलढाणा (८५७), कोल्हापूर (८७०) आणि जालना (८७९) यांचा समावेश आहे. नोंदणीकृत कार्यक्रमांवर आधारित मुंबईतील लिंगप्रमाण ९३९ आहे. ठाणे, पालघर, पुणे आणि रायगड येथे ते अनुक्रमे ९२६, ९२८. ९१४ आणि ९१६ असे आहे. आरोग्य विभागाने मुलींचा जन्मदर वाढण्याचे श्रेय, प्री-नेटल डायग्नोस्टिक टेक्निक (नियमन आणि गैरवापर प्रतिबंध) कायद्याच्या (पीसीपीएनडीटी) अंमलबजावणीला दिले आहे. 

मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढते आहे, ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. अन्यथा वेगवेगळ्या समजुतींखातर त्यांना जन्मच नाकारला जात होता. अर्थात, अजूनही हे प्रकार कुठे कुठे होत असणार, अन्यथा जन्मदर ९००-९६५ दरम्यान घोटाळला नसता. पण प्रमाण वाढते आहे, हीदेखील समाधानाचीच गोष्ट आहे. मुलीला जन्मच नाकारण्याची अनेक कारणे आहेत. एकतर तिची जबाबदारी; आपल्याकडे मुलीची अब्रू ही फार मोठी गोष्ट आहे. आजच्या जमान्यात ती कशी राखावी, हा पालकांपुढचा मोठा प्रश्‍न आहे. या भीतीने मुलीला घरी एकटे सोडता येत नाही, बाहेर पाठवता येत नाही. याचा परिणाम म्हणजे, तिचे शिक्षण थांबते. दुसरे म्हणजे तिचे लवकर लग्न लावून दिले जाते. कुठूनतरी जबाबदारीतून आपली सुटका करून घ्यायची. पण लग्न तरी कुठे सहजासहजी होते! त्यासाठी भरमसाठ खर्च करावा लागतो. मुलगी मुलापेक्षा कितीही उजवी असो, पण तिला ‘उजवण्या’साठी मुलाला जबरदस्त हुंडा द्यावा लागतो. मग त्या हुंड्याला तुम्ही काहीही नाव द्या. त्यानंतर हे थांबले तर ठीक नाहीतर सासरच्यांची हाव संपतच नाही. त्यात अनेकदा अनेक मुली संपतात... मुलींना जन्मच नाकारण्याची ही अनेक कारणे आहेत. ती गोष्ट अर्थातच चुकीची आहे. पण तेवढा विवेक राहात नाही. खरेतर मुलींना जन्म नाकारण्याऐवजी या चुकीच्या प्रथाच नष्ट करायला हव्यात, पण त्यासाठी कोणी प्रयत्नही करताना दिसत नाही. 

तसे बघायला गेले, तर वडील-मुलीचे नाते वेगळेच असते. खरेतर सगळीच नाती सुंदर असतात. आई-मुलीचे नातेही तितकेच सुंदर असते. ‘घरात एकतरी मुलगी हवीच’ असे म्हणणारी कितीतरी कुटुंबे आहेत. निवडीचे स्वातंत्र्य असूनही अनेक एकही मूल नसणारे नवराबायको, मुलगी दत्तक घेतात. मुलगी सासरी गेल्यानंतर आमच्या घराची कळाच गेली, असे म्‍हणणारी घरे पूर्वीपासून आपल्याकडे दिसतात. ‘पहिली बेटी,धनाची पेटी’ म्हणून मुलीच्या पावलाने भाग्य येते, असे मानणारी मंडळी आजही आहेत. यातील भाबडेपणा सोडला, तरी मुलींबद्दल इतक्या छान भावना असणाऱ्या आपल्या समाजाला अचानक मुली नकोशा का वाटू लागल्या? बाई म्हणून आपल्याला आलेले अनुभव मुलीच्या वाट्यालाही येऊ नये असे वाटल्याने? समाजचित्र झपाट्याने बदलल्याने? मुलीची जबाबदारी आपण नीट पार पाडू शकणार नाही असे वाटल्याने?... कारणे काहीही असतील, त्या त्या वेळी ती त्या त्या व्यक्तीसाठी खरीही असतील; पण म्हणून एखाद्याला जीवनच नाकारायचे? हा दुष्टपणा नाही? अघोरीपणा नाही? त्यापेक्षा ही परिस्थिती बदलण्याचे मनात का येत नाही? माझ्या मुलीला मी शक्यतो वाईट अनुभवांपासून दूर ठेवीन. तिला शिकवून तिच्या पावलांवर उभे करीन. संघर्षाला तोंड देण्याचे बळ तिला मिळवून देईन.. असे करणे अवघड आहे, मान्य; पण अशक्य नाही. त्यासाठी आपण स्वतः बळ मिळवायला हवे. तोच ठामपणा मुलीला द्यायला हवा. लगेच नाही, पण सगळ्यांच्या प्रयत्नांनी पण आपल्या मुलींना नक्कीच चांगला समाज, चांगले वातावरण देऊ शकू. मात्र सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.. आणि मुलींचे आणि मुलांचेही प्रमाण पूरक असले पाहिजे. ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे... 

संबंधित बातम्या