हा स्त्री-शक्तीचा जागर आहे?

ऋता बावडेकर
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

संपादकीय
 

नुकतेच नवरात्र संपले आहे. स्त्री-शक्तीचा जागर करणारा हा उत्सव.. समाजात खरोखरच स्त्रियांना हा मान मिळतो? त्यांच्या कर्तृत्वाचे योग्य मूल्यमापन होते? की अजूनही त्यांना किरकोळच समजले जाते? अजूनही त्यांना अनेक संधी नाकारल्या जातात? त्यांना दुय्यम स्थानीच बघितले जाते? समाजाचा विचार केला, तर या बाबतीत संमिश्र चित्र दिसते. एकीकडे महिला प्रगती करताना दिसतात; तर दुसरीकडे बरोबर याउलट चित्र दिसते. पण महिलांना त्यांचे स्थान मिळावे यासाठी प्रयत्न होताना दिसतात, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणावी लागेल... समाजाचे प्रतिबिंब कलाकृतींमध्ये उमटते असे म्हणतात. महिलांच्या या स्थितीबाबत तसे प्रतिबिंब या कलाकृतींत उमटते का? नाटक, चित्रपटाबाबत ते काही अंशी खरे आहे; पण दूरचित्रवाणीबाबतही खरे आहे का? जाणून घ्यायला हवे.. 

अर्थात त्यासाठी दूरचित्रवाणी म्हणजेच टेलिव्हिजनचा इतिहास बघण्याची तशी आवश्‍यकता नाही. आजची परिस्थिती काय आहे, हे बघणे अधिक महत्त्वाचे. दूरदर्शन, दूरचित्रवाणी सुरू झाले तेव्हा त्यावरील मालिकांमध्ये स्त्री व्यक्तिरेखा अतिशय संवेदनशीलपणे उभ्या केल्या जात.. आणि केवळ स्त्री व्यक्तिरेखाच का, सगळ्याच व्यक्तिरेखा निगुतीने रंगवल्या जात. आशयाचे महत्त्व जाणणारे कलावंत आपले कथानक त्या पलीकडे भरकटू देत नसत. अनेक हिंदी, मराठी मालिकांची आजही त्यामुळेच आठवण काढली जाते. 

मग आजची स्थिती काय आहे? केवळ मराठीपुरते बोलायचे, तर विविध वाहिन्यांवरील बहुतांश मालिकांमध्ये स्त्री हीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा असते. अनेकदा सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे झालेला तिचा प्रवास दाखवला जातो. पण हे वाक्य जितके साधे, सरळसोट वाटते तितका तो अर्थातच नसतो. त्यात खाचखळगे, आव्हाने असणारच. ते स्वाभाविक असतील तर त्यालाही हरकत नाही; पण आपल्या मालिकांत येणारे हे अडथळे हे अतर्क्य असतात. त्याचा अर्थ कसा लावायचा हेच कळत नाही. एकतर या मालिकांना कथानक असे नसतेच. असते ती एखादी चमत्कृतीपूर्ण कल्पना; त्यालाही हरकत नाही. पण ती तरी नीट फुलवतील की नाही! तर तसेही नाही. प्रेक्षकांचा जसा प्रतिसाद मिळेल (?) त्याप्रमाणे हे कथानक कधी या बाजूने, कधी त्या बाजूने नुसते फिरत असते. आता उपाय सापडला, मार्ग निघेल, असे वाटत असतानाच कथानक पुन्हा १८० अंशात फिरते. मूळपदावर आल्यासारखे होते आणि परत तोच प्रवास, त्याच संवादांनी सुरू होतो. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो, टीआरपी वाढतो आहे तोपर्यंत हेच चक्र सुरू राहते... आणि मग अचानक कोणतेही कारण न देता अतर्क्यपणे मालिका निरोप घेते. आपण समजायचे, मालिकेचा टीआरपी कमी झाला असावा. 

हे टीआरपी प्रकरणही नेमके काय असते कळत नाही. असंख्य प्रेक्षकांना अक्षरशः असह्य झालेली मालिका संपायचे नावच घेत नाही, हे कोडे काही केल्या उलगडतच नाही. त्यामुळे मालिका यशाच्या शिखरावर पोचवणाऱ्या अज्ञात प्रेक्षकांबाबत नेहमीच उत्सुकता असते. 

अशा मालिकांवर टीका झाली, की अनेक जण म्हणतात, चालू दे की मालिका. त्यावर अनेकांचे पोट अवलंबून असते. त्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारणच नाही. कोणाच्या पोटावर पाय द्यायला कोणालाच आवडणार नाही, पण म्हणून प्रेक्षकांचा अंत बघणार का? ते तरी किती योग्य आहे? दुसऱ्या नवनवीन मालिका काढाव्यात की! 

आज प्रेक्षकांचा ८०-९० टक्के प्रेक्षक हा ज्येष्ठ नागरिक आहे. ज्यांना बाहेर पडता येत नाही. कुठे जाता येत नाही. करमणुकीसाठी त्यांना टेलिव्हिजनशिवाय पर्याय नसतो. त्यांना जडही काही नको असते. हलक्या फुलक्या, फार ताण येणार नाही अशा कथानकाला त्यांचे प्राधान्य असते. पण म्हणून नवरा-बायकोची भांडणे, त्यांत आलेला तिसरा किंवा तिसरी कोणी म्हणजे विवाहबाह्य संबंध, सासवा-सुनांची भांडणे, मधेच कारण नसताना कोणीतरी तुरुंगात जाणे, खलनायिका घरातच येऊन राहणे, तिने जीव जाईपर्यंत (म्हणजे कंटाळा येईपर्यंत) सगळ्यांना छळ छळ छळते... वगैरे काहीही दाखवायचे? असे कोणत्या मराठी कुटुंबात घडते? तरुण वर्ग तर अशा वाहिन्यांपासून कधीच दुरावला आहे. खरोखरचा बुद्धिजीवी वर्गही इकडे वळत नाही. अशावेळी आपल्या हक्काचा प्रेक्षक सांभाळायचे सोडून त्याच्या माथी काहीही मारत राहिले तर कसे व्हायचे? 

बरे, एवढे करून ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा काही करत असेल तर ठीक; पण मालिका सुरू झाल्यापासून संपेपर्यंत ती कधी मुले, कधी सासूसासरे, कधी कोणी, तर कधी कोणी यांच्यासाठी सतत माघारच घेत असते. अधून मधून आपण काही करतो आहोत, हे दाखवण्यासाठी ‘मी बघून घेईन’, ‘मी धडा शिकवीनच’ वगैरे फिल्मी गर्जना करत असते. प्रत्यक्षात मात्र काहीही करत नाही. अशा अनेक मालिका संपल्या, पण प्रेक्षकांना कधी तिचे ‘बघणे’ दिसले नाही, की कधी कोणता ‘धडा’ शिकवला ते कळले नाही. 

कणखर किंवा बाणेदार व्यक्तिरेखा ही नम्र, सगळ्यांचा आदर करणारी अशी आदर्शही असू शकते. आदर्श असण्यासाठी तिने सतत रडायला, विनवण्याच करायला हव्यात असे नाही. आपले घरदार, आपली मानमर्यादा सांभाळूनही ती आपली तत्त्वे, आपला स्वाभिमान जपू शकते. पण तेवढी समज, तेवढे आकलन कुठे दिसत नाही. पण त्यामुळे स्त्रियांचे चुकीचे चित्र समोर येते आहे. एकतर सगळे सहन करणारी आणि दुसरी सतत छळणारी, एवढ्याच दोन काळ्या-पांढऱ्या बटबटीत प्रतिमा समोर दिसतात. एकविसाव्या शतकात असे चित्र उभे राहणे - उभे करणे सर्वस्वी चूक आहे.  

संबंधित बातम्या