अत्याचार थांबायलाच हवेत 

ऋता बावडेकर
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

संपादकीय
 

त्रास देण्यासाठी सगळ्यात सोयीचे लोक (सॉफ्ट टार्गेट) कोण असतात? महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग.. अशी उत्तरे कोणीही देईल. त्यातही महिलांचे प्रमाण अधिक असेल हेही मान्य होईल. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातही हेच वास्तव स्पष्टपणे दिसते. 

देशाच्या गुन्हेगारीसंबंधित ‘क्राइम इन इंडिया २०१७’ हा अहवाल सरकारने नुकताच प्रसिद्ध केला आहे. एक वर्ष उशिरा प्रसिद्ध झालेल्या या अहवालात देशातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची गुन्ह्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यावरून महिलांवरील गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होते. देशात २०१७ मध्ये महिला अत्याचाराचे तीन लाख ५९ हजार गुन्हे घडले आहेत. २०१६ च्या तुलनेत या गुन्ह्यांत २१ हजारांनी वाढ झाली आहे. प्रसिद्ध झालेला अहवाल २०१७ चा आहे, २०१८ चा अहवाल अजून प्रसिद्ध व्हावयाचा आहे, त्यात किती वाढ अथवा घट झाली हे बघायला हवे. पण २१ हजारांनी अत्याचारात वाढ ही नक्कीच चिंताजनक परिस्थिती आहे. महिला अत्याचारांत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो, हे पुरोगामी महाराष्ट्राला अजिबातच शोभणारे नाही. 

अहवालात गुन्ह्यांचे प्रकार देण्यात आले आहेत, ही आकडेवारी देशभरातील आहे. त्यानुसार विवाहित महिलांचा कौटुंबिक छळ केल्याचे एक लाख चार हजार गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर विनयभंग (८६,६०१), बलात्कार (३२,५५९), बलात्काराचा प्रयत्न (४,१५४), हुंडाबळी (७,४६६), आत्महत्येस प्रवृत्त करणे (५,३८२), बलात्कार व खून (२२३), अपहरण (६२,४००), विवाहासाठी जबरदस्ती (३०,६१४) असे गुन्हे दाखल झाले आहेत. या आकडेवारीवरून या प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात यावे. 

अर्थात केवळ आकडेवारीवरून गांभीर्य ठरवणे योग्य ठरणार नाही. कारण इथे संख्येपेक्षा शरीराला-मनाला होणाऱ्या जखमा, वेदना अधिक त्रासदायक असतात. संबंधित महिलेचे केवळ भावविश्‍वच नाही, संपूर्ण आयुष्यच यामुळे उद्‍ध्वस्त होण्याची शक्यता असते; नव्हे तसे उद्‍ध्वस्त होत असते. विनयभंग, बलात्काराचा प्रयत्न, बलात्कार अशा घटना घेतल्या तर याची सत्यता पटावी. कारण आपल्याकडे स्त्रीचे चारित्र्य, तिचे पावित्र्य - तिच्या शरीराशी जोडलेले आहे. अशा घटनांत तिचा काहीही दोष नसला, म्हणजे तसा तो नसतोच; तरी त्याची शिक्षा मात्र तिलाच भोगावी लागते. तिच्यावर असा अत्याचार करणारे, तसा प्रयत्न करणारे अनेकदा उजळमाथ्याने वावरत असतात. ती मात्र तोंड लपवून घरात बसलेली असते. प्रसंगी तिचे शिक्षण थांबवले जाते, लहान वयातच तिचे लग्न लावून दिले जाते. मुलींच्या पालकांचेही बरोबरच असते. समाजातील अशा गुन्हेगार प्रवृत्तींशी लढायला ते आर्थिकदृष्ट्या, मानसिक-सामाजिकदृष्ट्या सक्षम नसतात. त्यामुळे आपल्या जबाबदारीतून या ना त्या प्रकारे ते स्वतःची सोडवणूक करून घेत असतात. 

हे कुठे तरी थांबायला हवे. त्यासाठी समाजाने आपले जुनाट, बुरसटलेले विचार बाजूला ठेवायला हवेत. या मुलींच्या - पीडितांच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे. हा पाठिंबा इतका जोरदार हवा, की मुलींची छेड काढतानाही समोरचा शंभरवेळा विचार करेल. एवढे करूनही दुर्दैवाने एखादीवर तशी वेळ आलीच, तर तिचे नाही - त्या मुलाचे-पुरुषाचे जिणे लाजिरवाणे व्हायला हवे. समाजाची मानसिकता बदलणे हे समाजातील प्रत्येक घटकावरच अवलंबून आहे. कोणी येऊन आपली मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करेल, याची वाट का बघा? आपण तेवढे सक्षम आहोत, नसू तर तसे होण्याचा प्रयत्न करायला हवा. विचार करायला हवा. 

अर्थात, अत्याचाराचा हा एवढाच भाग नाही. घरगुती हिंसाचार, हा आपल्या समाजाला मिळालेला फार मोठा शाप आहे. कधी काळी आपल्या समाजात मुलीचे विवाह त्यांच्या नकळत्या वयात होत असत. तिच्या भविष्याची तरतूद म्हणून तिच्याबरोबर स्त्री-धन दिले जाई, ज्यावर केवळ तिचाच हक्क असे. वेळप्रसंगी तिच्या उपयोगी पडावी यासाठी केलेली ती तरतूद असे. हळूहळू या प्रथेला वेगळे वळण पडत गेले आणि कालांतराने हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा सुरू झाली. मुलगा कमावता असला, घरचे चांगले असले, तरी मुलीकडून हुंडा स्वीकारणे सुरू झाले. ते कधी पैशाच्या, कधी वस्तूंच्या, तर कधी सोन्याचांदीच्या रूपात असे. पुढे पुढे ही भूक इतकी राक्षसी झाली, की मुलींचे यात बळी जाऊ लागले. मुलींना हुंडा द्यावा लागतो म्हणून स्त्री-गर्भ आईच्या गर्भातच खुडला जाऊ लागला. स्त्री जातीचे यामुळे नुकसान झालेच, पण काही राज्यांत स्त्री-पुरुष प्रमाण असमान ठरू लागले. त्यातून मुलींचे अपहरण, त्यांच्यावर लग्नाची बळजबरी, बलात्कार, खून असे प्रकार सुरू झाले. 

या सर्व प्रकारांमुळे स्त्रियांवर होणारे अन्याय - अत्याचार गंभीरपणे घ्यायला हवेत. एका स्त्रीवरील अत्याचार एवढेच त्याचे स्वरूप नसते, तर त्यामुळे समाजाच्या आरोग्यावरच परिणाम होत असतो. स्त्री केवळ कुटुंबाचाच नाही, तर समाजाचाही फार मोठा भाग असते. तिच्यामुळे समतोल राखला जातो. तिला घरात डांबून , तिचे हक्क नाकारून आपण तिला नाही, तर परिणामी समाजाला - म्हणजे आपल्यालाच शिक्षा देत असतो. पुस्तकी शिक्षणापलीकडे तिच्याकडे खूप क्षमता असतात. त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. तिच्यावर केवळ ‘पुरुषी’ वर्चस्व गाजवण्यापेक्षा तिच्या साथीने काही चांगले करण्याचा प्रयत्न करायला हवा. ज्या समाजात स्त्रीला देवीचा दर्जा प्राप्त आहे, त्याच समाजात तिच्यावर असे अत्याचार होणे, हे समाज म्हणून आपल्या सर्वांसाठी शरमेची बाब आहे. हे चित्र आपणच बदलायला हवे. एका दिवसात तर ते होणार नाही. त्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करायला हवेत. 

संबंधित बातम्या