स्वच्छता अभियान आपलेही हवे 

ऋता बावडेकर
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

संपादकीय
 

शहरी भाग असो वा ग्रामीण; एकत्र येऊन गप्पा मारणे हे आपल्या समाजाचे वैशिष्ट्य आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. चार लोक एकत्र आले आणि त्यांचा गप्पांचा फड जमला नाही, असे कधी होत नाही. गप्पांचे विषय तरी किती? राजकारण, समाजकारण, खेळ - त्यातही क्रिकेट.. मनसोक्त होणाऱ्या गप्पांचा प्रामुख्याने जाणवणारा सूर म्हणजे; संबंधिताने कसे वागायला हवे होते हा! म्हणजे, राजकारणाचे उदाहरण घेतले तर पंतप्रधानांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे कसे चुकले, त्यांनी काय करायला हवे होते... वगैरे मुद्द्यांवर या चर्चा रंगतात. मी काय करणार यापेक्षा इतरांनी काय करायला हवे, हे सांगणाऱ्याच या चर्चा प्रामुख्याने असतात. त्यामुळे ‘टाइमपास’ या व्यतिरिक्त फारसे काही या चर्चांतून हाती पडत नाही. अर्थात गंभीरपणे होणाऱ्या काही चर्चांचा अपवाद आहेच. समाजात काय घडते त्यावर अशा चर्चांमध्ये लगेचच टिप्पणी होत असते. पण जेव्हा काही गोष्टी स्वतः करण्याची वेळ येते, तेव्हा बरीचशी मंडळी मागे फिरताना दिसतात. ‘स्वच्छ भारत अभियान’ हे त्यापैकीच एक उदाहरण म्हणता येईल. 

केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केली. स्वाभाविकच सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. पण ही जबाबदारी फक्त सरकारचीच आहे? जबाबदार नागरिक म्हणून या योजनेच्या यशस्वितेची जबाबदारी आपली नाही? पुण्यात सध्या जे चित्र दिसते आहे, त्यावरून तरी तसेच दिसते आहे. 

‘स्वच्छ भारत अभियाना’च्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे पुण्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. दुकानांपुढे कचऱ्याचे ढीग लावू नयेत, अशा सूचना देऊनही खाद्यपदार्थ आणि भाजीविक्रेते मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या दीड हजार व्यावसायिकांना परवाना निलंबित करण्याचा इशारा आता महापालिकेने दिला आहे. 

स्वच्छता मोहिमेअंतर्गत विशेष मोहीम म्हणून महापालिकेतर्फे खासगी व अन्य व्यावयायिक ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. तेथील स्वच्छतेचा आढावा घेताना महापालिकेतर्फे खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, हातगाडीवाले, फेरीवाले, स्टॉलवाल्यांकडून कचरा, शिळे अन्न रस्त्यावरच टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी कायम आहेत. वास्तविक, कचरा साठविण्यासंदर्भात उपाय योजण्याच्या सूचना अशा व्यावसायिकांना घनकचरा व व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आल्या होत्या. परंतु, त्या अंमलात न आणता कचरा सर्रास रस्त्यावर टाकण्यात येत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दोन महिन्यांपूर्वी पुढाकार घेतला होता. तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना दंड करण्याची सूचनाही राव यांनी अतिक्रमण विभागाला केली होती. त्यानुसार दीड हजार अशा व्यावसायिकांना दंड करण्यात आला असून काही जणांचे परवाने स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना व्यवसाय करता येणार नाही. मात्र, कशाचाच परिणाम होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. 

विविध विषयांप्रमाणे आपल्या देशातील स्वच्छतेबाबतही आपण अगदी हिरिरीने बोलत असतो; विशेषतः ज्यांचा परदेशप्रवास झालेला आहे, असे लोक यात पुढे असतात. त्यातले काही स्वच्छता पाळतही असतील, पण बरेच जण नुसता बोलण्यापुरताच सहभाग नोंदवतात. सकाळी फिरायला जाताना अनेकांकडे कुत्री असतात. ती कुत्री कुठेही घाण करतात. परदेशात असे झाले, तर त्या कुत्र्याच्या मालकाला ती घाण उचलावी लागते. तसे डबेच ते घेऊन बाहेर पडतात. पण आपल्याकडे अशी तसदी कोणीही घेत नाही. कोणी त्यांना सांगितलेच, तर फणकाऱ्याने निघून तरी जातात किंवा वाद तरी घालत बसतात. 

अर्थात हे एक उदाहरण झाले. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. आपले स्वच्छ घर असले पाहिजे, असा अनेकांचा आग्रह असतो. तसे ते घर स्वच्छ ठेवतातही; पण परिसर? ती जबाबदारी फक्त त्यांच्या अंगणापर्यंत घेतली जाते. कधी कधी तीही नाही. प्रवासातही खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर त्याचे रॅपर्स, कागद हवेतच सोडून दिले जातात. आपली सगळी सार्वजनिक ठिकाणे बघितली तर प्रचंड गलिच्छ असतात. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणून हेटाळणी झाली. कदाचित असेलही तो स्टंट; पण म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करतो ते तरी संबंधितांनी सांगावे. दुसऱ्यांची चेष्टा, त्यांच्यावर टीका करणे सोपे असते; पण स्वतः काही करणे महत्त्वाचे असते. 

आपल्याकडे प्लॅस्टिकवरही बंदी आहे, पण ती किती पाळली जाते? काही ठिकाणी खरोखरच पाळली जाते, अगदी लहान गावांतही त्याची अंमलबजावणी झालेली दिसते. पण कचऱ्यांत सापडणारे प्लॅस्टिक बघता आपण ही गोष्ट शंभर टक्के पाळत नाही असेच म्हणावे लागेल. 

एखादी गोष्ट करायला हवी म्हटले, की ती करायची नाही असा एकुणात आपल्याकडचा अनुभव आहे. पण न सांगताही आपण काहीच करत नाही. दोन्हींतली एक तरी गोष्ट आपण करायला हवी ना; अन्यथा परदेशी जाऊन आले, की तिथली स्वच्छता, तिथली शिस्त यावर भरभरून फक्त बोलायचे. आपल्या देशात या गोष्टी करू नये, असे कोणी आपल्याला सांगितले आहे का? पण ‘मला काय त्याचे?’ ही आपली उदासीनता फार घातक आहे. हे माझे काम नाही. ज्याचे काम आहे तो करेल किंवा ज्याला हवे तो करेल असे म्हणण्यात आणि आपण तर करायचेच नाही, दुसरे कोण करत असेल तर त्याला हसण्यातच आपण अनेकदा धन्यता मानत आलो आहोत. हे चित्र बदलायला हवे ना? 

त्यामुळे केवळ इतरांना उपदेश करण्यापेक्षा स्वतः पुढाकार घेऊन किमान आपला परिसर प्रत्येकाने स्वच्छ ठेवला तरी देश स्वच्छ होईल. इच्छाशक्ती हवी!    

संबंधित बातम्या