इथे वय वाढण्यास बंदी आहे  

ऋता बावडेकर
सोमवार, 2 डिसेंबर 2019

संपादकीय
 

देश कोणताही असो, समाज कोणताही असो; प्रमाण कमीजास्त असेल, 
पण तडजोडी बायकांनाच अधिक स्वीकाराव्या लागतात, यावर एकमत होऊ शकते. घरात ही स्थिती असतेच, पण बाहेर कामाच्या ठिकाणी हे प्रमाण थोडे अधिक असते. अशा प्रत्येक वेळी स्त्रीच्या शारीरिक क्षमतेवर चर्चा केली जाते. ती कामासाठी किती वेळ देऊ शकते यावर बोलले जाते. घर सांभाळून ती विशिष्ट जबाबदारी स्वीकारू शकते का यावर शंका उपस्थित केली जाते. या सर्व कामांत एक क्षेत्र, ग्लॅमरचेही आहे. तिथे तर तिच्या वयावरच अनेक गोष्टी ठरतात. 

हिंदी चित्रसृष्टीतील नेहा धुपिया या कलावतीने या संदर्भात काही प्रश्‍न 
उपस्थित केले आहेत. तसे बघितले तर ती काही आघाडीची नायिका वगैरे नव्हे. मिस इंडिया झाल्यानंतर तिने मिस युनिव्हर्स हा किताबही मिळवला. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. हिंदीबरोबरच पंजाबी, तेलगू, मल्याळी भाषेत चित्रपट केले. ‘ज्युली’ हा तिचा चित्रपट खऱ्या अर्थाने गाजला. बाकी हिंदीत तिला तसे यश मिळालेच नाही. नंतर ती सहायक भूमिकांकडे वळली. त्यानंतर तिने टीव्ही केला. याच काळात अंगद बेदीबरोबर (क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचा मुलगा) लग्न केले. त्यांना मुलगी आहे. नेहा धुपियाची एवढी माहिती देण्याचे कारण म्हणजे, तिने उपस्थित केलेला मुद्दा नीट समजावा. ती म्हणते, आई झालेल्या अभिनेत्रींना चित्रपटांत काम मिळत नाही. खूप प्रयत्न करावे लागतात, पण मिळेल ती भूमिका स्वीकारावी लागते. 

अजिबात भावनिक न होता विचार केला, तर अशी परिस्थिती आहे हे मान्य करावे लागते. एकतर या मनोरंजन क्षेत्रात पुरुष असेल किंवा स्त्री रोज इतके तरुण येत आहेत की वय वाढतील तसे जुने कलाकार मागे किंवा बाहेर पडत जातात. यात स्त्री-कलावंतांचे प्रमाण दुर्दैवाने अधिक आहे. त्याला जबाबदार समाजाची मानसिकता आहे, असेच म्हणायला हवे. कारण 
इथे काम करणारे निर्माते हे जनहितार्थ 
काम करत नसतात. त्यांचा हा पोटापाण्याचा व्यवसाय असतो. गुंतवलेले पैसे 
दामदुपटीने जरी नाही, तरी जेवढे गुंतवले तेवढे परत मिळावेत अशी त्याची अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांना आवडतील असे कलाकार घेण्याकडे त्याचा कल असतो. दिग्दर्शकाचेही प्रसंगी फारसे काही 
चालत नाही. त्यामुळे जुने कलाकार मागेच राहतात आणि नंतर कधीतरी लुप्त होतात. हिंदीत तर ही सर्रास परिस्थिती आहे. क्वचित कोणी गौरी शिंदे मध्यमवयीन श्रीदेवीला नजरेसमोर ठेवून तिच्या त्या वयाला साजेशी भूमिका लिहिते आणि ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट यशस्वी करून दाखवते. एरवी, या गाजलेल्या अभिनेत्रींचा जुना करिष्मा डोळ्यासमोर ठेवूनच चित्रपट लिहिले जातात. मग ‘नच बलिये’सारख्या चित्रपटात माधुरी दीक्षितला डान्सशिवाय काही वावच नसतो. आधीची माधुरी आणि ही माधुरी प्रेक्षकांच्या मनात तुलना सुरू होते आणि त्याचा फटका चित्रपटाला बसतो. कारणे ही असतात, पण जुन्या (खरे तर वयस्कर) नायिकांना प्रेक्षक स्वीकारत नाहीत असा सोयीस्कर समज करून घेतला जातो. नेहाचे म्हणणे हेच आहे, की आई झालेल्या अभिनेत्रींना चित्रपटांत काम मिळणे मुश्‍कील होते. 

केवळ आई झालेल्या तरुण अभिनेत्रीच नव्हे, तर वयस्कर अभिनेत्रींसाठीही चित्रपटांत फारच किरकोळ काम असते. त्यामुळे टॅलेंट असूनही या अभिनेत्री मागे पडत जातात. मध्यंतरी तापसी पन्नू व भूमी पेडणेकर यांचा ‘सांड की आँख’ हा चित्रपट येऊन गेला. त्यात तरुणपण ते उतार वय अशा भूमिका या दोघींनी रंगवल्या. नीना गुप्ता आणि सोनी राझदान या अभिनेत्रींनी त्यावर मत मांडले, की उतारवयातील भूमिकांसाठी त्यांना मेकअप करण्यापेक्षा आमच्यासारख्या त्या वयातील अभिनेत्रींना त्या भूमिका देता येऊ शकल्या असत्या. त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण तो निर्णय निर्माता-दिग्दर्शकाचा असतो. मात्र ‘बधाई हो’ सारखे चित्रपट आपल्याकडेच झाले आणि यशस्वीही झाले. पण असे प्रयोग आपल्याकडे कमी होतात एवढे मात्र खरे. 

... आणि आपल्याकडेच का? हॉलिवूडमधील मेरिल स्ट्रीप वगैरे ज्येष्ठ अभिनेत्रींचीही हीच खंत आहे. तरीही मेरिल स्ट्रीपला तिच्या वयाला साजेशा बऱ्याच भूमिका मिळाल्या. पण तिकडेही अभिनेत्रींची हीच तक्रार आहे. पुरुष कलावंतांपेक्षा मानधन कमी मिळते, ही त्यांची आणखी एक तक्रार आहे. आपल्याकडे अजून तरी कोणी याविषयी बोललेले नाही. 

याला कारण काय असावे? खरे तर प्रत्येक वय वेगळे काही सांगत असते. प्रत्येक वय तितकेच महत्त्वाचे असते. कोणीही चिरतरुण राहात नाही, हे सत्य आहे. त्यामुळेच कदाचित पडद्यावर तरुण मुले बघायला प्रेक्षकांना आवडत असावे. पण शरीर आकर्षणाचा हा अतिरेक नव्हे काय? तर नक्कीच आहे, त्यामुळेच त्यावर उतारा म्हणून आशय असलेल्या कथानकांत नायक-नायिकेचे वय जाणवत नाही, कथेचा परिणाम जाणवतो. पण अशा खूप थोड्या कलाकृती असतात. अर्थात पुरुष कलावंतांना वयाच्या बाबतीत थोडे झुकते माप मिळते. 

पण हे थांबायला हवे. वयस्कर कलावंतांवर हा अन्याय आहे. केवळ वय वाढले म्हणून त्यांनी आई, आजी, बहिणीच्या भूमिका करण्यात काही अर्थ नाही. प्रेक्षकांनी आपली अभिरुची तपासली पाहिजे. त्यात वेळप्रसंगी बदल केले पाहिजेत. केवळ या कलावंतांसाठीच नाही, तर स्वतः समृद्ध होण्यासाठी हे आवश्‍यकच आहे.   
 

संबंधित बातम्या