वासनेचे अजून किती बळी? 

ऋता बावडेकर
सोमवार, 9 डिसेंबर 2019

संपादकीय
 

आपल्या आजूबाजूला जरा कुठे बरे चालले आहे असे वाटत असते - म्हणजे तसे काही कानावर पडत नाही म्हणून; तोच एखादी भयानक बातमी कानावर येऊन आदळते. ‘सुन्न’ या शब्दाचाही अर्थ कमी पडावा अशी काहीशी आपली भाववस्था होते.. आणि मग हे का? कशासाठी? तिचा काय दोष? वासना एवढी प्रबळ का होते? आरोपींना कोणती शिक्षा द्यावी? वगैरे प्रश्‍न मनात थैमान घालू लागतात. 

हैदराबादमधील एका पशुवैद्यक तरुणीवर हा भयानक प्रसंग ओढवला आहे. आपली ड्युटी संपवून ती घरी परतली आणि संध्याकाळी परत कामावर गेली. नेहमीप्रमाणे आपली स्कूटी तिने एका जागी लावली आणि तेथून ती शेअर-अ-कॅब करून कामावर पोचली. काम संपवून आल्यावर स्कूटी घ्यायला गेली, तर स्कूटीचे चाक पंक्चर झाले होते. एवढ्यात तिला मदत करायला म्हणून एकजण आला. दरम्यान, तिने आपल्या बहिणीला फोन लावला होता. तिला कदाचित संभाव्य धोक्याची कल्पना आली असावी. पण तोपर्यंत त्या नराधमांनी डाव साधला होता. त्या एकाचे चार झाले आणि त्यांनी तिला आडबाजूला नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ती ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबून धरले, त्यातच गुदमरून ती मरण पावली. एवढे करून त्यांचे समाधान झाले नाही, त्यांनी तिचा मृतदेह टेम्पोमध्ये घालून निर्जनस्थळी नेला व त्यावर पेट्रोल, डिझेल टाकून तो जाळून टाकला. दरम्यान या मुलीच्या बहिणीने व कुटुंबीयांनी पोलिसांबरोबर संपर्क साधला. त्यानंतर आठ तासांत पोलिसांनी या चारही आरोपींना पकडले. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिस तपासात आणखी संतापजनक गोष्टी समोर आल्या आहेत. या चौघांनी हा गुन्हा अगदी थंड डोक्याने व नियोजनपूर्वक केल्याचे उघड झाले आहे. आठ-पंधरा दिवस हे चौघे तिच्या पाळतीवर होते. तिचा दिनक्रम त्यांनी बघितला होता. त्याप्रमाणे त्या दिवशी त्यांनीच तिच्या गाडीचे चाक पंक्चर केले होते.. व पुढील सगळा प्रकार निर्दयीपणे केला. 

साहजिकच या प्रकाराबद्दल संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. बायका, मुली आपल्या देशात आजही सुरक्षित नाहीत का? असे प्रश्‍न विचारले जात आहेत. प्रचंड संताप आणि त्याबरोबरच आपल्या स्वतःबद्दल, आपल्या लेकीबाळींबद्दल प्रचंड काळजी अशा संमिश्र भावना महिलांच्या आणि पुरुषांच्या मनातही या घटनेने निर्माण केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा घटना सर्रास होत असतील, तर महिला कुठे सुरक्षित आहेत? असे प्रश्‍न मनात आल्यावाचून राहात नाही. 

अशा घटना घडल्यानंतर काही प्रश्‍न हमखास विचारले जातात. तिने मदत का मागितली नाही? ती ओरडली का नाही? तिचे वागणे आक्षेपार्ह असेल. तिने तोकडे कपडे घातले असतील... वगैरे वगैरे.. या संबंधित घटनेबाबत सुदैवाने अजून तरी कोणी असले वाह्यात प्रश्‍न उपस्थित केलेले नाहीत. पण ‘तिने बहिणीला फोन करण्याऐवजी पोलिसांना फोन केला असता तर ती वाचू शकली असती,’ असे तारे त्या राज्याच्या मंत्र्यांनी तोडले आहेत. त्यावर खूप टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली. पण अजूनही केवळ मुलींवरच अशी टीका टिप्पणी का होते, याचे कारण काही कळत नाही. संपूर्ण समाजाचा तोल सांभाळण्यासाठी महिलांनीच ‘चांगले’ वागायला हवे, पुरुषाची काही जबाबदारीच नाही. त्याने कसेही वागावे, काहीही करावे, असाच काही अपवाद वगळता एकूण समाजाचा दृष्टिकोन दिसतो. यामुळेच मुली अजूनही बळी जात आहेत. कधी त्या वासनेच्या शिकार होतात, कधी हुंडाबळी ठरतात, कधी गर्भातच खुडल्या जातात... हे थांबणार कधी; थांबणार की नाही? सगळे प्रश्‍न अनुत्तरितच वाटू लागतात. 

मात्र, वाटले तरी हे प्रश्‍न अनुत्तरित राहता कामा नयेत. त्यावर उत्तरे शोधायलाच हवीत. या घटनेनंतर या चौघांना जिवंत जाळावे, अशी प्रतिक्रिया संबंधित मुलीच्या आईने दिली. ती स्वाभाविकच म्हणावी लागेल. आपल्या मुलीचा असा करुण अंत कोणत्या मातेला सहन होईल? इतर अनेकांनीही अशाच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चारचौघांत त्यांना शिक्षा व्हावी इथपासून ते त्यांना जाळून मारावे, त्यांचा तो अवयवच कापून टाकावा, त्यांचे हात-पाय-डोळे काढावेत इथपर्यंत अनेक शिक्षा अनेकांनी सुचवल्या. त्या चौघांनी केलेला गुन्हाच तेवढा गंभीर आहे. पण अशा शिक्षांनी नेमके काय साध्य होणार, हा प्रश्‍न तसाच कायम राहतो. त्यामुळे पुढे अशा घटना घडणार नाहीत, याची काही हमी आहे? आतापर्यंत अशा इतक्या घटना घडल्या, त्यामध्येही थोड्याफार फरकाने अशाच प्रतिक्रिया आल्या, पण परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही, हेच हैदराबादच्या या घटनेने पुन्हा सिद्ध केलेले आहे. 

याचा अर्थ यावर काहीच उपाय नाही, यातून आपण काहीच मार्ग काढू शकत नाही असा अजिबात नाही. पण हा उपाय पटकन होईल असाही नाही. हा उपाय करण्यासाठी समाजाने आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. स्त्रियांना दुय्यम लेखणे बंद करायला हवे. त्याचबरोबर मुलग्यांचे - पुरुषांचे अति लाड करणे बंद केले पाहिजे. तो करेल ते सगळे चांगलेच, ही वृत्ती बदलायला हवी. त्याचे सगळे गुन्हे झाकता कामा नये. याचाच अर्थ असा, की मुलीचे वर्तन ‘चांगले’ असावे यासाठी जी ‘काळजी’ घेतली जाते, तसे मुलग्यांच्या बाबतीतही असावे; किंबहुना ते अधिक असावे. कारण घराणे केवळ मुलींच्या वर्तणुकीने नाही, मुलग्यांच्या वागण्यानेही बदनाम होते. मुलग्यांवर संस्कार करायला हवेत. 

अर्थात ही गोष्ट वेळ घेणारी आहे. तोपर्यंत मुलींनी स्वतःचे रक्षण करण्याचे शिक्षण घ्यायला हवे. पालकांनीही तिला घरात डांबण्याऐवजी तिच्या पाठीशी ठाम उभे राहायला हवे. त्यामुळेही समाजावर दबाव वाढतो. मुख्य समाजानेच बदलाची सुरुवात करून आपल्या मुलीबाळींना सुरक्षित करावे, ही अपेक्षा फार मोठी नसावी.   

संबंधित बातम्या