मुलांच्या भावविश्‍वासाठी 

ऋता बावडेकर
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

संपादकीय
 

कोणत्याही माणसासाठी, त्याच्या विकासासाठी, त्याच्या मनःस्वास्थ्यासाठी कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय महत्त्वाचे असते. ते असेल, तर कोणत्याही आघाडीवर लढण्यासाठी तो तयार असतो. कोणत्याही संकटाचे त्याला काहीही वाटत नाही. पण तेच नसेल, तर त्याची फारच केविलवाणी अवस्था होते. या कुटुंबकलहामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. काही जण आपला संसार तसाच रेटतात, तर बरेच जण घटस्फोटाचा पर्याय निवडून स्वतःच्या, आपल्या जोडीदाराच्या, मुलांच्या, इतर कुटुंबीयांच्या मनःस्वास्थ्याला प्राधान्य देतात. रोजची भांडणे टाळतात, त्यामुळे संपूर्ण घरावर होऊ शकणारे विपरित परिणाम टाळतात. पण हे सगळे व्यवस्थित पार पडते, तोपर्यंत ठीक आहे. पण घटस्फोटानंतरही जोडीदारापैकी एकाने जरी आडमुठी भूमिका घेतली, तरी हे मनःस्वास्थ्य क्षणात जाऊ शकते. संबंधित व्यक्तींना तर त्रास होतोच, पण त्यांच्या मुलांनाही हा त्रास होऊ शकतो, किंबहुना होतो. वाईट गोष्ट म्हणजे, या मुलांचाच ढाल म्हणून वापर केला जातो. मात्र आता तसे करताना संबंधितांना विचार करावा लागणार आहे. न्यायालयानेच तसा आदेश काढला आहे. 

संसारातील कुरबुरी, वाढते मतभेद टाळण्यासाठी अनेकदा जोडपी घटस्फोटाचा पर्याय निवडतात. आपल्या वादाचा परिणाम मुलांच्या विकासावर होऊ नये असाही एक उद्देश त्यामागे असतो. काही जोडपी आपल्या मुलांचा अगदी चांगला विचार करतात आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वागतात. पण अनेक जोडप्यांच्या बाबतीत तसे होत नाही. न्यायालयाने ताबा देऊनही ते आपल्या जोडीदारांना मुलांना भेटू देत नाहीत. उदाहरणार्थ, मुलाचा (मुलगीही आहे) ताबा आईकडे असेल, तर न्यायालयाचा आदेश असूनही ती आपल्या मुलाला त्याच्या वडिलांना भेटू देत नाही किंवा आदेश असूनही अनेकदा वडीलच आपल्या मुलांना भेटायला येत नाहीत. या गोष्टी मुलांच्या वाढदिवसाच्या वेळी अधिकतर होतात. न्यायालयाने निर्णय दिलेला असतो, संध्याकाळी ३ ते ५ दरम्यान मूल त्याच्या वडिलांकडे राहील किंवा या वेळात वडील त्याला भेटू शकतील. पण आई तसे होऊ देत नाही. बरेचदा वडीलच मुलाला भेटायला येत नाहीत. तसेच दर आठवड्याला शनिवार-रविवार वडिलांसाठी राखीव ठेवलेला असतो. पण आई तसे होऊ देत नाही. न्यायालयात याबाबत पुन्हा पुन्हा तक्रार करूनही अनेकदा या परिस्थितीत फरक पडत नाही. हे सगळे बघता, न्यायालयाने भेटीची परवानगी दिल्यानंतरही मुलांना भेटण्यास मज्जाव किंवा टाळाटाळ करणाऱ्या संबंधित आई किंवा वडिलांना तीन हजार रुपये दंड करण्याचा निर्णय पुण्यातील शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाने नुकताच दिला आहे. ज्या पालकांकडे मुलांचा ताबा नाही आणि ज्यांना मुलांचा सहवास हवासा वाटतो, त्यांना न्यायालयाच्या या आदेशामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे. 

रोजची भांडणे, कटकटी टाळण्यासाठी अनेक जोडपी घटस्फोट घेत असली, तरी घटस्फोट ही गोष्ट वाईटच. विवाहामुळे दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंबे एकत्र येतात, असे आपण मानतो. त्यामुळे या घटस्फोटाचा परिणाम दोन व्यक्तींबरोबरच दोन कुटुंबांवरही होत असतो. त्याची सगळ्यात मोठी झळ या जोडप्याच्या मुलांना बसते. मुलांच्या वाढीच्या वयात त्यांना आई आणि वडील अशा दोघांच्याही प्रेमाची आवश्‍यकता असते. ते मिळाले तर या मुलांची निकोप वाढ होऊ शकते. यासाठी अनेक जोडपी आपले मतभेद मिटवून किंवा लपवून मुलांसाठी एकत्र राहतात. अर्थात प्रत्येकवेळी अशा तडजोडी करणे पालकांना शक्य असतेच असे नाही. त्यामुळे नाईलाजाने ते घटस्फोटाचा पर्याय निवडतात. अशावेळी दोन्ही पालकांचा समजूतदारपणा आवश्‍यक असतो. लांब राहूनही मुलांचा विचार प्राधान्याने केला, तर तोही मुलांपर्यंत पोचू शकतो. पण जुने हिशेब पूर्ण करण्यासाठी जर मुलांचा वापर केला, तर मात्र त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात, किंबहुना होतात. त्यामुळे आपले काय मतभेद असतील ते पालकांनी आपसात मिटवावेत, मुलांचे भावविश्‍व त्यासाठी पणाला लावू नये. आपण त्यांचे जन्मदाते असलात, तरी तसे करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही, हे लक्षात घ्यावे. 

आईवडील एकत्र असतील तर मुलांचा विकास व्यवस्थित होतो, हे खरेच. पण ते सतत भांडत असतील. त्यांच्यात सतत वाद होत असतील, चिडचिड होत असेल; तर मात्र पालकांनी सामोपचाराने वेगळे झालेले चांगले, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. मात्र नंतरचे वातावरण शांत असावे. मुलांच्या विकासाला पोषक असावे. दोन्ही पालकांच्या पालकत्वाची कसोटी इथे सुरू होते. एकत्र राहताना पटले नसले, तरी वेगळे झाल्यानंतर पालक परस्परांशी सामंजस्याने वागू शकतात. मुलांच्या मनःस्वास्थ्यासाठी तेच आवश्‍यक असते. आई काय किंवा बाबा काय, मुलांसाठी दोघेही तेवढेच महत्त्वाचे असतात. हे दोघे त्यांची भावनिक गरज असते. ते पालकांनी ओळखायला हवे. 

वास्तविक, संपूर्ण कुटुंब हेच मुलांची भावनिक गरज असते. त्यांच्या या कुटुंबात आईवडिलांबरोबरच आजी, आजोबा, काका, आत्या, मामा, मावशी, भावंडे... अशी सगळी नाती येतात. पण आता बदलत्या परिस्थितीमुळे अशी एकत्र कुटुंबे फारशी दिसत नाहीत. पण दूर राहूनही हे सगळे नातेसंबंध जपता येतात. अपवादात्मक उदाहरणांत हे नातेसंबंध जपलेलेही दिसतात. पण प्रामुख्याने यावर फारसा विचार होत नाही, असेच दिसते. दुर्दैवाने नाती जोडण्यापेक्षा तोडण्यावरच अधिक भर दिसतो. आई वडिलांचेच नाते जिथे लोक तोडायला निघालेले दिसतात, तिथे इतर नात्यांची काय पत्रास! कमालीचा अहंकार, दर्प हेच यामागचे मुख्य कारण आहे. 

शेवटी काय, परस्परांचा विचार नाहीच केला, तरी आपल्या अपत्यांचा - आपल्या मुलांचा विचार पालकांनी जरूर करावा. आपली खेळी आपण खेळलेलो असतो किंवा खेळत असतो. तुम्ही एकत्र राहा वा वेगळे; मुलांना त्यांचे आयुष्य स्वतःला जगायचे असते. त्यासाठी ते शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या खंबीरच असायला हवेत. त्यांना तसे करणे हे केवळ पालकांच्याच हातात असते, एवढे जरी लक्षात ठेवले, तरी त्यांच्या भावविश्‍वाशी आपण खेळणार नाही आणि कोणाला खेळूही देणार नाही.   

संबंधित बातम्या