‘युवतीराज’च्या निमित्ताने... 

ऋता बावडेकर
सोमवार, 23 डिसेंबर 2019

संपादकीय
 

आत्तापर्यंत महिलांविषयी भलेबुरे खूप लेखन झाले आहे. त्यातही बुरेच अधिक आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. बुरे या अर्थाने, की महिलांवर काही अन्याय झाला, त्यांच्यावर अत्याचार झाला, त्यांचे शोषण झाले, की त्याविषयी खूपजण व्यक्त होतात. ते योग्यही आहे. घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केलाच पाहिजे. त्यातून कोणी शहाणपण घेतले तर त्याचे स्वागतच असते. मात्र, महिलांच्या कर्तृत्वाविषयी, त्यांच्या कामगिरीविषयी फारसे काही लेखन प्रसिद्ध होताना दिसत नाही. याचा अर्थ त्यांच्याबाबतीत असे चांगले काही घडत नाही असे नाही, पण प्रमाण नक्कीच कमी असते. मात्र अधूनमधून अशा चांगल्या बातम्या येत असतात, हेही तितकेच खरे. आताही अशीच एक बातमी आली आहे, फिनलंडमधील युवतीराजबद्दल! 

युरोपातील फिनलंडमधल्या सत्ताधारी आघाडीतील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या सना मरिन यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थिकेंद्री शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या फिनलंड या देशाची सूत्रे सना मरिन या ३४ वर्षांच्या युवतीच्या हाती आली आहेत. त्या जगातील सर्वांत तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. युरोपीय देशाच्या २०० सदस्यांच्या या संसदेत पाच पक्षांच्या आघाडीच्या सरकारचे नेतृत्व त्यांच्याकडे असून, उर्वरित चारही पक्षांचे प्रमुखही महिला आहेत आणि त्यातील तिघी पस्तिशीच्या आतील आहेत. फिनलंडला महिला पंतप्रधान मिळण्यासाठी एकविसावे शतक उलटले असले, तरी तेथील राजकारणात महिलांचे प्रमाण मात्र उत्तरोत्तर वाढत आहे. 

मरिन या वयाच्या विसाव्या वर्षी राजकारणात आल्या. नंतरच्या पाच वर्षांत त्यांनी पालिका निवडणुकीत केवळ विजयच मिळवला नाही, तर महापालिकेचे नेतृत्वही त्यांनी केले. २०१५ मध्ये त्या खासदार झाल्या. यंदा मे महिन्यातील निवडणुकीतही त्या जिंकल्या. या सरकारमध्ये त्या परिवहन मंत्री होत्या. आता त्या पंतप्रधान झाल्या आहेत. ‘मी माझ्या वयाचा किंवा स्त्री-पुरुष असण्याचा विचार करत नाही. मी राजकारणात का आले, मतदारांनी मला का निवडून दिले, याचा विचार मी करत असते. जेथे प्रत्येक माणूस सन्मानाने राहू शकेल आणि मोठा होऊ शकेल, असा समाज मला घडवायचा आहे,’ सना मरिन यांचे हे म्हणणे खूप आश्‍वासक आहे. 

फिनलंडमधील ही राजकीय परिस्थिती बघता नकळतपणे भारताच्या राजकीय परिस्थितीबद्दल मनात विचार येतोच. आपल्याकडेही महिलांना राजकारणात संधी देण्यात येते. त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात येतात. पण किती महिला राजकारणी आपले काम चोख बजावतात, हा संशोधनाचाच विषय आहे. खूप थोड्या महिला राजकारणी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असतात. मतदारांना दिलेल्या शब्दाला जागत असतात. गावपातळीवर मात्र असे चित्र अभावानेच दिसते. काही अपवाद वगळता, महिला नावापुरत्या एखाद्या विशिष्ट पदावर असतात. त्यांच्याऐवजी त्यांचा नवरा, भाऊ, वडील वगैरेच कारभार पाहात असतात आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या महिलांना त्यात काही वावगेही वाटत नाही. एखाद्या अपवादात्मक घटनेत एखाद्या महिलेला कारभार करण्याची इच्छाही असते. पण ‘तुला त्यातले काय कळते? ती पुरुषांची कामे आहेत,’ असे म्हणून तिला काम करू दिले जात नाही. तिला प्रचंड मानसिक, भावनिक त्रास दिला जातो. त्यातूनही आपली जबाबदारी चोख पार पडणाऱ्या महिलाही असतात, पण अशी उदाहरणे फारच विरळा, नगण्यच! 

गावपातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर कारभार करण्याची धमक, क्षमता महिलांमध्ये नसते, असे अजिबात नाही. पण त्यांना काम करू न देण्याची प्रामुख्याने दोन कारणे असतात. पहिले कारण म्हणजे, कोणते काम कोणी करावे याबद्दल आपले विचार अगदी ठाम आहेत. त्यामुळे ही पुरुषांची कामे, ही स्त्रियांची कामे अशी विभागणी आपणच करून टाकली आहे. या मानसिकतेत बदल करण्याची क्वचितच कोणाची तयारी असते. दुसरे कारण या मानसिकतेशीच जोडलेले आहे, ते म्हणजे, आपल्या समाजात पुरुषाला नेहमीच स्त्रीपेक्षा वरचे स्थान मिळालेले आहे. तो श्रेष्ठ! त्यामुळे एखादी महिला वरचढ ठरलीच, तर तो पराभव पुरुषाच्या अधिक जिव्हारी लागतो. त्यामुळे अशी वेळच येऊ न देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. 

खरेतर हे दोन्ही आपल्याच मनाचे खेळ आहेत. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हे कोणी ठरवले? का ठरवले? त्यामागे काही तर्क आहे का?.. या कोणत्याच प्रश्‍नाला ठोस उत्तर नाही. कोणाला तरी वाटले आणि तो प्रघात झाला, इतकेच! वास्तविक त्यात बदल व्हायला हवा, पण बदल दूरच हा मुद्दा विचार करायला घ्यावा असेही कोणाला वाटत नाही. निर्णय कोण घेते, राज्य कोण चालवते; यापेक्षाही खरेतर या निर्णयांमुळे फायदा होतो का? समाजाच्या दृष्टीने तो हितकारक आहे का? या मुद्द्यांवर विचार व्हायला हवा. पण अशा महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी आपण दुय्यम गोष्टींनाच महत्त्व देत बसतो. यामुळे कोणाचे वैयक्तिक नुकसान होतेच, पण समाजाचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे दुसऱ्या देशाचे कौतुक करत असतानाच आपल्या देशाच्या भल्याचाही विचार करावा. आपली मानसिकता बदलावी. 

संबंधित बातम्या