मुली इतक्या नकोशा का? 

ऋता बावडेकर
सोमवार, 30 डिसेंबर 2019

संपादकीय
 

सर करण्याचे एकही क्षेत्र मुलींनी सोडलेले नाही. अगदी अवकाशालाही गवसणी घातली आहे. त्यांच्या या कामगिरीचे अर्थातच सगळ्या स्तरावर कौतुक होते. या सगळ्या कर्तृत्ववान महिला-मुलींकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन इतर मुलींना केले जाते. ते रास्तच आहे. पण हे झाले सार्वजनिक जीवनातील कौतुक; प्रत्यक्ष आयुष्यात एकूणच मुलींच्या वाट्याला कौतुक येते का? त्यांना त्यांच्या आवडीनिवडी जपता येतात का? त्याप्रमाणे आपले आयुष्य कसे असावे, हे ठरवता येते का? यातील अनेक प्रश्‍नांची उत्तरे नकारार्थीच येतात. एवढेच कशाला कित्येक मुलींना तर जन्मही नाकारला जातो.. कारण काय, तर ती मुलगी आहे... मुलींबद्दलच्या या प्रचंड विरोधाभासाला काय म्हणायचे? 

काही दिवसांपूर्वी पुण्यातील विश्रांतवाडी भागातील एका कचराकुंडीत एक नवजात मुलगी सापडली. नुकतेच जन्मलेले हे बाळ कोणीतरी कपड्यात गुंडाळून कचराकुंडीत फेकून दिले होते. सकाळी त्या भागातील कचरा गोळा करण्यासाठी कर्मचारी आले. त्यापैकी लक्ष्मीबाई ढेमरे त्या कचराकुंडीपाशी आल्या. नेहमीप्रमाणे कुंडीतील कचरा त्या काढू लागल्या, तेव्हा त्यांना ते कापड दिसले. पण आत काय आहे, याची त्यांना कल्पनाच आली नाही. हा कचरा ओला की सुका, हे त्यांना कळले नाही आणि त्यांनी ती गुंडाळी सुक्या कचऱ्यात ठेवली. पण त्यातून दुर्गंध येत होता, त्यांना तो मांसाहारी कचरा वाटला; पण तेवढ्यात त्या गुंडाळीत काहीतरी हलले, आवाजही येत होता. ती हालचाल बघून त्या धास्तावल्या. त्यांनी आपल्या सहकाऱ्याला बोलावले. त्यांनी ती गुंडाळी उघडून बघितली, ते आत नवजात बालक होते. या बाळाला कचराकुंडीत कधी ठेवले होते, कल्पना नाही; पण आश्‍चर्यकारकपणे ते जिवंत होते. त्यांनी आपल्या वरिष्ठांना आणि पोलिसांना ही घटना कळवली. जवळच्या सोसायटीत ही बातमी पसरली. सगळे त्या बाळासाठी मदत देत होते. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ससून रुग्णालयात बाळावर प्राथमिक उपचार केले व नंतर अरुण आश्रमाकडे ते बाळ सोपवण्यात आले. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बाळाच्या बाबतीतही काही निर्णय घेतले जातील. 

परक्या मुलाच्या बाबतही कोणी संवेदनशील माणूस असे कृत्य करायला सहसा धजावणार नाही. पण इथे पोटच्या पोराबरोबर असे वागायला कोण धजावले असेल? ‘त्या’ आईचा नाईलाज असेल असे एकवेळ आपण म्हणू, पण तिच्या नात्यागोत्यातील लोकांचे काय? मुलापासून सुटका करून घेण्याचा हा कुठला मार्ग झाला? जिथे बाळाकडे बघितले जाईल, त्याची काळजी घेतली जाईल, अशा रुग्णालयाजवळ, अनाथाश्रमाजवळ हे बाळ ठेवले असते तर समजण्यासारखे होते. पण कचराकुंडीत? याचा अर्थ बाळ जिवंतच राहू नये, असा तर कोणाचा हेतू नव्हता? नसेल? त्यांच्या दुर्दैवाने आणि बाळाच्या सुदैवाने, बाळाची जीवनरेखा बळकट होती. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही ते वाचले. पुढेही या बाळाचा चांगलाच विकास होईल, अशी प्रार्थना; पण असे प्रकार आज - एकविसाव्या शतकात घडत आहेत, हे नक्कीच आपले दुर्दैव आहे. 

या सगळ्या प्रकारात एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे, हे बाळ मुलगी आहे. तिची आई अविवाहित म्हणून तिने ही मुलगी टाकून दिली, असे म्हणता येते किंवा हे बाळ मुलगी आहे म्हणूनच तिला घरच्यांनी टाकून दिले का, हा प्रश्‍नही मनात येतोच. अर्थात ही दोन्हीही कृत्ये अजिबात समर्थनीय नाहीत. उलट त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. त्यातही मुलगी म्हणून या बाळाला अशी वागणूक मिळाली असेल, तर ते अतिशय संतापजनक, चीड आणणारे आहे. 

मुलींची प्रगती बघून त्यांना डोक्यावर घेणारा समाज आणि मुलगी झाली म्हणून तिच्यापासून सुटका करून घेऊ पाहणारा समाज... किती हा विरोधाभास! यातील कोण खरे आणि कोण खोटे? खरे तर हे दोन्हीही तितकेच खरे आहेत... 

विचित्र वाटेल, पण मुलीची प्रगती पाहून समाधानाने आनंद व्यक्त करणारा समाजही तितकाच खरा आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, प्रगती करणारी ‘ही’ मुलगी त्याची कोणीच नसते, ती शेजारच्या घरात जन्मलेली असते. तिची कोणतीच जबाबदारी त्याला घ्यायची नसते. मग नुसते कौतुक करायला काय हरकत आहे? कोणाला ही टीका फार बोचरी वाटेल, पण त्यात तथ्य आहे. मुलीला जन्म देणे, तिला शिकवणे, तिच्यावर योग्य संस्कार करणे, तिला तिच्या पायावर 

उभे राहायला मदत करणे, तिला सक्षम नागरिक बनवणे आणि आपण हयात असेपर्यंत तिची काळजी घेणे... या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत. फार थोड्या लोकांना त्या जमतात. म्हणूनच प्रगती करणाऱ्या, यशोशिखरे गाठणाऱ्या महिलांची संख्या अजूनही कमी आहे. याचा अर्थ, महिलांबाबत सगळेच प्रतिकूल घडते आहे, असे नव्हे. अगदी यशोशिखरे गाठली नसली, तरी त्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या खूप मुली, महिला आज आसपास बघायला मिळतात. हेदेखील आशादायकच चित्र आहे. हे सगळे बघून आज ना उद्या प्रगती करणाऱ्या महिलांची संख्या वाढणार, ही खात्री पटते. त्यामुळेच केवळ समाज काय म्हणेल म्हणून; मुलीला सगळ्या संधी नाकारल्या, नवजात मुलीला टाकून दिले किंवा तिला जन्मच नाकारला अशा बातम्या कानावर पडल्या, वाचायला मिळाल्या, की मनात येतेच - मुली अजूनही नकोशा का? वास्तविक, मुलींनीच आईवडिलांचा सांभाळ केल्याचीही अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला बघतो, तरीही मुली का नकोत? समाजानेच अंतर्मुख होऊन विचार करायला हवा...   

संबंधित बातम्या