संतापजनक 

ऋता बावडेकर
सोमवार, 27 जानेवारी 2020

संपादकीय
 

लहान असो वा मोठी; मुली - बायकांवरील अन्याय, अत्याचार संतापजनकच असतात. हा प्रकार अधिक निंदनीय की तो, अशी तुलनाच करता येत नाही. अत्याचार हा अत्याचारच असतो. त्यावर टीका व्हायलाच हवी आणि या महिलांना न्याय मिळायलाच हवा. अशाच संतापजनक दोन घटना मराठवाड्यात नुकत्याच घडल्या आहेत. या घटनांचा कितीही तीव्र शब्दांत निषेध केला तरी तो कमीच पडेल. 

गतिमंद मुलांच्या बसमध्ये घुसून एका आठ वर्षांच्या गतिमंद मुलीचा विनयभंग करण्याची घटना नुकतीच औरंगाबाद येथे घडली आहे. औरंगाबादेतील विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल वाहनचालकाने त्याच्या दोन साथीदारांसह गतिमंद मुलीबरोबर अश्‍लील वर्तन केले. एवढेच नव्हे तर या प्रकाराचा व्हिडिओही त्याने काढला व त्याच्या त्या मित्रांनी तो समाजमाध्यमांवर व्हायरल केला. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता, ती क्लिप व्हायरल झाल्यामुळे त्याबाबत लोकांना कळले व काही लोकांनी त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला तशी माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्कूलवाहनचालक अविनाश कैलास शेजूळ (वय १९) याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून त्याच्या इतर दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा सगळा प्रकारच भयानक आहे. शाळेत येता-जाताना एके ठिकाणी थांबून हा वाहनचालक व त्याचे साथीदार सगळ्याच मुलांना त्रास देत. त्यांना मारहाण करत. या मुलीचा विनयभंगही त्यांनी केला. आठ वर्षांची ही मुलगी आरडाओरडा करत होती. पण त्यांना कसलीही दयामाया आली नाही. हा सगळा प्रकार नेमका किती दिवस सुरू होता, कल्पना नाही. पण ही मुले कुठल्या दिव्यातून जात असतील याची कल्पनाही करवत नाही. शनिवारी (ता. १८) सकाळी प्रार्थनेच्या वेळी एका मुलाने त्याच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी शिक्षकांना दिली. ‘व्हॅनवाला छोट्या मुलांना कापून, मारून टाकण्याची धमकी देतो. त्यांना चिमटे काढतो’ असे या चिठ्ठीत लिहिले होते. त्यावरून या मुलांबरोबर काय सुरू होते, याचा अंदाज येतो. 
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात घडलेला प्रकारही एवढाच निंदनीय आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातील नृत्याचा व्हिडिओ दाखवतो म्हणून सातवीत शिकणाऱ्या एका मुलीला शाळेतील सहशिक्षक रसूल सय्यद आणि दयानंद राजुळे यांनी एका खोलीत नेले व खोली बंद केली. तेथे त्यांनी तिला अश्‍लील चित्रफिती व छायाचित्रे दाखवून तिच्यावर अत्याचार केला. कुठे बोलायचे नाही, अशी धमकीही दिली. तरी तिने झाला प्रकार आईला सांगितला. मोलमजुरी करणाऱ्या या आईला मुख्याध्यापक, प्राचार्य यांनीही गप्प राहायला सांगितले. पण ग्रामस्थांच्या सांगण्यावरून आईने तक्रार दाखल केली व संबंधितांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू आहे. 

या दोन्ही प्रकारांची तीव्रता लिहिले - वाचले यापेक्षा कितीतरी तीव्र आहे. गतिमंद मुलीचा व्हिडिओ तर कुठल्याही संवेदनशील माणसाला बघवणार नाही. कोणाला अतिशयोक्तीही वाटेल, पण याबाबत ऐकतानाही संतापाने हाताच्या मुठी वळल्या जातात, मन सुन्न होते. काही काळ ठोके थांबतात... काय समजतात हे गावगुंड आपल्या लेकीबाळींना? कुठलीही बाई, मुलगी त्यांना स्वतःची प्रॉपर्टी वाटते की काय? कोणत्या जोरावर ते इतक्या नीच पातळीला जाऊन असा विकृत त्रास देऊ शकतात? ही मग्रुरी येते कुठून? हे सगळे लक्षात घेऊनच ‘सकाळ साप्ताहिक’मध्ये आम्ही डॉ. वैशाली देशमुख यांचे ‘आजकालची मुले’ हे सदर सुरू केले आहे. पौगंडावस्थेतील मुले (सगळीच नव्हेत) असे का वागतात, हे त्यातून कळेल. सर्व स्तरांतील मुलांनी तर हे सदर वाचावेच, पण त्यांच्या आईवडिलांनी - वडिलधाऱ्यांनी ते नक्कीच वाचावे. खूपदा आपल्याला या वर्तणुकीचे कारण कळत नाही, कालांतराने तो विषयही मागे पडतो. पण तसे व्हायला नको. या सदरातून डॉ. देशमुख खूप चांगले मार्गदर्शन करतात. त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. 

या दोन्ही घटना बघितल्या, तर एक गोष्ट लक्षात येते, ती ही की दोन्ही घटनांत अत्याचारांना बळी पडलेल्या मुली किंवा मुले लहान आहेत. दुसऱ्या घटनेतील मुलीचा तर सामाजिक स्तर कमी आहे. पहिल्या घटनेतील मुले केवळ लहानच नाही, तर ते गतिमंद, आत्ममग्न, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात झालेले वगैरे आहेत. ते किंवा सातवीतील ती मुलगी काय प्रतिकार करणार? पहिल्या घटनेतील मुलांना तर कशाचाच गंध नाही. यामुळेच या दोन्ही घटनांबद्दल वाचताना हृदय अक्षरशः पिळवटून जाते. त्यांचा काय दोष आहे? 
दोन्हीपैकी कोणती घटना अधिक निंदनीय, हे ठरवणे मुश्कील आहे. पहिल्या घटनेत अल्पवयीन मुले आहेत, तर दुसऱ्या घटनेत शिक्षकांचाच सहभाग आहे. आईवडिलांनंतर मुलांवर संस्कार करणारा घटक म्हणून शिक्षकांकडे अजूनही बघितले जाते. इथे तर शिक्षकच शिकारी झाले आहेत. मुलांनी काय करायचे? ज्यांच्यावर संस्कार करण्याची, नवीन पिढी तयार करण्याची जबाबदारी आहे. त्यांचा अशा नीच घटनेत सहभाग असावा, यापेक्षा दुर्दैव ते आणखी कुठले?

या दोन्ही घटनांतील (खरे तर अशा सर्वच घटनांतील) दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पहिल्या घटनेतील आरोपी तर अल्पवयीन आहेत. खरे तर यावरही विचार व्हायला हवा. गुन्हा करताना आपले वय काय याचा विचार ही मुले करत नाहीत. पण शिक्षेची वेळ येते तेव्हा, याच वयाची ढाल केली जाते. विचारवंतांनी, समाजाने यावर गंभीरपणे विचार करायला हवा. त्यावर कठोर उपाय शोधायला हवेत. अल्पवयीनच काय, कोणीच अशी कृत्ये करू धजणार नाही, अशी उपाययोजना करायला हवी. मुलींना, बायकांना न घाबरता जगता यायला हवे...

संबंधित बातम्या