बदलाचे स्वागतच! 

ऋता बावडेकर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

संपादकीय
 

पुरुष म्हणजे असे, पुरुष म्हणजे तसे.. विशेषतः भारतीय पुरुषांबद्दल, असे आपले काही ठोकताळे असतात. बरेचवेळा ते खरेही असतात; पण अनेक पुरुष ते खूपवेळा खोटेही ठरवतात. त्यांच्या बरोबरच्या मंडळींना तो एक सुखद धक्का असतो. पण असे होते; विशेषतः स्वयंपाकाच्या बाबतीत असे होताना दिसते. पुरुष म्हणजे त्याला स्वयंपाक करण्यात रस नसणारच हा सर्वांचा एक आवडता अंदाज असतो. तो बहुतांश वेळा खराही असतो, पण अलीकडे तो अनेकदा चुकतो आहे, असे लक्षात येऊ लागले आहे. 

आवडीने म्हणा किंवा गरज म्हणून म्हणा, पुरुष स्वयंपाक घराकडे वळताना दिसत आहेत. अर्थात, हा काही आजचा बदल नव्हे, खूप वर्षांपासून हा बदल होतो आहे, पण बदलाची गती कमी होती म्हणा किंवा त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही म्हणा; पण हा बदल तितकासा लक्षात आला नव्हता. समाजमाध्यमांचे जे फायदे आहेत, त्याचा फायदा झाला आणि पुरुषांतील हा बदल सगळ्यांच्या लक्षात येऊ लागला. अर्थातच हा बदल स्वागतार्हच आहे. त्यामुळे तोही स्वावलंबी होतो आहे, हा त्यातील मोठा भाग आहे. 

खरेतर स्वयंपाक घर ही काही स्त्रियांची मक्तेदारी नव्हे. पण पूर्वी स्त्री घरातच असे, स्त्रियांनी बाहेर जाऊन काम करण्याची तेव्हा पद्धतच नव्हती. साहजिकच घर, घरांतील कामे अशी सगळी जबाबदारी तिच्यावर पडली. बाहेरची कामे पुरुष करत. तेव्हाची ही पद्धत होती. पण काळ बदलला तरी या पद्धतीत काही बदल झाला नाही. गरजेमुळे स्त्रिया नोकरी करू लागल्या, पण स्वयंपाक-पाण्याच्या जबाबदारीतून काही तिची सुटका झाली नाही. किंबहुना अनेक ठिकाणी तर, गरज असूनही - घरही सांभाळीन या आश्‍वासनावरच तिला नोकरी करण्याची परवानगी मिळू लागली. तिनेही ती मान्य केली, पण एकविसाव्या शतकातही तिची या जबाबदारीतून अद्याप पूर्णपणे सुटका झालेली दिसत नाही. काही अपवाद नक्कीच असतील, पण अजूनही घरचे सगळे करून नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्य खूप आहे. या ‘घरचे सगळे’मध्ये खूप गोष्टी येतात. ही कामे कधीही संपणारी नसतात. तरी स्त्रिया ते निमूट करत असतात; पण कधीतरी ठिणगी उडतेच, आणि प्रश्‍न ऐरणीवर येतो. आपापल्या परीने मार्ग काढण्यात येतो, पण उभयपक्षी तो शंभर टक्के मान्य असतो, असे क्वचितच होते. 

उभयपक्षी मान्य असणारा मार्ग निघायला घरांतील मुलांमुळे मदत झाली, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. म्हणजे, मुले (कालांतराने मुलीही) शिकू लागली. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ लागली. काही देशांतच परप्रांतात जाऊ लागली. राहण्याची वगैरे सोय होऊ शकते. खाण्याचे काय? त्याचीही सोय होते, पण कितीही घरगुती म्हटले तरी रोज बाहेरचे खाऊन कंटाळा येतोच. आईच्या, आजीच्या हातच्या स्वयंपाकाची आठवण येतेच. इकडे मुलांचे, तिकडे आई-आजीचे मन खट्टू होतेच. यातून मार्ग काय? तर स्वतःच्या हाताने काही करणे. पण करता काही येत नाही, कारण पुरुषाने कसला स्वयंपाक करायचा? ही मनोवृत्ती! पण गरजेपुढे असले विचार टिकाव धरू शकत नाहीत. आपल्या मुलांचे हाल, त्यांची गरज ओळखून अनेक घरांनी त्यांना घरीच स्वयंपाक शिकवण्याचे मनावर घेतले. अगदी कणीक मळण्यापासून कुकर लावण्यापर्यंत गरजेचे सगळे शिकवले. तरी हे प्रमाण कमीच होते. कारण मानसिकता बदलायला अनेक घरे तयारच नव्हती. अशा घरांतील मुलांनी-पुरुषांनी कुकिंग क्लासचा शोध घेतला. पुण्यातील मेधा गोखले यांनी त्याच सुमारास असा क्लास सुरू केला आणि अनेक पुरुष पाककलेत निपुण होऊ लागले. तरुण मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण यात सहभागी झाले. 

परदेशी - परप्रांतात शिक्षण घेणे हे एक कारण होतेच, पण अनेकांच्या अनेक गरजा होत्या. पत्नीचे आजारपण किंवा मृत्यू, बाहेरचे खाणे पचत नाही इथपासून ते स्वयंपाकाची आवड इथपर्यंत अनेक कारणांनी पुरुष स्वयंपाक शिकताना दिसत आहेत. आजची ही गरज ओळखून ‘सकाळ साप्ताहिका’नेही ‘कुकिंग बिकींग’ हे सदर दोन वर्षे सुरू ठेवले. दही कसे लावायचे, गुरगुट्या भात कसा करायचा ते मसाले भात, बटाटेवडे वगैरे चमचमीत पदार्थ कसे करायचे अशी सगळी माहिती या सदरात देण्यात आली. या सदराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही आजची गरज आहे. कारण काहीही असो, पुरुष स्वयंपाक करू लागला हा चांगला बदल आहे. भले प्रमाण कमी असेल, पण सुरुवात तर झाली. यात आणखी चांगली गोष्ट म्हणजे, स्वतःसाठी म्हणून शिकायला सुरुवात केलेली मुले आपल्या पत्नीचाही विचार करू लागली आहेत. पत्नीला ऑफिसमधून यायला उशीर होतो. तेव्हा आपल्यालाही स्वयंपाक करता आला पाहिजे, म्हणजे ती येण्याआधी स्वयंपाक तयार असेल. तिच्यावरचा ताण कमी होईल. पुरुषाने स्वयंपाक शिकण्यापेक्षाही त्याने पत्नीचा - स्त्रीचा केलेला विचार अधिक मोलाचा आहे. हा विचारही रुजायला हवा. केवळ त्याच्याच मनात नव्हे, तर घरांतील इतर स्त्रियांच्या मनातही तो रुजायला हवा. 

मुख्य म्हणजे, स्वयंपाक करणे हे पुरुषांचे कामच नाही ही मानसिकता सगळ्यांनीच बदलायला हवी. आपल्या मुलीला स्वयंपाक शिकवताना, मुलग्यालाही शिकवायला हवा. 
आजच्या आघाडीच्या शेफ्सच्या मुलाखती ‘सकाळ साप्ताहिका’मध्ये वर्षभर प्रसिद्ध होत होत्या. त्यातील बहुतेक शेफ्सना आपले हे आवडते काम करण्यासाठी घरच्यांचे मन बदलण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. ही परिस्थिती पहिल्यांदा बदलायला हवी. कुठलेही काम लहान किंवा मोठे नसते; तसेच हे काम स्त्रीचे किंवा पुरुषाचे अशीही विभागणी झालेली नसते. आपणच ते करतो. त्यात आता बदल होत आहे, ही गोष्ट स्वागतार्हच म्हणायला हवी.  

संबंधित बातम्या