मुली ही काय खासगी मालमत्ता? 

ऋता बावडेकर
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

संपादकीय
 

आठ वर्षांच्या गतिमंद मुलीचा विनयभंग करून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची घटनेच्या अनुषंगाने या सदरात लेखन करण्यात आले होते. एकाच आठवड्यात दुसऱ्या अशाच घटनांसदर्भात लिहिण्याची वेळ यावी हे दुर्दैवी आहे. आपला समाज मुलींकडे आजही कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, हेच या घटनांतून दिसते. समाजात वावरणाऱ्या मुली - महिला ही आपली खासगी मालमत्ता आहे, असाच भाव यामागे असतो आणि तो अतिशय संतापजनक आहे. हे असे किती दिवस चालणार? 

काही दिवसांपूर्वी जालन्यात अशी एक घटना घडली. एक मुलगा आणि एक मुलगी एका ठिकाणी भेटले. हे कळल्याने गावातील चार मुले त्यांचा माग काढत तिथे पोचले. त्या दोघांना त्यांनी जबरदस्त मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्या मुलीची कॉलर धरून तिच्याशी वाईट वर्तन केले.. आणि आपण काही तरी फार मोठे काम करत आहोत, फार मोठे पाप होण्यापासून वाचवत आहोत या थाटात त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओवरून जालन्यात असा काही भयंकर प्रकार घडल्याचे लक्षात आले. प्रसंगाचे गांभीर्य पाहून पोलिसांनीही त्वरित हालचाल करून तिघांना ताब्यात घेतले. म्होरक्या फरार होता, पण नंतर त्यालाही पकडण्यात त्यांना यश आले. या टोळक्याचा प्रमुख आणि एकजण १९-२० वर्षांचे असून ते विवाहित आहेत. याबाबत काय न्याय मिळतो ते बघायचे. 

दुसरी एक घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात घडली. कामावर निघालेल्या तरुणीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका तरुणाने सोमवारी (ता. ३ फेब्रुवारी) केला. तिला पेटवून तो पळून गेला. एकतर्फी प्रेमातून हे प्रकरण घडले आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे. नागरिकांनी त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यात तिचा संपूर्ण चेहरा जळाला असून तिची वाचा गेली आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान तिला जिवंत जाळणाऱ्या मुलाला पोलिसांनी पकडले आहे. 

पश्‍चिम बंगालमधील एका खेड्यात दोन बहिणींचे हातपाय बांधून त्यांना मारहाण केल्याची घटनाही नुकतीच घडली आहे. आपल्या खासगी जमिनीवर रस्ता करू देण्यास या बहिणींनी विरोध केल्यामुळे जातपंचायतीच्या प्रमुखाने त्यांचे हातपाय बांधून त्यांना रस्त्याने फरपटत नेले व लोखंडी रॉड, सळ्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याची ही घटना आहे. हा प्रमुख सत्ताधारी तृणमूल पक्षाचा आहे. पक्षाने त्याला तातडीने निलंबित केले आहे. 

माहिती झालेल्या या काही घटना आहेत. या एवढ्याच घटना घडल्या असतील असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. जगासमोर न आलेल्या अशा बऱ्याच घटना असू शकतील. त्यामुळे महिलांच्या स्थितीबाबत चिंताजनक परिस्थिती आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. हे अतिशय वाईट प्रकार आहेत. महिलांना अशा प्रकारे टार्गेट करणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. मुलाने आणि मुलीने भेटणे, बोलणे, फिरायला जाणे यात गैर काय? पण आपल्या समाजातील काही घटकांना ते गैर वाटते हे चिंताजनक आहे. वास्तविक असे भेटणे ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. यात ही मुले प्रियकर-प्रेयसीच असतील असे नाही. ते चांगले मित्रमैत्रीणही असू शकतील. पण प्रियकर प्रेयसी असले तरी हरकत काय आहे? त्यांना तो अधिकार आहेच. त्यांच्यावर नजर ठेवण्याचा, त्यांना योग्य मार्गाला लावण्याचा (?) अधिकार इतरांना कोणी दिला? आणि त्यांच्याबरोबर अशा प्रकारे वर्तन करणाऱ्यांचा मार्ग योग्य आहे, हे कोणी ठरवले? त्या मुलीबरोबर जे वर्तन या मुलांनी केले ते पाहता कोणते संस्कार झाले हे दिसतेच. या मुलांना संस्कार शिकवणारे स्वतः किती असंस्कृत आहेत हेही हा व्हिडिओ दाखवतो. मूळात समाज सुधारण्याची जबाबदारी या मुलांवर कोणी सोपवली आहे का? त्यांची तेवढी पात्रता आहे का? सगळेच चीड आणणारे आहे. 

मुला-मुलींनी एकत्र येणे, भेटणे, गप्पा मारणे वगैरे खरे तर खूप स्वाभाविक आहे. पण त्यांना एकत्र बघून ‘सार्वजनिक ठिकाणी असले प्रकार खपवून घेणार नाही’ अशी एक प्रातिनिधीक प्रतिक्रिया अनेकदा बघायला - ऐकायला मिळते. गंभीरपणे विचार केला, तर या मुलामुलींना भेटण्यासाठी आपल्याकडे खरेच जागा असते का? ही मुलेच का, अनेकदा तर पती-पत्नीलाही घरात पुरेसा एकांत मिळत नाही. बागेत किंवा एखाद्या ठिकाणी हे भेटलेच तर आपल्यातील तथाकथित संस्कृतिरक्षक तिथे असतातच. अशावेळी त्यांनी काय करावे? आणि प्रत्येकवेळी एकांत म्हणजे, ते काही विपरितच (?) करत असतील असे नाही. गप्पाही मारत असतील, पण आपल्याला ते सहन होत नाही. ही मानसिकता समाजाने बदलायला हवी. त्यांना शिस्त (?) लावण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलेला नाही हे लक्षात ठेवावे. 

नोकरी, कामानिमित्त मुली घराबाहेर पडू लागल्यालाही जमाना झाला आहे. पण आपल्यातील अनेक जण हे वास्तव अजूनही सहन करू शकलेले नाहीत. तसेच मुलगी आपल्याला नकार कशी देऊ शकते हेही ते सहन करू शकलेले नाहीत. त्यातूनच अंगावर पेट्रोल-रॉकेल टाकून जाळून टाकणे, चेहऱ्यावर ॲसिड टाकणे वगैरे विकृत प्रकार होताना दिसतात. ‘तू माझी नाही, तर दुसऱ्याचीही होऊ शकणार नाहीस’ असे काही तरी छपरी विचार या मुलांच्या मनात असतात. पण आपण काय, आपली लायकी काय, आपण असे काय केले आहे म्हणून मुली आपल्या मागे येतील असे वास्तव विचार यांच्या मनालाही बहुतेक शिवत नाहीत. मुलगी म्हणजे आपली ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’ असेच ते वागत असतात. त्यात सुधारणा झाली, तरी खूप समस्या सुटू शकतील. 

मूळात मुलग्यांवर पहिल्यापासूनच चुकीचे संस्कार होत आले आहेत. त्याला नेहमीच उच्च दर्जा मिळाला आहे. या विचारांना धक्का बसला की त्यांचा अहं दुखावतो आणि तो अहं सुखवावा म्हणून ते वाटेल ते प्रकार करतात. मनातील ही विकृती जाईल तो सुदिन. एका दिवसात तर काही होणार नाही, पण त्या दिशेने प्रयत्न तरी सुरू करायला हवेत. महत्त्वाचे म्हणजे, आपल्या मनातील असले विचार प्रथम काढून टाकायला हवेत, पुढच्या गोष्टी सुकर होऊ शकतील...    

संबंधित बातम्या