अजून किती धडे घेणार? 

ऋता बावडेकर
सोमवार, 2 मार्च 2020

संपादकीय
 

फसवणूक झाल्याच्या संदर्भात सातत्याने बातम्या येत असतात. बरं ही फसवणूक वेगवेगळ्या प्रकारची असते, असे नाही; तरीही त्यातून आपण काही शिकत नाही. वारंवार कोणी ना कोणी मोहात अडकत जाते आणि स्वतःची प्रामुख्याने आर्थिक फसवणूक करून घेत असते. अलीकडे अशी फसवणूक ऑनलाइन व्यवहारांत अधिक होताना दिसते. केवळ हीच फसवणूक नाही, तर भावनांशी खेळून त्यांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून फसवणूक होण्याचे प्रकारही होताना दिसतात. 

पिंपरी-चिंचवडमध्ये नुकतीच अशी घटना घडली आहे. गुप्त धन मिळवून देतो, पुत्रप्राप्ती होईल अशी आश्वासने देत एका भोंदूबाबाने पाच बहिणींवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी संबंधित बाबावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. सोमनाथ कैलास चव्हाण (वय ३२, रा. खैरेवाडी, जि. रायगड) असे त्याचे नाव आहे.  

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी - एका कुटुंबाकडे गेला आणि तुमच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती होऊ नये म्हणून घरातील प्रत्येक सदस्यावर नात्यातील एका महिलेने करणी केलेली आहे. घराच्या एका खोलीत गुप्तधन असून त्यामध्ये सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असा खजिना आहे. तसेच तुमच्या घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे. तुम्हाला पुत्रप्राप्ती होण्यासाठी, गुप्तधन मिळविण्यासाठी आणि एका मुलीचा जीव वाचविण्यासाठी तुमच्या घरामध्ये तीन उतारे आणि नग्न पूजा करावी लागेल. या सगळ्यासाठी ३ लाख रुपये खर्च आणि ११ हजार रुपये दक्षिणा द्यावी लागेल. तीन उतारे तुम्ही १५ दिवसामध्ये सुरू केले नाही, तर तुमच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींच्या जिवाला धोका आहे, अशी त्यांना भीती दाखवली. ज्या मुलीला त्रास होता, तिला आणि तिच्या बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने तो एका खोलीत घेऊन गेला. दार लावून त्याने एका मुलीवर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास आईवडिलांना माझ्या दैवी शक्तीने आणि काळ्या जादूने मारून टाकीन अशी धमकी दिली. उतारा काढताना त्याने या मुलीवर तीनदा बलात्कार केला. तसेच इतर बहिणींवरही बलात्कार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

याशिवाय आर्थिक फसवणुकीच्या बातम्या तर जवळजवळ रोज येतात. त्यातही ऑनलाइन फसवणुकीच्या बातम्या अधिक असतात. 

फेसबुकवरून झालेल्या मैत्रीतून परदेशातून महागडे गिफ्ट, सोने व परकी चलन पाठविण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तींनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांना ३२ लाख रुपयांना फसवल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील कात्रज परिसरात राहणाऱ्या ५९ वर्षांच्या महिलेची फेसबुकवर एका व्यक्तीबरोबर ओळख झाली. तिला भेटवस्तू पाठवल्या आहेत. मात्र दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाने त्या अडविल्याचे त्याने सांगितले. त्या सोडविण्यासाठी त्याने तिला वेळोवेळी १५ लाख रुपये एका बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने पोलिसांत तक्रार दिली. दुसऱ्या घटनेत पुण्यातील विमाननगरमध्ये राहणाऱ्या तीस वर्षांच्या महिलेलाही असाच अनुभव आला. इंग्लंडमध्ये राहात असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने या महिलेस १७ लाख ७४ हजार रुपये एका बँक खात्यात भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिनेही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

अशा अनेक बातम्या आपण जवळजवळ राज्यभरातूनच रोज वाचत-ऐकत असतो. तरीही त्यातून काही शिकत नाही. अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार करताना आपल्याला अजिबात काळजी वाटत नाही? कोणत्या विश्‍वासाने आपण ती व्यक्ती म्हणेल तसे वागत असतो. बरे अशा प्रकरणांमध्ये ती व्यक्ती तोपर्यंत अनेकांनी बघितलेलीही नसते. मग कोणत्या मुद्द्यावर त्या व्यक्तीने इतका विश्‍वास कमावलेला असतो, की आयुष्याची कमाई त्याला देऊन टाकायला आपण तयार होतो? सगळ्यात काळजीची गोष्ट म्हणजे अशी स्वतःचीच फसवणूक करून घेणारे लोक (यात प्रामुख्याने बायकाच असतात) सुशिक्षित असतात. एक-दोन प्रकरणांत तर या महिला ‘आयटी’शी संबंधित होत्या. त्या संबंधित व्यक्तीचा इतका प्रभाव असतो, की डोळे मिटून आपण सगळे व्यवहार करतो? सगळेच अनाकलनीय आहे. 

पहिल्या घटनेतील गुप्तधनाचा संदर्भ तर अधिक चिंताजनक आहे. आजच्या काळातही गुप्तधन, काळी जादू, दैवी चमत्कार या प्रकारांवर विश्‍वास ठेवणारे लोक आहेत, हे काळजी करण्यासारखे आहे. वास्तविक, गुप्तधन, काळी जादू वगैरे गोष्टी नसतातच. असतील तर ती संबंधित व्यक्ती त्या धनाच्या बदल्यात केवळ काही लाख रुपये का घेईल? तो दैवी चमत्कार करू शकतो, त्याला काळी जादू येते, तर तो सगळेच गुप्तधन घेईल ना! असा साधा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. आपण मानसिकदृष्ट्या अजूनही किती कमकुवत आहोत याचे हे निदर्शक आहे. याचाच फायदा गुंड प्रवृत्तीचे लोक घेत असतात. या घटनेत तर पाच बहिणींवर त्याने बलात्कार केला, त्यांच्या आईवडिलांच्या उपस्थितीत; भले ते बाहेरच्या खोलीत असतील! पण आपल्या पाच वयात आलेल्या मुलींबरोबर तो आत काय करतोय, असा विचारही त्या आईवडिलांच्या मनात आला नसेल? गुप्तधन आणि ‘पुत्र’प्राप्ती या गोष्टी त्यापेक्षा महत्त्वाच्या होत्या? आता असेच म्हणावे लागेल. 

तुम्ही सुशिक्षित असा किंवा अशिक्षित; अशा गोष्टींवर आजच्या काळात विश्‍वास ठेवणे यासारखी मोठी चूक नाही. फसवणारी माणसे चुकीचीच आहेत, पण त्यांच्या अशा फसवणुकीला बळी पडणारे आपण अधिक चुकीचे आहोत. डोळ्यावर एवढी कसली पट्टी असते, की सारासार विचार करायला आपण तयार नसतो. आपली फसवणूक करणारी संबंधित व्यक्ती पकडली जाईल, तिला शिक्षा होईल, हे सगळे मान्य; पण त्या दरम्यान आपले जे नुकसान झालेले असते त्याचे काय? ते कसे भरून निघणार? ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. पण आपण काही शिकायलाच तयार नाही, असे या उदाहरणांवरून दिसते. ते बरोबर नाही. कधीतरी आपण शहाणे व्हायलाच हवे ना! अजून किती धडे घेणार?    

संबंधित बातम्या