सोशल मीडियाचा अडसर, की...? 

ऋता बावडेकर
सोमवार, 9 मार्च 2020

संपादकीय
 

सोशल मीडियाची जोरदार चर्चा आहे. व्यक्त होण्यासाठी अनेकांना हे माध्यम खूपच चांगले वाटते. मात्र प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, तशा या माध्यमालाही आहेत. काहींना चांगले वाटणारे हे माध्यम अनेकांना नकोसे वाटते. प्रत्येकाची कारणे असतात, व्यक्तिपरत्वे ती योग्य-अयोग्य ठरतात. तरीही हे माध्यम अजून तरी लोकप्रिय आहे. मात्र याच माध्यमामुळे आपल्या सुखी संसारात वाद निर्माण होतात, अशी काही जोडप्यांची, म्हणजे त्यातील एका जोडीदाराची तक्रार असते. नुकतेच पुण्यात अशा एका प्रकरणासंदर्भात न्यायनिवाडा होऊन मध्यममार्ग काढण्यात आला. 

व्यसन हे कुठलेही वाईटच. मग ते पान, तंबाखू, गुटखा, जुगार, दारू.. असे कसलेही असो. त्याप्रमाणेच सोशल मीडियाचेही व्यसन असू शकते. म्हणजे या माध्यमाचा अतिरेकी वापर कोणी करत असू शकतो. त्यामागे त्याची काही बाजू असू शकते. पण त्याच्या कुटुंबाचीही कारणे असू शकतात. असाच वाद पुण्यातील एका जोडप्यात होता. नवरा आयटीत नोकरी करणारा, बायको बँकेत काम करणारी. घरी आल्यानंतरही नवरा आपला फोनमध्येच, म्हणजे सोशल मीडियातच अडकून पडलेला. त्याच्या मित्रपरिवाराबरोबर गप्पा मारण्यात दंग. तिने त्याच्याबरोबर बोलून बघितले. त्याच्या आईवडिलांनीही त्याला सांगून बघितले. त्यावर, मित्रही कुटुंबाचाच भाग असतात आणि तेवढेच महत्त्वाचे असतात, असे त्याचे म्हणणे. पण आईवडिलांनी समजावल्यावर काही दिवस बरे गेले, मात्र त्यानंतर परत पहिले पाढे पंचावन्न. त्यामुळे बायको त्याच्यापासून वेगळी राहू लागली. तिने घटस्फोटाचा दावा दाखल केला. हे प्रकरण मध्यस्थाकडे गेले. तेथे ॲडव्होकेट प्रगती पाटील यांनी दोघांची भेट घेतली. ‘केवळ टाइमपास करणारे मित्र संसार सांभाळू शकत नाहीत. कुटुंबासाठी आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. प्रत्येकवेळी आपले घर आपला मित्रपरिवार सांभाळणार नाही. त्यासाठी पत्नीच हवी,’ असे त्यांनी नवऱ्याला समजावले; तर ‘तुझा नवरा थोडा सोशल आहे. त्यामुळे त्याच्यावर सतत संशय घेऊ नकोस. मात्र त्याने सोशल मीडियाचा वापर कमी करण्याचे मान्य केले आहे,’ असे बायकोला सांगितले. अशा समुपदेशनानंतर दोघांतील वाद मिटला आणि घटस्फोट टळला. तसे बघितले तर हा वाद क्षुल्लक वाटावा असा होता. पण त्याने इतके गंभीर वळण घेतले. सुदैवाने सामोपचाराने प्रकरण मिटले. 

अशी कितीतरी प्रकरणे असतात. सोशल मीडियाचे नवऱ्याला तरी वेड असते किंवा बायकोला तरी. त्यात ते इतके मग्न असतात, की आवश्‍यक अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यातून वाद निर्माण होतात. वेळीच ते आवरले तर ठीक अन्यथा त्याचे गंभीर परिणाम संबंधित दोघांना आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना भोगावे लागतात. 

वास्तविक सोशल मीडिया वाईट नाही. पण त्याचा ‘सोसल’ इतकाच वापर करायला हवा. तसे केले तर समोरचाही समजून घेऊ शकतो. अशावेळी दोन्ही बाजू समजूतदार असल्या पाहिजेत. कारण नवरा बायको हे नाते असले, तरी त्या पलीकडे जाऊन दोघांच्याही मानसिक, भावनिक गरजा वेगळ्या असू शकतात. दोघांचे विषय वेगळे असू शकतात आणि विषय जरी सारखे असले, तरी परस्परांशी किती वेळ बोलणार? त्यामुळे दोघांनाही मित्रपरिवार हवाच. फक्त हे सगळे किती ताणायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे. दोघांच्या आयुष्यात मित्रपरिवाराचा मर्यादेतील वावर दोघांनाही अवकाश आणि दिलासा देऊ शकतो. ती रेषा ओलांडली की मात्र प्रकरण हाताबाहेर जाऊ शकते. हे भान प्रत्येकाने पाळायला हवे. 

सोशल मीडियाचा, त्या अनुषंगाने मोबाइलचा किती वापर आपण करतो याविषयी अनेक व्यंगचित्रे, टिकटॉक व्हिडिओ आले आहेत. मजा म्हणून बघायला ते ठीक वाटतात. पण प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात असे झाले तर मात्र सहन करणे कठीण असते. 

मात्र, आपण बोलतो तितके हे प्रकरण साधे नसतो. एखादा माणूस या माध्यमाच्या किंवा पर्यायाने मोबाइलच्या इतका आहारी का जातो यामागेही काही मानसिक, भावनिक कारणे असूच शकतात. नव्हे असतातच. ती समजून घेतली पाहिजेत. प्रत्यक्षात कुठलीतरी गरज कमी पडत असणार, म्हणून माणूस दुसरीकडे ती शोधत असणार. कदाचित त्याला हव्या त्या गप्पा समोरचा मारू शकत नसेल. दोघांची वेव्हलेंग्थ जुळत नसेल. ती मानसिक गरज ते इतरत्र शोधत असतील. ते शोधायला हवे. त्यावर मार्ग काढायला हवा. त्यामुळे बऱ्याच समस्या सुटू शकतील. 

व्हिडिओ गेम्स, हा याचाच भाग आहे. घरात संवाद साधायलाच कोणी नसते त्यामुळे मुले या गेम्समध्ये सोबती शोधतात, असेही काही प्रकरणांत आढळलेले आहे. असे खरेच काही असेल, तर त्यांची हा भावनिक गरज कशी भागेल त्यावर विचार व्हायला हवा. ‘आजची पिढी’ किंवा ‘नवरा/बायको सतत मोबाइलमध्ये घुसलेला असतो’ असे केवळ शिक्के मारून काहीही उपयोग होणार नाही. त्यामागची कारणे मुळापासून शोधली पाहिजेत. तरच या समस्येवर (जर ती समस्या असेल तर) उपाय शोधता येतील. हे उपाय केवळ त्या संबंधितांनाच नव्हे, तर इतर अनेकांना उपयुक्त ठरू शकतील. कारण सोशल मीडिया चांगला असला, तरी प्रत्यक्ष साधलेल्या संवादाची सर त्याला कधीच येऊ शकणार नाही. हा संवाद आपल्यात निर्माण व्हायला हवा.

संबंधित बातम्या