संकटातील सकारात्मकता 

ऋता बावडेकर
रविवार, 19 एप्रिल 2020

संपादकीय
 

काही केल्या कोरोनाचा कहर थांबायला तयार नाही. जरा कुठे दिलासा मिळतो आहे असे वाटते, तेवढ्यात अशा काही घटना घडतात, की ते वाटणे कधी मनात आले होते, यावरही विश्वास बसत नाही. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारनेही आपले प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविल्याचे जाहीर केले. त्याबरोबरच इतर योजनाही केंद्र राबवत आहे. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवला होता. 

दोन्ही सरकारांचा हा आदेश काही अपवाद वगळता व्यवस्थित पाळला जाताना दिसतो आहे. जिथे पाळला जात नाही, तिथे तो  कसा पाळला जाईल हे बघायला हवे. मात्र, एकुणात जनतेने हे प्रकरण गंभीरपणे घेतलेले दिसते. आधी २१ दिवस, आता १९ दिवस.. बघायला गेला तर मोठा कालावधी आहे. त्याचे काय करायचे असा प्रश्न सुरुवातीला सगळ्यांनाच पडला असेल, पण स्वतःसाठी, समाजासाठी हे शिवधनुष्य चांगले पेललेले दिसते. कधी उद्वेगाने, कधी रागाने, कधी वैतागाने, कधी आनंदाने, तर कधी हसतखेळत लोकांनी हा कालावधी आपलासा केलेला दिसतो. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी फेसबुक, अर्थात सोशल मीडियाचाही आधार घेतला. 

हा कालावधी अजून संपायचा आहे, पण आतापर्यंतच्या कालावधीचा अनेकांनी सदुपयोग केलेला दिसतो. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, कुटुंब एकत्र आले. ते आधी नव्हते असे नाही. पण आता ते एकत्र दिसूही लागले. स्त्री-पुरुष असा भेद न करता घरकामांची विभागणी झाली. कारण घरकाम करणाऱ्या महिलांनाही लॉकडाऊन आहे.. ही कामे करताना सुरुवातीला धांदल उडाली, तरी अनेकांच्या चपात्या आता गोल होऊ लागल्या आहेत, झाडू-पोछा नीट जमू लागला आहे, वॉशिंग-मशीन लावायला जमू लागले आहे.. आणि हे फक्त सोशल मीडियापुरते नसावे. कारण काम केल्याशिवाय आज गत्यंतरच राहिलेले नाही. 

या कालावधीचा उपयोग अनेक जण आपले छंद जोपासण्यासाठीही करत आहेत. कोणी चित्रकला शिकत आहे, कोणी गाणे, कोणी नृत्य, कोणी पाककला, तर कोणी आणखी काही... तसेच कामाच्या धबडग्यात, जगण्याच्या रेट्यात हरवून गेलेली कला अनेक जण पुनरुज्जीवित करत आहेत. कोणी गाणी रेकॉर्ड करते आहे, कोणी कुठले वाद्य वाजवते आहे... अनेक जण कविता लिहू लागले आहेत.. कोणी आतापर्यंत राहिलेली पुस्तके वाचते  आहे, चित्रपट बघते आहे.. कोणी निराश जरूर झाले असतील. पण त्यांनी तसे होऊ नये. सगळेच या बंदिवासात (?) आहेत. आपण एकटेच नाही, हा फार मोठा दिलासा आहे. परिस्थिती सुधारायची असेल, तर हा बंदिवास आवश्यक आहे. तो काही दिवसांचाच आहे, हे मनाला समजावले पाहिजे. सकारात्मक राहायला हवे.. 

या अंकात आम्ही काही वाचकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. त्या वाचाव्यात अशाच आहेत. त्यातूनही कदाचित कोणाला कुठला चांगला मार्ग गवसेल. 

अनेक जण करतही असतील, पण जे करत नसतील त्यांच्यासाठी सूचना, विनंती.. काहीही म्हणा... स्वतःबरोबर संवाद साधा. एरवी वेळेचे कारण सगळे देत असतात. आता वेळच वेळ आहे, फक्त हवी आहे थोडी हिंमत.  हो स्वतःबरोबर प्रामाणिकपणे संवाद साधायला खूप हिंमत हवी, साधना हवी. कारण त्यातून काय बाहेर पडेल आपल्यालाही माहिती नाही. मात्र, जे समोर येईल ते हसतमुखाने स्वीकारायचे. बदल हवा तर तो करायचा.. असे केले तर एकच होईल.. एक चांगला, समृद्ध माणूस म्हणून आपण पुढे येऊ. त्याची आज आपल्याप्रमाणेच समाजालाही गरज आहे. 

कोरोनाचे संकट लवकर टळावे, पण त्याच्यामुळे होणाऱ्या, झालेल्या फायद्यासाठी त्याचे आभारच मानायला हवेत. पुढचे माहिती नाही, पण आज तरी आपण स्वावलंबी झालो आहोत, स्वयंपूर्ण होतो आहोत. या साथीने कधी नव्हे इतके आपण सगळे एका रांगेत आलो आहोत. पुढे एवढे सगळे टिकवता आले नाही, तरी चांगला माणूस होणे टाळू नये. वाईटातून काही तरी चांगले निघतेच, यावर आपला विश्वास आहे. तो तसाच कायम ठेवून आपली आताची आणि पुढचीही वाटचाल सुरू ठेवावी.. 

संबंधित बातम्या