‘जबाबदार’ सुटी 

ऋता बावडेकर
सोमवार, 11 मे 2020

संपादकीय
 

साधारण मार्चअखेरीपासून आपण सगळे एक प्रकारची सुटी अनुभवत आहोत. या सुटीला ‘सक्ती’ची सुटी म्हणणे तिच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. तसे बघितले, तर एकप्रकारे ती सक्तीचीच आहे, पण ती आपल्या भल्यासाठीच आहे, हेही तितकेच खरे. त्यामुळे ‘सक्ती’ शब्दातून येणारी नकारात्मकता तिथे लावाविशी वाटत नाही. सुटी म्हणजे, थोडा विरंगुळा, थोडी मजा, रुटिनमधून सुटका.. पण ही सुटी खऱ्या अर्थाने तशी नाही. या सुटीने आपल्याला एक प्रकारच्या जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे. आपण स्वतः, आपले कुटुंबीय, नातलग, मित्रमंडळी आणि एकूणच समाज यांप्रती आपली काही जबाबदारी असते; त्यानुसार आपले वर्तन हवे - अन्यथा कळत नकळतपणे सगळ्यांनाच त्याची झळ बसू शकते, हेच ही ‘सुटी’ जणू आपल्याला शिकवत आहे. 

आपल्या देशात, आपल्या राज्यात अखेर आपल्या शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. त्याला अटकाव करण्याचे खूप प्रयत्न झाले, पण त्याचे गंभीर परिणाम जसे दिसू लागले, तसे साधारण मार्चअखेरीपासून हळूहळू रस्त्यांवरची वर्दळ कमी होऊ लागली. अखेरीस तर सरकारने लॉकडाऊनच जाहीर केला. चार मेपासून १७ मेपर्यंत सुरू झालेला हा तिसरा लॉकडाऊन आहे. दोनही लॉकडाऊनदरम्यान काही अपवाद वगळता नागरिकांचे वर्तन खूपच जबाबदारीचे होते. त्याचे परिणामही काही भागांत जाणवले. तो भाग ग्रीन झोनमध्ये गेला, कारण त्या भागात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण तुलनेने खूपच कमी होते. अशा विभागानुसार काही गोष्टींना सवलती देण्याचे सरकारने ठरवले, त्यानुसार ४ मे रोजी काही भागांत थोडी शिथिलता देण्यात आली. पण त्याचा परिणाम उलटाच झाला. रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली. दुचाकी, चारचाकी, बसेस रस्त्यावर सर्रास धावताना दिसत होत्या; जणू कोरोनाचा संसर्ग इथे कधी नव्हताच. दारूविक्रीला काही तास परवानगी देण्यात आली. त्यामुळेही गर्दीत भर पडली. 

वास्तविक कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे गेलेला नाही. अजूनही रुग्ण सापडत आहेत. अशावेळी प्रत्येक नागरिकाचे वर्तन जबाबदारीचेच असले पाहिजे. पण तिसऱ्या लॉकडाऊनदरम्यान अनेकांचा संयम सुटलेला दिसतो. 

यासाठी अनेकजण सरकारला दोष देत आहेत. सरकारचे परस्परविसंगत निर्णय, एका यंत्रणेचा दुसऱ्या यंत्रणेशी संबंध नसल्यासारखे वर्तन, आदेशांत एकवाक्यता नसणे.. या सगळ्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आणि अनेकजण घराबाहेर पडले, असा अनेकांचा युक्तिवाद आहे. त्यात तथ्यही आहे. एकीकडे सरकार म्हणते दुकाने १० ते २ खुली राहतील, तर बारा वाजताच पोलिस येऊन दुकाने बंद करायला लावतात. ठराविक वेळेत नागरिक जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करू शकतात, असे म्हटल्यावर हमखास समजावे, रस्ते बंद असणार आणि तसेच होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. याचे कारण म्हणजे निर्णय घेणाऱ्या यंत्रणांमधील संवाद, समन्वयाचा अभाव. त्यामुळे अनेक पातळ्यांवर गोंधळाची परिस्थिती दिसते. त्याचा फायदा कोणी घेतला, तर त्या व्यक्तीला त्याचा दोष कसा देता येईल? हा फायदाही प्रत्येकवेळी जाणून बुजूनच घेतला जाईल असे नाही. ती व्यक्तीही संभ्रमातूनच काही निर्णय घेऊ शकते. 

मात्र, हे जरी कितीही खरे असले तरी नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. आतापर्यंत आलेल्या अनेक साथी-आजार आणि कोरोनाची साथ यात कमालीचा फरक आहे. ही साथ संसर्गजन्य तर आहेच, पण दुर्दैवाने तिच्यावर अजूनही लस किंवा औषध सापडलेले नाही. सुदैवाने आपले वैद्यकीय क्षेत्र निष्णात आहे. ते आपले सगळे ज्ञान पणाला लावून रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांच्या स्टाफची त्यांना तेवढीच मोलाची साथ मिळत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. या क्षेत्राला पोलिस क्षेत्राचेही तितक्याच मोलाचे सहकार्य लाभत आहे. अशावेळी आपले वर्तन खूप महत्त्वाचे ठरते. बरे, हे सगळे जे करत आहेत, ते त्यांच्यासाठी नाहीच; तुमच्या-माझ्या आरोग्यासाठी-आयुष्यासाठी त्यांची ही सगळी धडपड सुरू आहे, याची तरी जाणीव आपण सगळ्यांनी ठेवायला हवी. 

अशी जाणीव आपल्याला नाही, असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण दोन लॉकडाऊनदरम्यान आपण ते बहुसंख्येने दाखवून दिले आहे. त्या काळातही मॉर्निंग वॉकला जाणारे, उगाचच इकडे तिकडे भटकणारे, गर्दी करणारे होतेच; पण ते प्रमाण अत्यल्प नाही, पण कमी होते. तिसऱ्या लॉकडाऊनवेळी जे संयम सुटल्यासारखे 
वर्तन अनेकांकडून झाले, त्याला सरकारी निर्णयांतील गोंधळ प्रामुख्याने कारणीभूत असला, तरी आपण आपल्या जबाबदारीचे भान ठेवायलाच हवे होते. कारण हा केवळ आपल्या एकट्याच्या आयुष्याचा प्रश्‍न नाही, तर आपल्या अशा बेजबाबदार वर्तनाचा फटका आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, समाजालाच बसू शकतो. त्यामुळे या काळात प्रत्येक पाऊल उचलताना या सर्व घटकांचा प्रथम विचार करायला हवा. 

‘सकाळ साप्ताहिक’चा हा अंक खास मुलांसाठी केला आहे. एरवी अंकात सुटीत कुठे जायचे, काय शिकायचे, ट्रेकिंग-गडकिल्ले कुठे फिरायचे वगैरे मजकूर असतो. पण यंदा मुलांना सुटीत कुठेच जायला मिळणार नाही. त्यामुळे मुलांनी करायचे तरी काय? असा विचार करून या अंकाचे आम्ही नियेजन केले. त्यात पुस्तके कोणती वाचावीत, कोणत्या गोष्टी शिकाव्यात, निरीक्षण कसे असावे, कुठले पदार्थ करावेत वगैरे बरेच लेख आहेत. पालकांच्या प्रतिक्रियाही आहेत. पण मुलांना खरेच याची आवश्‍यकता आहे, असे वाटायला लावणारा एक विभाग यात आहे आणि तो म्हणजे मुलांच्याच प्रतिक्रिया. या सुटीत (?) आपण काय करतो, कसा विचार करतो याचा या मुलांनी इतका चांगला विचार केला आहे, की मोठ्यांनीही त्यातून शिकावे. या प्रातिनिधीक प्रतिक्रिया आहेत. पण जबाबदारीने कसे वागावे, हे या मुलांनी या प्रतिक्रियांतून कळत नकळतपणे सांगितले आहे.. म्हणून ही ‘जबाबदार’ सुटी आहे, असे म्हटले तर ते वावगे कसे ठरेल?

संबंधित बातम्या