आत्मनिर्भर आपण 

ऋता बावडेकर
सोमवार, 25 मे 2020

संपादकीय
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारपासून (ता. १८) लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला. ता. ३१ मेअखेर हा लॉकडाउन आहे. त्यानंतर पुढचा निर्णय होईल. दरम्यान, हा चौथा टप्पा कसा असेल, कोणत्या गोष्टींवर निर्बंध कायम राहतील, कोणते नियम काहीसे शिथील होतील.. वगैरे माहिती सांगितली जात असली, तरी या टप्प्याचे पूर्ण चित्र अजूनही पुरेसे स्पष्ट झालेले नाही, असेच म्हणावे लागेल. हळूहळू ते स्पष्ट होत जाईल, असे वाटते. बरेचसे निर्णय केंद्राने राज्य सरकारांवरच सोपवले आहेत. 

अर्थात, पंतप्रधानांनी कोरोनासंदर्भात भारतीयांबरोबर यावेळी जो संवाद साधला, त्यात लॉकडाउनचा मुद्दा तेवढा प्रभावी नव्हता. तर हळूहळू का होईना जनजीवन सुरू व्हावे यावर भर दिलेला दिसत होता. त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा भारतीयांनी ‘आत्मनिर्भर होण्या’चा होता. त्यावर पंतप्रधान प्रामुख्याने बोलले. 

अनेक प्रगत देश तसे स्वावलंबी असले, तरी काही गोष्टींसाठी ते इतर कोणत्या ना कोणत्या देशांवर अवलंबून असतातच. त्यात फारसे चुकीचे काही नसले, तरी हे अवलंबित्व फार कमी कारणांसाठी असते. उदाहरणार्थ, नैसर्गिक संसाधनांसाठी हे अवलंबित्व प्रामुख्याने असते. त्या बदल्यात इतर क्षेत्रात आपण प्रगत राहू यासाठी हे सगळे देश प्रयत्नशील असतात. आपलाही तसाच प्रयत्न असतो, पण हे प्रयत्न थोडे कमी पडत असावेत, असे पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने ‘आत्मनिर्भरते’वर भर दिला, त्यावरून वाटते. 

वास्तविक, आज आपल्याकडे फार कशाची कमतरता नाही. अनेक गोष्टी आपण निर्यात करत असतो. पण हे प्रमाण इतरांच्या तुलनेत पुरेसे नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी ‘मेड इन इंडिया’वर भर दिला होता. ‘आत्मनिर्भर होणे’ हा त्या उपक्रमाचाच पुढचा भाग मानायला हवा. 

आपण अमुक क्षेत्रात स्वयंपूर्ण आहोत, तमुक क्षेत्रात आघाडीवर आहोत.. असे म्हणून आपण आपलीच पाठ अनेकदा थोपटून घेत असतो. त्यात काही प्रमाणात तथ्य असले, तरी जगाबरोबर जेव्हा आपण स्पर्धेत स्वतःला बघतो, तेव्हा हे चित्र तेवढे स्पष्ट दिसत नाही. मग सगळे वास्तव डोळ्यासमोर येते आणि आपल्याला अजून किती पल्ला गाठायचा आहे, हे लक्षात येते. पंतप्रधानांनी नेमकी हीच जाणीव त्या दिवशी करून दिली. मात्र एवढे बोलून ते थांबले नाहीत, तर त्यासाठी त्यांनी वीस लाख कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला. या निधीची विभागणी नेमकी कशी होणार हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या तीन-चार पत्रकार परिषदांतून सविस्तरपणे सांगितले. 

या निर्णयासंबंधी तसेच, निधी वितरणासंबंधी नेमके व सविस्तर विश्‍लेषण करणारा ‘आर्थिक पॅकेज ः वास्तव आणि मृगजळ’ हा कौस्तुभ मो. केळकर यांचा लेखही या अंकात आहे. 

या पॅकेजसंदर्भात तज्ज्ञ आपली मते मांडतील. काय योग्य, काय अयोग्य ते सांगतील. त्यानुसार सगळे मार्गी लागेल.. पण आपल्या पातळीवर आपल्यालाही काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. ते ‘आत्मनिर्भर’ होण्यासंदर्भात. कदाचित कोणाला ते बालिश किंवा बालसुलभ वाटतील, पण या प्रक्रियेची सुरुवात आपल्याला स्वतःपासूनच करावी लागणार आहे. 

पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर’ हा शब्द उच्चारल्यापासून समाज माध्यमावर त्या संदर्भात अनुकूल - प्रतिकूल प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे येऊ लागल्या आहेत. अनेक जण चेष्टामस्करीच्याही मूडमध्ये आहेत. पण तो भाग सोडला, तर ‘आपण खरेच आत्मनिर्भर आहोत का?’ असा आपण कधीतरी अंतर्मुख होऊन विचार केला आहे का, हे तपासायला हवे. पंतप्रधानांनी मोठ्या पटलाचा विचार करून हा मुद्दा मांडला असेल, पण आपण वैयक्तिक विचार केला तर लक्षात येईल, की खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण कोणावर ना कोणावर अवलंबून आहोत. त्यामुळेच जेव्हा पहिला कर्फ्यू आणि पाठोपाठ पहिला लॉकडाउन जाहीर झाला तेव्हा, ‘कसे होणार?’ हे भलेमोठे प्रश्‍नचिन्ह आपल्या चेहऱ्यावर होते. त्यानंतर हळूहळू आपण सावरलो आणि काही प्रमाणात सरावलोही... पण म्हणून पूर्णपणे आत्मनिर्भर झालो नाही. आजही अनेकांनी नाईलाजाने उसने अवसान आणलेले जाणवते. आपल्याला ‘आत्मनिर्भर होण्या’ची सुरुवात इथून करावी लागणार आहे. 

लॉकडाउनमुळे आज मजूर वर्ग आपापल्या घरी परतू लागला आहे. हाताला काम नाही, खायला अन्न असले, तरी अनेकदा त्याचा भरवसा नाही. राहण्याची चांगली सोय नाही.. आणि मुख्य म्हणजे घराची, आपल्या प्रांताची ओढ.. या सगळ्या कारणांमुळे ते घरी परतू पाहात आहेत. मिळेल त्या वाहनाने किंवा वेळप्रसंगी चालतही! वाटेत त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या दरम्यान काही लोक मृत्युमुखीही पडले आहेत. तसे बघितले, तर हे लोक खऱ्या अर्थाने स्वावलंबी आहेत. ‘पैसा’ सोडला तर बाकी कशासाठीही ते इतर कोणावर अवलंबून नाहीत. पैसा, तोही त्यांच्या कष्टाचा पैसा आहे. नीट विचार केला, तर आपणच या सगळ्यावर विविध कारणांसाठी अवलंबून आहोत. त्यामुळे ही ‘श्रमिक शक्ती’ आपण वाचवायला - सांभाळायला हवी. मुख्य म्हणजे, हा ‘माणूस’ सांभाळायला हवा. आर्थिक पॅकेजमध्ये त्यामुळेच या ‘शक्ती’वर भर असेल तर आश्‍चर्य वाटायला नको. 

या खेरीज जगाच्या बाजारपेठेतही आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. आपल्या उत्पादनांना या बाजारात मागणी यायला हवी. ती वाढायला हवी. त्यासाठी आपली ‘निर्मिती’ जगासमोर यायला हवी. आपले कितीतरी कुशल मनुष्यबळ इतर देशांत नोकऱ्या करते आहे. या ज्ञानाचा आपण आपल्यासाठी उपयोग करून घ्यायला हवा. त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करायला हवे. आपणही ‘स्वदेशी’ची मागणी करायला हवी. ही सामूहिक जबाबदारी आहे. 

‘आत्मनिर्भर व्हा’ असे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही पहिले किंवा एकमेव नेते नव्हेत. महात्मा गांधींपासून अनेक नेत्यांनी वेळोवेळी ही गरज बोलून दाखवली आहे. पण आता कोरोनामुळे ‘आत्मनिर्भर होण्या’ला पर्याय उरलेला नाही. सुरुवात आपल्यापासून करूया...

संबंधित बातम्या