माणूस नावाचा क्रूर प्राणी

ऋता बावडेकर
रविवार, 7 जून 2020

संपादकीय
 

खरे तर माणसाला ‘क्रूर प्राणी’ म्हणणे, म्हणजे प्राण्यांना नावे ठेवण्यासारखे आहे. कारण जिवावर बेतले तरच इतर प्राणी ‘क्रूर’ होऊ शकतात, होतात. एरवी, ते विनाकारण फारसे कोणाच्या वाट्याला जात नाहीत. त्यांना टोकाचा त्रास दिला, तर मात्र ते कोणाला सोडत नाहीत. उलट हल्ला करतात. असे असताना आपण त्यांना ‘क्रूर’ का म्हणावे, हा प्रश्‍न आहे.

‘मनुष्य प्राण्या’ला मात्र आपण अगदी सर्रास ‘क्रूर’ म्हणू शकतो. कारण तो कधीही विनाकारण क्रूर होऊ शकतो. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे, केरळमध्ये एका गर्भवती हत्तिणीचा झालेला भयानक मृत्यू. तिच्या या मृत्यूला संवेदनशील, समंजस, प्रेमळ वगैरे म्हणवून घेणारा माणूसच कारणीभूत आहे.

माणसाकडे विचार करण्याची शक्ती असते - आहे, म्हणे. पण तो प्रत्येकवेळी विचार करतो का? आणि प्रत्येकवेळी योग्य किंवा चांगलाच विचार करतो का? हत्तिणीच्या या उदाहरणावरून तरी असे वाटत नाही. याचा अर्थ प्रत्येक माणूस अविचारी, असंवेदनशील, क्रूर असतो असे नाही. पण काही अपवाद असतातच, तेच फार हानिकारक असतात. यावेळीही तेच झाले आहे...

केरळमधील जंगलातील एक हत्तीण सायलेंट व्हॅलीमध्ये अन्नाच्या शोधात आली. त्यावेळी कोणीतरी तिच्या तोंडात अननस दिला. तो तिला नीट चावता येईना. पण चावल्यावर तिच्या तोंडात त्या अननसाचा स्फोट झाला, कारण त्यात स्फोटके होती. तिची जीभ, दात, सगळे तोंडच सोलवटून निघाले. ती तशीच निघाली.. वाटेत तिने कोणाला त्रास दिला नाही, घरांवर धडका मारल्या नाहीत, कोणत्याही माणसाला चिरडले नाही... ती पाण्याचा शोध घेत होती. नदी दिसल्यावर ती निमूट नदीत जाऊन उभी राहिली. वनअधिकाऱ्यांना ही गोष्ट कळताच ते तिच्या सुटकेसाठी धावले. अशा प्रसंगांत माणसांवरचा विश्‍वास उडाल्यामुळे हत्ती त्यांचे ऐकत नाहीत, हा अनुभव गाठीशी असल्यामुळे या अधिकाऱ्यांनी सोबत दोन हत्तीही नेले होते. पण ती शांतपणे नदीत उभी होती.

क्षणात अधिकाऱ्यांच्या लक्षात सगळा प्रकार आला.. कारण हळूहळू तिने मान पाण्यात घालायला सुरुवात केली. सगळे कळत असून, इच्छा असूनही हे अधिकारी काहीही करू शकले नाहीत. त्या हत्तिणीने जलसमाधी घेतली. ही हत्तीण गर्भवती असल्याचे तिच्या शवविच्छेदनानंतर समजले. त्यावेळी अनेक गोष्टींचा उलगडा झाला. कितीही भूक लागली तरी जंगली हत्ती असे कुठेही येत नाहीत. आपला कळप सोडत नाहीत. पण ही हत्तीण आपल्या पोटातील बाळासाठी अन्नाकरता या व्हॅलीत आली.. आणि माणूस नावाच्या ‘प्राण्या’ने तिचा घात केला. ज्या कोणी हे केले असेल, त्याचा हेतू नक्कीच चांगला नसणार. तस्करीसाठीच हा प्रकार घडला असणार. आता या व्यक्तीला शोधण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही व्यक्ती सापडेलही, तिला शिक्षा होईलही... पण जिने ‘माणसा’वर डोळे झाकून विश्‍वास ठेवला, त्या हत्तिणीचे आणि तिच्या पोटातल्या पिलाचे काय? ते दोघे तर जिवानिशी गेले..

कोणी म्हणेल, असे खूप प्राणी मरत असतात, माणसे मरतात तिथे प्राण्यांचे काय घेऊन बसलात? - अगदी बरोबर आहे. पण म्हणून हे कृत्य किंवा अशी कृत्ये योग्य ठरतात का? समर्थनीय ठरतात का? कोणीही ‘शहाणा’ माणूस याचे होकारार्थी उत्तर देणार नाही.

माणसालाही आपण ‘प्राणी’ म्हणतो. पण त्याला मिळालेली विचार करण्याची शक्ती, निर्णय घेण्याची क्षमता, त्याच्याकडे असणारी (?) संवेदनशीलता.. वगैरे गोष्टींमुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. किंबहुना आपण तसे मानतो. पण हे प्रत्येकवेळी खरे असते का? दुर्दैवाने याचे उत्तर नाही असेच येते. यापुढील चर्चेत आपण अपवाद बाजूला ठेवू. कारण ते सगळ्याच ठिकाणी असतात. त्यामुळे ही चर्चा सरसकट माणसांना नावे ठेवण्यासाठी नाही, तर त्याच्या ठायी अपवादाने दिसणाऱ्या या वृत्तीवर बोट ठेवून त्यात काही बदल करता येईल का, या अनुषंगाने आहे.

केवळ या घटनेचा विचार केला, तर असे म्हणता येईल ज्या व्यक्तीने हे क्रूर कृत्य केले, त्याचा काही नाईलाज असेल, त्याला पैशाची चणचण असेल... कारण काहीही असेल, तरी मुक्या प्राण्यावर असा हल्ला करण्याचे कुठलेच समर्थनीय कारण सापडत नाही. पैशासाठी दुसरे कुठलेही काम ती व्यक्ती करू शकली असती. अर्थात ही फारच मोठी घटना झाली, एरवीही आपण बघितले, तर चालता चालता कोणीतरी कुत्र्याला काठी मारतो, गाढवाची शेपटी पिळतो, मांजराला त्रास देतो... अशा उदाहरणांत काय म्हणायचे? आपल्यातील ‘त्रास देण्या’च्या ‘गुणा’चाच हा मोठा आणि वाईट आविष्कार आहे.

आपण असे का करतो? याचा प्रत्येकाने शांतपणे विचार करायला हवा. कदाचित आपलेच कुठलेतरी वैफल्य आपण तिथे काढत असू.. पण ते योग्य नाही ना. प्रत्येक भावना व्यक्त करण्याची एक पद्धत असते, जागा असते. योग्य ठिकाणी आपली नाराजी, निराशा व्यक्त केली तर त्याचा उपयोग. अशा प्राण्यांच्या खोड्या काढून विकृत समाधानाखेरीज काहीही मिळणार नाही आणि आपली समस्याही सुटणार नाही. त्यामुळे समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे.. आणि कोणी विनाकारणच प्राण्यांना असा त्रास देत असेल तर त्यांनी मात्र स्वतःला तपासून घ्यावे. स्वतःत सुधारणा करून घ्यावी. अन्यथा ही विकृती वाढत जाऊन तिचा समाजाला त्रास होऊ शकतो.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ‘प्राण्यांवर प्रेम करा’, ‘प्रत्येक सजीवावर प्रेम करा’ ही केवळ सुभाषिते म्हणून ठेवू नयेत. ती आचरणातही आणायला हवीत. तरच ‘माणूस होण्या’ला काही अर्थ राहील...
 

संबंधित बातम्या