‘अनलॉक - १’ 

ऋता बावडेकर
सोमवार, 15 जून 2020

संपादकीय
 

तब्बल चार लॉकडाउननंतर सरकारने जनतेला थोडा दिलासा देऊन ‘अनलॉक-१’ जाहीर केले. त्यानुसार ता. ८ जूनपासून अनेक नियम शिथिल करण्यात आले. मात्र काही गोष्टींवर अजूनही बंधने कायम आहेत किंवा काही गोष्टी सशर्त सुरू आहेत. पण अर्थचक्र पुन्हा सुरू व्हावे या दृष्टीने अनेक गोष्टी सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. 

या निर्णयाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असे म्हणता येईल. कारण अनेक जण अजूनही सगळे नियम पूर्वीप्रमाणेच पाळत आहेत. घरातून कामाशिवाय बाहेर न पडणे, मास्क लावणे, हात सतत धुणे, तसेच सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे वगैरे गोष्टी अजूनही अनेक जण पाळत आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. खासगी आस्थापनांना कार्यालये सुरू करण्याच्या सूचना मिळाल्याने ही कार्यालये ता. ८ जूनपासून सुरू झाली. तेथील अनेक कर्मचारीही या सगळ्या गोष्टी जबाबदारीने पाळत आहेत, करत आहेत. 

नाण्याला दोन बाजू असतात, त्यानुसार असे सकारात्मक चित्र एका बाजूला दिसत असताना या कशाचीही तमा न बाळगता वाटेल तसे वागणारेही दिसत आहेत. आपल्या वागण्यामुळे इतरांनाच नव्हे, तर आपल्या स्वतःलाही त्याचा त्रास होऊ शकतो हेही त्यांच्या गावी नाही. दुर्दैवाने ही साथ किंवा हा आजारच असा आहे, की आपल्या बेफिकीर वागण्याचा आपल्या स्वतःलाच त्रास होऊ शकतो. पण कशाचाही विचार न करता अनेक जण बेफिकीर वागताना दिसतात. 

‘अनलॉक १’च्या आधी एक दिवस म्हणजे, ता. ७ जून रोजी, रविवारी मुंबईतील मरिन ड्राइव्हवर व्यायामासाठी जी गर्दी जमली होती, ती बघून दोन महिन्यांनंतरही आपल्याला परिस्थितीचे गांभीर्य नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. अर्थात मरिन ड्राइव्ह हे एक उदाहरण झाले. अशी अनेक उदाहरणे देता येतील. 

स्वतःला घरात डांबून घेणे हे कोणाला आवडेल? पण कोरोनाच्या साथीमुळे आपल्या सगळ्यांनाच घरात सतत थांबणे आवश्‍यक होते. आवश्‍यक ती कामे करण्यासाठी जेवढे बाहेर पडणे होईल तेवढेच, घरातून बाहेर पडायला बंदीच होती. लॉकडाउनचा हा कालावधी वाढत वाढत तब्बल दोन महिने झाला. कामानिमित्त किंवा तसेही बाहेर पडण्याची सवय असणाऱ्या प्रत्येकालाच हा बंदिवास नकोसा होणे स्वाभाविक आहे. पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कंटाळा येऊनही अनेक जण प्रामाणिकपणे घरात थांबले. या कालावधीत ते काही नवीन, वेगळे शिकले. कोणी स्वयंपाकघरात आपले नैपुण्य दाखविले. आतापर्यंत कधीच किंवा फारसे न केलेले केरवारे काढण्याचे काम अनेकांनी केले. अलीकडे सगळ्यांकडे वॉशिंग मशीन्स आहेत. पण अनेकांची मशीन्स बंद पडल्याने कपडे धुण्याचे वाढीव काम अंगावर पडले. एरवी प्रत्येक गोष्टीसाठी सहजच वेगवेगळी भांडी काढली जातात. वापरल्यानंतर धुवायला लागणाऱ्या भांड्यांची संख्या वाढते, हे या काळात लक्षात आले. एरवीच्या काटकसरीबरोबर अनावश्‍यक कामे न काढण्याचे भानही या काळात आले. तसे या काळाने माणसाला खूप काही शिकवले... 

पण ‘अनलॉक - १’ करण्याचे सरकारने ठरवले आणि तसे केलेही; तसा हा मधला काळ विसरून अनेक जण असे काही घराबाहेर पडले, की जणू ते पहिल्यांदाच घराबाहेर पडत आहेत. घराबाहेरचे जग ते प्रथमच पाहात आहेत. सतत बाहेर पडण्याची, फिरण्याची सवय असणाऱ्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे. पण काही भान पाळणेही आवश्‍यक होते - आहे. कार्यालये सुरू झाली असली तरी तिथपर्यंत पोचण्याची सगळीच साधने सुरू झालेली नाहीत. मुंबईत ‘बेस्ट’ने आपल्या बसेस सुरू केल्या. सगळे नियम पाळून वाहतूक करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसतो. बस पकडण्यासाठी झुंबड उडालेली बघायला मिळते. ही चेंगराचेंगरी बघून, ‘कोरोनाला असेच चिरडून मारा..’ अशी उपहासात्मक शेरेबाजीही सोशल मीडियावर बघायला - वाचायला मिळाली. अर्थात, यात सगळा दोष लोकांचा आहे असे नाही. कारण ऑफिसला त्यांना वेळेत पोचायचे होते. पण हे सगळे लोक खरोखरच कामासाठी बाहेर पडले होते का, हाही प्रश्‍न आहेच. 

तीच गोष्ट इतर ठिकाणची.. न्यायालयाच्या आवारातही वकील, पक्षकारांचे असेच दृश्‍य दिसत होते. पुण्यातील काही भागांत सिग्नल, वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळले जात होते, पण अनेक भागात त्याचा पार फज्जा उडालेला होता. तोंडावर मास्क दिसत होता, पण तो कधी वर करून तर कधी खाली घेऊन पचापच थुंकणाऱ्यांचे प्रमाण मात्र कमी झालेले दिसत नाही. 

जे करायचे ते दुसऱ्याने करायचे; त्यातही सरकारने करायचे, अशी आपली वृत्ती आहे. मी कसाही/कशीही वागणार, सरकारने ते दुरुस्त करावे. त्यामुळे जे घडते त्याची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नसते. तसेच कळत असूनही वळत नाही म्हणतात, त्याप्रमाणे समोरचा वागतोय, म्हणून मीही तसेच वागणार ही वृत्तीदेखील दिसते. त्यातही कोणी चूक सांगायला गेलेच तर ‘तू कोण मला सांगणार?’ असे दरडवायला तयार! त्यामुळे या काळात अजूनतरी सगळे पूर्वीसारखेच सुरू आहे. तरी, अजून बऱ्यापैकी माणसे घरांतच आहेत. शाळा-महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. लोकल, पीएमपी, रिक्षा वगैरे सुरू झालेले नाहीत. हे जेव्हा सुरू होईल, तेव्हा काय परिस्थिती असेल? 

त्यामुळेच, अजून वेळ गेलेली नाही. अजूनही आपण जबाबदारीने वागून कोरोनाला मर्यादेत ठेवू शकतो. आता या आजाराबरोबरच आपल्याला राहायचे आहे, हे ठरवल्यानंतर आपल्या वर्तनात बदल करायला हवा. बेफिकिरी टाळायला हवी. कारण हा आजार केवळ तुम्हाला होत नाही, तर तुमच्यामुळे इतरांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. कोरोनाने हेही आपल्याला शिकवले आहे...

संबंधित बातम्या