निमित्त... सुशांतसिंग राजपूत! 

ऋता बावडेकर
बुधवार, 24 जून 2020

संपादकीय
 

प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केली... ‘का केली असेल?’ प्रत्येकाच्या मनात आलेला पहिला प्रश्‍न हाच असणार. ते साहजिकही आहे. कारण प्रत्येकाच्या दृष्टीने तो एक यशस्वी अभिनेता होता. खूप चांगले चित्रपट त्याने केले होते. ते गाजलेही होते. त्याचे पेंटहाऊस, त्याच्या गाड्या, बाइक्स, त्याने ठिकठिकाणी - अगदी चंद्रावरदेखील घेतलेल्या जमिनी.. हे सगळे यशस्वितेचेच द्योतक होते - आहेत. मग इतक्या ‘यशस्वी’ माणसाने आत्महत्या का केली असेल? 

प्रश्‍न अगदी स्वाभाविक आहे. कारण आपण यश असेच मोजतो. त्यात ‘मना’ला कुठे स्थान असते? मूळात यामध्ये ‘मना’चा संबंध काय? असेही अनेकांना वाटेल. पण खरेच असे असते का? ऐहिक सुखांमध्ये लोळणारा माणूस खरेच सुखी - खरेतर समाधानी असतो का? काही काळ असूही शकतो, पण कालांतराने त्याचाही त्याला कंटाळा येऊ शकतो. आणखी काही हवेसे वाटू शकते. प्रत्येकवेळी ही हाव किंवा हव्यास नसतो, तर त्याची स्वप्ने तेवढी मोठी असतात... आणि मोठी स्वप्ने बघणे हा काही गुन्हा नव्हे. प्रत्येकजण ती बघू शकतो. ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. हा प्रवास खूप सुंदर असतो, पण या प्रवासात अडचणीही येऊ शकतात. कधी त्या आपोआप निर्माण होणाऱ्या असतात, तर अनेकदा त्या कोणीतरी निर्माण केलेल्या असतात. जिवघेण्या स्पर्धेचाच तो एक भाग होय. अनेकजण या सगळ्या अडचणींवर मात करत आपली वाटचाल सुरू ठेवतात. मात्र काही जणांना हा ताण सहन होत नाही. बरेच जण माघार घेतात, दुसरा मार्ग निवडतात. पण त्यातलेही काही झगडत राहतात, आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतात, पण जमत नाही.. आणि थकून (हरून नव्हे) प्रयत्नच थांबवतात. जगाचाच निरोप घेतात... सुशांतचे असे झाले असेल? 

सुशांत ज्या क्षेत्रात होता, तिथे तर ही स्पर्धा अक्षरशः जिवघेणी आहे. त्यातही ‘आतले’ आणि ‘बाहेरचे’ असा एक वेगळाच वाद तिथे सुरू आहे. सुशांतच्या जाण्याने या वादाने उग्र रूप धारण केले आहे. ‘स्टार किड्स’ इंडस्ट्रीत येण्याचे प्रमाण वाढले, तसे या चर्चेने वेगळे वळण घेतले. ‘नेपोटिझम’ अर्थात ‘गटबाजी - कंपूशाही’ अशी चर्चा सुरू झाली. खरेतर हे प्रकार सगळीकडे असतात. पण शो-बिझनेसमध्ये ते अधिक उठून दिसतात. त्यात राजकारण, क्रिकेट, चित्रपट हे आपल्या सगळ्यांच्या आवडीचे विषय. काहीही समजून न घेता अधिकारवाणीने त्यावर मतप्रदर्शन केले जाते. त्यामुळे इथल्या वादांना अधिक प्रसिद्धी मिळते. सुशांत गेल्यानंतर या विषयावरच वाद रंगले आहेत. त्यात या क्षेत्रातील मंडळीही हिरिरीने उतरली आहेत. 

अर्थात, या ‘संपादकीया’चा विषय हा नाही किंवा सुशांतने आत्महत्या का केली, हादेखील नाही. तर, हे प्रकार होऊ नयेत किंवा ते टाळता कसे येतील यावर येथे विचार करण्यासाठी हा विषय निवडला आहे. सुशांतच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या किंवा ज्यामुळे तो या निर्णयाप्रत येऊन पोचला, तशी परिस्थिती अनेकांच्या आयुष्यात येत असेल; किंबहुना येतेच. आयुष्याचा संघर्ष कोणाला चुकला आहे? त्यामुळे अशा किंवा यापेक्षाही वाईट प्रसंगांत कसे वागायला हवे, कोणते निर्णय घ्यायला हवेत, कसा विचार करायला हवा, याबद्दलची माहिती सतत द्यायला हवी. प्रत्येकापर्यंत पोचणे शक्य नाही, पण जितके शक्य तितके प्रयत्न प्रत्येकाने करायला हवेत. ते करताना माझा काय संबंध? मी काय समजवणार? मला समजूत घालता येत नाही... असे काहीही म्हणता कामा नये. कारण संबंधित व्यक्तीला त्या क्षणी काहीही ऐकायचे नसते. ती त्या मनःस्थितीतच नसते. त्या क्षणी तिला फक्त आपले मन मोकळे करायचे असते. ते ऐकून घेणारा माणूस तिला हवा असतो. आपण तेवढे तर नक्कीच करू शकतो. आज कधी नव्हे ते प्रत्येकाला आधाराची गरज निर्माण झाली आहे. ‘मी आहे’ एवढेच त्याला हवे आहे. एवढे आश्‍वस्त तर आपण कोणाला करूच शकतो. 

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या ‘हितगूज’ या सदरात डॉ. विद्याधर बापट यांनी अनेकदा या विषयावर लिहिले आहे. समाजाने काय करावे, या अपेक्षेबरोबरच संबंधित व्यक्तीने काय करायला हवे, हेदेखील त्यांनी सांगितले आहे. केवळ आत्महत्या करणाऱ्यांसाठीच नव्हे, तर प्रत्येकाच्या बाबतीत ‘सेल्फ ॲक्सेप्टन्स’ अर्थात ‘आहे तसा स्वतःचा स्वीकार’ करण्याची क्षमता हवी. ती असेल तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. खरोखरच, आपण कोण आहोत, आपल्या क्षमता काय आहेत, आपण कधी स्ट्रॉंग होऊ शकतो, कधी हळवे होतो, कोणत्या गोष्टींमुळे आपण स्वतःला त्रास करून घेतो... या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती हव्यात. अभ्यास म्हणून नव्हे, तर कोणाला त्रास देण्यासाठी स्वतःच्याही नकळत त्या व्यक्तीचा प्रतिस्पर्धी ही तयारी करत असतो. अशावेळी आपणही आपल्या बाजूने ‘तयार’ असलो, तर त्रास कमी होईल. असे टोकाचे निर्णय घेताना दहा वेळा विचार केला जाईल. अर्थात बोलतो-लिहितो, तेवढे ते सोपे नसते. पण प्रयत्न तर करूच शकतो आणि ते करायलाच हवे. केवळ जिंकण्यासाठी नाही, तर गमावलेला आत्मविश्‍वास परत मिळवण्यासाठी हे आवश्‍यक आहे. स्पर्धा, हारजित, यशअपयश.. या गोष्टी आपल्या आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे. वेळ आली, की भल्याभल्यांचे हातपाय गळतात, हे अगदी मान्य; तसे होऊ नये म्हणूनच काही प्रमाणात का होईना स्वतःला तयार ठेवायला हवे. 

यासाठी सर्वप्रथम शरीराप्रमाणेच मनाचेही आजार असतात, मनाचे आजार म्हणजे फक्त वेड लागणे नव्हे, हे आपण मान्य केले पाहिजे. मनावरही उपचार करावे लागतात. त्यातून पूर्ण बरे होता येते, यावर विश्‍वास ठेवायला हवा. मन मोकळे करण्यासाठी कोणीतरी विश्‍वासू माणूसही हवा. अलीकडच्या काळात तसे कोणी मिळणे अवघड असले, तरी अशक्य अजिबात नाही. त्याबरोबरच डायरी लिहिता येते, छंद जोपासता येतात, लक्ष दुसरीकडे लागेल असे काहीही करता येते आणि ते करताना स्वतःवर उपचारही करून घेता येतात. न लाजता, संकोच न करता, हे सगळे करायला हवे. आपले आयुष्य खूप मोलाचे आहे, दुसऱ्या कोणाकरता ते असे सहजी संपवू नये... जग खूप सुंदर आहे!

संबंधित बातम्या