जीवन खरेच सुंदर आहे... 

ऋता बावडेकर
बुधवार, 1 जुलै 2020

संपादकीय

काही विषय असे असतात, ज्याबद्दल दुर्दैवाने वारंवार लिहावे लागते. महिला हा एक असा विषय आहे आणि नैराश्‍य, त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या - हा दुसरा विषय होय. असे अनेक विषय आहेत, पण या विषयांवर वारंवार लिहूनही ते कमीच वाटावे, अशी परिस्थिती आहे. असे असले तरी या विषयावर लिहिणे थांबायला नको. जेवढे प्रबोधन होईल तेवढे आवश्‍यक आहे. कारण लॉकडाउन काळात नैराश्‍यातून होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण पुणे आणि परिसरात वाढलेले दिसते. 

वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीमुळे येणारे नैराश्‍य, बदललेल्या जीवनशैलीतून येणारे ताणतणाव, यांमुळे आत्महत्यांसारख्या घटना घडत असल्याचे निरीक्षण पुणे पोलिसांनी नुकतेच नोंदविले आहे. त्यातही सर्वाधिक प्रमाण तरुणांचेच असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांमध्ये हीच कारणे समोर आली आहेत. यापूर्वी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागात दररोज एक याप्रमाणे गळफास घेतलेल्या व्यक्तीचा मृतदेह आणला जात असे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण दर दिवशी वाढत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. 

लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. छोटे व्यावसायिक, रोजच्या रोज मजुरी करून घर चालवणारे मजूर वगैरे आर्थिक संकटात सापडले. त्यातून नैराश्‍य आल्याने काहींनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. लॉकडाउनमुळे नैराश्‍य, त्यातून आत्महत्यांचे प्रमाण वाढले असले, तरी पूर्वीही असे प्रकार होतच होते. प्रमाण कदाचित कमी असेल; पण नैराश्‍य हा अलीकडे कळीचा मुद्दा झालेला दिसतो. त्याचे एकच एक असे कारण नाही. अनेक कारणे आहेत. बेरोजगारी, घरांतील भांडणे, प्रेमभंग, नोकरी व्यवसायांतील अपयश, आरोग्य, मानसिक आरोग्य... अशी कितीतरी कारणे सांगता येतील. कोणाला कशामुळे नैराश्‍य येईल हे अजिबात सांगता येत नाही. एखाद्याला गंभीर वाटणारे कारण दुसऱ्याला अगदी किरकोळ वाटू शकते. पण त्यामुळे कोणाला तरी नैराश्‍य येऊ शकते, हे लक्षात घ्यायला हवे. 

कारणे खूप आहेत, म्हणू तेवढी ही यादी वाढवता येईल. पण त्यावर उपायही आहेत. अगदी प्रत्येक कारणावर उपाय असू शकतो. प्रयत्न करायला हवेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, बोलायला हवे. ज्याच्याकडे आपल्याला मन मोकळे करता येईल, असा कोणीतरी आपला ‘मित्र’ हवा. काही लोकांना आपले मन मोकळे करायला संकोच वाटू शकतो. ज्या व्यक्तीकडे मन मोकळे करू ती व्यक्ती आपले म्हणणे सगळ्यांना सांगेल, पुढेमागे आपल्याला त्रास देईल, अशी भीतीही कोणाला वाटू शकते. अशावेळी व्यावसायिक मदत घ्यायला अजिबात लाजू नये. या सगळ्यातील महत्त्वाचा उद्देश म्हणजे, आपले मन मोकळे होणे. त्यावर काही उपाय सापडणे. 

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे - परिस्थिती कधीच एकसारखी नसते. ती बदलत असते. आज वाईट असेल, तर उद्या ती नक्कीच चांगली होईल - असेल, यावर प्रत्येकाने विश्‍वास ठेवायला हवा. ज्यांचा विश्‍वास असेल, त्यांचा असो; पण पुनर्जन्म आहे, असे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे मिळालेला हा जन्म खूप मौल्यवान आहे. जमेल तितका या आयुष्याचा उपभोग घ्यावा. जमेल तितके समाधानाने आयुष्य जगावे. काही क्षणांच्या अविचाराने ते गमावू नये. ताणतणाव, संघर्ष या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य गोष्टी आहेत. त्यासाठी सदैव तयार राहायला हवे. त्यांच्यापुढे हार मानण्यात अर्थ नाही. नेहमी सकारात्म राहायला हवे. विचार करून निर्णय घ्यायला हवेत. असे करताना ‘हेही दिवस जातील..’ असे मनाला समजावून सांगायला हवे. एक अविचार आणि सुंदर आयुष्य नाकारणे, याला अर्थ नाही. लोक चार दिवस हळहळतील, पुढे आपल्या कामाला लागतील... कवी म्हणतो ना, जन पळभर म्हणतील हाय हाय... त्यामुळे आपल्या आयुष्याचा विचार इतक्या अविचाराने करू नये. आपल्यावर प्रेम करणाऱ्यांचाही विचार करायला हवा. 

‘मी कुठेतरी कमी पडतो आहे. आता मरण हाच पर्याय आहे, असे एखाद्याला वाटू शकते. भूतकाळातील संकटांवर मात केली तरी त्यातील ताणतणावांचा अनेकदा निचरा झालेला नसतो. त्यातच लॉकडाउनमुळे ही चिंता खूप वाढली आहे. त्यामुळे नैराश्‍य येते. या नैराश्‍यावर आपण मात करू शकू की नाही, ही शंका असल्याने आत्महत्येचा निर्णय घेतला जातो. भविष्यात काय वाढून ठेवले आहे, यापेक्षा आता काय चालले आहे, याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे,’ असे समुपदेशक डॉ. संदीप शिसोदे सुचवतात. तर समुपदेशक स्मिता जोशी म्हणतात, ‘तणावांचा स्वीकार करा. त्याची कारणे शोधा. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्या स्वीकारून त्याबद्दल आत्मपरीक्षण करून प्रयत्न करत राहिले पाहिजे.’ 

बरोबरच आहे. समुपदेशक, आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे मन मोकळे केले पाहिजे. पण त्याबरोबरच स्वतःही प्रयत्न करत राहायला हवे. मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ डॉ. विद्याधर बापट म्हणतात तसे, ‘स्वतःचा स्वीकार करा.’ आपण जसे आहोत, तसे स्वतःला आपण स्वीकारले पाहिजे. म्हणजे अनेक समस्या सुटतील. अपेक्षा वाढल्या, की ताण येणार, ताण आला की काळजी वाढणार, काळजीचे रूपांतर कधीतरी नैराश्‍यात होणार... ही दुष्ट साखळी कुठेतरी तोडायला हवी. ती आपणच तोडू शकतो. सकारात्मक आणि योग्य विचार करून या सगळ्या गोष्टींवर आपण मात करू शकतो. त्यासाठी स्वतःवर विश्‍वास मात्र हवा. आत्महत्या हा उपाय किंवा पर्याय कधीच होऊ शकत नाही. त्यापेक्षा जीवनाचा संघर्ष अधिक प्रेरणादायी असतो. खूप काही चांगले केल्याचे समाधान त्यातून मिळते. म्हणून बोलत राहा, आपले दुःख हलखे करा, मन मोकळे करा.. हार मानू नका... कारण आयुष्य खरेच खूप सुंदर आहे!

संबंधित बातम्या