कोरोनानंतर...

ऋता बावडेकर
सोमवार, 6 जुलै 2020

संपादकीय

आतापर्यंत अनेक साथी, अनेक आजार येऊन गेले. पण कोरोनासारखी साथ एकही नसेल आणि पुढेही नसावी. समाजात एखादी घटना घडली, की तिचे पडसाद काही प्रमाणात का होईना उमटतात. पण कोरोनामुळे आमूलाग्र बदल होतो आहे, की काय असे वाटू लागले आहे. सामान्यांच्या मनातील या भावनेला आम्ही सकाळ साप्ताहिकाच्या या अंकात स्थान देण्याचे ठरवले आणि आपल्या आयुष्यात थेट फरक घडवतील अशा महत्त्वाच्या क्षेत्रांत या नंतरच्या काळात काही बदल घडेल का? तो काय असेल? त्याच्याशी कसे जुळवून घ्यायचे? इत्यादी मुद्द्यांवर लेख घेतले. वाचकांना याचा नक्कीच उपयोग होईल असे वाटते. 

नवीन वर्ष सुरू झाले, तेव्हा सुरुवातीलाच एवढी मोठी उलथापालथ होईल, असे कोणालाही वाटले नसेल. पण बघता बघता संपूर्ण जगच कोरोनाच्या कचाट्यात आले. त्यावर अजून औषधच सापडलेले नसल्याने गोंधळात आणखीनच भर पडली. एकूण रागरंग बघता सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला आणि सगळा देश बंद झाला. सगळे व्यवहार बंद झाले. जनजीवन ठप्प झाले. जीवनावश्‍यक वस्तू मात्र मिळत होत्या. असे एक-दोन दिवस नाही, तब्बल दोन-अडीच महिने चालले. त्यानंतर ‘अनलॉक १’ आला आणि आता ‘अनलॉक २’ आला आहे. या कालावधीत अनेक व्यवहारांत सरकारने शिथिलता आणली आहे. दुकाने वगैरे सुरू ठेवण्याच्या वेळा ठरवण्यात आल्या आहेत. असे असले, तरी म्हणावे तसे व्यवहार अजूनही सुरू झालेले दिसत नाहीत. आता तर कोरोनाआधी आणि कोरोनापश्‍चात असे दोन भाग झाले आहेत. त्याचाच ऊहापोह या अंकातील लेखांमध्ये करण्यात आला आहे. 

कोरोनाआधीची परिस्थिती कशी होती, याची आपल्याला कल्पना आहे. लॉकडाउन काळातील परिस्थितीबाबतही आपण जाणतो. कोरोनाची साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. रुग्णसंख्या वाढते आहे. ही साथ कधी आटोक्यात येईल आणि सगळे व्यवहार कधी पूर्वपदावर येतील, याबाबत कोणीही काही सांगू शकत नाही. असे असले तरी अनेकांनी कामे सुरू केली आहेत. प्रमाण कमी असले, तरी परवानगी मिळेल तशी कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे लॉकडाउननंतरची किंवा साथ आटोक्यात येईल त्यानंतरची स्थिती काय असेल, याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या अंकातील लेखांतून ही उत्सुकता खूपशी शमेल, याची खात्री आहे. 

या काळात सगळ्यात जवळचा संबंध आला तो स्वाभाविकपणे आरोग्यसेवेबरोबर. आपले वैद्यकीय क्षेत्र अतिशय प्रगत आणि आधुनिक असल्याचा आपल्याला खूप फायदा झाला. या साथीवर अद्याप औषध सापडलेले नसूनही आपल्या संबंधित सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी कमालीची शिकस्त केली. प्रसंगी जीव धोक्यात घातला. पण रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे हे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. त्याबरोबर संशोधनही सुरू आहे. कोरोनापश्‍चात काळात या क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केली आहे. त्यात डॉक्टर-रुग्ण संबंधही येतात. याचा अर्थ त्यात अंतर येईल असे नाही, पण स्वरूप बदलेल. आपल्याला फिरायला खूप आवडते. अलीकडे तर देश-परदेशांत फिरण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. पण या साथीमुळे हे फिरणे एकदम थांबले आहे. या क्षेत्रावर याचा काय परिणाम होईल, याविषयी संजय दाबके यांनी विवेचन केले आहे. बरोबरच काही व्यावसायिकांचीही मनोगते आहेत. शिक्षण क्षेत्रावर तर या बदलांचा खूप मोठा परिणाम होतो आहे, हे आपणही जाणतो. तो नेमका काय आणि कसा हे श्रुती पानसे यांचा लेख समजावून सांगतो. आपल्या आयुष्याशी निगडीत आणखी एक क्षेत्र म्हणजे, बांधकाम क्षेत्र. या क्षेत्रातील बदल काय असतील, हे सांगताना आपण फार आशादायी असल्याचे क्रेडाई - इंडियाचे अध्यक्ष आणि बांधकाम क्षेत्रातील अध्वर्यू सतीश मगर सांगतात. 

तुम्हाला आर्थिक बाबी कळोत अथवा न कळोत; हे क्षेत्र तुमच्या आयुष्यावर खूप परिणाम करत असते. आज अर्थव्यवस्थेला सावरण्याची गरज आहे. त्यासाठी क्रयशक्ती कशी वाढेल, मागणी वाढवण्यासाठी काय करता येईल, अर्थव्यवस्थेला व्यापक प्रमाणावर कशी चालना मिळेल इत्यादी मुद्द्यांवर आर्थिक घडामोडींचे अभ्यासक कौस्तुभ मो. केळकर यांनी हा विषय समजावून सांगितला आहे. 

मानसिक आरोग्य या विषयाकडे आपण अजूनही म्हणावे तितक्या गांभीर्याने बघत नाही, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मानसिक रुग्ण म्हणजे वेडाच, अशी आपली ठाम समजूत आहे. त्यामुळे आधीच या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यात लॉकडाउनमुळे समस्यांत भर पडली आहे. त्यामुळे या क्षेत्रात पुढे काय काय घडू शकेल, काय काळजी घ्यायला हवी, याचे मार्गदर्शन मानसोपचार व ताणतणाव तज्ज्ञ डॉ. विद्याधर बापट यांनी केले आहे. या क्षेत्रांखेरीजही अनेक (जवळजवळ सगळीच) क्षेत्रे आहेत, जिथे बदल होऊ शकतो - होतो आहे. त्यावरही चर्चा होईल. 

कोरोनाने आपले आयुष्य बदलवले. कोणाचा विश्‍वास बसणार नाही, इतके ते बदलले आहे. आता तर आपल्याला कोरोनाबरोबरच जगण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ही नवीन जीवनशैली आपण जितक्या लवकर आत्मसात करू तेवढे चांगले. नुसती आत्मसात करून उपयोग नाही, तर ती कायम ठेवायला हवी.

संबंधित बातम्या