नियम पाळाच! 

ऋता बावडेकर
सोमवार, 13 जुलै 2020

संपादकीय

खरे तर ‘नियम पाळाच!’ असे कोणाला म्हणण्याची वेळ का येऊ द्यावी? वाहतूक असेल, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता असेल, सिव्हिक सेन्स असेल, हेल्मेट वापरणे असेल.. अशा अनेक बाबतींत आपल्याला असे सांगण्याची वेळ का यावी? या बाबतीतले अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे कोरोना, त्या अनुषंगाने आलेला लॉकडाउन आणि नंतरचा अनलॉकिंगचा काळ... खरेतर अशा प्रसंगांत किती जबाबदारीने वागायला हवे, हे सुजाण, सज्ञान, समजूतदार नागरिकांना सांगण्याची आवश्‍यकता नाही. पण लॉकडाउनच्या काळात अतिशय जबाबदारीने वागणारे लोक अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीने वागले आणि त्यामुळे जे परिणाम सगळ्यांनाच भोगायला लागत आहेत, ते बघता ‘नियम पाळाच’ असे सांगण्याची वेळ आली आहे... 

वास्तविक, अनलॉकच्या कालावधीत काही प्रमाणात रुग्ण वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज होताच. ते साहजिकही होते, असे त्यांचे म्हणणे होते. पण ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढते आहे, ते बघता सगळेच अवाक झाले आहेत. केवळ पुण्याचेच उदाहरण घ्यायचे तर गेल्या आठवड्यात दररोज सरासरी सातशे-आठशेच्या पटीत रुग्णांची संख्या वाढत आहे. एकट्या पुण्यात आठ हजारांहून अधिक रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. ही संख्या आणि परिस्थिती नक्कीच चिंता वाढवणारी आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण पुण्यात ६१ टक्के आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्युचे प्रमाणही ३.५५ टक्केच आहे, ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे. पण त्यामुळे आपली जबाबदारी संपत नाही किंवा कोरोनाचा संसर्गही संपत नाही. तो सुरूच आहे, हे लक्षात घ्यायला हवे. कारण आपला थोडाही बेसावधपणा ही साथ वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो; किंबहुना तसा तो ठरताना दिसत आहे. 

लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणांत शिथिल झाले. अनलॉकिंगचा कालावधी सुरू झाला म्हणजे कोरोनाचा संसर्ग संपला असे नाही. घरात बसणे कोणालाच परवडणारे नाही. अर्थचक्राला गती मिळायलाच हवी. उद्योग-व्यवसाय सुरू व्हायलाच हवेत; पण सगळी काळजी घेऊन! मात्र तीच काळजी घेताना आपण दिसत नाही. अनलॉकिंगच्या कालावधीसाठी जे निर्बंध आपल्याला पाळायला सांगितले आहेत, ते आपण किती प्रमाणात पाळतो, याची प्रामाणिक उत्तरे आपण स्वतःला जरी दिली तरी खूप समस्या सुटतील. 

घराबाहेर पडताना मास्क लावणे, दुचाकीवर एकानेच प्रवास करणे, अत्यावश्‍यक सेवेसाठी रिक्षा वापरताना एका रिक्षेत दोनच प्रवाशांनी बसणे, चारचाकीत तिघांनीच प्रवास करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझर वापरणे, साबणाने सतत हात धुणे वगैरे गोष्टी आपण किती प्रामाणिकपणे पाळतो? जे पाळतात, त्यांच्याबद्दल तक्रारच नाही. पण जे नाही पाळत त्यांनी काळजी घ्यायला हवी. कारण ही साथ किंवा हा आजार केवळ तुम्हाला होत नाही; तर काळजी घेतली नाहीत तर तुमच्यामुळे इतर कोणालाही तो होऊ शकतो.. अगदी तुमच्या जवळच्यांनाही! यात सर्वाधिक धोका ज्येष्ठ-वयस्कर नागरिक, लहान मुले यांना आहे. मग या व्यक्ती आपल्या घरच्या असोत, परिचित असोत वा नसोत. हे सगळे असे स्पष्ट असताना आपण काळजी का घेत नाही? का इतरांच्या आयुष्याला ‘रिस्क’ निर्माण करतो? 

केवळ एवढेच नाही, तर आपल्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे यंत्रणाही वेठीला धरल्या जातात. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, महापालिका कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा, नातेवाईक, स्वयंसेवी संस्था.. असे समाजातील कितीतरी घटक साधारण मार्चपासून अव्याहत काम करत आहेत. समाजाप्रती आपली सेवा पोचवत आहेत. यातील अनेक जण अनेक दिवस घरीही गेलेले नाहीत. हे ते कशासाठी करत आहेत? त्यांच्याप्रती आपण आपली कृतज्ञता कशी व्यक्त करतो? तर त्यांच्यावर फुले उधळून, त्यांचे औक्षण करून... हा आपल्या आनंदाचा भाग असला आणि त्याला हरकत असण्याचे कारण नसले, तरी त्याबरोबर निर्बंध पाळले, नियम पाळले, तर या लोकांना त्याचा जास्त फायदा होईल. त्यांचे काम जरा कमी होईल, ताण कमी होईल. पण तेवढेच आपण करत नाही. अर्थात, अपवाद आहेतच.. 

सार्वजनिक व्यवहार जितक्या लवकर सुरळीत होतील, तेवढे सगळ्यांच्याच दृष्टीने योग्य आहे. त्या निमित्ताने देशाच्या, राज्यांच्या अर्थचक्राला गती येणार आहे. ते अतिशय आवश्‍यक आहे. पण त्यामुळेच नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाची हालचाल जबाबदारीची असायला हवी. ही साथ आपल्यामुळे पसरू शकते, याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. खोकताना, शिंकताना चेहरा झाकून घ्यायला हवा. मास्कचा वापर आता अनिवार्य झाला आहे. हस्तांदोलन टाळायला हवे. सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे. हॉटेले सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे, काही दिवसांनी कदाचित थिएटर्सही सुरू होतील, सार्वजनिक वाहतूक सुरू होईल अशा वेळी यंत्रणा आपले काम करेलच; पण नागरिकांनीही शिस्त पाळायला हवी. नियम पाळायला हवेत. अन्यथा लॉकडाउन आपला पिच्छाच सोडणार नाही. सततचे लॉकडाउन आपल्याला परवडणारेही नाही. 

अशा काळात आता या परिस्थितीबरोबर राहण्याची सवय प्रत्येकाने करायला हवी. काही भागात सतत लॉकडाउन जाहीर करावे लागते. नागरिकांच्या राहण्याच्या सवयी, तेथील घरांची रचना.. अशी अनेक कारणे त्यासाठी दिली जातात. ती बरोबरही आहेत. मात्र आता केवळ कारणे देण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार केला पाहिजे. तेथे राहणाऱ्यांनीच तो केला, तर अधिक चांगले. सगळ्याच गोष्टी सरकारने किंवा इतर  कोणी करायच्या अशी अपेक्षा आता सोडायला हवी. आहे ती परिस्थिती आपण कशी सुसह्य करू शकतो, याचा विचार मोठ्या प्रमाणात सुरू व्हायला हवा.. आणि त्यासाठी शिक्षणाची अट अजिबात नाही. अनुभव हाच अशावेळी शिक्षक असतो. त्याच्याइतका चांगला शिक्षक नाही... अट एकच - नियम पाळणे!

संबंधित बातम्या