‘कोरोना’चा धडा 

ऋता बावडेकर
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

संपादकीय

कोरोनाने आपली संपूर्ण जीवनशैलीच बदलली नाही, तर विचार करण्याची पद्धतही बदलून टाकली आहे. हा आजार, ही साथ कधी संपणार असे विचार मनात येतातच; पण त्याचबरोबर या परिस्थिती कसे राहायचे, वागायचे, वावरायचे हेदेखील आपण कळत-नकळत अंगीकारतो आहोत. अर्थात, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, तसा याही गोष्टीला अपवाद आहेच. अशा काही-मूठभर लोकांमुळे इतर सगळ्यांना सहन करावे लागते. जबाबदारीचे भान समस्त समाजाला कधी येणार कल्पना नाही.. 

कोरोनामुळे मार्चपासून सुरू झालेल्या विविध लॉकडाउनमध्ये ही गोष्टच अधोरेखित होत आली आहे. ९५-९८ टक्के लोक जबाबदारीने वागताना दिसत असले, तरी उर्वरित लोकांचे काय, असा प्रश्‍न पडतोच. कारण त्यांच्यामुळेच इतर सर्वांवर अनेक गोष्टी, अनेक बंधने लादली जात असतात.. आणि या मूठभर लोकांमध्ये केवळ अशिक्षित, निरक्षर लोक नाहीत; तर सुशिक्षितांचाही समावेश आहे. कोरोनामुळे सगळ्यांचाच व्यायाम थांबला, पण ‘आम्हाला एक्सरसाइजशिवाय अजिबात चैन पडत नाही’ म्हणून अनेक जण नियम तोडून फिरायला, जॉगिंग करायला बाहेर पडलेले दिसत होते. त्यात नवख्यांची संख्या लक्षणीय होती.. हा एक भाग झाला. 

या काळात जेवढे लॉकडाउन झाले, त्या प्रत्येक काळात जीवनावश्‍यक वस्तू आणण्यासाठी काही वेळ देण्यात आला होता. याचा अर्थ रोज त्यावेळेत बाहेर पडायलाच हवे असे नाही. पण काही मंडळी रोज त्यावेळेत बाहेर पडताना दिसत होती. ‘त्या निमित्ताने पाय मोकळे होतात..’ असे त्यांचे म्हणणे. पण हा प्रकार किती धोकादायक होता-आहे, याची जाणीव तरी त्यांना होती की नाही कल्पना नाही. कारण कोरोना होण्याचा धोका त्यांना तर होताच, पण त्यांच्यामुळे इतरांनाही हा आजार होण्याची जबरदस्त शक्यता होती. केवळ बाहेरच्यांनाच नव्हे, तर ‘फिरून’ आल्यावर घरातील ज्येष्ठ, लहान मुले, समवयस्क या सगळ्यांनाच आपल्यामुळे धोका असू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. केवळ मास्क लावल्याने, घरी येऊन हात-पाय स्वच्छ धुतल्याने, अगदी अंघोळ केल्याने प्रश्‍न मिटत नाही. इतरही काळजी घ्यावी लागते. घराबाहेर न पडणे हा त्यातील महत्त्वाचा भाग होय. तसेच कारण असेल तर ठीक, पण एरवी घरी थांबणेच आवश्‍यक होते. पण पहिल्या लॉकडाउनपासून हा बेशिस्तीचा अनुभव आपण घेतलेला आहे. 

‘आयुष्यात खाल्ली नसेल, एवढी भाजी या लॉकडाउन काळात लोकांनी खाल्ली असेल..’ असा एक विनोद या काळात आणि अजूनही गाजतो आहे. एरवी ‘रोज काय भाजी करायची’ म्हणणारे लोक भाजीवाल्यांच्या भोवती इतकी गर्दी करायचे, की कधी भाजीच बघितली नसावी.. आणि आत्ता भाजी घेतली नाही, तर परत भाजीच दिसणार नाही! 

लॉकडाउन हवे की नको, त्याची किती गरज, त्याचा उपयोग काय.. हे वेगळे मुद्दे; त्यावर सविस्तर चर्चा होऊ शकते. पण एकदा लॉकडाउन जाहीर झाल्यावर शिस्त पाळणे आवश्‍यक आहे. आपल्याच भल्यासाठी ते आवश्‍यक आहे. या काळात जीवनावश्‍यक वस्तूंचीही तशी टंचाई कधी भासली नाही, असे असताना इतका उतावळेपणा का? अलीकडे पुणे, पिंपरी परिसरात दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर झाला. त्याच्या तयारीसाठी नागरिकांना तीन दिवस मिळाले. पण हे तीन दिवस शेवटचे, यानंतर पुन्हा आपल्याला अन्न-धान्य, भाज्या वगैरे गोष्टी बघायलाच मिळणार नाहीत अशा भावनेने बाजारात इतकी गर्दी झाली, की ती बघून डोक्याला हात लावून घेण्याखेरीज पर्यायच राहिला नाही. 

लॉकडाउन हळूहळू शिथिल होत असताना काही बंधने ठेवण्यात आली. उदा. दुचाकीवर केवळ एकानेच बसणे, रिक्षेत दोन प्रवासी, चारचाकीत केवळ तीन माणसे.. असे काही नियम होते - आहेत. पण ते पाळताना मूठभरच लोक दिसत होते. दुचाकीवर तर अनेकदा तीन तीन जण दिसत. सांगायला गेले, की वस्सकन अंगावर येणे, शिवीगाळ करणे असे प्रकार होत. तीच गोष्ट स्वच्छतेची.. रस्त्यात थुंकणे, नाक शिंकरणे सर्रास सुरू होते - आहे. सांगण्याची सोय नाही. कोरोनापूर्वी अनेक जण म्हणत, स्वतःवर बेतले की सुधारतील.. कोरोनामुळे स्वतःवर बेतूनही हे लोक सुधारताना दिसत नाहीत. 

अर्थात, सगळीच बेशिस्त होती असे नाही. सगळे नियम पाळून इतरांना मदत करणारेही अनेकजण या काळात अनेकांना भेटले. काही वस्तू आणायच्या असतील तर एका ठिकाणी राहणारे यादी करत आणि सगळ्यांच्या वस्तू एकदमच आणत.. अशा प्रकारे परस्परांना मदत करणारेही खूपजण आहेत. 

हा कठीण काळ आहे नक्कीच, पण अशा काळातच आपली कसोटी लागत असते. सतत घरात बसून राहणे कोणाला आवडेल? थोडे बाहेर पडले की बरे वाटते. पण काळच बिकट होता, घरात बसण्याखेरीज पर्याय नव्हता. संयमाची ही परीक्षा बहुतांश लोक उत्तीर्ण झाले. काही मूठभरांच्या बेशिस्त वागण्यामुळे त्यांचे श्रेय हिरावून घेता कामा नये. 

कोरोना कधी जाईल, पूर्णपणे जाईल का.. वगैरे प्रश्‍नांची उत्तरे डॉक्टर्स, संशोधक, अभ्यासक शोधत आहेत. त्याचे उत्तर लवकरच सापडावे. कोरोनावर औषधच नव्हते - नाही, मात्र आता अखेर कोरोना लस दृष्टिपथात आलेली दिसते आहे. चाचण्या सुरू झाल्या आहेत. त्यावर डॉ. अविनाश भोंडवे यांचा सविस्तर लेख या अंकात आहे..  
सगळ्यांच्या परिश्रमांना लवकरच यश मिळो, हीच सगळ्यांची भावना आहे आणि असणार. त्याचबरोबर या काळाने आपल्याला खूप काही शिकवले आहे, ते सतत लक्षात असायला हवे. आपले वर्तन त्यानुसार हवे, तर या शिकण्याला काही अर्थ असेल!

संबंधित बातम्या