उत्सवात स्वयंशिस्त हवीच!  

ऋता बावडेकर
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

संपादकीय

गणपतींचा काळ म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा काळ.. गणपती जवळ आले, की सगळीकडे लगबग सुरू होते. आसमंत उत्साहाने, चैतन्याने भरून जाते. पण यावेळी हा उत्साह, हा आनेद, चैतन्य कुठे फारसे दिसत नाही. नाही म्हणायला बाजारात आता गणेश मूर्ती विक्रीला दिसू लागल्या आहेत. पण एरवी, सगळे शांत शांतच आहे... याचे कारणही फार महत्त्वाचे आहे. साधारण मार्चपासून आलेला कोरोना.. अजूनही ही साथ ओसरायला तयार नाही. कधी ओसरणार कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. या साथीवर अद्याप औषध नाही. लवकरच लस येईल अशी आशा आहे. पण तोपर्यंत काही नियम, काही बंधने पाळून ही साथ आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जे नियम-बंधने आहेत; नेमकी तीच गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. साबणाने सतत हात धुणे, सॅनिटायझर हातांना लावणे, आपले घर - बसण्याची ठिकाणे वगैरे सतत स्वच्छ ठेवणे, तोंडाला मास्क लावणे, परस्परांपासून अंतर राखणे, खोकताना - शिंकताना रुमाल धरणे.. वगैरे बऱ्याच गोष्टी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पाळाव्या लागतात. ‘गर्दी टाळणे’ ही जी यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तिचा गणेशोत्सवात भरभरून सहभाग असतो. पण आता या गर्दीलाच अटकाव येणार आहे; किमान तशी अपेक्षा आहे. त्यामुळे या कोरोनाचे जबरदस्त सावट गणेशोत्सवावर पडले आहे. त्यावर उपाय एकच आहे, उत्सव साधेपणाने, गर्दी न करता सगळे नियम पाळून साजरा करणे... पोलिस, विविध सामाजिक संस्थांनी तसे आवाहन केले आहे. अनेक मंडळांचीही तशी तयारी असल्याचे दिसते. 

सामाजिक सुधारणा हा मूळ उद्देश कायम ठेवून काम करणाऱ्या पुणे शहरातील पन्नासाहून अधिक मंडळांनी यंदा रस्त्यावर मंडप न घालण्याचे; तसेच मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व मंडळांनी तसे निवेदन पोलिसांना दिले आहे. ‘सध्याच्या परिस्थितीत गणेश मंडळांनी घेतलेला हा निर्णय स्तुत्य आणि स्वागतार्ह आहे. पोलिसांच्या आवाहनास मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या काळात कोरोनाची संसर्ग वाढण्याची भीतीही कमी झाली आहे,’ असे पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे म्हणाल्या. 

खरोखरच या उपक्रमाची किंवा पुढाकाराची आज अतिशय आवश्‍यकता होती. या निर्णयाचे अनुकरण सर्वच मंडळे लवकरच करतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. तसे झाले, तर कोरोनाची साथ लवकर आटोक्यात येण्यास मदत होऊ शकेल. 

‘सकाळ साप्ताहिका’च्या अनेक विशेषांकांपैकी ‘गणपती विशेष’ हा अंक खूप महत्त्वाचा असतो. त्यात गणेश स्थापनेचा मुहूर्त, पूजेची तयारी, विविध गावांची - मंडळांची वैशिष्ट्ये, देखावे, सजावट अशा विविध आकर्षक मजकूर दरवर्षी असतो. मात्र कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचे भान यंदा सकाळ साप्ताहिकाच्या या ‘गणपती विशेष’ अंकाचे नियोजन करताना आम्ही पाळले आहे. उत्सवाचे पावित्र्य, लोकांच्या भावना जपून या अंकाचे नियोजन करण्यात आले आहे. 

श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेच्या मुहूर्ताला आपण खूप महत्त्व देतो; विशेषतः घरगुती पूजेला! प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांचे चिरंजीव ओंकार मोहन दाते यांनी प्रतिष्ठापनेचा मुहूर्त, पूजेचे महत्त्व, या कोरोना काळात कसे पूजन करावे वगैरे गोष्टी खूप चांगल्या रीतीने सांगितल्या आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाला एक - दोन नव्हे, तब्बल १२८ वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य आणि कोरोना काळात सार्वजनिक उत्सव कसा साजरा करावा, तसेच विविध मंडळे कोणती काळजी घेत आहेत, याविषयीचे उद्‍बोधक विवेचन सुनील माळी यांनी केले आहे. या उत्सवात यंदा सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय झाला आहे, तो आरोग्याचा! या काळात आपले आरोग्य कसे जपावे, याबद्दल डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिले आहे. 

कोणतेही धार्मिक कार्य असो, आपल्याकडे प्रसादाला - खिरापतींना प्रचंड महत्त्व आहे. त्यात श्रीगणेशाचे आवडते खाद्य म्हणजे मोदक! ते टाळून पुढे कसे जाता येईल? या अंकात पारंपरिक मोदकाबरोबरच मोदकांच्या विविध रेसिपीज सुजाता नेरुरकर यांनी दिल्या आहेत. तर विविध खिरापतींच्या रेसिपीज सुप्रिया खासनीस यांनी लिहिल्या आहेत. श्रीगणेशाच्या पूजेत पत्रींचे विशेष महत्त्व आहे. या पत्री नेमक्या कोणत्या व त्यापैकी कोणत्या पत्री तुम्ही बागेत, कुंडीत लावू शकता, याचे मार्गदर्शन प्रिया भिडे यांनी केले आहे. 

प्रचंड उत्साहात होणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सवाला यंदा कोरोनामुळे काहीसे थांबावे लागणार आहे. भक्तांना, चाहत्यांना हा उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. या साथीचा फैलाव रोखायचा असेल, तर याशिवाय आपल्याला पर्यायही नाही. केवळ सार्वजनिकच नव्हे, तर घरगुती उत्सवही यंदा साधेपणाने साजरा केल्यास हरकत नसावी. उत्सवानिमित्त काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याचा अर्थ साथ आटोक्यात आलेली आहे असा नव्हे, तर आपल्या भावना दुखावू नयेत, आपला हिरमोड होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. त्याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. या साथीच्या आजारात केवळ आपल्या स्वतःला नव्हे, तर आपल्यामुळे इतरांनाही त्रास होऊ शकतो, याचे भान ठेवायला हवे. त्यामुळे आपले प्रत्येक पाऊल विचारपूर्वक, जबाबदारीने उचलायला हवे. स्वयंशिस्त पाळायला हवी...    

संबंधित बातम्या