मुलींचा वारसा हक्क 

ऋता बावडेकर
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

संपादकीय

घराण्याचा वारस मुलगाच.. त्याच्यामुळेच वंश चालतो... ही आपली पारंपरिक भाबडी समजूत. त्यानुसारच आपले सगळे व्यवहार सुरू असतात. त्यात किती फरक पडला आहे, मुख्य म्हणजे पडला आहे की नाही; हा विषय वेगळा. पण आपल्या कुटुंबाच्या संपत्तीमध्ये मुलगी या नात्याने वाटा मिळावा म्हणून महिला आता दावा दाखल करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय नुकताच दिला आहे. तसेच, २००५ मध्ये सुधारणा करण्यात आलेला हिंदू वारसा कायदा पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होऊ शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या कायद्याच्या माध्यमातून महिलांना समान वारसा हक्क बहाल करण्यात आला आहे. पण हा निकाल केवळ वडिलोपार्जित मिळकतींसाठी लागू आहे, स्वकष्टार्जित मिळकतींसाठी नाही, हे लक्षात घ्यायला हवे. मात्र, या निमित्ताने मुलींना वारस मानण्यात आले हेही नसे थोडके. 

अविभक्त हिंदू कुटुंबांमध्ये मुलींना वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीमध्ये समान वाटा असतो. ‘२००५ मध्ये झालेल्या सुधारणेच्यावेळी ती हयात होती किंवा नाही, ही बाब फारशी महत्त्वाची नाही,’ असे येथे न्यायालयाने म्हटले आहे. या कायद्यामध्ये सुधारणा होत असताना हयात असलेल्या किंवा या काळामध्ये जन्मलेल्या मुलींचा, वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीमध्ये समान वाटा असून त्यासंबंधीचे अधिकारदेखील या कायद्याच्या माध्यमातून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्या. अरुण मिश्रा, न्या. एस. अब्दुल नाझीर आणि न्या. एम. आर. शहा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. 

‘मुलगी ही कायमची मुलगीच असते. मुलींच्या बाबतीत मिळकतीच्या हक्कांसंदर्भात आजपर्यंत भेदभाव केला गेला, तो चुकीचा होता आणि मुलगा हा केवळ लग्न होईपर्यंतच मुलगा असतो.पण मुलगी ही आयुष्यभर मुलगीच राहते. हयातभर मुलगी ही समान उत्तराधिकारी राहायला हवी. तिचे वडील जिवंत आहेत की नाहीत, ही बाब गौण ठरते,’ असे सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले. 

हे सगळे बघताना कायदा नेमका काय आहे, हे बघायला हवे. हिंदू उत्तराधिकारी कायदा हा १९५६ मध्ये तयार करण्यात आला होता. पण तेव्हादेखील मुलींना समान उत्तराधिकारी मानण्यात आले नव्हते. पुढे २००५ मध्ये संसदेने या कायद्याच्या सहाव्या कलमामध्ये सुधारणा केली होती. या माध्यमातून मुलीला वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीमध्ये समान वाटेकरी करण्यात आले होते. ९ सप्टेंबर २००५ च्या आधी पित्याचा मृत्यू झाला असेल तरीदेखील वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीमध्ये मुलींचा समान वाटा असेल. 

संयुक्त हिंदू कुटुंबाच्या संपत्तीत मुलींचाही समान हक्क असल्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल स्वागतार्ह आहे. मात्र हा हक्क मागितल्याने आपले माहेर तर दुरावणार नाही ना, अशी भीती अनेक महिलांच्या मनात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महिलांना न्याय देणारा असला, तरी त्यामुळे कौटुंबिक वाद होऊ शकतात, असे अनेक महिलांना वाटते. येथे सामंजस्याची भूमिका घेणेच योग्य ठरणार आहे. 

तसे बघितले तर आईवडील, मुले (मुलगा मुलगी) हे एकाच कुटुंबाचा भाग होत. प्रत्येक मूल हे आपापल्या आईवडिलांचे वारसच असते. त्यांचेच गुण, दोष (माणूस म्हटले की या दोन्ही गोष्टी येणारच), सवयी, लकबी घेऊन मोठे होत असते. या सगळ्या गोष्टी त्यांना वारसा हक्कानेच मिळालेल्या असतात. खरे तर हीदेखील एका अर्थाने संपत्तीच असते. पण प्रामुख्याने केवळ भौतिक सुखे पुरवणाऱ्या गोष्टींनाच आपण संपत्ती मानत असतो. पैसे, दागिने, जमीनजुमला.. अशा गोष्टी प्रामुख्याने या संपत्तीत येतात आणि सगळे काही बिघडायला लागते. दुर्दैवाने या गोष्टींनीच आपण आपली सुखे मोजत असतो. स्वाभाविकच त्याचे पडसाद चुकीचे उमटू लागतात. नात्यांत तेढ निर्माण होऊ लागते. खरे तर याची काहीच आवश्‍यकता नसते. 

एकदा मुलीचे लग्न झाले की ‘ती आणि तिचे नशीब..’ असे आपल्याकडे म्हटले जाते. पण पोटच्या गोळ्याला खरेच असे ‘नशिबाच्या’ हवाली सोडता येते का? तसे सोडणे योग्य आहे का? ज्या मुलीला जन्म दिला, लाडाकोडात वाढवले, तिचा संबंध - तिच्या लग्नानंतर असा अचानक संपतो का? संपवता येतो का? तसा तो संपत नाही, संपवता येत नाही किंवा संपवू नये. लग्नानंतर मुलीची जबाबदारी तिच्या सासरच्यांनी घ्यायची असे आपण मानतो. पण तसे शक्य असते का? असे संबंध संपतात का? या आणि असा स्वरूपाच्या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे नकारार्थी आहेत. ती तशी नकारार्थीच असायला हवीत. कारण उद्या काही विपरीत घडले, तर तिचे लग्न झाले होते, म्हणून आपण हात वर करू शकणार आहोत का? करणारे करतही असतील, पण तसे योग्य नाही. 

अशिक्षित, लहान वयातच लग्न झालेल्या मुलींवर दुर्दैवाने एखादा प्रसंग आलाच, तर तिला आधार म्हणून काही करायला पाहिजे. वारसा हक्काने मिळणारी संपत्ती हा त्याचाच भाग आहे. त्याला कदाचित चुकीची दिशा मिळतही असेल, पण ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ याचाच तो भाग असे म्हणायला हवे. पण मुलीला हक्क नाकारता कामा नये. कारण ही संपत्ती तिच्याही वाडवडिलांचीच आहे. घराण्याचा भाग म्हणून तिचाही त्यावर हक्क आहे. न्यायालयाने तो तिला दिला आहे. कुठलेही भांडणतंटे न करता, समजुतीने तिला तो द्यायला हवा. मनगटात धमक असेल, तर कशाचा बाऊ वाटत नाही. संबंधही बिघडत नाहीत.

संबंधित बातम्या