पाऊस आला... 

ऋता बावडेकर
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

संपादकीय

कोरोनाने व त्यामुळे उद्‍भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सगळी समीकरणेच बदलून टाकली आहेत. दरवर्षी वाजतगाजत धूमधडाक्यात येणारा गणपती या परिस्थितीमुळे यंदा शांततेत आला. सगळ्या गोष्टी शांतपणे सुरू होत्या. मंडपाचे आकार छोटे झाले. सजावट झाली नाही. देखावे नव्हते. ऐतिहासिक महत्त्व असलेला पुण्याचा गणेशोत्सव यंदा परिस्थितीचे गांभीर्य पाहून खूप जबाबदारीने पार पाडण्यात आला. पावसाचेही तेच आहे... 

पाऊस म्हणजे धमाल.. मजा.. भटकंती.. खादाडी... असे बरेच काही... पण यंदा कोरोना आणि त्यामुळे आलेल्या परिस्थितीमुळे यातील बऱ्याच गोष्टींवर फुली मारण्यात आली. अद्यापही फिरण्यावर बंदी असल्यामुळे पावसाळी सहलींचे प्रमाण कमी म्हणजे शून्यच झाले. दर्दी, हौशे, नवशे सगळ्यांच्याच फिरण्यावर बंधने आली. ट्रेक्स बंद झाले. डोंगर, दऱ्याकपारी, घाट, धबधबे अशी सगळीच भटकंती कमी नाही, बंदच झाली.. 

इतर अनेक विषयांप्रमाणे ‘पाऊस’ हादेखील सकाळ साप्ताहिकाचा लोकप्रिय विषय आहे. या विषयावरील विशेषांक वाचकांच्या-लेखकांच्या विशेष आवडीचा! पावसाळ्यात फिरताना आलेले अनुभव लिहिणे, हे अनुभव वाचणे हा लेखक वाचक यांचा आवडता उद्योग असतो. पण यावर्षी फिरण्यावरच बंदी असल्याने प्रश्‍न निर्माण झाला. पण अंक काढायचाच, हा निर्णय पक्का होता. कारण निसर्गनियमाप्रमाणे पाऊस आला. त्याने धरणीला मनसोक्त भिजवले.. हे संपादकीय लिहित असतानाही बाहेर पाऊस सुरूच आहे. आणखी दोन-तीन दिवस सलग पावसाचा अंदाज आहे... असे असताना साप्ताहिकाच्या ‘पाऊसधारा..’ नसणे शक्यच नाही.. रूप थोडे वेगळे असेल इतकेच. 

भटकंतीवर बंधने आल्यामुळे त्यावर आधारित मोठा विभाग घेता येणार नव्हता.. पण त्यापलीकडेही पाऊस कितीतरी उरतोच आहे, असे आमच्या लक्षात आले. त्यावर मग अंकाचे नियोजन झाले... 

पाऊस येणार का? किती येणार? सरासरी पूर्ण करणार का? असे विविध अंदाज वेधशाळा खूप आधीपासून बांधत असते. तो एक शास्त्रीय अभ्यासच असतो. पण शेतकरी, सामान्य माणसे यांचेही पावसाबद्दलचे त्यांचे असे अंदाज असतात.. पाऊस तसे संकेत देतो, असे ते मानतात, त्यानुसार पाऊस येण्याबद्दल ते बोलतात.. पक्षी, फुले, निसर्गातून त्यांना हे संकेत मिळत असतात... या विषयावर सीमंतिनी नूलकर यांचा रंजक लेख अंकात आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? किंवा पावसाळी पर्यटन म्हटले, की ठरावीक ठिकाणांची नावे डोळ्यासमोर येतात. पण त्यापेक्षाही थोडा जास्त पाऊस इतर काही ठिकाणी पडतो. इतर काही ठिकाणे पावसाळ्यांत अधिक प्रेक्षणीय असतात. ही कोणती ठिकाणे आहेत, हे सांगणारा लेखही अंकात आहे. 

पाऊस म्हणजे सर्दी ठरलेली.. त्यावर एक विनोदी लेख ब्रिटिश नंदी यांनी लिहिला आहे. याशिवाय, पावसाळ्यातील मेकअप कसा असावा, पावसावर आधारित हिंदी चित्रपटगीते, शब्दकोडेदेखील आहे. 

पावसाची चाहुल जरी लागली, तरी खवय्यांच्या जिभा खवळून उठतात. भजी, बटाटेवडे, भेळ, पाणीपुरी.. असे कितीतरी पदार्थ आठवू लागतात. आताआतापर्यंत हे पदार्थ बाहेर जाऊन खाण्याची सोय होती, पण कोरोनामुळे त्यावरही बंधने आली आहेत. तसेही हे पदार्थ घरीदेखील केले जातात, पण या पदार्थांव्यतिरिक्त कितीतरी चमचमीत पदार्थ आहेत; अशा पकोडे, कटलेट, कबाब वगैरेंच्या पाककृती अंकात देण्यात आल्या आहेत. 

चित्रपटातील पाऊस नेहमीच रोमँटिक असतो. इंग्रजी चित्रपटही त्याला अर्थातच अपवाद नाहीत. अनेक चित्रपटांत हा पाऊस असाच रोमँटिक आहे. पण अनेक चित्रपटात त्याला ‘कॅरॅक्टर’ही आहे. चित्रपटांतील इतर व्यक्तिरेखांप्रमाणे त्यालाही व्यक्तिरेखा मिळालेली आहे. चित्रपटाच्या कथानकात त्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांचा आढावा घेणारा इरावती बारसोडे यांचा लेख अंकात आहे. 

ही सगळी मौजमजा ठीक आहे, पण अखेर सगळी चर्चा आरोग्याशी येऊन थांबते. आरोग्य हा विषय महत्त्वाचाच, पण ‘पावसाळ्यातील आरोग्य’ विशेष महत्त्वाचे! या ऋतूत आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल डॉ. अविनाश भोंडवे यांनी सविस्तर विवेचन केले आहे. सर्दी नेमकी कशामुळे होते, या काळात पिण्याचे पाणी कसे असावे, रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे काय दुष्परिणाम होतात, लक्षणे काय असतात, प्रतिबंध कसा करावा, पावसाळ्यातील आहार कसा असावा, व्यायाम कोणता आणि किती करावा याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर, कोरोनाच्या या काळात पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी हेदेखील त्यांनी सांगितले आहे. 

पाऊस म्हणजे प्रेम, पाऊस म्हणजे भयंकर, पाऊस म्हणजे विध्वंसक.. असा एक अन् एक रूपात पाऊस कधीच नसतो. पाऊसच काय, काहीच नसते. एका पावसाची अनेक रुपे असतात. माणसाला येणाऱ्या अनुभवाप्रमाणे तो त्याला नाव देत असतो. पाऊस बघून कोणाला प्रेमळ स्मृती येत असतील; तर कोणाला पूर आठवत असेल. त्या पुराचे रौद्र रूप आठवत असेल. पण म्हणून पावसाला त्या आणि तेवढ्याच रूपात बंदिस्त करता येत  
नाही.. तसे करू नये. तो त्या पावसावर अन्याय ठरेल. 

असे असले, तरी पाऊस आणि रोमँटिक, हळुवार आठवणी हे नातेच अधिक जवळचे वाटते. पाऊस म्हटले, की हळवेच व्हायला होते. लहानपण आठवते, त्यावेळी केलेल्या गमती आठवतात, तेव्हाच्या होड्या आठवतात, पावसात केलेली भटकंती आठवते, कविता आठवतात, स्वतः कविता केल्या जातात - या ऋतूवर जेवढ्या कविता होत असतील, तेवढ्या इतर ऋतुंवर नक्कीच होत नसाव्यात... अशा कितीतरी आठवणी पावसाळ्याशी निगडीत असतात. इतर ऋतुंतीलही आठवणी असतात, पण या काहीशा खास असतात. त्यामुळेच त्याचे थोडे अधिक कौतुक... पण काळजीही घ्यायलाच हवी!

संबंधित बातम्या