अत्याचार कधी थांबणार? 

ऋता बावडेकर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

संपादकीय

महिलांवरील अत्याचार हा विषय असा आहे, की दर काही काळाने डोके वर काढतो. याचा अर्थ एरवी हे अत्याचार होत नसतात असे नाही, पण त्याची फारशी वाच्यता होत नाही. आताही महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) या संदर्भात २०१८ चा त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार राज्यात २०१८ या वर्षात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात १०.९५ टक्के इतक्या प्रमाणात वाढ झालेली आहे. 

एवढेच नव्हे तर राज्यातील एकूण गुन्ह्यांत १९.८७ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत देशपातळीवर महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर पोचले आहे. राज्यात एकूण तीन लाख ४६ हजार २९१ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१८ या वर्षी राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात १०.९५ टक्के इतकी वाढ झाली असून सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात घडले आहेत. या गुन्ह्यांची संख्या सहा हजार ५८ इतकी आहे.तर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याची टक्केवारी अमरावती शहरामध्ये सर्वाधिक आहे. देशात हुंडाबळीचे २०० गुन्हे दाखल असून गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणामध्ये राज्या बाराव्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये देशात २१ हजार ४२ गुन्हे दाखल असून बलात्काराच्या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता देशात महाराष्ट्र बाविसाव्या क्रमांकावर आहे. 

महिलांवरील अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होणे चिंताजनक आहे. त्यात आपले राज्य सातव्या क्रमांकावर असणे ही गोष्ट अजिबात भूषणावह नाही. या एकविसाव्या शतकात एकीकडे महिला यशाची एकेक शिखरे गाठत असताना त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ होणे हे अजिबातच योग्य नाही.. मुख्य म्हणजे त्यांच्यावर अत्याचार का व्हावेत? त्या अबला (?) आहेत, दुबळ्या (?) आहेत म्हणून? तसे बघितले तर त्या अजिबातच दुर्बळ नाहीत. वेळप्रसंगी महिला ज्या कणखरपणे उभ्या राहतात, संकटांचा सामना करतात ते बघता त्यांना दुबळे म्हणणे, ही म्हणणाऱ्याची चूक आहे. 

आपल्याकडे - आणि आपल्याकडेच का, जगात अनेक ठिकाणी महिलांवर नियंत्रण ठेवणे याला पुरुषीपणा मानतात. बाई आपले ऐकते यातच भूषण मानले जाते. कधी या उलट घडले, तर हा पुरुषी अहंकार प्रचंड दुखावतो. मग त्या बाईला मारहाण सुरू होते, घरात डांबून ठेवले जाते.. नाना तऱ्हेचे त्रास तिला दिले जातात. ही बाई घरातील असते, तेव्हा हे सगळे त्यांना बिनधोक करता येते; बाहेरची किंवा काहीही संबंध नसलेली असली तर काय करणार? अशा प्रसंगांत बहुतांश वेळा ‘वड्याचे तेल वांग्यावर’ या न्यायाने घरातील स्त्रीवर सगळा राग काढला जातो. काही प्रसंगांत तर थेट त्या संबंधित स्त्रीचाही तिच्या अंगावर ॲसिड टाकून, तिला जाळून, तिच्यावर अत्याचार करून तिचा सूड (?) घेतला जातो. हा अहंकार इतक्या टोकालाही जाऊ शकतो. स्त्रीची चूक काय, तर तिने अरे ला कारे केले किंवा दुर्लक्ष केले.. असे काहीही असू शकते. 

अत्याचार करण्याला काही ठोस कारणच हवे असते असे नाही किंवा स्त्रियांवर अत्याचार केवळ पुरुषच करत असतात असेही नाही. बायकाही बायकांवर अत्याचार करत असतात. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे हुंडा. लग्नात हुंडा दिला नाही, मनासारखे मानपान केले नाही, लग्नानंतर सुनेच्या माहेरच्यांनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत.. अशा कोणत्याही कारणावरून सूनेचा छळ केला जातो. ही कारणे नसतील, तर स्वयंपाक येत नाही, मोठ्याने बोलते, नोकरी करते.. अशी कुठलीही कारणे चालतात. 

पण अत्याचार म्हणजे केवळ शारीरिक छळ नव्हे, मानसिक, भावनिक छळही असू शकतो. त्याचा थेट संबंध मानसिक स्वास्थ्याशी लागतो किंवा सोयीने लावता येतो. सतत टोचून बोलणे, टोमणे मारणे, माहेरच्या लोकांपासून - मुलांपासून, प्रसंगी पतीपासूनही दूर ठेवणे, उपाशी ठेवणे, कोणाशी बोलू न देणे.. अशा कितीतरी प्रकारे मानसिक छळ केला जातो. त्यातून तिचे मानसिक संतुलन ढळले आहे, असा निष्कर्ष काढला जातो. अनेकदा या छळामुळे, सततच्या या परिस्थितीमुळे बायका-मुली कोषात जातात, डिप्रेशनन - नैराश्‍याची शिकार होतात. हा अतिशय त्रासदायक अनुभव असतो. 

याचा अर्थ केवळ प्रौढ महिलांवर, विवाहित महिलांवरच अत्याचार होतात असे नाही. लहान मुलींपासून अत्याचार होऊ शकतात. त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकेल. 

लहान मुली म्हणजे स्त्री-भ्रूणापासून याची सुरुवात होते. अनेकदा गर्भातच हा गर्भ खुडला जातो. कधी जन्मानंतर किंवा जन्मताना हे दुष्कृत्य केले जाते. कधी काही महिन्यांच्या बाळाच्याबाबतीत हे दुष्कृत्य घडते. काही दिवसांपूर्वी सांगलीत सुदाम मुंडे प्रकरण गाजले होते. याच्या दवाखान्यात अशा कितीतरी स्त्रीभ्रूणहत्या करण्यात आल्या होत्या. वैद्यकीय पेशाला काळिमा फासणाऱ्या या व्यक्तीला त्याची शिक्षा मिळाली. त्याची डॉक्टर ही पदवी काढून घेण्यात आली. सध्या जामिनावर तो सुटून आला होका. त्या काळातही तो मुलीच्या दवाखान्यात हेच कृत्य करत असल्याची तक्रार आल्यावरून त्याला पुन्हा पकडण्यात आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी दोन घटनांमध्ये काही महिन्यांच्या दोन मुलींना असेच निर्जन ठिकाणी व कचराकुंडीजवळ सोडून देण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून त्यांच्या पालकांपर्यंत त्यांना पोचते केले. 

एकतर्फी प्रेमाच्या तर कितीतरी मुली शिकार होतात. ॲसिड हल्ला, जाळून टाकणे अशा अत्याचारांना हकनाक बळी पडतात. कोणाला प्रेमसंबंधांतून बाहेर पडायचे असते, पण अहंकारापुढे त्या बळी पडतात. 

वास्तविक अनेक मुलींना शिक्षणाची प्रचंड ओढ असते. शिकून कोणी व्हायचे असते. पण गावातील टवाळ मुले छेड काढतात किंवा काढतील म्हणून त्यांना शाळाप्रवेशच नाकारला जातो. याच भीतीने त्यांची लवकर लग्ने करून दिली जातात. लग्न करून तरी त्यांचा ‘त्रास’ संपतो का? उत्तर नकारार्थीच आहे. 

सगळ्याच मुलींना - महिलांना या त्रासांतून जावे लागते असे नाही. पण बहुतांश महिलांनी या ना त्या प्रकारे अशा त्रासांचा सामना कधी ना कधी केलेला असतोच. महिलांवरील असो वा पुरुषांवरील; अत्याचार केव्हाही वाईटच. तसेच ते कशावरचेही उत्तर नक्कीच नाही. हे आपल्याला कधीतरी कळायला हवे.

संबंधित बातम्या