समंजस संवाद महत्त्वाचा! 

ऋता बावडेकर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

संपादकीय

नाते वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक, ते टिकविण्यासाठी संवाद अतिशय महत्त्वाचा असतो. संवादाशिवाय कोणतेही नाते टिकू शकत नाही. कोणाला तसे वाटत असेल तर ते फार वरवरचे नाते असावे, तडजोडीचे असावे.. संवादामुळे सुरुवातीला कदाचित वाद होतील, पण त्यातून तावून सुलाखून निघालेले नाते अतिशय टिकाऊ असू शकते. कारण त्यातून परस्परांचे म्हणणे कळते. अनेक घटस्फोट या संवादाअभावीच घडतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

घटस्फोट केव्हाही दुःखदच.. कोणताही संसार मोडणे चांगले कसे असू शकेल? पण काही वेळा परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की वेगळे होण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशावेळी एकमेकांशी भांडत वेगळे होण्यापेक्षा परस्पर संमतीने वेगळे होणे केव्हाही चांगलेच. गेल्या वीस महिन्यांत पुणे येथील कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी तीन हजार १५२ अर्ज दाखल झाले आहेत. तसेच या काळात संमतीने विभक्त होण्याचे एक हजार ९१२ दावे निकाली काढण्यात आले आहेत. एकतर्फी घटस्फोट, नांदावयास येण्यासाठी आणि विवाह रद्द करण्यासाठी १ जानेवारी २०१८ ते ३१ ऑगस्टअखेरीस चार हजार २७३ अर्ज आले आहेत. या कालावधीत याबाबतचे तीन हजार ४८४ अर्जांवर निकाल देण्यात आला आहे. पती किंवा पत्नी कोणा एकाला घटस्फोट हवा म्हणून दावा दाखल करण्याच्या तुलनेत ९० टक्के जोडपी संमतीने वेगळी होत आहेत. 

वर म्हटल्याप्रमाणे घटस्फोट, वेगळे होणे केव्हाही वाईटच. कोणाचा संसार मोडणे, घर मोडणे या गोष्टी चांगल्या कशा असू शकतील? पण मन मारून संसार करणे हेदेखील घरासाठी, घराच्या स्वास्थ्यासाठी, घराच्या सौख्यासाठी फारसे चांगले नाही. दोन कुटुंबाचे स्वास्थ्य, सौख्य यामध्ये पणाला लागलेले असते. हे परस्पर संमतीने टाळता आले तर केव्हाही चांगलेच ना! 

‘आमचे आता पटणार नाही व एकत्र राहणे तर शक्यच नाही, अशी खात्री पटली होती. आम्हा दोघांचे वय आत्ता ३२ च्या आत आहे. आर्थिक परिस्थितीदेखील चांगली आहे. एकत्र राहून एकमेकांना त्रास देण्यापेक्षा वाद न घालता विभक्त होऊ आणि पुन्हा नवीन आयुष्य सुरू करू, या भावनेतून आम्ही वेगळे झालो..’ हा अनुभव आहे रिया आणि अक्षय (नावे बदललेली आहेत) यांचा. परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा त्यांच्यासारखा अनुभव सध्या अनेक जण घेत आहेत. वाद घालत आयुष्य घालवण्यापेक्षा एकत्र बसून शांतपणे चर्चा करू, एकमेकांच्या अपेक्षा समजावून घेऊ आणि विभक्त होऊ, अशी मानसिकता अलीकडे वाढताना दिसते आहे. दररोज अशा प्रकारचे सरासरी पाच दावे दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. ‘शारीरिक व मानसिक त्रास, वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी जोडपी दोघांच्या मर्जीने घटस्फोटाचा अर्ज दाखल करीत आहेत. अशा दाव्यांचे प्रमाण वाढले आहे. आम्ही दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो; पण एकत्र येणे शक्य नसेल तर त्यांना संमतीने विभक्त होण्याचा सल्ला देतो,’ असे ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांनी सांगितले. 

परस्परांची मने दुखावून, परत सांधता येणार नाही असे नुकसान करून वेगळे होण्यापेक्षा असे वेगळे होणे केव्हाही चांगले. परस्पर सामंजस्याने विभक्त होण्याची काही कारणेही सांगता येतील.. ती म्हणजे, प्रामुख्याने - शारीरिक व मानसिक त्रास कमी होतो. मर्जीने अर्ज केल्यामुळे द्वेषभावना निर्माण होत नाही. वेळ वाचतो व कमी वेळा न्यायालयात जावे लागते. घटस्फोटाची प्रक्रिया लवकर होते. बदनामी होत नाही. मुलांना जास्त त्रास होत नाही. 

असे जरी असले, तरी मूळात परस्पर संमतीने का असेना विभक्त होण्याची वेळच का यावी किंवा येते? परस्परांची, एकमेकांच्या कुटुंबांची माहिती कमी पडते? एकमेकांना समजून घेणे कमी पडते? कोणी म्हणेल, आयुष्य सोबत काढले तरी जोडीदाराच्या मनाचा थांग लागतोच असे नाही.. हे बरोबरही आहे. पण काही प्रमाणात का होईना लग्नाआधी एकमेकांना समजून घेता आले तर, लग्नानंतरच्या समस्या थोड्या तरी कमी होतील असे वाटते. शेवटी काय होणार याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही, पण म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत असे होत नाही ना! 

विवाहपूर्व समुपदेशन हा चांगला ट्रेंड हल्ली दिसतो. प्रमाण कमी असले, तरी हा ट्रेंड सुरू झाला आहे आणि नवीन जोडप्याच्या दृष्टीने तो आवश्‍यकही आहे. विवाह ठरवलेला असो किंवा प्रेमविवाह असो; विवाहपूर्व समुपदेशन हवेच. यातून एकमेकांच्या स्वभावांची ओळख होते, एकमेकांच्या परस्परांकडूनच्या अपेक्षा कळतात, एकमेकांच्या आवडीनिवडी कळतात.. प्रेमविवाह असणाऱ्यांनाही हे समुपदेशन उपयुक्त ठरू शकते. कारण एरवी प्रेमाच्या गुजगोष्टी करताना या सगळ्या बाबी उलगडतीलच असे नाही. केवळ जोडपीच नव्हेत तर होणाऱ्या सासूसासऱ्यांबरोबरही समुपदेशन व्हायला हवे. त्यांच्या अपेक्षा विवाहानंतरच धाडकन कळण्यापेक्षा विवाहाआधी कळल्या, तर भावी सुनेला - जावयाला विचार करण्याला वाव मिळू शकतो. सासू सासऱ्यांनाही या दोघांचे विचार कळू शकतात. नंतर होणारे वाद यामुळे अगदी टाळता येणार नसले, तरी कमी नक्कीच होऊ शकतात. त्यातील तीव्रता टाळता येऊ शकते. 

शंभर टक्के सौहार्द कुठेच असणार नाही. कोणी त्याची अपेक्षाही ठेवणार नाही - ठेवू नये. पण शंभर टक्क्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न नक्कीच करता येईल.  
आपल्याकडे विवाह हा कधीच दोघांपुरता मर्यादित नसतो. दोन कुटुंबे त्यामुळे जोडली जात असतात. अशावेळी केवळ संवाद नाही, तर समंजसपणे संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर घर घरासारखे असेल.. प्रेम-जिव्हाळा जपणारे!

संबंधित बातम्या