मानसिक आरोग्य महत्त्वाचे! 

ऋता बावडेकर
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

संपादकीय 

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. सगळ्यांची जीवनशैलीच या आजाराने पूर्णपणे बदलून टाकली आहे. विचार करण्याची पद्धत बदलून टाकली आहे. काय करावे, काय करू नये याबाबत इतका संभ्रम निर्माण केला हे, की कोणतीही गोष्ट करताना अडखळायला होते, दहा वेळा विचार करावा लागतो. या आजारामुळे बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत.. 

या साथीमुळे पहिला बदल काय झाला असेल, तर माणसे घरात डांबली गेली आहेत. डांबली हा शब्द अशासाठी, की घराची कितीही ओढ असली तरी आता त्याचे अजीर्ण झाल्यासारखे वाटते आहे. नोकरी - व्यवसायानिमित्त दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या माणसांना घराची ओढ असे. कधी एकदा आपल्या घरट्यात परततो, असे त्याला होत असे.. पण सततच्या लॉकडाउनमुळे त्याची ही इच्छा काही अंशी कमी झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अर्थात कितीही झाले तरी घराची ओढ नष्ट होणे शक्य नाही.. पण सतत घरात राहावे लागल्याने बाहेरची दुनिया खुणावू लागते, थोडावेळ तरी पाय मोकळे करून यावे असे वाटू शकते... तसेच आज झाले आहे. खरेतर लॉकडाउनमधील बंधनांत थोडी शिथीलता आली आहे. तरी काही अंशी बंधने आहेतच. घरांतील लहानांना, ज्येष्ठांना अजूनही घराबाहेर पडता येत नाही. त्यांनी बाहेर पडूही नये, त्यांच्या तब्येतीसाठी ते योग्य नाही. असे अनेक जण अजूनही घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, होत आहेत. 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आयटी वगैरे ज्यांना सहज शक्य आहे अशा व्यवसायांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना स्वीकारली आहे. त्याचा फायदा असला, तरी त्यामुळे काही समस्याही निर्माण झाल्या आहेत. यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्याचा परिणाम शारीरिकबरोबरच मानसिक आरोग्यावरही होतो आहे - झाला आहे. मुंबईच्या ‘टाटा सॉल्ट लाइट’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार आता मानसिक आरोग्यासंदर्भातील रुग्णसंख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत झालेल्या या सर्वेक्षणात लोकांचा राग आणि तणावही वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. सुटीच्या दिवशी काम दिले किंवा शुक्रवारी उशिरापर्यंत काम करण्यास सांगितले तर खूप राग येईल. कामात चुका होतील. वरिष्ठांबरोबर वाददेखील होऊ शकेल, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे ६० टक्के व्यक्तींनी मान्य केले. तसेच वायफाय कनेक्शन बंद पडले तर त्यांना राग किंवा वैताग येतो, फोन चार्ज होत असताना तो तोणी काढला तर प्रचंड राग येऊन त्रास होतो, असे ५१ टक्के व्यक्तींनी मान्य केले. 

हा एक भाग झाला. त्याचवेळी आहारविषयक समस्याही उद्‍भवत असल्याचे लक्षात येत आहे. कोरोनाकाळात पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी आहारात पौष्टिक घटक आणि आवश्‍यक जीवनसत्त्वांचा समावेश करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे स्पष्ट करताना अनेक गोष्टींबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते असे - 

मानसिक अनारोग्य म्हणजे मनाची मनोवृत्ती, चिंतेची पातळी, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर झालेले दुष्परिणाम होय. यामुळे अस्थिर मनःस्थिती, नैराश्‍य, चिंता, झोप न लागणे, चिडचिडेपणा, अस्वस्थता जाणवते. याचा परिणाम रोजच्या जगण्यावरही होतो. आहाराचा मानसिकतेशी संबंध कसा? असा प्रश्‍न मनात येणे स्वाभाविक आहे. अपोलो डायग्नोस्टिक्‍सच्या सर्वेक्षणानुसार, कोरोनाकाळात बहुतांश तरुणांमध्ये मानसिक आजाराची समस्या समोर आली. पौष्टिक आहाराचा अभाव हे यामागील मुख्य कारण असल्याचे डॉक्‍टर सांगतात. चांगला, सकस व समतोल आहार घेतला तर बरेचसे आजार टाळता येतात. त्यामुळे आपल्या मनाची मनोवृत्ती स्थिर राहते. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम आणि लोह यांचा आहारात समावेश आवश्‍यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार रोजच्या आहारात एक फळ, पालेभाज्या, डाळी, मांसाहार, अंडी यांचा समावेश असावा. रोज दोन लिटर पाणी प्यावे, अशा पद्धतीने संतुलित  
आहार घेता येतो. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी संतुलित आहार आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अस्वस्थ वाटत असेल, चिडचिड होत असेल तर डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. संगणकावर सातत्याने काम, बाहेर न पडणे, अनावश्‍यक भीती यामुळे मानसिक समस्या जाणवू शकते. त्याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही हे सर्वेक्षण सुचविते. तसेच, भारतीय मनोरुग्ण संस्थेच्या सर्वेक्षणानुसार देशात अजूनही मानसिक समस्येकडे निषिद्ध (टॅबू) म्हणून पाहिले जाते. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यम वर्गियांमध्ये मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याविषयी अंधश्रद्धा आहे. लॉकडाउनच्या काळात ८५ टक्के लोकांमध्ये थकव्याची समस्या, तर ४० टक्के लोकांना सर्वसाधारण मानसिक समस्या जाणवल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.  

आरोग्य तपासणीत २५ ते ५५ वयोगटातील व्यक्तींचे नमुने घेण्यात आले होते. त्यातून असे निदर्शनास आले की, गेल्या १२ महिन्यांत जवळपास २० टक्के लोकांना पोषण कमतरता आहे. यामागील मानसिक आरोग्य हे मुख्य कारण आहे. त्यामुळे घरगुती उपाय करणे, दुखणे अंगावर काढणे यापेक्षा तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

संबंधित बातम्या