छान छान गोष्टी 

ऋता बावडेकर
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

संपादकीय

कोरोनाने प्रवेश केला आणि आपले सगळे जगच बदलले. अनेक गोष्टी जणू कालबाह्य झाल्या. अनेक गोष्टींचे संदर्भ बदलले. काय करावे, काय करू नये.. असा संभ्रम निर्माण झाला. हा संभ्रम इतका गंभीर झाला, त्यातून मार्ग काढणे अशक्य वाटू लागले. मात्र, असे असले तरी सगळ्याच गोष्टी अशा निराशाजनक नव्हत्या - नाहीत.. काही गोष्टी चांगल्याही घडल्या, घडत आहेत. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट आपल्या ‘मन की बात’मध्ये घेत आहेत.. सगळेच काही वाईट चाललेले नाही. 

`मन की बात’ या आपल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी इतर अनेक गोष्टींप्रमाणे पुण्यातील दोघांची दखल घेतली. श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीच्या कामाची ओळख त्यांनी करून दिली. तसेच मानवी जीवनातील कथांचे महत्त्व सांगताना वैशाली व्यवहारे देशपांडे यांच्या लहान मुलांसाठीच्या यू-ट्यूब चॅनेलची माहिती दिली. 

शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोचविणारी पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनी मुंबईत तब्बल १ लाख ६० हजार ग्राहकांपर्यंत रोज पोचत आहे. त्यातून कंपनीची दरवर्षी १०० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होत असून, ४ हजार ५०० शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होत आहे. या कंपनीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये घेतली. पुणे, मुंबईमध्ये शेतमाल विक्रीसाठी सुरू केलेल्या आठवडे बाजारात पुणे आणि नगर जिल्ह्यातील शेतकरी थेट शेतमालाची विक्री करत आहेत. श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी गेल्या सहा वर्षांपासून ही संकल्पना पुणे व मुंबई शहरात राबवीत आहे. जवळपास ४ हजार ५०० शेतकरी व ७५० तरुण मिळून वार्षिक १०० कोटी रुपयांचा ताजा, स्वच्छ व निवडक शेतमाल या माध्यमातून थेट उत्पादकांकडून १ लाख ६० हजार ग्राहकांना रास्त किमतीत विक्री करत आहेत. म्हणूनच मंजूर झालेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे, हे सांगत पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वामी समर्थ’ कंपनीची दखल घेतली. 

शहरातील नागरिकांकडून या शेतकरी आठवडी बाजारास प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या परिस्थितीतही कंपनीने योग्य ती काळजी घेऊन शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतमालाच्या विक्रीचे यशस्वी नियोजन केले. शेतकरी उत्पादक कंपनीने काटेकोर व्यवस्थापनातून शेतकरी आठवडी बाजाराच्या यंत्रणा उभ्या केल्या आहेत. ग्रामीण भागात संकलन प्रतवारी केंद्रे उभी करणे, शेतकऱ्यांच्या स्वतःच्या वाहतूक व्यवस्था उभ्या करणे, आधुनिक तसेच ग्राहकभिमुख पॅकेजिंग व हाताळणी व्यवस्था, बाजार ठिकाण स्वच्छता व टापटीपपणा, शेतकरी आठवडी बाजारांच्या जागांचे व्यवस्थापन, मागणी पुरवठा योग्य समतोल धोरणामुळे शेतमालाच्या नासाडीवर नियंत्रण, कायदेशीर बाबींची पूर्तता इत्यादी बाबी शेतकरी उत्पादन कंपनी स्वतःच्या यंत्रणेमार्फत राबवते. त्यातून शेतमालाच्या दरात स्थिरता व एकसूत्रीपणा आला आहे. ‘नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठी बाजारातील ओल्या कचऱ्याचा वापर केला जातो. त्यातून शासकीय यंत्रणेवर येणारा ताण कमी होतो. शेतकरी कंपन्यांनी नियमावली शेतकरी-ग्राहक हित जोपासत शेतकरी आठवडी बाजाराची कार्यपद्धती उभारली आहे,’ असे श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र पवार म्हणतात. 

समाजमाध्यम, ते वापरणाऱ्यांच्यावर अनेकदा टीका होते. वास्तविक, हे माध्यम अतिशय संवेदनशील आहे व उपयुक्त ठरू शकते. पण ते कोण कसे वापरते यावर त्याची परिणामकारकता अवलंबून असते. लॉकडाउनच्या काळात अनेकांनी या माध्यमाचा खूप संवेदनशील व अर्थपूर्ण पद्धतीने वापर केला. वैशाली व्यवहारे-देशपांडे या त्यापैकीच एक होय! मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासाला चालना मिळावी, म्हणून लॉकडाउनमध्ये छान-छान गोष्टी सांगणारे ‘अस्मि गम्मत कट्टा’ हे यू-ट्यूब चॅनेल त्यांनी सुरू केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये मानवी जीवनातील कथांचे महत्त्व सांगितले. हे सांगताना त्यांनी देशपांडे यांच्या मराठी कथांच्या यूट्यूब चॅनेलचा उल्लेख केला. मुलांसाठीच्या या कामाची दखल अनपेक्षितपणे थेट पंतप्रधानांनीच घेणे त्यांच्यासह सहकाऱ्यांसाठी कौतुकाची थाप ठरली आहे. देशपांडे यांनी त्यांच्या आई डॉ. कल्पना व्यवहारे यांच्या स्मरणार्थ ‘प्रोजेक्‍ट अस्मि’ सुरू केला आहे. त्यासंदर्भात त्या म्हणाल्या, ‘नागपुरातील आईचे घर विकून उभ्या राहिलेल्या पैशातून, पहिली ते दहावीच्या मुलांच्या भावविश्‍वाचा विकास करणारे उपक्रम आम्ही सुरू केले. लहान मुलांना उपदेश करण्यापेक्षा त्यांच्यासारखे लहान होत रमत गमत मानसिक विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही कार्यशाळाही घेतल्या होत्या. लॉकडाउनच्या काळात मुलांना अधिक भावनिक आणि मानसिक आधाराची गरज होती. म्हणून सहकाऱ्यांच्या मदतीने ‘अस्मि गम्मत कट्टा’ सुरू झाला.’ 

मागील तीन महिन्यांपासून सुरू झालेल्या या कट्ट्याची पंधरावी गोष्ट या रविवारी सादर झाली. मुलांना विचार करायला प्रवृत्त करणारा उपक्रम प्रत्येक गोष्टीनंतर सांगितला जातो. या उपक्रमात शुभदा काटदरे, संध्या झोपे, मीनल विध्वंस आणि दीपाली एकतारे यांचेही सहकार्य लाभत असल्याचे देशपांडे सांगतात. 

‘तंत्रज्ञानाने मुलांच्या रोजच्या जगण्यात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी त्याचा आधार घेणे गरजेचे आहे. पण अतिरेकही व्हायला नको. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आदींच्या माध्यमातून मर्यादित स्वरूपात मुलांना गोष्टी सांगणे किंवा मानसिक विकासाच्या दृष्टीने आवश्‍यक उपक्रम द्यायला हवे. पुढे मात्र त्यांना मुक्तपणे विचार करण्याला प्राधान्य द्यायला हवे. मुलांच्याच आई वडिलांची जबाबदारी अधिक आहे,’ असे देशपांडे म्हणतात. 

कोरोना, लॉकडाउन सगळ्यांच्याच वाट्याला आले आहे. पण या काळात मिळालेल्या वेळेचा, उद्‍भवलेल्या परिस्थितीचा उपयोग अनेकांनी अशा सकारात्मक पद्धतीने करून घेतला आहे. त्याचा केवळ त्यांनाच नाही, तर समाजालाही उपयोग झाला आहे - होतो आहे. ज्याची दखल थेट पंतप्रधानांनीच घेतली. समाजातील असे प्रयत्न वाढायला हवेत.

संबंधित बातम्या