महाराष्ट्राची गौरवगाथा

ज्योती बागल
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

उपक्रम
 

महाराष्ट्र ही कर्मभूमी मानून एकोणिसाव्या व विसाव्या शतकात सर्व क्षेत्रांतील प्रगतीसाठी स्वयंप्रेरणेने ज्यांनी अनन्य असे योगदान दिले आहे, अशा उत्तुंग कामगिरी करणाऱ्या सहा हजारांहून अधिक शिल्पकारांचा परिचय करून देणारा प्रकल्प म्हणजे ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश’ होय!
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने विवेक समूहाने ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रांत अग्रेसर करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी मूलगामी, तरीही अभिनव कार्य केले, त्यांच्या कार्याचा आणि एकूणच जीवनचरित्राचा परिचय या कोशाच्या माध्यमातून करून दिला जात आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच आधुनिक महाराष्ट्र घडवणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तिमत्त्वांची चरित्रे एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित समोर येत आहेत. 

एकोणिसावे आणि विसावे शतक हे भारताचे प्रबोधनपर्व मानले जाते. याच शतकांमध्ये भारतातील अनेक राज्यांमध्येदेखील उल्लेखनीय परिवर्तन झाले. यात महाराष्ट्र अग्रेसर होता, कारण महाराष्ट्रात मूलभूत परिवर्तन घडवण्यासाठी विविध क्षेत्रांतील अनेकांनी स्वतःचे आयुष्य वाहून घेतले होते. त्यांच्या या योगदानाने आजचा प्रगत महाराष्ट्र आपल्यासमोर आहे. पण त्यातल्या अनेकांचे उल्लेखनीय आणि प्रेरणादायी काम अंधारातच राहिले होते. त्या सगळ्यांना प्रकाशात आणून त्यांच्या कार्याबद्दलचे ऋण समाज म्हणून व्यक्त करण्यासाठी, महाराष्ट्रात परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींचा परिचय सर्वांना व्हावा या उद्देशानेच हे काम सुरू आहे. 

या प्रकल्पांतर्गत इतिहास, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान-शिक्षण, न्यायपालिका-प्रशासन-संरक्षण, कृषी-पशुसंवर्धन-सहकार, चित्रपट-संगीत, दृश्यकला (चित्रकला-शिल्पकला-उपयोजितकला), प्राच्यविद्या-धर्मकारण, आरोग्य, समाजकारण-राजकारण-पत्रकारिता, उद्योग-अर्थकारण, क्रीडा-नाटक असे (पंचवीस विषयांवरील) बारा खंड प्रकाशित करण्याची योजना आहे. प्रत्येक खंडात त्या त्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींची चरित्रात्मक माहिती असलेल्या नोंदी असणार आहेत. प्रत्येक कोशाच्या सुरुवातीला भूमिका आणि प्रस्तावनेच्या स्वरूपात त्या त्या विषयाची पार्श्वभूमी, महत्त्व, व्याप्ती स्पष्ट करून सांगितली आहे. या दोन्ही गोष्टींमुळे कोशाचे अंतरंग समजून घ्यायला नक्कीच मदत होते. 

या प्रकल्पातील सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे चरित्रनायकाची चरित्रनोंद लिहिणे. चरित्रनायकाच्या जन्मापासून ते तो हयात नसेल, तर मृत्यूपर्यंत आणि हयात असल्यास कोश प्रकाशित होण्यापर्यंत अद्ययावत माहितीचा समावेश चरित्रनोंदींत केला जातो. चरित्रनायकाच्या कार्याप्रमाणेच त्याच्या कौटुंबिक जीवनावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला असतो. लेखकाने चरित्रनोंद संदर्भसूचीसह लिहिल्याने वाचकांसाठी तसेच संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती जास्त फायदेशीर ठरते. 

शिल्पकार चरित्रकोश प्रकल्पातील जमेची बाजू म्हणजे कोशाची विषयाधारित रचना म्हणता येईल. प्रत्येक कोशाच्या विषयानुसार तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली असून त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे महाराष्ट्रभरातून त्या त्या विषयामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्या त्या व्यक्तीची चरित्रनायक म्हणून निश्चिती करण्यात आली आहे. चरित्रनायकांच्या नोंदी लिहिण्यासाठी नोंद लेखनाचे निकष निश्चित केले आहेत. या नोंदींची शब्दमर्यादा साधारणतः ५०० ते १५०० दरम्यान असते. चरित्रनायकांच्या नोंदी लिहिताना त्यांच्या संबंधित योग्य आणि सत्य माहिती मिळवणे हे खरोखरच आव्हानात्मक काम असते. कारण बऱ्याच चरित्र नायकांच्या कार्याचा उल्लेख कुठेही सापडत नसतानाही संदर्भासहित माहिती मिळवावी लागते. अशा वेळी संबंधित नायकांच्या नातेवाइकांचा किंवा मित्र मंडळीचा किंवा त्यांच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेऊन माहिती मिळवावी लागते. 

अनेकदा एकाच चरित्रनायकाचे नाव दोन किंवा तीन विषयांतदेखील येऊ शकते, अशा वेळी ठरवलेल्या निकषांची मदत होते. आतापर्यंत या प्रकल्पातील आठ कोश प्रकाशित केले असून एक कोश प्रकाशनाच्या वाटेवर आहे, तर उर्वरित तीन कोशांचे काम सुरू आहे. प्रकाशित कोशांचा उपयोग सर्वांनाच व्हावा या दृष्टिकोनातून प्रकाशित कोश प्रताधिकार मुक्त केले आहेत.  

मुद्रित स्वरूपातील शिल्पकार चरित्रकोश डिजिटलाइज करणे आणि चरित्रकोशातील नोंदींचे दृकश्राव्य माध्यमात रूपांतर करणे अशा दोन विभागांमध्ये प्रकल्पाचे पुढील काम सुरू आहे. यासाठी राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटिकर, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, विनोद पवार अशा मान्यवरांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. युनिकोड टंकामध्ये रूपांतरित केलेल्या चरित्रकोशाच्या सर्व खंडांतील चरित्रनोंदी विकिस्रोतावरील https://w.wikil6fi, https://w.wikil5z3, विकिपीडियावर, तसेच ‘महाराष्ट्र नायक’ (www.maharashtranayak.in) या संकेतस्थळावर मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे वाचकांसाठी ही नक्कीच विशेष महत्त्वाची बाब आहे. या महत्त्वपूर्ण कामाच्या पूर्ततेसाठी, विवेक समूहाला मराठी विकिपीडियाचे प्रचारक सुबोध कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. विकिपीडिया आणि विकिसोर्सवर ही चरित्रे उपलब्ध करून देण्यामुळे मराठी विकिपीडिया समृद्ध होण्यास नक्कीच मदत होईल.

शिल्पकार चरित्रकोश प्रकल्पाचा दुसरा विभाग हा दृकश्राव्यीकरणाचा आहे. यामध्ये शिल्पकार चरित्रकोशाच्या सर्व खंडांतील अंदाजे ६००० चरित्रनोंदींपैकी ३००० चरित्रनोंदी दृकश्राव्य स्वरूपामध्ये मांडण्यात येणार आहेत. चरित्रनायकांच्या मूळ नोंदींच्या आधारे संहितालेखन करून, ३ ते ५ मिनिटांचे माहितीपट तयार करण्याचे काम सुरू आहे. सदर माहितीपट हे ‘महाराष्ट्र नायक’ (www.maharashtranayak.in) या संकेतस्थळावर मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संकेतस्थळाचे स्वरूप ब्रिटानिका एनसायक्लोपिडीया, विकिपीडिया, यांसारख्या जागतिक स्तरावरील संकेतस्थळांप्रमाणे असणार आहे. सदर संकेतस्थळावर नियमितपणे माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. 

या प्रकल्पाचे महत्त्व जाणून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या मराठी विज्ञान परिषद, आघारकर संशोधन संस्था, व्ही. शांताराम चलतचित्रशास्त्रीय अनुसंधान आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान, दादासाहेब फाळके चित्रनगरी, इंडिअन मेडीकल असोसिएशन, आयुर्वेद व्यासपीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अंड अँग्रीकल्चर, गोखले अर्थशास्त्र संस्था, गोरेगाव फिल्मसिटी, भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, भांडारकर प्राच्यविद्या संस्था, पुणे मराठी ग्रंथालय, दादर मराठी ग्रंथालय, विविध विद्यापीठे यांसारख्या नामांकित संस्था आणि ३०० हून अधिक तज्ज्ञ या प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. डॉ. अरुण टिकेकर, डॉ. बाळ फोंडके, डॉ. सुभाष भेंडे, डॉ. रा.श्री. मोरवंचीकर, वैद्य दादा खडीवाले, वैद्य भि.के. पाध्येगुर्जर, डॉ. भा. र. साबडे, डॉ. अरुणचंद्र पाठक, डॉ. ए. पी. जामखेडकर, डॉ. गौरी माहुलीकर, ले. ज. द. ब. शेकटकर, डॉ. द. र. बापट, प्रा. वसंत रोकडे, डॉ. विलास खोले, सुहास बहुळकर, दीपक घारे, सुधीर नांदगावकर, सूर्यकांत पाठक, विद्याधर ताठे, डॉ. अरुणा ढेरे, अभय टिळक, आनंद काटीकर अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे बहुमोल मार्गदर्शन प्रकल्पाला सुरुवातीपासूनच लाभले आहे, लाभत आहे. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या आठ कोशांच्या प्रकाशन समारंभांना महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पांडुरंग फुंडकर, अमिताभ बच्चन, मंगेश पाडगावकर, रघुनाथ माशेलकर, एकनाथ ठाकूर, राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. गो. बं. देगलूरकर, कृष्णा पाटील, मधू मंगेश कर्णिक, डॉ. म. द. हातकणंगलेकर, अजित मराठे, दादोबा पंडोल, अतुल दोडिया, नाना पाटेकर, विजय कुवळेकर, अमोल पालेकर, वसंत आबाजी डहाके, 
मनोहर म्हैसाळकर, सुशीलकुमार शिंदे, रामदास फुटाणे अशा मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली आहे.          

शिल्पकार चरित्रकोश प्रकल्प वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्वच स्तरातील लोकांपर्यंत पोचण्याचासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अशा समाजजीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्वच क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र घेऊन अनेक उपक्रम राबवतात. त्यामध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त 'मराठी भाषा प्रश्नमंजूषा स्पर्धा', कुसुमाग्रजांच्या साहित्यावर आधारित ‘एक किरण सूर्याचा’, बा.भ. बोरकर यांच्या साहित्यजीवनावर आधारित ‘बाकीबाब’, गदिमा-बाबूजी-पुलं यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘माझ्या खिडकीतून गदिमा’ हा आनंद माडगुळकर यांचा एकपात्री कार्यक्रम, ‘ज्योतीने तेजाची आरती’ आणि विद्यार्थ्यांसाठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यशाळा यांसारख्या कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. 

हे चरित्र कोश मराठी भाषेपुरतेच मर्यादित न ठेवता याचा लाभ जास्तीत जास्त वाचकांना त्याचा उपयोग व्हावा व महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने नायक असलेल्या समाज सुधारकांची जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी म्हणून सर्वच कोश इंग्रजी आणि अन्य भाषांमधून मांडण्याचा विवेक समूहाचा विचार आहे. याची सुरुवात ही दृश्यकला कोशापासून झाली असून हा कोश इंग्रजी भाषेतून प्रकाशित करण्याचे काम ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.  

एकोणिसावे आणि विसावे शतक हे भारताचे प्रबोधनपर्व मानले जाते. भारतातील प्राचीन संस्कृती आणि पाश्‍चात्त्य देशांतून आलेली आधुनिकता यांच्या परस्पर संवादातून आणि समन्वयातून जीवनाच्या विविध क्षेत्रांत मूलभूत परिवर्तन घडले. या सर्व परिवर्तनात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिला. ज्या व्यक्तींनी हे परिवर्तन घडवून आणले, त्यांच्या कार्याची माहिती व त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा महाराष्ट्रातील नव्या पिढीला कळाव्यात, तसेच या परिवर्तनाचा आलेख महाराष्ट्रासमोर ठेवावा, हा प्रमुख उद्देश ठेवून, महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून साप्ताहिक विवेकने ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या बौद्धिक संपदेला साद घालून महाराष्ट्राच्या विकासासाठी एक सक्षम व्यासपीठ निर्माण करणे, हाच या प्रकल्पाचा हेतू असल्यामुळे मुख्य प्रकल्पाच्या जोडीनेच आनुषंगिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत मराठी भाषा, मराठी संस्कृतीची छाप जगाच्या पटलावर उमटावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि बौद्धिक क्षेत्राशी जोडला गेलेला मराठीजन या सर्वांपर्यंत पोचण्यासाठी विविध कार्यक्रमांची-उपक्रमांची योजना शिल्पकार चरित्रकोशाच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. त्यामध्ये मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने विविध परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, यांचे आयोजन करण्यात येते. या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या संस्था, तसेच ३०० तज्ज्ञ या प्रकल्पात सहभागी झाले आहेत.   
- महेश पोहनेरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिल्पकार चरित्रकोश

संबंधित बातम्या