'साजोस - २०२०'

ज्योती बागल
सोमवार, 13 एप्रिल 2020

उपक्रम
 

एक काळ असा होता, की एका ठराविक वाचक वर्गाला 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक माहीत होते. अर्थात तळागाळातील महिलांपर्यंत पोचत, त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्यातील आत्मभान जागृत करत, गेली ३० वर्षे समाजात समता निर्माण करण्याचा प्रयत्न 'मिळून साऱ्याजणी' मासिक करत आहे. सतत बदलत्या भवतालाचा वेध घेणारे हे मासिक माणूसपणाला जास्त महत्त्व देते. (मासिकाच्या नावात 'साऱ्याजणी' असले, तरी सारेजण ही त्यात येतात हे आता सर्वांना पटले आहे.) मात्र, पूर्वी तरुणाईचा म्हणावा तसा सहभाग यात दिसत नव्हता. आता मात्र तरुणांना सामील करून घेण्यात, त्यांच्याशी संवाद साधण्यात, त्यांना बोलत करण्यात 'मिळून साऱ्याजणी' नक्कीच यशस्वी होताना दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'मिळून साऱ्याजणी-युथ कनेक्ट'चा 'साजोस २०२०' हा युवा महोत्सव!

समाजात सध्या संमिश्र वातावरण बघायला मिळत आहे. आपल्या अवतीभवती चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी घडताना दिसत आहेत. मात्र एक माणूस म्हणून आपण चांगलेच वागणे अपेक्षित असते. परंतु, समाजातील काही हिंसक प्रवृत्ती समाजातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, हिंसा वाढताना दिसत आहे. राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती हे शब्द सरसकट प्रत्येकाच्या तोंडी येत आहेत आणि याच शब्दांचा आधार घेत एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. सत्ता आणि पैशांच्या जोरावर मर्दानगी, गुंडगिरी दाखवली जात आहे. तसेच सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद आजमावताना लोक दिसत आहेत. त्यामुळे कोणीतरी सामंजस्याची भूमिका घेत तरुणांना हिंसेने नाही, तर शांततेने, संवादाने आपलेसे करण्याची गरज आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या पुढाकारातून गेल्या तीन दशकांपासून समाजात लैंगिक समानतेसाठी अभिप्रेत असलेल्या 'मिळून साऱ्याजणी' चळवळीच्या 'युथ कनेक्ट' या युवा उपक्रमातर्फे 'सावित्री जोतिबा समता फेस्टिव्हल २०२०' (साजोस) चे आयोजन करण्यात आले होते.

'मिळून साऱ्याजणी' तर्फे दरवर्षी सावित्री जोतिबा समता उत्सव आयोजित केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवाचे स्वरूप थोडे बदलून 'साजोस २०२०' महोत्सव घेण्यात आला. 'साजोस' हा शब्द 'सावित्री जोतिबा समता' या तीन शब्दांमधून तयार केला आहे.

बऱ्याचदा तरुणांसाठी घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यांना ऐकणाऱ्याची भूमिका दिली जाते. एखादा तज्ज्ञ वक्ता बोलावला जातो. ते योग्यही आहे. मात्र या तरुणांचीही काही मते असतात आणि जोपर्यंत हे तरुण व्यक्त होत नाहीत, तोपार्यंत त्यांची मते योग्य आहेत की नाही ते कळणार तरी कसे? त्यासाठीच त्यांनी व्यक्त होणे, बोलणे, लिहिणे गरजेचे आहे. हाच विषय समोर ठेवून 'साजोस २०२०' हा कार्यक्रम आयोजित केला होता.

'साजोस २०२०' हा दोन दिवसीय युवा महोत्सव ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले सभागृहात झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांना समर्पित या महोत्सवात सामाजिक, तसेच वर्तमान घडामोडींवर भाष्य करणारे विविध मुक्त संवाद, मुलाखती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सोबतच, महोत्सवात प्रत्येक पातळीवर सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी पूरक व मार्गदर्शनपर उपक्रमांचीही रेलचेल होती. या महोत्सवात विविध सामाजिक विषयांवर ख्यातनाम मान्यवरांचे मार्गदर्शनपर संवाद, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, कविसंमेलन, नाट्यप्रयोग, पथनाट्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोस्टर-पेंटिंग स्पर्धा अशा विविधांगी उपक्रमांचा समावेश होता.

'साजोस'च्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते माधव वझे व प्रसिद्ध नाटककार व चित्रपट दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌्‌घाटन झाले. त्याचबरोबर 'मिळून साऱ्याजणी'च्या फेब्रुवारीच्या अंकाचे प्रकाशनही झाले. या कार्यक्रमात बोलताना तांगडे म्हणाले, 'धर्म ही वैयक्तिक बाब असून, त्यावर देश चालत नाही. देश राज्यघटनेवर चालतो. त्यामुळे तरुणांनी देशाला मानवतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.'

'मिळून साऱ्याजणी'च्या संपादक व महोत्सवाच्या मुख्य संयोजिका गीताली वि. मं. यांनी प्रास्ताविक करताना महोत्सवाच्या आयोजनाची भूमिका मांडली. पहिल्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सध्याचे प्रमुख मार्गदर्शक, शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंत यांनी उपस्थित तरुणांशी कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि रोजगार या विषयावर संवाद साधला.

पहिल्या दिवसाची सांगता वर्तमानातील विविध सामाजिक प्रश्नांना वेगवेगळ्या स्वरूपात अतिशय प्रभावीपणे मांडणाऱ्या प्रतीक ठाकरे यांच्या 'हाय हाय' या एकपात्री प्रयोगाने, प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ, पूजा भडांगे व नितीन जाधव यांच्या कविसंमेलनाने व तसेच कोल्हापूरच्या सृजनशाळा नाट्यसंस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार लिखित 'ईश्क में शहर होना' या नाटकाच्या प्रयोगाने झाली.

युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही विविध कार्यक्रमाची रेलचेल होती. पहिले सत्र हे विद्यार्थ्यांच्या वादविवाद स्पर्धेने अतिशय गाजले. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ मनोविश्लेषणतज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांचा 'प्रेम, सेक्स, राजकारण आणि तरुणाई' यावरील मुलाखतीच्या स्वरूपातील संवाद अनेक लैंगिक प्रश्नांची उकल करणारा ठरला. सेजल नातू आणि दीपंकर उषा बॅनर्जी यांनी ही मुलाखत घेतली. वर्तमान ऑनलाइन विश्वात थेटपणे ऑनलाइन पद्धतीने लैंगिक शिक्षणाचा वसा घेऊन चालणाऱ्या 'तथापि समूहा'तर्फे अच्युत बोरगावकर व अमोल काळे यांनी 'लैंगिकतेवर बोलू काही...' या विषयावर संवाद साधला. त्यानंतर, नाट्य-चित्रपट-वेब सिरीज क्षेत्रातील तरुण अभिनेता आलोक राजवाडे यांची प्रज्ञा जयश्री व अक्षय चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत नाट्यसृष्टीकडे तरुणांना अभिनव पद्धतीने बघण्यास शिकवणारी ठरली. आलोकने या मुलाखतीतून शालेय जीवनापासून वर्तमानापर्यंतचा त्याचा नाट्य-चित्रपट सृष्टीचा प्रवास उलगडून सांगितला.

विविध विषयांवर मान्यवरांचे संवाद, मुलाखत व वादविवाद, पथनाट्य आणि भित्तीपत्रक स्पर्धेसोबतच 'साजोस २०२०'चे मुख्य आकर्षण होते ते या महोत्सवादरम्यान 'युथ कनेक्ट' तर्फे आयोजित करण्यात आलेले विविध स्वरूपाचे 'तरुणाई कट्टे'. ब्रेल शिकण्यासाठी ब्रेल कट्टा, एलजीबीटीक्यू समूहाचा संवाद कट्टा, लैंगिकतेबाबतचे शंका निरसन करणारा तथापि कट्टा, तरुण-प्रौढ पुरुषांना त्यांची पाककला दाखवण्याची संधी देणारा 'मी आणि माझे स्वयंपाकघर' कट्टा इत्यादी. सोबतच, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांना समर्पित या महोत्सवाच्या प्रसंगी सभागृहात विविध माध्यमांतून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

साजोसमधील दिव्यदृष्टीप्राप्त व डोळस मुलांचा 'फॅशन शो' सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले लोकप्रिय लेखक अरविंद जगताप आणि युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सुशीलकुमार शिंदे यांनी श्रोत्यांशी केलेल्या हितगुजीने महोत्सव सार्थकी लागला.

'प्रत्येक स्त्रीने तिच्या नवऱ्याकडे एक वटवृक्ष लावण्याचा आग्रह धरावा आणि तेव्हाच वटपौर्णिमा साजरी करावी' असे पर्यावरणपूरक आवाहन अरविंद जगताप यांनी कार्यक्रमात बोलताना केले.  

पथनाट्य हे समाजजागृती करण्याचे एक अतिशय प्रभावशाली माध्यम आहे. यातून कोणाताही विषय थेट समाजापर्यंत पोचवता येतो. पथनाट्य स्पर्धेसाठी 'ज्वलंत सामाजिक समस्या' हा विषय दिला होता. सादरीकरणासाठी प्रत्येक ग्रुपला १० मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता.

वादविवाद स्पर्धेसाठी 'लोकशाहीसाठी तरुणांनी पक्षीय राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा - हो/नाही, विद्यार्थ्यांनी आंदोलने करावीत - हो/नाही, विषमतेचे निर्मूलन झालेय - हो/नाही हे तीन विषय देण्यात आले होते. पोस्टर आणि पेंटिंग स्पर्धेसाठी 'स्त्री पुरुष समता' हा एकच विषय देण्याता आला होता.

निबंध स्पर्धेसाठी कबीर सिंगचं करायचं काय?, विवाहपूर्व लैगिंक संबंध, सोशल मिडिया सोसतोय का?, खरंच मी पर्यावरणवादी? देशप्रेमाची संकल्पना बदलते आहे का? हे विषय देण्यात आले होते. निबंध स्पर्धेत २०० तरुणांनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.

प्रत्येक विभागातील, विषयातील विजेत्या स्पर्धकांसाठी एक ठराविक रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

वादविवाद, पथनाट्य व पोस्टर स्पर्धेच्या बक्षीस वितरणांसह कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी, डॉ. गीताली वि. म. यांनी अध्यक्षीय भाषणात दोन्ही दिवसांचा आढावा घेतला, तर अश्विनी बर्वे यांनी आभार मानले.

'साजोस २०२०' च्या या दोन दिवसीय युवा महोत्सवाला यशस्वीपणे पार पाडण्यात 'मिळून साऱ्याजणी'च्या 'युथ कनेक्ट' ने महत्त्वाची भूमिका बजावली. 'मैत्री सेवा संघ'च्या तरुणांनाही विशेष मेहनत घेतली. 'साजोस'च्या नियोजनापासून समारोपापर्यंत सर्व कार्यक्रमांत नितीन जाधव, प्रज्ञा जयश्री, अश्विनी, सत्यजित, मानसी, जयंत काटकर, हर्षाली, सुदर्शन, प्राची, शुभम आदींचा सहभाग होता.

संबंधित बातम्या