स्फुरण श्रेय प्रदायिनी

प्रांजल अक्कलकोटकर
गुरुवार, 23 जानेवारी 2020

उपक्रम

शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील संस्था म्हणून लौकिक असलेल्या ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा २२ डिसेंबर रोजी सुवर्ण महोत्सवी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा प्रारंभ एका नवरचित संस्कृत गीताने करण्यात आला. या गीताच्या निमित्ताने झालेले काही मंथन...       

वाचस्पती वि. वि. तथा अप्पासाहेब पेंडसे यांनी समाज परिवर्तनासाठी बुद्धिमंतांचे प्रशिक्षण करावे आणि एक शिस्तबद्ध संघटन उभे रहावे या हेतूने इ. स. १९६२ मध्ये ज्ञान प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली. स्वत: संन्यस्त राहून समविचारी कार्यकर्त्यांची फळी उभी करून इ. स. १९६९ मध्ये ज्ञान प्रबोधिनीच्या सदाशिव पेठेतील वास्तूचा पाया घातला गेला आणि ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सुरू झाली. कुठलेही आर्थिक पाठबळ हाताशी नसताना अप्पांच्या समर्पित वृत्तीच्या गुरुत्वाभोवती उभी राहिलेली ज्ञान प्रबोधिनी अशा व्रतस्थ कर्मयोग्याच्या कार्यातील सत्त्व ओळखून त्याला उचलून धरणाऱ्या भारतीय समाजाचे प्रतिबिंब आहे. संस्थेचे वर्तमान संचालक, माजी प्राचार्य आणि लष्करप्रमुख ले. जनरल मनोज नरवणे मंचक भूषवीत असताना या सोहळ्याचा प्रारंभ एका नवरचित संस्कृत गीताने करण्यात आला. ‘या रता प्रतिभामताम् उद्बोधने’ म्हणजेच ‘जी संस्था प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी कार्यरत आहे’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून पुढील ओळींमध्ये संस्थेच्या कार्यदिशांची वैशिष्ट्ये विशद करीत हे गीत आकार घेत जाते.

या रता या संसृता 
प्रतिभामतां उद्बोधने।
या रता निष्कामभूत्वा 
अध्यायिनाम् उत्थापने।।

म्हणजेच प्रतिभावंतांच्या उद्बोधनामध्ये जी रममाण आहे, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण उत्थापन हेच जिचे निष्काम व्रत आहे. खरे म्हणजे आज पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरातील अनेक शिक्षण संस्थांनादेखील हे वर्णन लागू पडतेच.

परिकल्पिता संस्थापिता 
संवर्धिता संन्यासिभि:।
चेतसि धृत्वा व्रतानि 
तै: एव प्रचोदिता।।
मातृभूम्यै अर्पणं कृत्वा विरागि-उद्यमं।
प्रस्थापितं तस्यारिह (तस्या: इह) गर्भगृहे अध्यासनम् ।।

संन्यस्त आणि विरागी वृत्तीच्या समाजाभिमुख कर्मयोग्याने जिची स्थापना केली आणि आजही असेच संचलन ज्या संस्थेत होत आहे, जिच्या उपासना मंदिरात विविध कार्यक्षेत्रातील कार्यकर्ते कर्तृत्वपुष्पे अर्पण करण्यास येतात.. तिथे आमच्या हातूनदेखील अर्चना घडावी, हीच प्रार्थना आहे.

आवेष्टिता: स्म मार्दवेन अनया
भवेम अभिन्ना: स्नेहिनो वयम्
अनुसृत्य उपदिष्टम् यथामति:
उद्दीपयाम अस्माकं जीवनम्
या व्रतस्था
श्रमण-स्निग्धा
स्फुरण-श्रेय-प्रदायिनी

आपण सर्वच जिच्या स्नेहाने अंकित आहोत, हे यापुढेही अशाच आपुलकीने सांधलेले राहोत. इथल्या ज्ञानतीर्थामधून आपण जे वेचले, ते आपल्या परीने वैयक्तिक आणि सामूहिक उत्थापनामध्ये उपयोगात आणू.

अशी स्फूर्ती आणि श्रेय प्रदान करणारी ही शिक्षण संस्था. या गीतातील भावार्थ जो आहे त्याची व्याप्ती खरे तर केवळ या संस्थेपुरती नसून एकूणच आपण जिथे शिकलो, जिथे मोठे झालो त्या त्या शैक्षणिक संस्थेप्रति असलेली कृतज्ञ असलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याची भावना आहे.
खरे पाहता असे वेगळेपण जपणाऱ्या संस्था आणि तिथे प्रयोगांना मिळणे उत्तेजन हे समाज सकस असल्याचेच द्योतक असतात आणि त्याच न्यायाने ज्ञान प्रबोधिनी ही प्रत्येकातील प्रयोगशीलतेचे प्रतीक म्हणून पाहिल्यास कला, साहित्य, शास्त्र, शिक्षण, प्रशासन या प्रत्येक क्षेत्रात वेगळेपण जोपासणाऱ्या कर्तृत्ववंतांना इथे येऊन त्यांच्या वैशिष्ट्यांची मांडणी करण्यासाठी आवर्जून आमंत्रण का दिले जाते हे लक्षात येऊ शकेल. या गीताच्या निमित्ताने आपण आपल्यात दडलेल्या प्रयोगशील सृजनक्षम पैलूला आवाहन करावे असे वाटते. आपल्या देशाला हजारो वर्षांची संस्कृत साहित्य आणि काव्यपरंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीतदेखील परंपरासिद्ध आहे. या दोहोंच्या मिलाफातून उत्तम कलाविष्कार साकार होऊ शकतात, किंबहुना झालेलेच आहेत.  
स्वभावतःच एकाच भूमीमध्ये उगम असलेले शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत आणि संस्कृत रचना या एकमेकांना पूरक ठरतात. त्यातून मराठीमध्ये आपण नकळत अनेक संस्कृत शब्द वापरत असल्याने सोप्या संस्कृत रचना समजण्यास अडचण येत नाही. या प्रकारे संस्कृत काव्यांना उत्तम सांगीतिक जोड मिळाल्यावर पुढे अगदी संस्कृत गाण्यांच्या मैफिलीदेखील भरू लागल्या तर नवल वाटू नये. या गीताच्या निमित्ताने सध्याच्या नव्या फळीच्या संगीतकारांनी, कवींनी असे  कलाविष्कार आवर्जून साकारावेत, ज्यातून रसिकांना वेगळ्या धाटणीचे कलास्वाद घेता येतील.   

संबंधित बातम्या