बिघडते पर्यावरण, घसरते आरोग्य

डॉ. अविनाश भोंडवे 
मंगळवार, 11 जून 2019

पर्यावरण संवर्धन
 

निसर्ग ही एक अद्‌भत गोष्ट आहे. त्याचे वर्णन करायला शब्द कमी पडतील. वारे, वादळ, हवा, ढग, नदी, तलाव, ओढे, समुद्र, डोंगर, दऱ्या, पठारे, खडक, माती, झाडे, वृक्ष, वेली, फुले, वनस्पती, असंख्य प्रजातींचे पशुपक्षी, कीटक, माणूस, मानवनिर्मित अनेक गोष्टी हे सारे निसर्गाचेच अविभाज्य घटक असतात. यातली सजीव सृष्टी वगळता जे काही असते, त्याला पर्यावरण म्हणतात. सोप्या शब्दांत सांगायचे, तर पर्यावरण म्हणजे सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी त्यांच्या भोवतालची परिस्थिती. 

निसर्गामध्ये समावेश असलेल्या घटकांचा वापर मानवासह सारे सजीव त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी करत असतात. पृथ्वीवरचे जीवनचक्र संतुलितरीत्या अखंडपणे चालतच राहावे अशाप्रकारे या सगळ्यांची रचना आणि त्यांचे प्रमाण आखलेले आढळते. अनेक कोटी वर्षांपूर्वी जेव्हा जंतू, कीटक, पशुपक्षी आणि मानव पृथ्वीवर अस्तित्वात येऊ लागले, तेव्हापासून निसर्गाचे हे चक्र अखंड आणि सुरळीत रीतीने चालत आले आहे. 

पर्यावरणाचे अखंडत्व आणि सातत्य यावर सजीवसृष्टीचे अस्तित्व अवलंबून असते. पण याचबरोबर सजीवसृष्टीतील घटकांचे एकमेकांशी असलेले सामंजस्यदेखील या पर्यावरणाच्या निरंतर अस्तित्वाला आवश्‍यक असते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे म्हणणाऱ्या संत तुकारामांना, सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी एकमेकांत सौहार्द्रता असणे आवश्‍यक आहे आणि त्यातूनच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असे कदाचित म्हणायचे होते की काय? असे वाटते. 

पर्यावरणाच्या समतोलावर सजीवसृष्टीचे आणि साहजिकच माणसाचे जीवन म्हणजेच पर्यायाने अस्तित्व अवलंबून असते. पर्यावरणातील घटकांचा नाश होऊन हा समतोल बिघडला, तर सजीवांच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो. यामध्ये प्राथमिक पातळीवर आरोग्य बिघडते किंवा ते प्राणी नष्टही होऊ शकतात. ज्वालामुखी उद्रेक, भूकंप, वादळे, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये डायनासॉरसारख्या सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होत गेल्या. मात्र, असे निसर्गनिर्मित अपवाद वगळता इतर सजीवांपेक्षा मानवच पर्यावरणाची हानी करण्यात अग्रेसर राहिला आहे. पर्यावरणाबाबतच्या विध्वंसक स्वरूपाच्या मानवी कृतींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यामुळे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम आज पर्यावरण शास्त्रातल्या संशोधनात अधोरेखित होत आहेत. 

पर्यावरण स्वास्थ्य
 दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाचा पर्यावरणाशी निरनिराळ्या प्रकारे सातत्याने संबंध येत असतो. यातूनच मानवी जीवनाचा दर्जा, मानवाची आयुर्मर्यादा आणि एकंदरीत स्वास्थ्य आकाराला येते. 
 जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानवी आरोग्याचे पर्यावरणाशी खूपच जवळचे नाते असते. प्रत्येक प्रदेशातल्या पर्यावरणातील भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांचा मानवाच्या आरोग्यावर आणि आरोग्यविषयक वर्तनावर दूरगामी परिणाम होत असतो. जगभरातील एकूण मृत्यूंपैकी २३ टक्के आणि पाच वर्षांखालील बालकांच्या बाबतीत २६ टक्के मृत्यू हे पर्यावरणातील घटकांच्या परिणामांमुळे होतात. हे सारे मृत्यू टाळता येण्याजोगे असतात. तऱ्हेतऱ्हेचे आजार, दुखापती आणि शारीरिक अपंगत्व टाळण्यासाठी किंवा त्यांच्यावर नियंत्रण राखण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्‍यक असते. यालाच ‘पर्यावरण स्वास्थ्य’ किंवा ‘एन्व्हायर्न्मेंटल हेल्थ’ असे संबोधले जाते. 

 पर्यावरण बिघडते, तेव्हा आरोग्याची पातळी घसरते. या संदर्भात काही गोष्टी मानवनिर्मित गोष्टीतून उत्पन्न होतात आणि माणसांनाच प्राणघातक ठरतात. यामध्ये... 
 आरोग्याला विघातक गोष्टींच्या वापरामुळे हवा, पाणी, माती आणि अन्न प्रदूषित होणे.
 मानवनिर्मित मोठ्या दुर्घटना उदा. आगी, युद्ध, हिंसाचार, इमारती, पूल कोसळणे, विषारी वायूची गळती, अणुस्फोट, आण्विक कारखान्यातील विस्फोट
 पर्यावरणाचा नाश करणे - वृक्षतोड, नद्या बुजविणे, भूगर्भजल जास्त वापरणे, पाण्याचा अपव्यय, कचऱ्याचे गैरव्यवस्थापन, व्यावसायिक दुर्घटना आणि त्यातील प्राणघातक धोके
 मानवनिर्मित टोलेजंग इमारती, त्यातील कृत्रिम सुखसोई 
 जगाच्या पर्यावरण स्वास्थ्याबाबत अकरा बाबी निर्देशक म्हणून मानल्या आहेत. या गोष्टींचा मानवी आरोग्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. त्या म्हणजे- 
१. आरोग्यसेवेची उपलब्धता, २. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, ३. पर्यावरणाचा दर्जा, ४. अपघात, दुखापती आणि हिंसाचारावर नियंत्रण, ५. माता-बाल आरोग्य, ६. मानसिक आरोग्य, ७. आहार विषयक पोषण आणि शारीरिक व्यायाम, ८. मौखिक आरोग्य, ९. लैंगिक आणि पुनरुत्पादन संस्थेचे आरोग्य, १०. व्यसने ११. अशास्त्रीय सामाजिक रूढी. यामध्ये पर्यावरण स्वास्थ्याला पहिल्या तीन गोष्टीत महत्त्व दिल्याचे लक्षात येते.

पर्यावरणाशी आरोग्याचे नाते
पर्यावरणातील बिघाडामुळे जगभरात आरोग्याची हानी होताना आपण पाहतोच आहोत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते पर्यावरणातील सहा गोष्टींवर भर देऊन त्यातील सुधारणांवर लक्ष केंद्रित केल्यास जगातील यच्चयावत नागरिकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकेल.
वायू प्रदूषण : प्रदूषित हवेमुळे मृत्युदर वाढतो आहे. कार्बन मोनॉक्‍साईड, मिथेन आणि अशा इतर वायूंच्या प्रदूषणामुळे कर्करोग, फुफ्फुसांचे दीर्घकालीन आजार, हृदयविकार यांनी पीडित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे प्रदूषणकारी वायू मुख्यत्वे कारखाने आणि वाहनांच्या धुरातून निर्माण होतात. जगातील ४० टक्के जनता मानवी शरीराला विघातक ठरतील अशा प्रदूषित वायूंच्या पातळीमध्ये आपला श्वास घेते. त्यांच्या आरोग्यावर त्याचे होत असलेले दुष्परिणाम सामोरे येत आहेत. त्यामुळे हवेचे प्रदूषण घटविणे म्हणजेच पर्यावरण स्वास्थ्य सुधारणे. वायू प्रदूषणाचे नियंत्रण हे साऱ्या जगाच्या आरोग्यासाठी अत्यावश्‍यक आहे. 
जल प्रदूषण : नद्या, तलाव, समुद्र असे जमिनीवरील पाण्याचे साठे आणि भूगर्भजल या दोन्ही जलस्रोतांमध्ये आज प्रदूषण पाहायला मिळते आहे. विविध प्रकारचे जिवाणू, विषाणू आणि रसायने त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. पचनसंस्थेचे, मज्जासंस्थेचे, मूत्र विसर्जन संस्थेचे आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांचे आरोग्य त्यामुळे बिघडते हे वारंवार सिद्ध झाले आहे. साहजिकच जमिनीखालील आणि जमिनीवरील पाणी शुद्ध व प्रदूषणापासून सुरक्षित ठेवणे पर्यावरण स्वास्थ्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.
विषारी रसायने, पदार्थ आणि घातक कचरा व टाकाऊ पदार्थ : अन्न, पाणी, श्वास आणि या घटकांशी होणाऱ्या संपर्कातून या गोष्टी मानवी शरीरात प्रवेश करतात. यामधून असंख्य प्रकारचे आजार उत्पन्न होतात. अनेकदा प्राणावर बेतणाऱ्या घटना घडतात. अर्थातच या साऱ्या गोष्टी मानवाच्या आरोग्याला विघातक ठरतात.
घरे, शाळा, कार्यालये : याला वैद्यकीय भाषेत, ‘बिल्ट एन्व्हायर्न्मेंट’ म्हणतात. आजच्या आधुनिक जीवनात प्रत्येक व्यक्तीचा दिवसातील जास्त वेळ घर, शाळा-कॉलेज किंवा कार्यालयात जातो. या ठिकाणी जर अंतर्गत प्रदूषण, हवा व्यवस्थित खेळू शकेल अशी दारे-खिडक्‍या, पंखे किंवा एसी नसेल, तर आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. अशा ठिकाणाचे बांधकामातील दोष, विद्युतप्रवाहामधील दोष किंवा वायरिंगमधील दोष, आगीपासून संरक्षण करण्याची यंत्रणा नसणे, घरांच्या भिंतींना शिसेमिश्रित रंगकाम असणे यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अनेक व्याधी उत्पन्न होतात. साहजिकच निरामय घरे आणि परिसर हा पर्यावरण स्वास्थ्याचा अविभाज्य भाग ठरतो.
आरोग्यविषयक पायाभूत सुविधा : पर्यावरणातील घातक गोष्टींपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी सरकारी आरोग्यसेवा सर्व पातळीवर कार्यक्षम असावी लागते. यामध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्रे, जिल्हा सरकारी रुग्णालय, राज्य आणि केंद्र पातळीवरील आरोग्य विभाग, या साऱ्या पातळीवरील वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी पर्यावरण स्वास्थ्याबाबत जागरूक आणि कार्यक्षम असावे लागतात. कोणत्याही आजाराबाबतचे प्रतिबंधक प्रशिक्षण, त्याबाबतची जागरूकता, विविध आजारांच्या संभाव्य रुग्णांची देखरेख याबाबत सर्व पातळीवर जय्यत तयारी असावी लागते. पर्यावरणामुळे होणाऱ्या आजारांचे त्वरित निदान होऊन त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपचारांची साखळी तातडीने कार्यान्वित होणे नितांत गरजेचे असते.
जागतिक पर्यावरण स्वास्थ्य : स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी योग्य प्रमाणात सर्वांना उपलब्ध केल्यास आणि सांडपाण्याचा योग्य तऱ्हेने निचरा केल्यास असंख्य आजार काबूत ठेवता येतील. जागतिक पातळीवरील पर्यावरण स्वास्थ्यासाठी पिण्याच्या पाण्याची शुद्धता, सांडपाणी आणि कचऱ्याचे काटेकोर नियोजन अत्यावश्‍यक आहे. 

नवी आव्हाने
 आज जगातील जीवनशैली वेगाने बदलत आहे. त्याबरोबरच पर्यावरण स्वास्थ्य शास्त्रापुढे अनेक नवनवीन समस्या उभ्या राहत आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पर्यावरण स्वास्थ्याच्या रक्षणासाठी गेल्या पन्नास वर्षांत कित्येक नवीन गोष्टींचा विचार करावा लागतो आहे. येत्या काळात या समस्यांमध्ये अधिकाधिक भर पडतच जाणार आहे.
ग्लोबल वॉर्मिंग : जागतिक तापमानवाढीचा परिणाम समुद्राच्या पाण्याच्या पातळीवर, हवेच्या शुद्धतेच्या गुणधर्मांवर, संसर्गजन्य आणि साथीच्या आजारांच्या पद्धतींवर होतो. जागतिक तापमानवाढीचा परिणाम म्हणून महापूर, दुष्काळ, वादळे निर्माण होतात. याचे पर्यावरण स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतात. हे प्रमाण यापुढे वाढत जाईल असा अंदाज आहे.
आपत्ती निवारण योजना : पर्यावरण स्वास्थ्यावर नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तीचे दूरगामी परिणाम होत असतात. या दोन्ही प्रकारच्या आपत्तींमुळे निर्माण होणाऱ्या विपदांचा सामना योजनाबद्ध पद्धतीने करावा लागतो. या योजनांमध्ये आरोग्यसेवेच्या सर्वंकष तयारी सोबत पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, दळणवळण आणि संपर्क साधने, पाण्याचे नियोजन या गोष्टींचाही बारकाईने विचार करावा लागतो. पर्यावरण स्वास्थ्यासाठी अशी आपत्तीनिवारण योजना जगातील प्रत्येक देशात सर्वत्र आणि सर्वदूर उपलब्ध व्हायला हवी. हे अत्यंत जिकिरीचे काम आहे.
नॅनो तंत्रज्ञान : या नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवता येईल. मुख्यत्वेकरून निरनिराळ्या आजारांचे निदान, उपचार, प्रतिबंधक उपाय यांच्याबाबत महत्त्वाची माहिती संकलित करून निर्णय घेता येतात. वातावरणातील प्रतिकूल घटकांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे अचूक मोजमाप करता येते. याशिवाय इलेक्‍ट्रॉनिक्‍स, उत्पादन क्षेत्र तसेच ऊर्जाक्षेत्राचा सक्षमतेने वापर करून पर्यावरण स्वास्थ्याचे संवर्धन करता येऊ शकेल. मात्र, या तंत्रज्ञानाच्या वापरानेदेखील भविष्यकाळात काही अनपेक्षित दुष्परिणाम आरोग्यावर आणि पर्यावरणावर होण्याची शक्‍यता टाळता येत नाही.   
नवी जीवनपद्धती : मानवी समाजातील हिंसक घटना, सोशल नेटवर्क्‍स, बदलती बैठी जीवनशैली यांचा परिणाम आरोग्यावर होताना दिसतो आहे. मात्र, यापुढे तो अधिकाधिक वाढत जाईल. पाणी, पेट्रोल, खनिजे, अन्नधान्य यांची उपलब्धी कमी होत गेल्यास त्याचे परिणाम आरोग्यावर वाढत्या प्रमाणात होतील.
नवनवीन तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगती : आज विज्ञानाच्या प्रगतीने अनेक नवीन रासायनिक पदार्थ, नवीन उत्पादने, करमणुकीची आणि नित्य वापरासाठी अनेकविध साधने, ॲप्स, गेम्स लोकांसमोर येत आहेत. यांच्या दुष्परिणामांची कल्पना आताच येत नाही, मात्र त्यासाठी या नव्या गोष्टींचे काळजीपूर्वक परिशीलन करून संभाव्य त्रासाबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. किंबहुना अशी खात्री दिल्याशिवाय या गोष्टींच्या वापराला परवानगी मिळू नये. 
दैनंदिन वापरातील वस्तू : घरातील भिंतींना अनेक आकर्षक रंग दिले जातात. घरात लहान मुले असतील, तर ती या भिंती चाटतात किंवा ते भिंतींना हात लावून तो तोंडात घालतात. वरून दिलखेचक दिसणाऱ्या या रंगामध्ये शिसे असते. त्यामुळे पाच वर्षांखालील या मुलांना शिशाची विषबाधा होते. अमेरिकेत २०१७ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात या वयोगटातील चाळीस लाख मुलांच्या रक्तात शिसे अतिशय धोकादायक पातळीपर्यंत वाढलेले दिसले. आजही अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या पर्यावरण स्वास्थावर परिणाम करू शकतात. 

माणसाच्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून म्हणजे निसर्गातूनच होत असते. तरीही पर्यावरण संवर्धनाकरीता भरीव प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाहीत. उलट पर्यावरणामध्ये उपलब्ध घटकांचा हव्यासापोटी आपण जास्तीत जास्त वापर करत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्यास नजीकच्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल, यामध्ये कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही.
 
पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करताना मानवाने आपल्याबरोबरच इतर सजीवांचा विचार करायला हवा. तरच पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही आणि भविष्यात येणाऱ्या पर्यावरण स्वास्थ्य समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. मात्र, आज पर्यावरणीय समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होताना दिसत आहे. पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाचीच एक सामाजिक जबाबदारी आहे हे विसरता कामा नये. जनजागृती म्हणून आपण प्रत्येकाने पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडल्यास पर्यावरणाचे आणि जगातील प्रत्येकाच्या आरोग्याचे संरक्षण आणि संवर्धन व्हायला मदत होईल.

संबंधित बातम्या