पर्यावरण संवर्धन गरजेचे

प्रा. रेखा नाबर
मंगळवार, 11 जून 2019

पर्यावरण संवर्धन
 

निसर्ग अपुला सखा सोबती। 
सदैव धरावी त्याची संगती।।

संत तुकोबारायांपासून सर्वांनी आपल्याला हीच शिकवण दिली, तरीसुद्धा आपल्या प्रगतीसाठी माणूस निसर्गावर घाला घालून अधोगतीकडे वाटचाल करीत आहे. नैसर्गिक संपत्तीच्या ऱ्हासामुळे प्रदूषणाचा प्रादुर्भाव होऊन पर्यावरणाला धोका पोचत आहे. ही जागतिक स्तरावरची विवंचना झाली आहे. वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबर ही समस्या गंभीर होत जाणार आहे.

विविध माध्यमांतून निर्माण झालेल्या भंगाराची विल्हेवाट सुरक्षितरीत्या कशी लावायची हा प्रश्‍न सर्व देशांना भेडसावत आहे. अमेरिकेत वाहनांचा वापर जास्त प्रमाणावर होतो. एखादे वाहन बिघडले, तर वाहनचालक ते रस्त्यावरच सोडतो. सरकार दरबारी दंड भरतो. विम्याचे संरक्षण वाहन धारकांना असतेच. त्यामुळे हजारो टन पोलाद अथवा लोखंड दरवर्षी तयार होते. ते भारतासारख्या विकसनशील देशात येते. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर दूषितवायू तयार होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांत अमेरिकन कंपन्यांनी आपली नजर जगातील अन्य देशांकडे वळवली आहे. जी-८ ही प्रगत राष्ट्रे मोठ्या प्रमाणावर केमिकल्स तयार करत असून, त्यामुळे दूषित वायू तयार होत आहेत. युनोनेसुद्धा याची दखल घेतली आहे. विविध प्रकारचे धातू, केमिकल्स, औषधे, ई-कचरा, हॉस्पिटल मटेरिअल इ. असंख्य निरुपयोगी वस्तू आपण पृथ्वीच्या पोटात गाडतो किंवा नदी, नाले, समुद्रात सोडतो. त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. जलप्रदूषण हे नेहमीच कारखान्यांतून २० टक्के सांडपाणी व नागरी वस्तीतून ८० टक्के सांडपाणी अशा स्वरूपात असते. यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर होऊ शकतो. युरोपमधील अनेक देशांनी हे सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील एमआयडीसीमध्ये तशी यंत्रणा बसवली असली, तरी त्याची कार्यशक्ती पुरेशी नाही. अनेक कारखाने समुद्रात किंवा नदीनाल्यांमध्ये सांडपाणी सोडतात. त्यामुळे प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. याकरिता जनजागृती होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमातदेखील या विषयांचा समावेश केला पाहिजे. नागरिक म्हणूनही आपल्या जबाबदाऱ्या आहेत. 

कोकण किनाऱ्यावर समुद्रातील कासवांची मोठ्या प्रमाणावर हत्या होते. मादी एका वेळेस भरपूर अंडी घालते. काही काळानंतर वाळूतून पिल्ले आपोआप बाहेर येऊन समुद्राकडे कूच करू लागतात. पाण्यामधील दूषित द्रव्ये कासव पोटात घेतो. त्यामुळे जलप्रदूषणास आळा बसतो. पण किनारपट्टीवरील माणूस त्यांचा खाद्य म्हणून वापर करतो. 

काळानुरूप गिधाडांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. गिधाडे निसर्ग स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. गुरांसाठी वापरत असलेले पेनकिलर डायक्‍लोफेमिना गिधाडांना घातक असते. मृत जनावर खाल्ल्यावर अल्पावधीत गिधाडाचा मृत्यू होतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशी जागृती केल्यावर गुरे जमिनीत पुरली जातील आणि गिधाडे वाचतील.

सध्या मोठ्या शहरांत डंपिंग ग्राउंडचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रस्त्यावर जाळला गेलेला कचरा, त्यातील धातू, प्लास्टिक यापासून विषारी वायू तयार होऊन पर्यावरण धोक्‍यात येते. डंपिंग ग्राउंडला आग लावण्याचा प्रकारही तसाच आहे. ई-कचऱ्यामुळेसुद्धा अशीच समस्या उद्‌भवते. आता त्यात स्पेस कचऱ्याची भर पडली आहे. पर्यावरण ऱ्हासाच्या संदर्भात जागतिक तापमानवाढ हा कळीचा मुद्दा आहे. यात होणारी वाढ मुख्यत्वेकरून जंगलतोडीमुळे होत आहे. मानवाची हाव नाशास कारणीभूत ठरत आहे. औद्योगिकीकरणामध्ये कोळसा व तेलाचा वापर वारेमाप होतो. कार्बन डायऑक्‍साईड, मिथेन हे वायू उष्णता धरून ठेवतात. पेट्रोल, डिझेल, कोळसा जाळल्यामुळे वातावरण प्रदूषित होते. तापमान वाढून जागतिक तापमानवाढ सुरू होते. नवीन शोधांमुळे सूर्यकिरण व पृथ्वी यांच्यामधील संरक्षक कवचाचा संहार होत आहे. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायू संरक्षक असून सूर्यापासून येणारी नीलकिरणे थोपविण्याचे काम करतो. प्रयोगांती असे सिद्ध झाले आहे, की दर दहा वर्षांत हे तापमान ०.२ अंश सेल्सिअस इतके वाढते. वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईड, पाण्याची वाफ, मिथेन यांचे प्रमाण वाढत आहे.

पेट्रोल, वीज इ. स्वरूपात ऊर्जा वापरली जाते. पारंपरिक पद्धतीने ऊर्जा निर्माण करताना कार्बन जाळावा लागतो. त्यामुळे कार्बन डायऑक्‍साईड तयार होतो. सर्वच देशांत वीज निर्मिती होते. त्यामुळे भरपूर कार्बन डायऑक्‍साईड हवेत सोडला जाऊन हवा प्रदूषित होते. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. धुव्रीय प्रदेशातील बर्फ वितळू लागला आहे. १९९५ पासून ध्रुवीय प्रदेशात बर्फ पडणे कमी झाले असून पूर्वीची बर्फाची जाडी कमी झाली आहे. समुद्राची पातळी वाढून अनेक देशांसाठी ती समस्या ठरली आहे. त्याचा शेतीवर व जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होणार आहे. विषुववृत्ताकडून निघणारे वारे उत्तर व दक्षिण ध्रुवाकडे जातात. त्याचवेळी दोन्ही ध्रुवांकडून विषुववृत्ताकडे वारे वाहतात. हे वारे मधेच मिळतात व मागे फिरतात. त्यामुळे तापमानात वाढ होते. समुद्राची पातळी वर्षागणिक एक मिलिमीटरने वाढत आहे. येत्या काही वर्षांत समुद्र पृथ्वीवरील काही प्रदेश गिळंकृत करू शकतो. शिवाय त्सुनामीचा धोका आहेच! नागरिक म्हणून आपण घरगुती स्तरावर वीज वापरात बचत करू शकतो. फ्रिज व एसीमध्ये क्‍लोरोफ्लुरो कार्बन वायू वापरला जातो. तो शरीराला आवश्‍यक असलेला ओझोन वायू नष्ट करतो. वाहनांनी सोडलेल्या धुरातून कार्बन मोनॉक्‍साईड, शिसे उत्सर्जित होते. ते घातक असते. त्याकरिता शिसेविरहीत पेट्रोल, सीएनजी, सीपीजी गॅसेसचा वापर असलेली वाहने वापरावी.

भारताला सात हजार किलोमीटरचा सागरी किनारा आहे. मच्छीमारी करताना निर्माण होणारे सांडपाणी समुद्रात सोडले जाते. शहरांतून समुद्रात सोडलेल्या सांडपाण्यामध्ये असणाऱ्या रासायनिक घटकांचा परिणाम सागरी जीवसृष्टीवर होतो. उत्सवादरम्यान केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विघटित होत नाहीत. त्यामध्ये केमिकल्ससुद्धा असतात. थर्माकोल व प्लास्टिकचेही तसेच आहे. त्याकरिता इको फ्रेंडली तत्त्वावर सण साजरे करावेत.

फळे, भात, कापूस यांच्यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके वापरली जातात. ती पाण्याच्या माध्यमातून जमिनीत उतरतात व पुन्हा आपल्याच शरीरात जातात. आपले आरोग्य धोक्‍यात येते. 

समुद्राच्या पृष्ठभागाखालील तापमानात बदल झाल्यास तेथील जीवसृष्टी धोक्‍यात येते. शंखशिंपल्याच्या प्रजातीसुद्धा नष्ट होतात. समुद्रकिनारी असलेले खारफुटीचे जंगल इमारती बांधण्यासाठी नष्ट केले जाते. हे मॅन्ग्रोव्ह म्हणजे समुद्र व जमीन यात असणारे बफरझोन आहे. हे संरक्षण स्वार्थापोटी नष्ट करून अनर्थ ओढवून घेतला जात आहे.
 
नद्यांची तर गटारे झाली आहेत. कारखाने सांडपाणी सोडतात. बांधकामासाठी वाळूचा उपसा होतो. त्याबद्दल शासनाचे कायदे कडक आहेत, पण अंमलबजावणी ढिसाळ आहे. जंगलतोडीमुळे नदीची पात्रे मातीने भरून जातात. मानवाने निर्माण केलेल्या या संकटावर जनजागृती हा एकच उपाय आहे.

मेट्रोच्या कामामुळे वारेमाप वृक्षतोड होते. तोडलेल्या वृक्षांइतके नवे वृक्ष लावले जात नाहीत. शिवाय ध्वनिप्रदूषण आहेच. सुधारणा अपरिहार्य आहे. परंतु, समतोल राखण्याचा पर्याय आहे. देशाची स्थिती त्याच्या मातीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. मातीमधील सूक्ष्म बॅक्‍टेरिया मानवाचे मित्र आहेत, म्हणून मातीची काळजी घेणे आवश्‍यक आहे. भारतात प्रतिवर्षी अंदाजे ५५० कोटी टन मातीची धूप होते. त्यातील ४० टक्के माती समुद्रात, तर ४० टक्के माती नदीच्या पात्रात किंवा धरणात साठते. धरणे गाळाने भरतात. धरणांची उंची वाढविण्याची गरज भासते. परंतु, तिथे राजकारणाचा तिढा असतो. उंची वाढविण्यासाठी जंगलतोड करून आजूबाजूची गावे ओसाड करतात. गाळ उपसण्याची क्रियाच थांबली आहे. पर्यावरण तज्ज्ञांची ही मागणी स्तुत्य आहे.

जंगलतोडीचा गंभीर तोटा म्हणजे औषधी वनस्पती नष्ट होत आहेत. आपण निर्यात करीत असलेल्या औषधी वनस्पतींवर विपरीत परिणाम होत आहेत. औषधी वनस्पतींच्या वापरासाठी जागतिक स्तरावर दोन लाख कोटींची गुंतवणूक आहे. त्यात भारताचा वाटा हजार कोटींचा आहे. आज दोन लाख पन्नास हजार औषधी वनस्पती जगात आहेत. त्यातील ऐंशी हजार भारतात आहेत. आपण फारच थोड्या वनस्पतींचा वापर करतो. आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती तीन हजाराच्या आसपास आहेत. आजपर्यंत फक्त सातशे वनस्पतींवर संशोधन केले गेले आहे. या क्षेत्रात संशोधनास भरपूर वाव आहे.

पाण्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर बोअरवेल्स आहेत. त्यामुळे पाण्याचा वारेमाप उपसा होतो. परंतु, पाणी अडविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. कंबोडिया या कोकण सदृश देशात पाण्याची समस्या होती. तेथील घरेसुद्धा कौलारू आहेत. तेथील जागरूक राज्यकर्त्यांनी जनजागृतीच्या माध्यमातून प्रत्येक घराच्या चारही दिशांना चार फुटांचे चरे मारले. पावसाचे कौलावरून पडणारे पाणी या चऱ्यांत साठविले गेले. पुढील तीन वर्षांतच तेथील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची समस्या दूर झाली. अशी जागृती आपल्या देशात होणे ही काळाची गरज आहे. आपल्या देशात जवळ जवळ १८ टक्के जमीन पाटाच्या पाण्याखाली आहे. उर्वरित ८० टक्के निव्वळ पावसावर अवलंबून आहे. पंजाबखेरीज कोणताही प्रांत याचा गांभीर्याने विचार करीत नाही.

भारतात मुबलक सौरऊर्जा असूनसुद्धा हवा तितका उपयोग होत नाही. तिच्यापासून वीजनिर्मिती करणे शक्‍य आहे. त्यातून अर्थार्जनसुद्धा होऊ शकते. दैनंदिन जीवनापासून सामाजिक व राजकीय स्तरापर्यंत ‘प्रदूषण रोखा आणि पर्यावरण राखा’ असा आचरणाचा मूलमंत्र असल्यास आपल्या पुढच्या पिढ्यांचे जीवन सुखावह होईल. पूर्वीचे वातावरण निसर्गाशी एकरूप होण्याचे, तर सध्याचे यंत्राशी जोडले गेलेले आहे. निसर्गाच्या सांनिध्यात हर्ष, उल्हास, उत्साह यांना उधाण येत असे. आता निव्वळ औपचारिकपणा राहिला आहे. समाजसुधारकांमुळे काही घातक रूढी बंद पडल्या ते योग्य झाले. आपली कायिक, वाचिक व मानसिक प्रगती व्हावी हेच उद्दिष्ट असते. जुन्या-नव्याचा सुंदर मेळ घालून, विज्ञानाची कास धरून पर्यावरणाचे संतुलन राखणे हे ध्येय असावे. 

संबंधित बातम्या