चळवळ रुजवणारा माणूस

अर्चना जगदीश 
सोमवार, 7 जून 2021

पर्यावरण दिन विशेष

आपला निसर्गाबद्दलचा चांगला विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर समाज सहज सहभागी होईल अशा कार्यक्रमावर सुंदरलाल बहुगुणा यांचा विश्वास होता. ‘आहे ते प्रत्येक झाड आणि निसर्गाने दिलं आहे ते जंगल राखलं पाहिजे,’ असं सुंदरलालजींचं मत होतं. झाडं लावून जंगल तयार करता येतं यावर तर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता!!

मी  सुंदरलाल बहुगुणांना पहिल्यांदा बघितलं  ते  १९८४ मध्ये. एम.एस्सी. करत असताना पुणे विद्यापीठाच्या  (आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) वनस्पतीशास्त्र विभागात त्यांचे ‘चिपको’ आंदोलनाबद्दल एक व्याख्यान आयोजित केले होते, तेव्हा.  पुण्याचा तरुण पर्यावरणप्रेमी आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासकांबरोबर चिपको मोहीम काढली होती तो सामाजिक  कार्यकर्ता  जगदीश गोडबोले त्यांना  घेऊन  आला होता. त्यादिवशी बहुगुणांकडून  चिपको मोहीम आणि त्यांच्या कामाबद्दल ऐकायला मिळालं  ते महत्त्वाचं होतं, कारण आमच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात पर्यावरण शास्त्र हा नवा विषय सुरू झाला होता.  वक्तृत्व फार अवगत नसलं  तरी छोट्या चणीचे  बहुगुणा बोलत होते, ते फार आतून आलेलं  आणि पर्यावरणाबद्दल मूलभूत विचार मांडणारं  होतं. त्यांचा मुख्य भर चिपको आंदोलन लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी काय काय केलं यावर होता. एखादी  चळवळ उभी राहून मोठी झाल्यावर ती यशस्वी की अयशस्वी, यावर खूप चर्चा होतात, पण ती चळवळ उभी कशी राहिली याबद्दलचं  विश्लेषण मागे पडतं. सुंदरलालजींनी मात्र ही प्रक्रिया अगदी व्यवस्थित समजावून सांगितली. म्हणूनच नैसर्गिक संसाधने वापरणाऱ्या  लोकांना  त्या संसाधनांच्या संरक्षणात सहभागी करून घ्यायला हवं, हा मूलभूत विचार तिथेच माझ्या मनात रुजला असावा.  

पुढे जगदीशमुळे त्यांना भेटण्याचा योग्य आला तो त्यांच्या पुणे भेटीत ते काही वेळा आमच्याकडे मुक्कामाला येत त्यामुळे.  त्यांच्या काही विशेष तत्त्वांमुळे, ते येणार असतील तर आधी तयारी करावी लागायची; म्हणजे भाताच्या स्थानिक जातींचाच ते आग्रह धरायचे आणि जेवणात त्याबरोबर गायीचे तूप महत्त्वाचे. पण हासुद्धा एक आनंदाचा भाग असायचा. त्यांचं  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाबद्दल जागरूक असायचे, तयारी करायचे आणि कितीही उत्तम  विषयावरचं संभाषण सुरू  असलं  तरी त्यात वाहून न जाता आपल्या  धीम्या गतीने मुद्दे मांडत राहायचे.  

चमोलीच्या  दशोली ग्राम स्वराज्य मंडळाचे कार्यकर्ते  चंडिप्रसाद भट यांच्या अथक परिश्रमातून, स्थानिक महिलांना जंगल असण्याचे फायदे समजावून  दिल्यामुळे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. हिमालय हा त्यामानाने तरुण पर्वत असल्यामुळे  तिथे जंगल तुटलं तर भूस्खलनाचा, डोंगर खचण्याचा धोका  लगेच दिसतो. उतारावरची थोडी फार शेती आणि बाकी सगळ्या गरजा  पुरविणारे ओक-बाँझचे जंगल हाच  जीवनाचा आधार होता. म्हणूनच चमोलीच्या आसपासच्या गावातल्या महिला मंगल दलांनी जंगल राखायला सुरुवात केली होती आणि ठेकेदार झाडं कापायला आल्यावर त्या सगळ्या स्त्रियांनी झाडाला मिठ्या मारल्या होत्या. 

झाड तोडणारा जरी ठेकेदार असला तरी तोडणारे लोक स्थानिक होते. त्यामुळे या भागातल्या गावांमध्ये जंगलाचे फायदे मोठ्या प्रमाणावर समजावून सांगण्यासाठी लोक जागृतीची गरज होती आणि हे छोटं आंदोलन आणखी सर्वदूर पोहोचविण्याची गरज होती. बहुगुणांनी त्यावर लक्ष केंद्रित केलं.  

आपला निसर्गाबद्दलचा चांगला  विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर समाज सहज सहभागी होईल अशा  कार्यक्रमावर सुंदरलालजींचा विश्वास होता. भागवत आणि  कृष्णलीला हा जनमानसाच्या हृदयात स्थान असलेल्या  संस्कृतीचा भाग. मग त्याचाच आधार घेत त्यांनी उत्तराखंडमधल्या अनेक गावात  जंगल आणि झाडांबद्दल जाणीव जागृती करायला सुरवात केली.  रेनी  गावातल्या छोट्याशा  प्रसंगाने सुरू झालेले आंदोलन सुंदरलालजींच्या  कार्यक्रमामुळे  हिमालयातल्या शेकडो गावांमध्ये पोहोचले. चिपको आंदोलनाला, मुख्य  प्रवाहातल्या स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये, अन्य माध्यमांमध्ये जागा मिळवून देण्याचं कामही त्यांचंच. भारतभर फिरून  त्यांनी अक्षरशः शेकडो तरुण कार्यकर्त्यांना  पर्यावरण संरक्षणाच्या कामाची गरज पटवून दिली, त्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. शांततामय मार्गाने  मुजोरांना नमवता  येतं हे पुन्हा दाखवून दिलं. चिपको आंदोलनाने सर्व प्रकारच्या, विचारांच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचं काम केलं. ते पुढे नर्मदा आणि इतरही अनेक पर्यावरण आणि सामाजिक प्रश्नांवरून झालेल्या देशव्यापी आंदोलनांमध्ये दिसून आलं. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस भारतातल्या  महत्त्वाच्या पर्यावरण जागृती मोहिमांपैकी एक पश्चिम घाट बचाओ मोहिमेच्या दक्षिणेकडच्या पथकाची सुरुवात सुंदरलालजींनी केली, तर उत्तरेकडे चंडीप्रसाद आले होते. 

पर्यावरण संरक्षण जाणीव जागृती करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांना, कार्यकर्त्यांना एक नवा कार्यक्रम चिपकोच्या निमित्ताने मिळाला. त्याचे पडसाद हिमालयापासून दूर अगदी कर्नाटकातही  उमटले. शिरसीचा कार्यकर्ता पांडुरंग हेगडेने उत्तर कन्नडा  जिल्ह्यातील  संपन्न जंगलं  वाचविण्यासाठी ‘अप्पीको’ आंदोलन सुरू केलं ते सुंदरलालजींच्या प्रेरणेमुळे.  सुंदरलालजींचा  पांडुरंग, जगदीश अशा प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जीव होता आणि त्यांना मदत करायला ते नेहमीच तयार असायचे. महाराष्ट्रातून गेलेल्या चिपको अभ्यास मोहिमेतल्या अनेक कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा संपर्क कायम होता. १९९२ मधल्या गढवाल भूकंपाच्यावेळी महाराष्ट्रातून आणि देशाच्या अन्य भागांतून वार्तांकनासाठी  गेलेले  पत्रकार, मदत घेऊन गेलेले कार्यकर्ते  यांना योग्य ठिकाणी पोहोचायला मदत मिळाली ती  चिपकोमुळे जोडल्या गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांची. जगदीशने भूकंपग्रस्तांना  देण्यासाठी नेलेली मदत योग्य लोकांना पोहोचविण्यासाठी सुंदरलाजींच्या टिहरीच्या आश्रमाची आणि तिथल्या कार्यकर्त्याची मदत झाली. 

पदयात्रा आणि लोकसंपर्क हा त्यांच्या कामाचा गाभा होता. त्यांनी हिमालयात हजारो छोट्या मोठ्या पदयात्रा काढल्या आणि  हिमालयातल्या, विशेषतः उत्तराखंड मधल्या कानाकोपऱ्यातल्या गावांपर्यंत पर्यावरणाचा संदेश आणि कृती कार्यक्रम घेऊन ते पोहोचले होते. एक माणूस म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून हिमालय  सुंदरलालजींना जेव्हढा कळला होता तेव्हढा  क्वचितच आणखी कुणाला समजला असेल.  सुंदरलालजींची सुरुवात चिपको आंदोलनाच्या  प्रसाराच्या कामाने झाली  असली  तरी पुढे त्यांनी हिमालयातील विकास आणि निसर्गाचा विनाश यावर आंदोलन आणि निसर्गाच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी अथक प्रयत्न केले. १९८० ते २००४ अशी जवळजवळ पंचवीस वर्षे त्यांनी टिहरी धरणाला विरोध केला,  आणि लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले. अनेक उपोषणं आणि उपवास  केले. अनेकदा राजकीय  हस्तक्षेप किंवा चर्चेच्या शक्यतेमुळे त्यांनी उपोषण सोडले. यावरून त्यांना टीकेचे धनीदेखील व्हावे लागले. पण मला वाटतं, गांधीजींप्रमाणेच उपोषणाचं शस्त्र किती आणि केव्हा वापरायचं याची सुंदरलालजींना उत्तम जाणीव असावी.  त्यांनी स्वतः भलेही गावांमध्ये प्रत्यक्ष चिपकोच्या कामाचं  नेतृत्व केलं नसेल, पण जंगलतोडीचे चटके सोसणाऱ्या आणि त्याविरूद्ध बोलणाऱ्या स्थानिक लोकांकडे जगाचं, धोरणकर्त्यांचं लक्ष वेधून घेणं ही मोठी गोष्ट सुंदरलालजींमुळे घडली होती आणि ते काम सुंदरलालजींनी शेवटपर्यंत केलं.  गेली काही वर्षे वृद्धापकाळाने त्यांचा प्रवास त्यामानाने कमी झाला  होता. पण सर्व प्रकारच्या पर्यावरण आंदोलनांकडे त्यांचं लक्ष असायचं. पंधरा दिवसांपूर्वी सुंदरलालजींनी जगाचा निरोप घेतला तोही कोरोनामुळे, हे कळल्यावर  वाईट  वाटलंच पण देशभर पर्यावरण चळवळीचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता हरपला म्हणून जास्त त्रास झाला.  त्यानंतर समाज माध्यमांच्या भिंतींवर लोकांनी खूप लिहिलं, त्यांच्याबरोबरचे आपले  फोटो डकवले. पण ते असताना आपण गेल्या दहा वर्षात त्यांच्याकडे  बघितलं का? हा प्रश्न मला अस्वस्थ करतो. आज कोरोना पीडितांना झाडं लावायला सांगणाऱ्या  डॉक्टरची खिल्ली उडवली जाते, पण प्रत्येक झाड प्राणवायू आणि कार्बन यांचा समतोल  राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते म्हणून ते ठेवलंच पाहिजे हे आपण विसरून जातो.

सुंदरलालजी आणि चिपको आंदोलन मला महत्त्वाचं वाटतं,  कारण सुंदरलालजी, ‘आहे ते प्रत्येक झाड आणि निसर्गाने दिलं आहे ते जंगल राखलं पाहिजे’ या मताचे होते. झाडं लावून जंगल तयार करता येतं यावर तर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता!! 

काही दिवस लेख आणि श्रद्धांजलीचा सिलसिला चालू राहील आणि कालांतराने समाज माध्यमप्रणित आभासी  चळवळीतून जंगल आणि झाडं  वाचविता येतात अशा भ्रमात असणारे  सुंदरलालजींना विसरून जातील. पण आज गरज आहे ती सर्व प्रकारची नैसर्गिक जंगलं, परंपरेनं संस्कृतीनं टिकवून ठेवलेल्या देवराया, परंपरांनी पवित्र मानलेले वृक्ष जपण्यासाठी जमिनीवर कृती कार्यक्रम राबविण्याची, स्थानिक समाजांना पुन्हा निसर्गाशी जोडण्याची. संशोधन आणि समाज माध्यमांपलीकडे जाऊन हे करायला काही जण पुढे आले आणि थोडा काळ का होईना ही जबाबदारी घेतली तरच ती सुंदरलजींसारख्या पर्यावरण योद्ध्याला खरी श्रद्धांजली असेल.

संबंधित बातम्या