बदलत गेलेली जैवविविधता

इरावती बारसोडे
सोमवार, 7 जून 2021

पर्यावरण दिन विशेष

पुण्याच्या जैवविविधतेमध्ये गेल्या दोन-तीन दशकांपासून बदल होत असला, तरी गेल्या १० वर्षांमध्ये या बदलांचा वेग वाढल्याचे तज्ज्ञ म्हणतात. आयटी हब म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात या आयटी कंपन्या ज्या ठिकाणी आज उभ्या आहेत तिथे पूर्वी गवताळ प्रदेश होते. हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा अधिवास होता. हा अधिवास कमी होण्यास कधीच सुरुवात झाली होती, मात्र गेल्या दशकापासून हा अधिवास बहुतांश नाहीसा झाला आहे. आता त्याची जागा नागरी वनांनी घेतली आहे.

गेल्या दशकभरात पुणे झपाट्याने वाढले. ठिकठिकाणी मोठाल्या इमारती उभ्या राहिल्या. वाहतूक तर बेसुमार वाढली. पण तरीही पुण्यात हिरवाई मात्र जागोजागी दिसते. ऐन उन्हाळ्यात नळस्टॉपजवळच्या रस्ता दुभाजकामध्ये फुललेला पिवळाजर्द बहावा पाहून मन शांत होते. वड, पिंपळ, अशोक (सीतेचा नव्हे) तर ठिकठिकाणी दिसतात. कधी कुठल्या उद्यानातल्या वृक्षावर पोपटांची जोडी दिसते, तर कधी कुठल्या टेकडीवर मोर आपल्यासमोर पायवाट ओलांडून जातो. विकासाच्या रेट्यात जैवविविधतेची थोडी पीछेहाट झाली असली तरी अजूनही या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत जैवविविधता टिकून आहे.

टेकड्यांचे वैभव
पुण्याच्या जैवविविधतेसाठी इथल्या टेकड्या फार महत्त्वाच्या आहेत. पर्वती, वेताळ, तळजाई, वाघजाई, हनुमान, चतुःश्रुंगी, बाणेर-पाषाण आणि रामटेकडी अशा टेकड्या अजूनही पुण्याच्या भोवतीने उभ्या आहेत. इथेही पूर्वी गवताळ प्रदेश होते. कालांतराने तिथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले. गवताळ प्रदेशाची जागा वृक्षांनी घेतली, तसा तिथे नागरी वनांचा अधिवास तयार झाला आहे. काही झाडे नैसर्गिक पद्धतीने वाढली, तर काही मुद्दाम लावली गेली. जी मुद्दाम लावली त्यामध्ये सुबाभूळ, निलगिरी अशा परदेशी प्रजाती अधिक होत्या. त्या वेगाने वाढतात म्हणून त्यांची लागवड केली गेली. परदेशी प्रजाती लावू नयेत, त्यामुळे परिसंस्था बिघडू शकते ही जागरूकता त्यावेळी नव्हती, ती आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये आली आहे. टेकड्यांवर काही प्रदेशनिष्ठ (एन्डेमिक) झाडेही आढळतात. कात्रज, वेताळ टेकडीवर कुसर नावाची वनस्पती आढळते. परदेशी प्रजाती अभ्यासासाठी संस्थेच्या आवारात लावायला किंवा सौदर्यीकरणासाठी थोड्या प्रमाणात लावायला हरकत नाही. पण टेकड्यांवर अशी झाडे लावणे योग्य नसल्याचे मत वनस्पतितज्ज्ञ डॉ. मंदार दातार यांनी व्यक्त केले. कोणत्याही झाडाची लागवड अधिवास समजून घेऊन करणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. 

पुणे दख्खनचे पठार आणि पश्‍चिम घाट यांच्या सीमेवर आहे. मॉन्सून आला की तिथे ढग येतात, दृश्‍यमानता कमी होते. अशा वेळी त्या भागातले जंगल बॅब्लर, ब्लॅक बर्डसारखे अनेक पक्षी पुण्यातल्या टेकड्यांवर येतात. त्यामुळे टेकड्या त्या पक्ष्यांसाठी ‘बफर झोन’ असतो, अशी माहिती पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी दिली.

जैवविविधतेसाठी महत्त्वाच्या असलेल्या या टेकड्यांवरील हस्तक्षेप आता वाढू लागला आहे. एकेकाळी नाराच गरुडासारख्या पक्ष्यांची घरटी इथे दिसायची. पण आता त्याला बघायचे असेल तर सिंहगड व्हॅलीपर्यंत जावे लागते. दहा वर्षांपूर्वी आढळणाऱ्या काही वनस्पती प्रजाती आता कमी होत चालल्या आहेत. टेकड्यांना आता अतिक्रमणाचा विळखा पडत आहे, त्यामुळे इथली वनराजी जपणे आव्हान ठरू लागले आहे.

शहरी जैवविविधता
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय (एफसी), विधी महाविद्यालय, भांडारकर संशोधन संस्था, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी), यांसारख्या शैक्षणिक संस्था, नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीसह (एनडीए) शहरातील लष्कराच्या इतर संस्था, एम्प्रेस गार्डनसारखी जुनी उद्याने, टेल्कोसारख्या कंपन्या या ठिकाणी अजूनही वनस्पतींसह इतर प्रजातींची जैवविविधता टिकून आहे. याचे कारण म्हणजे या सर्व संस्था जुन्या आहेत आणि इथली हिरवाई जाणीवपूर्वक जपली गेली आहे. महापालिकेच्या बहुतेक बागा पक्ष्यांच्या आकर्षणाच्या जागा  आहेत. पेशवे पार्कसारख्या उद्यानांमध्ये पक्षी राहतात. अनेक फुलपाखरेही आढळतात. पुणे महानगरपालिकेच्या २०१९-२०च्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालानुसार, पुण्यामध्ये वृक्षांच्या ४१८ प्रजाती आढळतात. त्यामध्ये १११ दुर्मीळ प्रजाती आहेत. जीआयएस पद्धतीने केलेल्या गणनेनुसार शहरात ४१ लाखांहून अधिक वृक्ष असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

याशिवाय आता बहुतेक सोसायट्यांमध्ये झाडे लावणे अनिवार्य आहे. नागरिकांमध्येही जागरूकता आल्याने, रहिवासीच झाडे लावतात. ज्या सोसायट्या १० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या आहेत, तिथे इमारतींभोवती उंच झाडोरा आहे. त्यामुळे आता शहरात इमारतींच्या भोवताली वेगळा अधिवास तयार होतो आहे. पूर्वी फक्त विद्यापीठासारख्या गर्द झाडोऱ्यात दिसणारा टिकेलचा ब्ल्यू फ्लाय कॅचर आता इतर ठिकाणीही उंच झाडांवर हिरवाई असेल तिथे सहज दिसतो. नाचरासुद्धा पुण्याभोवतालच्या गावांमध्ये दिसायचा, तो आता सोसायट्यांमध्ये दिसतो. रेड व्हिस्कर बुलबुलचेही तेच! हे सकारात्मक बदल गेल्या दहा वर्षांमध्ये घडले आहेत, असे डॉ. संजीव नलावडे यांनी सांगितले. अनेक ठिकाणी टेरेस गार्डन केली जातात, बागांमध्ये झाडे लावली जातात. त्यामुळे सन बर्ड, वटवट्या, नाचरा, पॅरेडाईज फ्लाय कॅचर असे पक्षी सहज दिसू लागले आहेत. वैकुंठ स्मशानभूमी, पोलीस ग्राउंड, चित्तरंजन रोपवाटिका, एम्प्रेस गार्डनसारख्या जुन्या बागांमध्ये अजूनही बगळे, पाणकावळे, पोपट रातथाऱ्याला येतात. फळझाडे लावल्यामुळे वटवाघळांच्या संख्येमध्येही वाढ झालेली आहे. 

अलीकडे शहरामधून वाहणाऱ्या नाल्यांच्या काठांवर काही ठिकाणी नाला उद्याने विकसित झाली आहेत, त्याशिवाय वारजे, बाणेर-पाषाण भागांत टेकड्यांवर जैवविविधता उद्यानेही उभारली गेली आहेत.

नाहीशा झालेल्या प्रजाती
नदीजवळ वाळुंज नावाची प्रजाती आढळत असे. पण आता पुण्यात त्याची फक्त दोन किंवा तीनच झाडे शिल्लक असतील. पाषाण तळ्याकाठी पावसाळ्यानंतर पाणी आटले आणि दलदली कोरड्या पडल्या की तिथे ‘शिशिर आमरी’ आणि ‘संयोगिता’ ही दोन ऑर्किड्स दिसायची. ही ऑर्किड्स आता पूर्णतः नाहिशी झाली आहेत कारण तलावाला बांध घातला गेला. तिथली माती आणून पु. ल. देशपांडे उद्यानामध्ये ती ऑर्किड्स लावली गेली पण फक्त एक वर्षच उगवली, कारण हा त्यांचा नैसर्गिक अधिवास नव्हता, असे डॉ. दातार यांनी सांगितले. 

सिंहगड, सातारा, सोलापूर रस्ता अशा पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर चार-पाच दशकांपूर्वी वडाच्या झाडांचा बोगदा असायचा. हळूहळू रस्ता रुंदीकरणात ही सर्व झाडे छाटली गेली. या झाडांवर हरावत (ग्रीन पीजन्स) पक्षी मोठ्या प्रमाणात असायचे. मे महिन्यात ते दिसायचे. त्यांची संख्या आता खूप कमी झाली आहे. विद्यापीठ, एफसीमधल्या झाडांवर क्वचित दिसतात, अशी माहिती डॉ. संजीव नलावडे यांनी दिली. माळराने शिल्लक होती तेव्हा तिथे माळटिटवीसारखे पक्षी दिसायचे, पण हा पक्षी पुण्यापुरता दुर्मीळ झाला आहे.  

शहरात आता साप कमी झाले असले तरी टेकड्यांच्या परिसरात, नद्यांजवळ साप अजूनही दिसतात. लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्यामुळे आता सापांना कोणी मारत नाही. खार हा पुण्यात सगळीकडे अगदी सर्रास दिसणारा प्राणी. इमारती आणि त्यांच्या भोवती झाडे असतील हा प्राणी हमखास तिथे असतोच. मोठ्या प्राचीन झाडांच्या सोबतीने किंवा दगडी वाड्यांच्या वळचणींमध्ये राहणारे उदमांजर मात्र आता दिसत नाही. 

पाषाण तलावाच्या सुशोभीकरणामुळे तिथल्या जैवविविधतेचा नाश झाला असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. तिथे आता फारसे पक्षी दिसत नाही. रेलसारखे पक्षी पूर्वी दिसायचे पण आता तुरळक पाणकावळे तेवढे दिसतात. नद्यांमध्येही अनेक स्थलांतरित पक्षी दिसायचे. शेकाटा थोडेफार प्रदूषण सहन करू शकतो त्यामुळे आता थोडेफार शेकाट्यासारखे पक्षी नदीवर दिसतात. पण त्याचीही संख्या खूप कमी झाली आहे.येरवड्याच्या डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात १२ प्रकारची फक्त बदके यायची. चिखले, सँडपायपर्स, प्लोव्हर्सही दिसायचे. आता त्यांचीही संख्या कमी झाली असल्याचे डॉ. पांडे यांनी सांगितले.

नद्यांची दुरवस्था
मुठा नदी पुणे शहराच्या मधून वाहते. तिच्या जोडीला मुळा, रामनदी, इंद्रायणी याही पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या जवळून वाहतात. त्याशिवाय आंबिल, भैरोबा यांसारखे ओढे-नालेही आहेत. इतर ओढे नागरीकरणामुळे बुजले, त्यामुळे हल्ली दरवर्षी जोराचा पाऊस झाला की पुण्यात ठिकठिकाणी पाणी साचते, कारण पाण्याला वाहून जायला जागाच नाही. या नाले-ओढ्यांच्या भोवताली दोन-एक दशकांपूर्वी असलेली जैवविविधता आता सापडत नाही.

पुणेकरांना पुण्यातल्या अनेक गोष्टींविषयी पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे जाज्वल्य अभिमान असतो, मग ती चितळ्यांची बाकरवडी असो अथवा सवाई गंधर्व महोत्सव. पण हा जाज्वल्य अभिमान नदीबद्दल थोडा कमी पडतो की काय असे वाटते. कारण पुण्यातून वाहणाऱ्या मुठा नदीची अवस्था, तिला नदी म्हणावे की नाला असा प्रश्‍न उपस्थित करते. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे प्रदूषण, नदीत पडणारा कचरा आणि प्लॅस्टिक. हे कमी की काय म्हणून अजूनही नदीमध्ये राडारोडा पडतोच आहे. त्यामुळे हा सगळा परिसरच उद्ध्वस्त झाला आहे. एकेकाळी नदीमध्ये ६०-७० प्रकारच्या माशांच्या प्रजाती आढळत. पण आता तिथे फक्त अतिक्रमण करणारा तिलापिया आहे. हा तिलापिया मोझाम्बिका मूळचा आफ्रिकेतला. पण आता तो भारतात सगळीकडेच पसरला आहे, तसाच पुण्यातल्या नद्यांमध्येही आहे. त्याला नैसर्गिक शत्रू नाही आणि तो इतर प्रजातींना टिकू देत नाही, अशी माहिती डॉ. हेमंत घाटे यांनी दिली. तिलापिया आणि गप्पी मासे यांमुळे माशांबरोबरच इतर कीटक, मोलस्कदेखील नाहीसे झाले आहेत. नदीच्या बाजूला साठणाऱ्या पाण्यात बेडकांचेही प्रजनन व्हायचे. पण आता राडारोड्यामुळे तेही होत नाही. नद्या आणि त्याभोवतालच्या अधिवासाचा प्रचंड प्रमाणात नाश झालेला आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यांचे सुशोभीकरण हे अजून तरी दिवास्वप्नच आहे!

कबुतरांचा उपद्रव
पोपट, करकोचे, खंड्या, टिटव्या, बुलबुल, धनेश असे अनेक छोटे-मोठे पक्षी पुण्यात सापडतात. महापालिकेच्या अहवालामध्ये पुण्यात पक्ष्यांच्या १९४ प्रजाती असल्याची नोंद आहे. पण गेल्या दहा वर्षांमध्ये पक्ष्यांच्या संख्येमध्ये बदल झाला आहे. शहरीकरणामुळे शहरातला कचरा वाढला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये घारी, कावळे, डोमकावळे कबुतरे, मैना असे कचऱ्यावर जगणारे पक्षी वाढले आहेत. कबुतराइतका उपद्रवी दुसरा पक्षी पुण्यात नाही. लोक कबुतरांना खायला घालतात, त्यामुळे त्यांना सहज अन्न उपलब्ध होते. कबुतर हा कपाऱ्यांमध्ये राहणार पक्षी. शहरातल्या उंच इमारतींमुळे कपाऱ्यांसारखाच समांतर अधिवास त्याच्यासाठी निर्माण झाला आणि तो इमारतींवर राहू लागला. ज्या इमारती रिकाम्या आहेत, तिथे तर कबुतरांची पैदास जोमाने होते. अन्न आणि अधिवास या गरजा सहज पूर्ण झाल्यामुळे कबुतरांची संख्या अतोनात वाढली आहे. कबुतर इतर पक्ष्यांना वाढू देत नाही. पूर्वी इमारतींच्या मधल्या जागेच चिमण्या, साळुंक्या दिसायच्या. या पक्ष्यांनाही कबुतरांनी हकलून दिले. पुण्यातला कचरा वाढल्यामुळे उंदीर वाढले आणि उंदीर वाढले त्यामुळे त्यांना खाण्यासाठी गव्हाणी घुबडे वाढली. ही घुबडे इमारतींच्या वळचणीला घरटी करतात. त्यांची पिल्ले रात्री ओरडतात आणि मग मानव वन्यजीव संघर्ष सुरू होतो, असे डॉ. पांडे यांनी सांगितले. विजेच्या तारांमुळे असंख्य पक्षी इलेक्ट्रिक्युट होतात. मैना, घारींबरोबरच वटवाघळेही तारांमध्ये अडकून मरतात. 

गेल्या दहा वर्षांत पुण्याच्या जैवविविधतेत निश्‍चितच बदल झाले आहेत. पण आता नियम झाल्यामुळे शहरात सोसायट्यांमध्ये झाडे लावली जातात, त्यामुळे शहरी वन अधिवास तयार होत आहेत. त्यामुळे बागेतल्या फुलांवर येणारे गार्डन बर्ड्स येतच राहतील. खारीसारखे सस्तन प्राणीही राहतील. जिथे मोठी आवारे असतील तिथे धामण दिसेल, मुंगूस सापडतील. मुळात पुणेकर आता जागरूक होऊ लागल्यामुळे पुण्यात जीवित नदीसारख्या काही संस्था आहेत, ज्या संवर्धनासाठी काम करत आहेत. शहरातील काही भागांच्या ‘चेक लिस्ट’ आहेत, ज्याचा संवर्धनासाठी उपयोग होऊ शकतो. मात्र हे सगळे प्रयत्न तुकड्या तुकड्यांमध्ये होत आहेत, ते एकत्रित व्हायला हवेत. आपल्याकडे दस्तावेजीकरणही कमी पडते. गवताळ प्रदेश गेला, पण त्याची जागा नागरी वनांनी घेतली. पण नद्या-ओढ्यांची जागा कोण घेणार? त्यांना पर्याय नाही. त्यामुळे त्यांना प्राधान्य द्यायला हवे. तसेच निसर्गाने दिलेल्या टेकड्यांना गृहित न धरता तिथली संपदाही गांभीर्याने जपायला हवी!

संबंधित बातम्या