जैवविविधता धोक्यात

प्रकाश बनकर, औरंगाबाद
सोमवार, 7 जून 2021

पर्यावरण दिन विशेष

ऐतिहासिक व पर्यटनाच्या जगाच्या नकाशावर झळकणारे औरंगाबाद शहर गेल्‍या काही दशकांमध्ये औद्योगिकदृष्ट्याही झपाट्याने वाटचाल करत आहे. या औद्योगिकरणाबरोबरच नागरी भागही वाढत चालला आहे. टोलेजंग इमारती होत आहेत. मात्र हा भौतिक विकास साधत असताना गेल्या दशकात या शहरात मोठे पर्यावरणीय बदल होत आहेत. परिणामी इथली जैवविविधता धोक्यात येत चालली आहे. 

हिमायतबाग, डॉ. सालीम अली सरोवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, त्या लगतच्या व साताऱ्याच्या डोंगररांगा, एमजीएमसमोरील प्रियदर्शनी उद्यान हा परिसर म्हणजे औरंगाबाद शहराचा ऑक्सिजन हबच. हा परिसर वगळता बहुतांश भागातील झाडे, झुडुपे नामशेष होताहेत. डॉ. सालीम अली सरोवराच्या स्वच्छ निळ्याशार पाण्यात ड्रेनेजचे, इतर दुर्गंधीयुक्त पाणी मिसळत असल्याने या सरोवराचा जीवच धोक्यात आला आहे. शहराचे तापमान, हवेतील धुळीचे प्रमाण यांसारखे परिणाम थेटपणे जाणवू लागले आहेत. 

औरंगाबाद शहराची लोकसंख्या १७ लाखांवर पोहचली आहे. हा विस्तार होताना मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्यात आली. महापालिका दरवर्षी पर्यावरण अहवाल सादर करते. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेने हा अहवाल सादर केलेला नाही. २०१९मध्ये सादर केलेल्या महापालिकेच्या अहवालानुसार शहरात ८.८३ टक्केच वनक्षेत्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त शहरात किती झाडे आहेत, झुडुपे, वनस्पती किती आहेत हे मोजण्याची यंत्रणाच नाही. 

दिल्ली-मुंबई कॉरिडार (डीएमआयसी), औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीसाठी (ऑरिक) शेंद्रा-बिडकीन पट्ट्यातील आठ हजार हेक्टरहून अधिक जमिनीचे संपादन झाले. यासह शहराचाच भाग झालेली २८ गावांची हजारो हेक्टर जमीनही झालर-क्षेत्रासाठी संपादित केली जाणार आहे. यातील बहुतांश जमीन सुपीक आहे. सुपीक जमीन विकासाच्या नावाखाली घेणे म्हणजेच जैवविविधतेवर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत पर्यावरणवादी कार्यकर्ते विजय दिवाण मांडतात.

डॉ. सालीम अली सरोवर
 डॉ. सालीम अली सरोवरात वर्षभर विविध प्रकारचे देशी, विदेशी स्थलांतरित पक्षी येतात. याशिवाय विविध १६ प्रकारच्या वृक्ष प्रजाती, ११ प्रकारची झुडुपे, आठ प्रकारच्या वेली, ३२ प्रकारच्या जमिनीवरील लहान वनस्पती, १२ प्रकारच्या पाणथळ वनस्पती व विविध प्रकारची वन्यजीव संपदा या ठिकाणी आढळते. महापालिकेतर्फे याच सरोवराचे जतन व संवर्धन करण्यात येत आहे. गेल्या सात वर्षांपासून हे सरोवर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. २०१९मध्ये सरोवरातील जैवविविधतेला हानिकारक जलपर्णीने सरोवराचे क्षेत्र जवळपास ७० टक्के व्यापून टाकले होते. महापालिकेने ते काढून टाकले. आजही सरोवरावर विविध प्रकारचे हजारो पक्षी येतात. मात्र सरोवरात गेल्या पाच ते सात वर्षांपासून दूषित पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे सरोवरातील मासे, इतर जीवजंतू नष्ट होत चालले आहे.शहरातील जैवविविधतेची इतर ठिकाणे असलेल्या खाम आणि सुखना या नद्या नाले बनत चालल्या आहेत. दहा वर्षांत इथे सुधारणा करण्यात आल्या. मात्र केवळ सौंदर्यीकरण करण्यात आले. पण येथील वनस्पती, झाडे, जलचर पक्षी प्राण्याच्या संवर्धनासाठी आवश्य‍क गोष्टी होताना दिसत नाही. गेल्या दहा वर्षांत सरोवरावर येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. शहराला तिन्ही दिशेने डोंगर आहेत. या डोंगरांवर विविध प्रकारची झाडे, झुडुपे, वेली आहेत. मात्र पाच ते सात वर्षांत मोठ्या प्रमाणवर वृक्षतोड होत आहे. एवढेच नव्हे तर याच डोंगराला आग लावत सर्व वनसंपदा नष्ट करण्याचे प्रकारही सातत्याने होत आहे.

जुनी झाडे झाली कमी
शहरात बाबा पेट्रोलपंप ते चिकलठाणा व क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या दोन्ही प्रमुख रस्त्यांवर दुतर्फा शंभर वर्षापेक्षा जास्त वयोमानाची वडाची झाडे होती. ती दहा वर्षांत नष्ट झाली. त्या जागी नवी झाडे लावली. मात्र त्यांचे संगोपन योग्य पध्दतीने झाले नाही. शहरात गेल्या दहा वर्षांत देशी वंशाची झाडे कमी झाली आणि विदेशी झाडांची संख्या वाढली. या झाडांवर पक्षी बसत नाही आणि ते फलधारणाही करत नाही. विशेष म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने या झाडाच्या पाला-पाचोळ्याचे विघटनही लवकर होत नाही. केवळ शोभीवंत आणि लवकर वाढतात म्हणून ही झाडे मोठ्या प्रमाणावर लावण्यात आली आहेत. यामुळेच पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. बलभीम चव्हाण म्हणतात, की जैवविविधतेच्या दृष्टीने शहरात मोठ्या प्रमाणावर बदल होत गेला. स्मृती उद्यान ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे. म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तींच्या वाढदिवस, जयंती-पुण्यतिथीला त्यांच्या नावाने पर्यावरणपूरक झाडे लावावीत. यातून जैवविधता टिकण्यास हातभार लागेल. मात्र असे काम करणारे खूप कमी लोक आहेत. सध्या महापालिकेतर्फे शहरात डेन फॉरेस्टची संकल्पना राबविण्यात येत आहे. यात काही प्रमाणात यशही आले आहे. यासाठी प्रयास यूथ फाऊंडेशन ही संस्था कार्यरत आहे.  

पक्षी करताहेत स्थलांतर 
दहा वर्षांपूर्वी शहरातील मोठ्या वडाच्या झाडांवर तांबट, धनेश, बुलबुल, मैना, कोकिळा, पोपट असे विविध पक्षी अाढळून यायचे. आजही रेल्वे स्टेशन येथील वडाच्या झाडावर पक्ष्यांची शाळा भरते. सायंकाळी व पहाटे या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. एवढेच नव्हे तर मच्छली खडक या भागात चिंचेचे झाड आहे. तेथे रात्रीच्या वेळी चिमण्या असायच्या. त्यांची संख्या आज कमी झाली आहे. शहरालागत चंडोल, होले, टिटव्या, कोतवाल पक्षी आता कमी प्रमाणात अाढळतात. सध्या विद्यापीठ परिसर, हिमायत बाग, खान नदी परिसर, विद्यापीठाचे फळ संशोधन केंद्र परिसरात मोर, निळकंठ, स्वर्गीय नर्तक, फुलटोचे, सुग्रण, तांबट, पावश्या, गप्पीदास कोतवाल हे पक्षी अाढळून येतात. तर सालीम अली सरोवरावर स्थलांतरित शॉवेलर, गार्गनी, गॉडविट, ग्रीन शॅन्क, हॉर्नबिल, ग्रेट कॅन्टेल फ्लायकॅचर, हेरॉन हुप्पी, आयोरा या १३८ प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी झाल्या आहेत. सरोवरात पूरक खाद्य आणि जैवविविधता असल्याने हे पक्षी येतात. आता मात्र सरोवरात दूषित पाणी येत असल्याने पक्षांची संख्याही कमी होऊ लागली आहे. शहराच्या विस्तारासाठी मोठी जुनी झाडी तोडल्यामुळे पक्ष्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे. २०१४मध्ये रेल्वे स्थानकातील पार्किंगमधील झाड तोडल्यामुळे शेकडो बगळ्यांचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर ५० ते ६० बगळ्यांची घरटी उद्ध्वस्त झाली. या दहा वर्षांत हजारो चिमण्या कमी झाल्या. पोपट, बगळ्यांची संख्या कमी झाली. फुलझाडेही कमी झाल्याने शिंपी, राखी, वटवट्या, साळुंख्या, आयोरा, ग्रेटिट हे पक्षी क्वचित दिसत. गेल्या दहा वर्षांत ३५ ते ४० प्रकारचे पक्षी कमी झाले असल्याचे पक्षी मित्र दिलीप यार्दी सांगतात. पक्षीमित्र डॉ. संजय मोतीवाले म्हणाले, की शहरात झाडे, झुडुपे कमी झाली, यामुळे पक्षी इतरत्र स्थलांतरित झाले आहे. विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसजवळ असलेल्या तलावाजवळ १३० हून अधिक प्रकारचे पक्षी त्यांनी पाहिले आहेत. या तलावातही परिसरातील वस्तीचे दुर्गधीत पाणी सोडण्यात येत आहे. 

पाणी प्रदूषणात वाढ
शहरात सुखना आणि खाम नद्या वाहतात. गेल्या अनेक वर्षांपासून या नद्यांचे नाले झाले आहे. सध्या महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे स्मार्ट सिटी आणि लोक सहभागातून खाम नदीचे पुनरुज्जीवन करीत आहे. याला काही प्रमाणात यशही आले आहे. कचऱ्याची साठवणूक होणाऱ्या नारेगाव भागात जलप्रदूषण वाढले आहेत. जमिनीतील पाणी रसायन आणि कचऱ्यामुळे प्रदूषित झाले आहेत. यामुळे जमीनाचा पोत खराब झाला आणि याचा थेट परिणाम नागरिकांवर होत आहेत. चिकलठाणा परिसरात महापालिकेतर्फे १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. यासह महापालिकेच्या एसटीपी प्लॉटचे आऊटलेट नाल्यात काढण्यात आल्याने पावसाळ्यात नाल्याचे पाणी चिकलठाणा परिसरातील नागरिकांच्या शेतात जाते. यामुळे शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. शहरातील हवेतील प्रदूषण सकाळी आणि सायंकाळी जवळपास २०१च्या पुढे असते.

मधमाशा घटल्या
जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाश्यांची संख्या घटत आहे. दहा वर्षांपूर्वी शहर परिसरातील मोठ्या इमारतीवर मधमाश्यांचे मोहोळ दिसून यायचे. आता ते कमी झाले आहे. विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. भालचंद्र वायकर म्हणाले, की मधमाशी पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. परागीकरणात मधमाशीची महत्त्वाची भूमिका असते. गेल्या दहा वर्षांत तिची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. झाडे, झुडुपांची कमी झालेली संख्या, पेस्टीसाईडचा वापर, वनस्पती संख्या कमी होणे, पोळे तोडणे यांमुळे मधमाश्यांचे अस्तित्व नष्ट होत आहे. विद्यापीठ परिसरात आग्यामाश्यांचे मोहोळ दिसायचे. तेही कमी झाले आहे. हे वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र यात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे, तेव्हा जैवविविधतेतील हा घटक टिकेल. अन्यथा ती प्रजाती धोक्यात येईल.  
गेल्या दहा वर्षांत जैवविविधता आणि पर्यावरणीय बदलामुळे शहरातील अनेक समस्या वाढल्या आहेत. त्याच दृष्टीने जैवविविधता टिकवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.

दहा वर्षांपूर्वी शहरातील मोठ्या वडाच्या झाडांवर तांबट, हॉर्नबिल, बुलबुल, मैना, कोकिळा, पोपट असे विविध पक्षी अाढळून यायचे. आजही रेल्वे स्टेशन येथील वडाच्या झाडावर पक्ष्यांची शाळा भरते. सायंकाळी व पहाटे या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. एवढेच नव्हे तर मच्छली खडक या भागात चिंचेचे झाड आहे. तेथे रात्रीच्या वेळी चिमण्या असायच्या. त्यांची संख्या आज कमी झाली आहे. शहरालागत चंडोल, होले, टिटव्या, कोतवाल हे पक्षी आता कमी प्रमाणात अाढळतात.

संबंधित बातम्या