विकासाच्या रेट्यातही जैवविविधता कायम

राजेश रामपूरकर, नागपूर
सोमवार, 7 जून 2021

पर्यावरण दिन विशेष

देशाच्या हृदयस्थानी वसलेल्या नागपूरला जैवविविधतेची चांगली आहे. विकासाच्या रेट्यात नागपूरचा समावेश देशातील १०२ प्रदूषित शहरांत झाला आहे. त्यामुळे जैवविविधतेत थोडा फरक पडला असला तरी तो धोकादायक पातळीवर नाही. गेल्या दहा वर्षांत शहरातून पक्षी स्थलांतरित झाले खरे, पण नागपूर शहरात व लगत अनेक हरित पट्टे आहेत, तेथे पक्ष्यांचे चांगले वास्तव्य आहे. शिवाय नागपूरपासून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटरच्या परिघात वाघ आणि बिबट्यांचे अस्तित्व आहे. त्यामुळे जैवविविधतेत नागपूरला चांगला दर्जा द्यावा लागेल, असे चित्र आहे.

जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर गेल्या दीड दशकात नोकरी, व्यवसाय, शिक्षण व उद्योगासाठी इतर भागातून लोक नागपुरात आले. दहा वर्षांपूर्वी असलेली लोकसंख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. परिणामी, पायाभूत सुविधा सुस्थितीत आणणे,  मलनिस्सरण, उद्योग, दळणवळण व्यवस्थेचा शहरातील नैसर्गिक आणि हरित क्षेत्रावर ताण निर्माण झाला. मिहान, मेट्रो, रस्ते रुंदीकरण, मॉल, जुन्या इमारती पाडून नवीन बहुमजली इमारती बांधण्याचा वेग वाढला आहे. एकप्रकारे काँक्रिटचे जंगल उभे राहिले. नागपूरची जीवदायीनी असलेल्या नाग नदीच्या तीरावर दहा वर्षांपूर्वी जैवविविधता मोठ्या प्रमाणात होती. त्या भागात अतिक्रमणे झाली, बांधकामांसाठी काही ठिकाणी पिंपळासारख्या मोठ्या झाडांची कत्तल झाली. परिणामी कावळे, घार, बगळे इत्यादी पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला. तसेच वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पोपट, मैना मोठ्या प्रमाणात रात्री मुक्कामाला येत असत. ती संख्याही रोडावली आहे. शहरातील तलावांवर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे येण्याचे प्रमाणही कमी झालेले आहे. नागपूरच्या पक्षीवैभवाला धक्का लागला, तेव्हा पक्ष्यांनी शहरातील काही हरित पट्टे आणि शहरालगतच्या हिरवाईकडे आपला मोर्चा वळविला.  शहरातील गोरेवाडा, अंबाझरी, नीरी, व्हीएनआयटी, महाराजबाग, सेमिनरी हिल्स येथील हरित पट्यांमध्ये अद्यापही जैवविविधता अबाधित आहे. शहराच्या वेशीवर म्हणजेच १३ ते १५ किलोमीटर अंतरावर वाघांसह बिबट्याचेही अस्तित्व आहे. हेच अद्यापही जैवविवधता सुरक्षित असल्याचे द्योतक आहे.  

विकासाच्या रेट्यात  पक्षीजीवन, दुर्मीळ वृक्ष, कीटक, फुलपाखरे यांसह जैवविविधतेच्या काही घटकांना ग्रहण लागले खरे, पण शहरालगतच्या हरित पट्ट्यांमध्ये कावळे, चिमण्या, मैना, बुलबूल, शिंपी, रंगेल सुगरण, पोपट, सुतार, निळकंठ, सातभाई, भारद्वाज, नकल्या खाटीक, कोतवाल, हळद्या, चातक, टिटवी, खंड्या, रॉबिन, फॅलोज (पासोळा) हे पक्षी आढळतात. पण त्याचवेळी स्थलांतरित शहरी पक्षी घुबड, फ्लायकॅचर इत्यादी पक्षी संख्या कमी झालेली आहे. या पक्ष्यांची जागा आता कबूतरासारख्या नागरी वस्तीत राहणाऱ्या पक्ष्यांनी घेतली आहे. त्यांची घरटीही अनेक ठिकाणी दिसू लागली आहेत. अंबाझरी तलावाची स्थितीही खराब झाली आहे. हा तलाव स्वच्छ करणे गरजेचे आहे. ती सजगता अद्यापही प्रशासकीय यंत्रणा, राजकीय नेत्यांना आलेली नाही. त्यामुळे पक्षी आणि प्राण्यांवर नक्कीच परिणाम झालेला आहे. धनेश पक्ष्यांची बरीच घरटी जेलच्या परिसरात होती. भरत वन आणि अजनी या परिसरात विकास कामांना नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे ते थांबले असले तरी आता पर्याय द्यावा असाही आग्रह महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे संस्थापक सदस्य. डॉ. अनिल पिंपळापुरे यांचा आहे, .

नीरी - जैवविविधतेचे माहेरघर
धोक्यात असलेल्या दुर्मीळ मांजराच्या एका प्रजातीचे अस्तित्व नीरीच्या जंगलात असल्याचे आढळले आहे. मांजराची ही प्रजाती केवळ आशिया व आफ्रिकेच्या भागात आढळून येते. या मांजराचे अस्तित्व धोकादायक स्थितीत पोहचले आहे. अशा दुर्मीळ प्रजातीच्या अस्तित्वामुळे पर्यावरण अभ्यासकांसाठी नीरीचे जंगल कायम कुतूहलाचा विषय ठरला आहे. नीरीच्या परिसरात चंदन, आंबे, निंबाची झाडे असून काही दुर्मीळ प्रजातीच्या वनस्पती आणि औषधी वनस्पतीही आहेत. 

अंबाझरी जैवविविधता उद्यान 
हिरवीगार वनराई, विस्तीर्ण तलाव, गवतांच्या १५ प्रजाती, जलाशयातील १६ प्रजातींचे मासे, १०४ रंगीबेरंगी फुलपाखरे, ४५ स्थलांतरित आणि ११५ स्थानिक अशा १६० विविध पक्ष्यांच्या प्रजाती, तसेच समृद्ध वनसंपदेचे दर्शन या उद्यानात होते. १८७०मध्ये भोसलेशाहीच्या काळात नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. हे जैवविविधता उद्यान ७५८  हेक्टरमध्ये साकारले आहे.  या जंगलाला सर्वाधिक धोका आहे तो आगीचा आणि घुसखोरीचा. या उद्यानाला नागपूरच्या पर्यावरणात मोठे महत्त्व आहे. औद्योगिकरण वाढले असताना हे उद्यान पर्यावरणातील संतूलन राखण्यात मोलाची भूमिका पार पाडते आहे. एकेकाळी या जंगलात तरस आणि लांडगेही होते, ते आता गायब झालेले आहेत. या जंगलात बिबट्यासह हरिण, ससे, रानडुक्कर इत्यादी वन्यप्राणी आहेत असे सृष्टी पर्यावरण मंडळाचे सचिव विनित अरोरा यांनी सांगितले.  

महाराजबाग, सेमिनरी हिल्स, तेलगखेडी, पंजाबराव कृषी विद्यापीठ, व्हीएनआयटी आणि मध्यवर्ती कारागृह ही छोटी हरित बेटे आहेत. ही शहरातील ऑक्सिजन पुरविणारी स्थळे आहेत. यामुळेही शहरातील जैवविविधता टिकलेली आहे, असे बीएनएचएसचे संजय करकरे म्हणाले. 

गोरेवाडा उद्यान 
बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय आणि उत्तरेकडील जंगल सफारी हे शहरातील जैविविधेतील महत्त्वाचा भाग आहे. या जंगलात बिबट्यासह हरिण, निलगाय, मोर इत्यादी वन्यजीव आहेत. याशिवाय काही दुर्मीळ वृक्ष, औषधी वनस्पती आढळतात. शहरातील जैवविविधतेत यामुळे भर पडते आहे. 

तलाव व नद्यांतील जैवविविधता 
शहरातील तिन्ही नद्या, सर्व १३ तलाव आणि पाण्याचे इतरही स्रोत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालेले आहेत. वाडी औद्योगिक परिसर हा शहरातील सर्वात प्रदूषित परिसर आहे. हिंगणा परिसरात सल्फर आणि नायट्रोजनयुक्त घातक वायूंचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाणही बरेच खालावलेले आहे. एक लिटर पाण्यात ४५ मायक्रोग्रॅम नायट्रेट असणे अपेक्षित आहे. परंतु गोरेवाड्यातील पाण्यात हा आकडा २.८ इतका खालावला आहे. तर कान्हा आणि पेंच येथे हा आकडा अनुक्रमे ३.९ आणि २.८ इतका आहे. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचेही प्रमाण आता वाढले आहे. हे प्रमाण ५.५ ते ६ मायक्रोग्रॅम प्रती लिटर इतके आहे. परंतु गोरेवाड्यात हे प्रमाण ६.७ आहे. कॉलिफार्म बॅक्टेरियाच्या पातळीही वाढ झालेली आहे. हा बॅक्टेरिया म्हणजे प्रदूषित पाण्याचे लक्षण आहे. फुटाळा, अंबाझरी, गांधीसागर, सोनेगाव, सक्करदरा, लेंडी तलाव, नाईक तलाव, गोरेवाडा आणि पांढराबोडी तलाव येथे नायट्रेट, विरघळलेला ऑक्सिजन, केमिकल ऑक्सिजन डिमांड आणि बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड यांचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेले आहे. तसेच कॉलिफार्म बॅक्टेरिया जास्त आढळून आल्याने शहरातील सर्वच तलावांमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे तलावात जलपर्णी वाढून जैवविविधतेला धोका पोहचतो.

त्याशिवाय लोकसंख्येबरोबर वाढत गेलेले गणेशमूर्ती विसर्जनाचे प्रमाण हा देखील मुद्दा पर्यावरणप्रेमा अधोरेखिक करतात. गणेशोत्सव काळात पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा कमी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तलावातील ऑक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी कारंजे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची ऑक्सिजन मात्रा वाढण्यास मदत होईल आणि जैवविविधतेचेही संवर्धन होण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. नाग, पोहरा आणि पिवळी या शहरातील तिन्ही नद्यांमधील जलप्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. वर्षभर या नद्यामधून सांडपाणीच वाहत असते, पावसाळ्यात फक्त पावसाचे पाणी वाहत असते. या नद्यांमधील जैवविविधता पूर्णपणेच संपलेली आहे, असे ग्रिन व्हिजील फाऊंडेशनेचे संस्थापक कौस्तुभ चटर्जी यांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आले आहे.  

राजभवनात जैवविविधेचे दर्शन 
हिरव्याकंच वृक्षांची दाटीवाटी, त्यावर सुरू असलेला असंख्य पाखरांचा चिवचिवाट डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे गालिचे, त्यावर इकडून तिकडे उडणारे फुलपाखरांचे असंख्य थवे, ऐन उन्हाळ्यातही निसर्गाचे असे वैभव शहराच्या मध्यभागी असलेल्या राजभवनात अनुभवता येते. नयनरम्य निसर्गाचा हा अद्भुत थाट खऱ्या अर्थाने पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाची साक्ष देतोय. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. कारण त्याच्या संवर्धनावर भविष्याची सुरक्षा अवलंबून आहे. शहरात बघावे तिकडे कचऱ्याचे ढिगारे, प्रदूषण, ओसाड झालेले रस्ते याचाच अनुभव येतो. या शहराची ही अवस्था असताना राजभवनाने मात्र निसर्गाचा अद्भुत वारसा निर्माण केला आहे. राजभवनाच्या १०० एकरच्या परिसरात विशेष सल्ल्यानेच जैवविविधता उद्यानाची निर्मिती केली आहे, असे राजभवनचे प्रभारी अधिकारी रमेश येवले यांनी सांगितले.या परिसरात १६४ प्रजातीचे पक्षी आहेत. भीषण उन्हाळ्यात बर्ड रेस्टॉरंट ही संकल्पना राबविण्यात येते. राजभवन परिसरात मोरांचा अधिवास आहे. याशिवाय शहरातील विविध भागात सहज मोर दिसत असल्याने काही पक्षीप्रेमी आता नागपूर शहराला पिकॉक सिटी म्हणून ओळखले जावे अशीही मागणी करू लागले आहेत.

नागपुरात भरत वन आणि अंजनी येथील महाकाय प्रकल्पाला अनेक पर्यावरणप्रेमींना विरोध केला हे योग्यही आहे. विकास हा देशाच्या प्रगतीचा एक अंग आहे. त्यामुळे विकासाला विरोध करण्यापेक्षा त्याला पर्य़ाय देण्याचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे असा नवा सूर आता पुढे येऊ लागला आहे. नागपुरातील विकास झपाट्याने होत असताना जैवविविधेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे हे विशेष.

नागपूरचे मानचिन्ह!
नागपुरात पक्षीमित्रांची संख्या वाढू लागली आहे. नागपूर बर्ड रेसमध्ये ओरिएंटल हनी बझार्ड अर्थात मोहळ्या मोरना या पक्ष्याला नागपूर शहराचे मानचिन्ह (सिटी बर्ड) ठरविण्यात आले. जीपीओ चौकात या पक्ष्याचे देखणे शिल्प साकारले आहे. संत्रानगरी, टायगर सिटीनंतर आता ओरिएटल हनी बझार्डचे शिल्प असलेले नागपूर शहर हे देशातील एकमेव असेल, असे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे संस्थापक सदस्य. डॉ. 
अनिल पिंपळापुरे यांनी केलेल्या निरीक्षणातून पुढे आले आहे.

संबंधित बातम्या