वनौषधीच्या नजाकतेला हवंय पाठबळाचं कोंदण!

तुषार महाले, नाशिक
सोमवार, 7 जून 2021

पर्यावरण दिन विशेष

त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी, अंजनेरी, कसारा घाट अन इगतपुरीच्या डोंगररांगांमधील धम्मगिरीची वनसंपदा हे नाशिक जिल्ह्याच्या जैवविविधतेचे प्रतीक. वनौषधीसाठी नाशिकचा लौकिक मोठा आहे. ही संपदा जपण्यासाठी राज्य-केंद्र सरकार व प्रशासकीय स्तरावरील पाठबळाचं कोंदण हवंय. तसं घडल्यास नाशिक जैवविविधतेसंदर्भात जागतिक पातळीवर लक्षवेधी ठरेल हे नक्की.

पर्यावरणदृष्ट्या नाशिक जिल्ह्याचा पश्चिम अन पूर्व भाग जैवविविधतेसाठी महत्त्वाचे आहेत. त्यातील पश्चिम भाग हा स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी महत्त्वाचा मानला जातो. पूर्व भाग हा वन्यप्राणी संपदेसाठी पूरक आहे. पश्चिम भागातील डोंगररांगा, तीव्र उतारामुळे तयार झालेल्या पाणथळ जागा अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या भरणपोषणासाठी उपयुक्त ठरल्या आहेत. त्र्यंबकेश्वर, अंजनेरीचा भाग हा औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी वनविभागाने घोषित केला आहे. २०१२नंतर या भागातील वनस्पतींचे डिजीटल हरबेरियमही (संग्रहालय) करण्यात आले. इथल्या पर्यावरणाचे सर्वेक्षण अजून चालू आहे. लोकसंख्या वाढीमुळे या भागात वाढीस लागलेल्या फार्म हाऊस संस्कृतीचा परिणाम अभ्यासण्याची गरज आहे. कधीकाळी काजव्यांनी लखलखणारी जिल्ह्यातली अनेक ठिकाणे, मानवी संचारामुळे, प्रखर प्रकाशातल्या वाहनांनी गर्दी केल्याने, कमी होत चालली आहेत. वाढणारी लोकसंख्या, वाढत्या गरजा, स्वत:च्या सुखशांतीसाठी निसर्ग जिवांच्या अधिवासावर झालेल्या धनिकांच्या आक्रमणामुळे होणारा जैववैविधतेवरील परिणाम धोकादायक आहे.

कंदील पुष्प (सेरोपेजिया अंजनेरी) तर आजूबाजूच्या इतर कुठल्याच टेकडीवर आढळत नाही (ही कास पठारासारख्या ठिकाणी दिसणारी कीटकभक्षी वनस्पती आहे). तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे. तिचे अस्तित्व धोक्यात आहे. फेरिया इंडिका, डेंन्ड्रोबियम सारख्या प्रजाती इथे प्रामुख्याने दिसून येतात. स्थानिक वनसंपदा तुडवणाऱ्या पर्यटकांमध्ये यासंदर्भात जागृती करणे महत्त्वाचे ठरेल. कायद्याने या वनस्पतींच्या संवर्धनासाठी संरक्षण देणे गरजेचे आहे. या भागात असणारा गिधाडांचा अधिवास कमी झाला होता, मात्र आता त्यांची संख्या पूर्वीपेक्षा वाढलेली दिसून येत आहे. पक्ष्यांच्या दोनशेवर प्रजातींची नोंद नाशिक पश्चिम भागात सापडते. तसेच सापांच्या अनेक प्रजाती इथे आढळतात.

 नाशिकच्या पूर्वेस असणारे बोरगड सहा वर्षांपूर्वी अगदी उजाड झाले होते. त्याचे प्रमुख कारण जळणासाठी झालेली जंगलतोड. वनविभाग, हवाई दल आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आता पुन्हा हा परिसर हिरवाईने नटला आहे.  दीड लाखाच्या आसपास वृक्षारोपण करण्यात आले. इथल्या स्थानिकांना करटोली, जंगली काकड्या, करवंदे अशा वनभाज्या- फळे लावण्यास प्रोत्साहन दिल्याने जैवविविधता टिकून राहण्यास हातभार लागला. इतर वन्यप्राणी संपदा जसे जंगली मांजरी, ससे, तरस, मुंगूस, साळींदर, मोठ्या चोचीची गिधाडे, ठिपकेदार पारवे, गरुड यांनी पुन्हा हा भाग आपला अधिवास म्हणून निवडला आहे. 

नाशिकमध्ये ३४ हजार वृक्षांची नोंद
पर्यावरण विषयक नाशिक महापालिकेच्या सद्यस्थिती अहवालानुसार शहरातील विविध उद्यानांमध्ये ३४ हजार १२५ वृक्षांची नोंद करण्यात आली. त्यात भारतीय झाडांची संख्या ३० हजार असून परदेशी झाडांची संख्या चार हजार १२५ आहे. तुलनेत शहरातील बहुतांश भागात भारतीय झाडांपेक्षा परदेशी झाडे गेल्या काही वर्षात लावली गेल्यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने घातक आहे. पांडवलेणी, पंडित जवाहरलाल नेहरू वनउद्यानामुळे (बोटॅनिकल गार्डन) नाशिकच्या सौंदर्यात भर पडली. शहरात वड, पिंपळ, कडूनिंब, नारळ, पळस, बिबला, रिठा यासह ९९ झाडांच्या प्रजाती आढळतात. मात्र शहरात परदेशी तसेच येथील हवामानाला सूट न होणाऱ्या पाम, गुलमोहर इत्यादी झाडांची वाढत जाणारी संख्या पुढील काळात आव्हान ठरणार आहे. शहराच्या भोवताली असलेले डोंगर हिरवेगार असणे आवश्यक आहे. 

कबुतरांचे लसीकरण आवश्यक 
नाशिक शहरात ब्ल्यू मॉर्मन, ब्ल्यू पॅन्सी यासह विविध १७ प्रकारच्या जाती आढळून आल्या आहेत. मैना, कावळा, चिमणी, कबुतर, बुलबुल, सनबर्ड, कोतवाल, घार, गाय बगळे, छोटा राघू, ग्रासलेड बर्ड, गरुड यासह ३४ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. परंतु कबुतरांची शहरात वाढणारी संख्या चिंतेचा विषय आहे. त्यांच्यात रोगांचे प्रमाण वाढले असून कबुतरांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण पक्षी अभ्यासकांनी नोंदविले आहे. 

ममदापूर काळविटांचे माहेर 
शहरातील जुने वाडे, चाळी नष्ट झाल्याने पक्ष्यांना घरटी करायला जागा राहिली नाही. नाशिकच्या अवतीभोवती वनराई प्रकल्प उभे न राहिल्याने अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. गोदापार्कजवळ दहा वर्षापूर्वी किंगफिशर (खंड्या) पक्ष्याची संख्या दोनशेच्या घरात असायची. आता तीच संख्या आठ ते दहावर आली आहे.  गोदावरीतील पाणवेली वाढल्या आहेत. गवताळ प्रदेश नसल्याने पक्ष्यांच्या जाती नष्ट होत आहेत. तसेच मोर, माकडे शहराकडे धाव घेत आहेत. झाडे आणि योग्य खाद्य नसेल तर पक्ष्यांच्या जाती अशाच नष्ट होत जातील. पक्ष्यांबरोबर रंगीत सरडे, बेडूक यांच्या अनेक जाती आढळतात. वनस्पती, पक्ष्यांबरोबर त्यांचेही संवर्धन होणे गरजेचे आहे. येवल्यातील ममदापूर काळविटांसाठी प्रसिद्ध असून त्याठिकाणी गवताळ प्रदेश असल्यामुळे काळविटांची संख्या एक हजार ५००च्या वर गेली आहे. 

जैवविविधता महोत्सव गरजेचा 
मधमाश्यांचे संगोपन, संवर्धन निसर्गासाठी फार मोलाचे आहेे. नाशिक जिल्ह्यात मधमाश्यांचे संगोपन, संवर्धन व्हायला लागले आहे. परंतु, शहरात मधमाश्यांच्या पोळ्याची संख्या घटली आहे. शहरात गुलमोहराच्या झाडांचे प्रमाण अधिक आहे. मधमाश्या, फुलपाखरे, पक्ष्यांना खाद्य पुरवण्यात ही झाडे अपुरी पडत आहेत. पक्षी, प्राणी, वनस्पती यांनाही जगण्याचा माणसाइतकाच अधिकार आहे. नागरिकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टिकोनातून ‘कीटक आणि जैवविविधता’ महोत्सव वारंवार होण्याची आवश्यकता आहे. 

गोदावरीचे जलस्रोत नाशिकची श्रीमंती 
नाशिक महापालिका प्रशासनाने गोदावरी नदीतील (रिव्हर बेड) तळ कॉँक्रीटीकरण करून कुंडे बुजवली. नदी अप्रवाही झाल्यामुळे प्रदूषित झाली.  न्यायालयीन आदेशानुसार सध्या नाशिक स्मार्ट सिटीतील "गोदा प्रोजेक्ट" अंतर्गत पहिल्या टप्प्यात १७ प्राचीन कुंडांपैकी ५ कुंडांचे तळ कॉँक्रीटीकरण काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कॉँक्रीटीकरणाला  १९ वर्षे झाल्यानंतरही गोदावरी नदी पात्रातील जलस्रोत आजही सुस्थितीत आहेत. हेच नाशिकच्या जैवविविधतेच्या श्रीमंतीचे लक्षण आहे. नाशिक शहरातील सरस्वती, वाघाडी, नंदिनी  या नद्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. अरुणा, वरुणा, कपिला या नद्या बुजवून टाकल्या आहेत. गेल्या काही वर्षांत नर्मदेतील जैवविविधता संपून गेली आहे. पाण्याची शुद्धता असली तरच कासव, मासे यांसारखे जलचर प्राणी टिकून राहतात. बीओडी (बायोलॉजीकल ऑक्सिजन डिमांड) पातळी दहाच्या खाली असेल तरच बायोडायव्हर्सिटी टिकून राहते. ती पातळी २५च्या वर गेली असल्याचे निर्दशनास आले आहे. 

१६८ प्रजातींचे वृक्षारोपण 
 नाशिकच्या हवामानात संतुलन राहील अशा पद्धतीची झाडे गेल्या दहा - पंधरा वर्षांत लावली गेली आहेत. काही संस्था जंगलातून बी-बियाणे आणून त्याचे संगोपन करण्यासाठी नर्सरी व्यावसायिकांना देत आहेत. नागरिकांना वड, पिंपळ, उंबर यापलीकडे झाडांच्या जाती माहिती नाहीत. शहरात कोणत्या ठिकाणी कोणते वृक्ष लावले जाणे आवश्यक आहे, याची जनजागृती व्हायला हवी. कुसुमासारख्या झाडांची ओळख होणे, त्याचबरोबर परदेशी, भारतीय झाडांविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. धावडा, पाचुंदा, कोशीम, कर्मळ इत्यादी १६८ प्रजातींची झाडे लावली गेली आहेत.  नाशिकच्या जवळ असलेल्या गावांमध्ये काही समूह कशी झाडे लावली गेली पाहिजेत यासाठी प्रयत्न करताना दिसत असून देवळाली, सातपूरचा डोंगर या भागात वनराई फुलत आहे.  पर्यावरण परिसंस्था अबाधित ठेवण्याचे काम परदेशी झाडे करू शकत नाहीत. परदेशी झाडांची हिरवळ दिसते, मात्र पक्षी त्यावर घरटी करत नाहीत. पक्ष्यांना घरटी करायला भारतीय झाडे लागतात. नाशिकच्या अवतीभोवती बिजा, तीळस, कळंब, कोर्शीम, हळदु, भोकर, धावडा, मोह, पासुंदा, पायर, सादोडा, देरडा या प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. 

दुर्मीळ वनसंशोधनाला वाव 
कसारा घाटातील इगतपुरी परिसरातील डोंगर रांगा, त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरी, अंजनेरी पर्वतरांगामधील जैवविविधता पाहता दुर्मीळ वनस्पतींच्या संशोधनाला खूप मोठा वाव आहे.  मुळात उपलब्ध असलेल्या वनौषधींचा शोध घेऊन त्यांची वर्गवारी करून उपलब्ध वनौषधीचे संशोधन होणे आवश्यक आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी, अंजनेरी, इगतपुरीच्या डोंगररांगांमध्ये धम्मगिरीचा परिसर येथील वनसंपदा नाशिकच्या जैवविविधतेचे प्रतीक आहे. द्राक्ष, गहू, ऊस, डाळिंबाची शेती, माती, वनसंस्कृतीचा योग्य वापर झाला तर आरोग्य संवर्धनाची गरज भागू शकेल अशा पद्धतीची फळे, फुले, पिके नाशिकमध्ये घेतली जातात. नाशिकच्या जैवविविधतेला प्रशासकीय पातळीवर पाठबळ मिळण्याची गरज आहे. 

नदी अप्रवाही झाल्यामुळे प्रदूषित झाली.  न्यायालयीन आदेशानुसार सध्या नाशिक स्मार्ट सिटीतील "गोदा प्रोजेक्ट" अंतर्गत पहिल्या टप्प्यात १७ प्राचीन कुंडांपैकी ५ कुंडांचे तळ कॉँक्रीटीकरण काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कॉँक्रीटीकरणाला  १९ वर्षे झाल्यानंतरही गोदावरी नदी पात्रातील जलस्रोत आजही सुस्थितीत आहेत. हेच नाशिकच्या जैवविविधतेच्या श्रीमंतीचे लक्षण आहे. नाशिक शहरातील सरस्वती, वाघाडी, नंदिनी  या नद्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे.

संबंधित बातम्या