अपेक्षांच्या ओझ्याखाली 'लग्न' 

ओंकार सिन्नरकर
गुरुवार, 19 जुलै 2018

घर पहावे बांधून‘ तसेच ‘लग्न पहावे करून‘ ही वाक्‍य आपल्या आयुष्यात जेव्हा खरी व्हायची वेळ येते तेव्हा या वाक्‍यांचा खरा अर्थ आपल्याला उमजत जातो. नाव नोंदणी करण्यापासून लग्न संपन्न होईपर्यंत एक भीतीयुक्त मजा/गंमत खरं तर या प्रोसेसमध्ये असते, पण हीच मजा आपण कुठेतरी हरवून बसलोय/बसतोय. याचे मूळ कारण आहे ‘अपेक्षा‘. या अपेक्षांमध्ये देखील उपप्रकार आहेत. उदा. मुलाची नोकरी आयटी असावी ही मूळ अपेक्षा आणि त्याचा पगार किमान ५०,००० च्या पुढे असावा ही अपेक्षा मधली अपेक्षा. शिवाय स्वतःचे घर असावे ते देखील मोठे असावे, शक्‍यतो एकुलता एक असावा या सर्व आजकाल ‘सहज‘ सांगितल्या जाणाऱ्या प्रमुख अपेक्षा!

घर पहावे बांधून‘ तसेच ‘लग्न पहावे करून‘ ही वाक्‍य आपल्या आयुष्यात जेव्हा खरी व्हायची वेळ येते तेव्हा या वाक्‍यांचा खरा अर्थ आपल्याला उमजत जातो. नाव नोंदणी करण्यापासून लग्न संपन्न होईपर्यंत एक भीतीयुक्त मजा/गंमत खरं तर या प्रोसेसमध्ये असते, पण हीच मजा आपण कुठेतरी हरवून बसलोय/बसतोय. याचे मूळ कारण आहे ‘अपेक्षा‘. या अपेक्षांमध्ये देखील उपप्रकार आहेत. उदा. मुलाची नोकरी आयटी असावी ही मूळ अपेक्षा आणि त्याचा पगार किमान ५०,००० च्या पुढे असावा ही अपेक्षा मधली अपेक्षा. शिवाय स्वतःचे घर असावे ते देखील मोठे असावे, शक्‍यतो एकुलता एक असावा या सर्व आजकाल ‘सहज‘ सांगितल्या जाणाऱ्या प्रमुख अपेक्षा! आपल्याला नक्की काय हवंय समोरच्या स्थळाकडून या गोंधळात आजकालचे होतकरू तरुण, तरुणी पडलेले दिसताहेत.   

आयुष्यातील भावी जोडीदाराकडून अपेक्षा नक्कीच असाव्यात; पण त्या देखील माफक. शिवाय या अपेक्षा मोल्ड करता येण्यासारख्या असाव्यात. पूर्वग्रहदूषित मनानेच जर आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला गेलो तर ती व्यक्ती एकदा काय अनेकदा भेटून सुद्धा समजणार नाही. आपल्याला पसंत जोडीदाराशी विवाह करायला मिळावा यासाठी सर्व होतकरू तरुण/तरुणी (मी देखील) धडपडत आहेत. समोरची व्यक्ती जास्तीत जास्त समजून घ्यावी यासाठी कॉफीशॉपमध्ये पहिली भेट घडते. प्रथम भेटीत काहीच अंदाच येत नसल्याने दुसरी भेट घेतली जाते, आणि तिसरी भेट घडते असे नाही कारण दुसऱ्या भेटीतच (किंवा पहिल्या भेटीत) समोरच्या व्यक्तीसमोर अपेक्षा मांडलेल्या असतात. असे अनेकदा होते. माझ्याबरोबर देखील घडले आहे. कुठे विचार जुळत नाहीत, कधी अपेक्षा जुळत नाहीत, कधी लुक जमत नाही तर कधी पत्रिकाच.  

एकदा शिक्षण संपून मुलाला/मुलीला छान नोकरी मिळाली, की पालक लग्नाच्या मागे लागतात आणि सुरू होतो अनुरूप स्थळ शोधण्याचा एक सोपा असून अवघड झालेला प्रवास. आजकाल लग्नाचे विशिष्ट असे वय राहिलेले नाही. साधारण ३० हे वय लग्नासाठीचे बेसिक वय झालेले आहे. जास्तीत जास्त स्वतंत्रपणे जगायला मिळावी यासाठी अनेक तरुण, तरुणी लग्न पुढे ढकलतात आणि मग ३२-३३ वय उजाडते. मग लग्नाचे वेगळेच टेन्शन घरात तरंगत राहते. पूर्वी योग्य वयात लग्न होऊन व्यक्ती पुढे वाटचाल करीन असे. पण आता या वाटचालीलाच उशिरा सुरवात होत आहे किंवा वेळेत वाटचाल सुरू होऊन देखील त्यात यश मिळत नाहीये. याला अनेक कारण आहेत. अजूनही समाजात मुलगा/मुलगी डॉक्‍टर, इंजिनिअर, आयटी क्षेत्रातीलच असावा/असावी ही अपेक्षा जिवंत आहे. यात गैर काही नाही; पण ही अपेक्षा पूर्ण होई पर्यंत वाट बघावी, की एखाद्या दुसऱ्या क्षेत्रातील व्यक्तीशी नातं जुळवावे हा प्रश्न बऱ्याचदा अनुत्तरीतच राहतोय. मुळात लग्न सामंजस्याने जमते आणि सामंजस्यानेच टिकते. ५० वर्षे सुखी संसारात आयुष्य व्यतीत केलेली जोडपी अजूनही समाजात आपल्याला मिळतात का तर मुळात अशा भलत्या अपेक्षा कोणी एकमेकांकडून ठेवत नसे आणि शिवाय आई वडिलांच्या पसंतीपुढे कोणाचे काही चालत नसे. 

मी विवाहसंस्थेत नाव नोंदणी केल्यानंतर अनेक चांगले वाईट अनुभव मला यायला लागले. असंच एक दिवस एका मुलीचे स्थळ मला आले. २ दिवसांनी मी त्या मुलीच्या पालकांशी बोलून मुलीला बाहेर भेटण्याची विनंती केली आणि त्यांनीही ती तत्काळ मान्य केली. यथावकाश आमच्या भेटीचा दिवस उजाडला आणि आम्ही कॉफीशॉपमध्ये भेटलो. प्राथमिक बोलणी, आवड निवड, अपेक्षा या सर्व गोष्टींवर आमचे बोलणे झाले. थोड्यावेळानंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि जाताना पुन्हा भेटायचे ठरले. साधारण एका आठवड्यानंतर आमची दुसऱ्यांदा गाठभेट झाली. यावेळेस आम्ही जरा वेगवेगळ्या विषयांवर बोललो. थोड्यावेळाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पण यावेळेस ती पुढे भेटायच्या निर्णयावर कळवते असे म्हणाली. पुढे अनेक दिवस गेले. आम्ही व्हाट्‌सॲपवर एकमेकांच्या मोजकेच संपर्कात राहिलो. अन शेवटी मी तिला तिचा निर्णय विचारला अन तिने ‘I think हे workout होत नाहीये‘ असा रिप्लाय दिला. मला नकाराचे फार काही वाटले नाही; पण दुसऱ्यांना इतके दिवस पेंडिंग ठेवणे हे माझ्या विचारापलीकडचे होते.  असे एकेक (विचित्र) अनुभव येत गेले अन त्यातून मी शिकत गेलो. लग्न जमणार असेल तर ते एका दिवसांत देखील जमतं, जेव्हा दोन कुटुंब विनाअपेक्षा एकत्र येतात अन जेव्हा त्यांच्यात विचारांची स्पष्टता असेत. आजकाल अनेक विवाहसंस्था तुमच्या  दिमतीला उभ्या आहेत. एका क्‍लिक वर अनेक स्थळे पहायला मिळतायेत. पण हे बघताना डोळ्यांवर  खूप अपेक्षांचा नंबर असलेला चष्मा नसावा. समोरचे स्थळ आपल्या तोलामोलाचे आहे, हे निश्‍चित बघावे पण त्याला विलंब करू नये. त्या स्थळाचे योग्य तितकेच विश्‍लेषण  करावे, आणि मुख्य म्हणजे योग्य वेळी होकार/नकार द्यायला हवा आणि त्यासाठी तुम्ही स्वतः ठाम असायला हवे. तेव्हाच आपल्या घरात लग्नाची सनई वाजेल अन नवीन जोडप्यांचे वैवाहिक आयुष्य आनंदाने स्वागत करेल.

संबंधित बातम्या