बाप्पासाठी पत्रप्रपंच 

अमित डोंगरे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

उपक्रम
 

पुण्यासारख्या शहरात काय काय ऐकावे, ते नवलच असेच म्हणावे लागते. यातील विनोदाचा भाग सोडला तर खरोखर काही उपक्रम अत्यंत अविश्वसनीय पण तितकेच प्रशंसनीय वाटतात. पुण्याचा गणेशोत्सव तर भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरदेखील नावाजला जातो. याच गणेशोत्सवाबाबत एक अवलिया गेली तीन दशके पत्रप्रपंच करत आहे. 

आता तुम्हाला वाटेल बाप्पांसाठी पत्रप्रपंच म्हणजे काय? तर गेली तीन दशके सुबोध महाजन नावाचा अवलिया आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या गणपती बाप्पांच्या भक्तांना स्वहस्ते लिहिलेली पत्रे पोस्टाद्वारे पाठवून आपण बुक केलेल्या बाप्पांना घेऊन जा, अशा स्वरूपाचा संदेश पाठवितात. पुण्यात किंवा देशातच नव्हे तर परदेशातील गणेश भक्तांना देखील ते बाप्पांची मूर्ती पाठवितात. 

कोथरूड येथील आनंदनगर सोसायटीमध्ये महाजन यांचे संसार नावाचे दुकान आहे. गृहोपयोगी तसेच पूजा साहित्य विक्रीचे हे दुकान असून गणेशोत्सवाला एक महिना अवकाश असताना दरसाल त्यांचा हा पत्रप्रपंच सुरू होतो. प्रत्यक्ष जेव्हा घरात तसेच मंडळांमध्ये बाप्पांची प्राणप्रतिष्ठा होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची सुटका होते. 

सोशल मीडिया, इंटरनेट, व्हॉट्सॲप, फेसबुकच्या आधुनिक युगातदेखील महाजन यांनी पारंपरिक गोष्ट जपली असून केवळ बाप्पांसाठीच हा पत्रप्रपंच सुरू आहे. महाजन यांच्या दुकानात शाडू मातीचे अत्यंत सुबक बाप्पा भक्तांचे लक्ष वेधून घेतात. पर्यावरणपूरक आणि अगदी घरातील पाण्याच्या बादलीतदेखील नागरिक बाप्पांचे विसर्जन करू शकतील अशा मूर्ती येथे मिळतात. त्यात पेशवाई, पुण्याचे वैभव असलेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई, चौरंग, मुंबईचे दैवत असलेला लालबागचा राजा, मैसुरी, मयूरासन तसेच पुणेरी पगडीवाला बाप्पा असे अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात. यंदा बाप्पांच्या मूर्तींच्या किमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झालेली आहे. पाचशे रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत सहा इंचांपासून दोन फूट अशा विविध आकारात, रूप, रंग आणि बैठक अशा विविध प्रकारांत मूर्ती उपलब्ध आहेत. 

बाप्पांची सेवा आपल्या हातून घडावी आणि कमीत कमी नफा मिळवून महाजन हा व्यवसाय गेली तीन दशके करत आहेत. बुद्धीची देवता असलेला बाप्पा आपल्या भक्तांना नेहमीच पावतो असा विश्वासही महाजन व्यक्त करतात. बाप्पांच्या आगमनाला आता काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत तेव्हा महाजन यांच्या या अनोख्या उपक्रमाचेदेखील अनेक स्तरांतून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या