असावी सुंदर मातीची मूर्ती

ज्योती बागल
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

उपक्रम
 

गणेशोत्सव, आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा सण. पण या सणाचे स्वरूप आता पूर्वीसारखे न राहता खूप बदलले आहे. काही चांगले बदल झाले आहेत, तर काही वाईट. म्हणजेच काही गणेश मंडळे सामाजिक प्रश्न जाणून घेऊन त्यावर समाज प्रबोधन करत आहेत. पण काही मंडळे गणेशोत्सवाच्या नावाखाली नुसता धिंगाणा घालताना दिसतात, तर तरुणांची चौकाचौकांत गणेश मंडळे पाहायला मिळतात. जाणून बुजून मोठमोठ्या गणेशमूर्ती आणण्यात तरुण अग्रेसर असतात. तसेच घराघरांत तुमचा गणपती मोठा की आमचा गणपती मोठा याची चुरस पाहायला मिळते. पण अशा मोठ्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसशिवाय तयार होतच नाहीत. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि केमिकलयुक्त रंगांमुळे पाणी प्रदूषणात चांगलीच भर पडली आहे. प्लॅस्टिक, थर्माकोलसारख्या विघटन न होणाऱ्या साहित्याचा वाढता वापर, त्यातच चौकाचौकांत वाजणाऱ्या डिजेमुंळे ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. म्हणजे पूर्वी सर्वांनी एकत्र यावे या धारणेतून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आज एका एका मंडळाचा होत चालला आहे. हे सर्व रोखण्यासाठी इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आहे. त्यासाठी इकोफ्रेंडली गणेशमूर्तींचे प्रमाण वाढवले पाहिजे आणि लोकांना त्याच मूर्ती पूजेसाठी घेण्यास तयार केले पाहिजे. अशा प्रयत्नांना नक्कीच यश येऊ शकते. पण त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे... आणि सध्या अशाच विषयावर काम करत आहे निवेदिता प्रतिष्ठान.

निवेदिता प्रतिष्ठान ही गेली दहा वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण रक्षण, पर्यावरणाचा प्रचार-प्रसार आणि त्यासाठी विविध उपक्रम राबवणारी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कचऱ्याचा पुनर्वापर करणे, जल संवर्धन करून पाण्याच्या प्रदूषणाला आळा घालणे, पर्यावरण रक्षण, सेंद्रिय खत निर्मिती हे व असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यावर्षी प्रतिष्ठानने हाती घेतलेला उपक्रम म्हणजे ‘इकोफ्रेंडली गणेशमूर्ती’. हा उपक्रम खासकरून मूर्तिकारांसाठी राबवला जात असून या उपक्रमाअंतर्गत इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करून त्या मूर्तीमध्ये धान्य भरून दिले जाणार आहे. हे ऐकायला थोडे वेगळे वाटेल, पण संकल्पना छान आणि नक्कीच विचार करण्याजोगी आहे. प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेण्याचे कारण म्हणजे जल संवर्धनाचे काम करत असताना त्यांच्या असे निदर्शनास आले, की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे, केमिकलयुक्त रंगांमुळे आणि मूर्तीं बरोबर सोडलेले हार, फुले, फळे आणि सजावटीच्या व पूजेच्या इतर साहित्यांमुळे नदी आणि तलावातील पाणी आणखी प्रदूषित होते. त्यामुळे जलचरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे तर गरजेचे आहेच; शिवाय मूर्तींमध्येदेखील बदल करणे गरजेचे होते. त्यामुळे प्रतिष्ठानने ग्राहकांपेक्षा विक्रेत्यांनाच इकोफ्रेंडली मूर्ती तयार करायला उद्युक्त करायचे ठरवले.

इकोफ्रेंडली गणेशमूर्ती करताना हे लोक कोकणातील भाताच्या शेतातली लाल माती वापरतात. मूर्तींचा आकार जास्त मोठा न ठेवता दोन फूट एवढाच ठेवतात. ही मूर्ती फक्त एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध होते. पण इतर ठिकाणी याच आकारची मूर्ती साधारण दोन हजार ते अठराशे रुपयांना मिळते. प्रतिष्ठानने या आधी मूर्तींच्या आकाराबद्दलदेखील जनजागृती करण्याचे उपक्रम केले आहेत. म्हणजे पूजेसाठी लहान आकाराचीच मूर्ती वापरली जावी. विनाकारण खूप मोठ्या आकाराच्या मूर्ती घेऊ नयेत, असे आवाहन या संस्थेमार्फत करण्यात आले होते. यातूनपण प्रदूषण रोखण्यासाठी काही प्रमाणात का होईना मदत झाल्याचे ते सांगतात.

‘इकोफ्रेंडली गणेश’ या उपक्रमाअंतर्गत इकोफ्रेंडली गणेश मूर्तींमध्ये धान्ये भरून देण्याची नवीन संकल्पना प्रतिष्ठानने यावेळी अमलात आणली आहे. यासाठी त्यांनी गेल्या वर्षी प्रयोग करून पाहिला आणि यावर्षी अशा मूर्ती बाजारात आणल्या आहेत. यात मूर्ती तयार करताना नेहमीसारखीच तयार करतात. या मूर्तीदेखील इतर मूर्तींप्रमाणे आतून पोकळ असतात. पण जेव्हा ग्राहक घ्यायला येतात किंवा मागवतात, तेव्हा म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी त्यात धान्य भरून दिले जाते. एका मूर्तीत साधारण एक ते दीड किलो धान्य बसते. या धान्यात वरई, राजगिरा, नाचणी असे बारीक धान्य भरले जाते. अनेक लोक कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करणे टाळून नदीत किंवा तलावातच विसर्जन करतात. त्यामुळे हा पर्याय योग्य ठरतो. जेव्हा मूर्ती विसर्जित केली जाते, तेव्हा ती पूर्ण विरघळते आणि त्यातील धान्य हे तेथील जलचर प्राण्यांना खाता येते. यामुळे त्या प्राण्यांच्या पोटात प्लॅस्टिक किंवा इतर काही जाण्याची भीती नसते... आणि मूर्तीत भरलेले अन्न खाताना थोडीशी माती गेलीच तर त्याने जलचरांना तशी इजा होत नाही. 

खूप लोकांचा समज असतो, की शाडू मातीच्या किंवा इतर मातीच्या मूर्ती लवकर तुटतात आणि मूर्ती तुटणे हा अपशकून मानला जातो. पण असे नसून प्रतिष्ठानने दिलेल्या माहितीनुसार, मातीच्या मूर्तीदेखील खूप दिवस टिकतात. अगदी वर्षभरसुद्धा टिकतात, एवढ्या त्या घट्ट होतात. फक्त या मूर्ती करताना मूर्तिकाराने योग्य पद्धत वापरायला हवी. त्याचे प्रशिक्षणदेखील प्रतिष्ठानतर्फे दिले जाते.    

गेल्या वर्षी प्रतिष्ठानने बियाणांचा गणपती केला होता. त्या मागचे कारण म्हणजे गणपती विसर्जित करताना तो नदीत विसर्जित न करता एखाद्या कुंडीत विसर्जित करायचा. म्हणजे नंतर त्याचे रोप उगवते. पण याला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रतिष्ठानने यावेळी गणपतीच्या मूर्तीत धान्ये भरून देण्याची संकल्पना राबवली आहे. 

मूर्ती रंगवताना सोनेरी रंग सोडून सर्व इकोफ्रेंडली रंग वापरले जातात. सोनेरी रंग अशासाठी की, त्यामुळे गणपतीचा मुकुट आकर्षक दिसावा आणि ती मूर्ती सुबक वाटावी. लोकांना मूर्ती कशाची आहे यापेक्षा ती सुबक असणे हे जास्त महत्त्वाचे असते. तसेच काही हौशी कलाकारांसाठी न रंगवलेल्या मूर्तीदेखील उपलब्ध करून दिल्या जातात. 

इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गेल्या वर्षी प्रतिष्ठानने कृत्रिम तलावाचा प्रयोगदेखील केला होता. त्या तलावात पूर्ण गावातील फक्त तेरा मूर्तींचेच विसर्जन झाले होते आणि त्यातही तीन मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत्या. यावर उपाय शोधताना त्यांच्या असे लक्षात आले, की ग्राहकांपेक्षा मूर्तिकारांनाच इकोफ्रेंडली मूर्ती करायला तयार केले, तर खूप मोठ्या प्रमाणात फरक पडू शकेल. त्यासाठी प्रतिष्ठानचे लोक मूर्तिकारांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधू लागले, त्यांना इकोफ्रेंडली मूर्तीचे महत्त्व सांगून त्यांना अशाच मूर्ती करण्यासाठी ते प्रेरित करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

निवेदिता प्रतिष्ठान दरवर्षी गणपती उत्सवादरम्यान वेगवेगळ्या सामाजिक विषयावर आधारित उपक्रम राबवत आहे. अशी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती खरेदी करून तुम्हीदेखील पर्यावरण संवर्धन राखण्यासाठी एक पाऊल पुढे येऊ शकता...

पर्यावरण संवर्धन हे निवेदिता प्रतिष्ठानचे मुख्य काम असून, या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून आम्ही त्यात सक्रिय असतो. यामध्ये आमची पंधरा लोकांची टीम असून, काही ज्येष्ठ नागरिक, तरुणदेखील स्वयंसेवक म्हणून मदतीला येतात. या वर्षी आम्ही मूर्तिकारांकडून इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करून घेण्यावर भर दिला आहे. त्यांना भेटून याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी प्रतिष्ठानने कागदाच्या लगद्यापासूनदेखील अतिशय सुंदर अशा गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम केला आहे. तसेच काही टाकाऊ वस्तूपासूनदेखील गणेशमूर्ती केल्या आहेत. तसेच गुढी पाडव्याला इको फ्रेंडली गुढीदेखील तयार करून विकल्या आहेत. फक्त आपण टाकाऊ कचऱ्यापासून न म्हणता इको फ्रेंडली हा शब्द वापरायचा, म्हणजे लोकांना काही वावगे वाटत नाही. खरे तर ग्राहकांच्या मानसिकतेत बदल घडणे खूप गरजेचे आहे. हा बदल घडवणे अवघड आहे, पण अशक्य नाही. हीच गोष्ट समोर ठेवून आम्ही त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. आम्ही जल संधारण, सर्वप्रकारच्या कचऱ्याचा पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करत आहोत. यातूनच रोजगार निर्मितीलादेखील वाव आहे.
- प्रशांत परांजपे, 
निवेदिता प्रतिष्ठान, रत्नागिरी.
संपर्क : ९५६११४२०७८

संबंधित बातम्या