स्पंज डोसा आणि मका मठरी

डॉ. अमृता वाळिंबे
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

भूक लागली आहे, पोटभर खायला हवंय... पण तेच तेच खाऊन कंटाळाही आलाय का? मग हे पदार्थ करून पाहा; जेवणासाठीही आणि चहाबरोबर स्नॅक्स म्हणूनही!

मुंबई स्टाइल तवा पुलाव
साहित्य - दोन वाट्या  तांदळाचा शिजलेला भात, १ वाटी  बारीक चिरलेला कांदा, १ वाटी  बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धी वाटी  बारीक चिरलेली शिमला मिरची, १ उकडलेला बटाटा, अर्धी वाटी  वाफवलेले मटार, अर्धा चमचा  हळद, १ चमचा  तिखट, अर्धा टीस्पून  जिरे, १ टीस्पून  पावभाजी मसाला, चवीनुसार  मीठ, २ चमचे  तेल आणि १ चमचा  बटर.
कृती - तवा पुलाव करण्यासाठी भात मोकळा करून घ्यावा. सर्व भाज्या चिरून घ्याव्यात. गॅसवर कढईत तेल व बटर तापायला ठेवावे. जिरे आणि कांदा घालून परतावे. कांदा बदामी रंगाचा झाल्यावर, त्यामध्ये टोमॅटो घालावा व ५ मिनिटे झाकण ठेऊन शिजवावे. त्यामध्ये पावभाजी मसाला, हळद, तिखट व मीठ घालून चांगले ढवळून घ्यावे. नंतर त्यात शिमला मिरची, फ्रोजन मटार, बटाटा घालून एकत्र करावे. त्यानंतर भात घालून पुन्हा एकत्र करून घ्यावे आणि झाकण ठेवून वाफ आणावी. गरमागरम तवा पुलाव दही व पापडाबरोबर सर्वांना खायला द्यावा.

अननसाचा शिरा
साहित्य - दोन कप  रवा, दीड कप  साखर, १ कप  अननसाचे काप, ४ कप  पाणी, १ टीस्पून  दूध मसाला, १ चिमूट  केशर व ५ टीस्पून साजुक तूप.
कृती - प्रथम रवा तूप घालून ५ मिनिटे भाजून घ्यावा. नंतर त्यात अननसाचे काप घालून ते ५ मिनिटे परतावेत. पाणी उकळत ठेवावे. आता उकळलेले पाणी रव्यामध्ये घालावे. थोडे परतून मग साखर घालून वाफ आणावी. दूध मसाला व केशर घालावे. शिरा तयार आहे.

लोणी स्पंज डोसा
साहित्य - दोन कप तांदूळ, अर्धा कप उडदाची डाळ, अर्धा कप भिजवलेले पोहे, अर्धा टीस्पून मेथीचे दाणे, पाव कप साबुदाणा, २ टेबलस्पून  तेल व चवीनुसार मीठ.
कृती - सर्वप्रथम तांदूळ, डाळ व साबुदाणा छान स्वच्छ धुऊन घ्यावा आणि सात ते आठ तास भिजवून ठेवावे. पोहे भिजवून घ्यावेत. नंतर मिक्सरमध्ये खूप बारीक दळून घ्यावे व व्यवस्थित मिक्स करावे. हे मिश्रण ८ तास ठेऊन आंबवून घ्यावे. नंतर मिश्रणात मीठ घालून छान फेटून घ्यावे. तव्यावर तेल घालून या मिश्रणाचे डोसे घालावेत व दोन्ही बाजूंनी छान भाजावे. हे जाळीदार डोसे लोणी, बटाट्याच्या भाजीबरोबर खायला द्यावेत.

पंचमेळ पालक खिचडी
साहित्य - दोन कप तांदूळ, अर्धा कप मूग डाळ, पाव कप तूर डाळ, १ टेबलस्पून चणा डाळ, १ टेबलस्पून मसूर डाळ, १०-१५ पाने पालक, १ टेबलस्पून  कोथिंबीर, ७-८ पाने कढीपत्ता, ४ टीस्पून  तूप, साखर, चवीनुसार मीठ, १ टीस्पून  मोहरी, चिमूटभर हिंग, १ टीस्पून हळद, १ टीस्पून धने-जिरे पूड व २ टीस्पून  गोडा मसाला.
कृती - तांदूळ व सर्व डाळी धुऊन घ्याव्यात. पालक चिरून घ्यावा. ५ कप पाणी उकळत ठेवावे. कुकरमध्ये चार चमचे तूप घालावे. त्यात मोहरी, हळद, हिंग, जिरे, कढीपत्ता, डाळी, पालक व तांदूळ घालावा व सर्व परतून घ्यावे. त्यावर उकळलेले पाणी घालावे. नंतर मीठ, गोडा मसाला, धने-जिरे पूड, साखर, कोथिंबीर घालून ३ शिट्या कराव्यात. तुमची पौष्टिक खिचडी तयार. पापड व लोणच्याबरोबर खावी.

मका मसाला मठरी
साहित्य - १ कप मक्याचे पीठ, अर्धा कप कणीक, अर्धा कप मैदा, १ टीस्पून  मिरपूड, १ टीस्पून  ओवा, चवीनुसार  मीठ व तळण्यासाठी  तेल.
कृती - तिन्ही पिठे एकत्र करावीत. त्यात मीठ, मिरपूड, ओवा आणि दोन टेबलस्पून तेल घालून पीठ एकजीव करावे. आता या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा भिजवावा. त्याचे छोटे छोटे गोळे करावेत. छोट्या व पातळ पुऱ्या लाटाव्यात. त्यावर सुरीने किंवा काट्याने टोचे पाडावेत, म्हणजे मठरी छान कुरकुरीत होते. कढईत तेल घालून गरम करावे. गरम तेलामध्ये मंद गॅसवर मठरी तळाव्यात. गरमागरम चहाबरोबर खायला द्याव्यात.

खमंग पाटवडी
साहित्य- एक कप बेसन, ५-६ हिरव्या मिरच्या, १०-१२ लसूण पाकळ्या, १ टीस्पून  जिरे, १ चिमूट हिंग, २ टेबलस्पून  कोथिंबीर, १ टेबलस्पून  तेल, चवीनुसार मीठ, १ टीस्पून  हळद व अर्धा टीस्पून तिखट.
कृती- सर्वप्रथम बेसन २ कप पाण्यात मिसळून घ्यावे व एकजीव करावे. मिरची, लसूण व जिरे भरड वाटून घ्यावे. कढईत तेल गरम करावे. त्यात जिरे, हिंग, मिरचीचे वाटण, हळद व तिखट घालावे. थोडे परतावे. मग पाण्यात एकत्र केलेले बेसन व मीठ घालावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गुठळ्या होऊ न देता पीठ शिजेपर्यंत सतत ढवळत राहावे. एका ताटाला तेल लावून वरील मिश्रण थापून घ्यावे. थंड झाल्यावर वाड्या कापाव्यात. खमंग पाटवड्या तयार आहेत.

तीळ गूळ शेंगदाणा लाडू
साहित्य - एक कप शेंगदाणा कूट, अर्धा कप तिळाचे कूट व १ कप किसलेला गूळ.
कृती - सर्व जिन्नस एकत्र करावेत. मिक्सर मधून एकदा फिरवून एकजीव करावे. एका भांड्यात हे मिश्रण काढून घ्यावे आणि याचे छोटे लाडू वळावेत. ५ मिनिटांत पौष्टिक लाडू तयार.

डाळ पराठा
साहित्य - एक वाटी  शिजवलेली डाळ, अर्धी वाटी किसलेला मुळा, २ वाट्या कणीक,  मीठ चवीनुसार, अर्धा चमचा ओवा, अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून लसूण पेस्ट व तेल आवश्‍यकतेनुसार. 
कृती - डाळ, कणीक, मुळा, ओवा, हळद, मीठ व लसूण एकत्र करावे. त्यात १ टेबल स्पून तेल घालावे. आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालून पराठ्यांसाठी कणीक मळून घ्यावी. कणीक १५ मिनिटे झाकून ठेवावी. नंतर गॅसवर तवा गरम करावा. कणकेचे मध्यम आकाराचे गोळे करावेत व पराठे लाटावेत. तव्यावर तेल लावून पराठे खरपूस भाजावेत. चविष्ट डाळ पराठा दह्याबरोबर द्यावा.

दुधी शेवगा सूप 
साहित्य- एक वाटी चिरलेला दुधी भोपळा, ४ शेवग्याच्या शेंगा, पाव वाटी भिजवलेली मूग डाळ, ४ वाट्या पाणी, मीठ चवीनुसार, ५-६ लसूण पाकळ्या, १ टीस्पून चिरलेले आले, १ टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून मिरपूड व पाव टीस्पून  हळद.
कृती - भोपळा चिरून पाण्यात ठेवावा. कुकरमध्ये एका भांड्यात डाळ, आले, लसूण व भोपळा मऊ शिजवून घ्यावा. शेवग्याच्या शेंगा कापून उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर त्याचा गर काढावा. दुधी, डाळ व शेंगांचा गर मिक्सरमधून वाटून घ्यावा. एका पातेल्यात हे मिश्रण घालावे. त्यात पाणी घालून उकळत ठेवावे. आता त्यात हळद, जिरेपूड, मिरपूड व मीठ घालावे. एक उकळी आणावी. सूप तयार आहे.

डोनट्स
साहित्य - दोन कप मैदा, १ टेबलस्पून दही, १ कप पिठीसाखर, १ टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा  टीस्पून बेकिंग सोडा व तेल तळण्यासाठी.
कृती - मैदा, साखर, बेकिंग पावडर, सोडा सर्व एकत्र करावे. त्यात १ टेबलस्पून तेल घालावे. हळूहळू दही घालून घट्ट करून पीठ मळून घ्यावे. पीठ अर्धा तास झाकून ठेवावे. ३० मिनिटांनी गोळ्याचे ३ भाग करून जाडसर पोळ्या लाटून घ्याव्यात. वाटीच्या साहाय्याने छोट्या छोट्या गोलाकार पुऱ्या कापाव्यात. मध्यभागी छोटासा गोल कापावा. तेल तापवावे व हे डोनट्स मंद आचेवर तळून घ्यावेत.

संबंधित बातम्या