पोटॅटो पॅनकेक्स, पनीर टिक्का

अनुषा मुदगल
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

स्वयंपाक करणाऱ्यालाही रोज तेच तेच करून कंटाळा येतो. मनापासून स्वयंपाक आवडणाऱ्यांना नेहमीच नवीन काहीतरी करून बघायला आवडते. म्हणूनच या काही सोप्या पण जरा वेगळ्या रेसिपीज...

गाजर खीर 
साहित्य ः (चार जणांसाठी) दोन मोठी दिल्ली गाजरे, १ लिटर गाईचे दूध, अर्धा कप मिल्क पावडर, २ ते ३ ड्रॉप व्हॅनिला इसेन्स, ५ ते ६ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून मिक्स ड्रायफ्रूट पावडर (बदाम, पिस्ता, काजू), ५-६ केशर काड्या.
कृती ः गाजरे स्वच्छ धुऊन त्याची साले काढून घ्यावीत. बारीक किसणीने गाजराचा कीस करावा. एकीकडे दूध तापवायला ठेवावे, दुधाला उकळी आली की गॅस बंद करावा. एका नॉनस्टिक पॅनमध्ये गाजराचा कीस थोडेसे पाणी शिंपडून मंद आचेवर ठेवावा. झाकण ठेवून दहा मिनिटे वाफ आणावी. त्यात गरम केलेले दूध, मिल्क पावडर, व्हॅनिला इसेन्स, केशराच्या काड्या, ड्रायफ्रूट पावडर आणि आवडीनुसार साखर घालावी. दहा ते पंधरा मिनिटे मंद आचेवर खीर दाटसर होईपर्यंत शिजू द्यावी. रूम टेंपरेचरला आल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवावी व थंड सर्व्ह करावी. आवडीप्रमाणे वरून काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालू शकता.

चीज बॉल्स
साहित्य - (पंधरा बॉल्ससाठी) शंभर ग्रॅम प्रोसेस्ड चीज, २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, १ टेबलस्पून ब्रेड क्रम्ब्स आवरणासाठी आणि २ टेबलस्पून घोळवण्यासाठी, ५-६ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, २ टीस्पून चिली फ्लेक्स, २ टीस्पून मिक्स्ड हर्ब्स, १ टीस्पून काळी मिरी पूड, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून मैदा आणि १ टेबलस्पून  कॉर्नफ्लोअर यांची पाणी घालून तयार केलेली पेस्ट, तळण्यासाठी तेल.
कृती - चीजचे छोटे छोटे १५ एकसारखे क्युब करून घ्यावेत. एका बोलमध्ये उकडलेले बटाटे, एक टेबलस्पून ब्रेड क्रम्ब्स, ४ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, काळी मिरी पूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून छान गोळा तयार करावा. या गोळ्याचे एकसारखे पंधरा भाग करावे. आता एक एक गोळा घेऊन हाताने त्याची पारी करून त्यात चीज क्यूब स्टफ करावी. पुन्हा लाडूसारखा छान वळावा. नंतर आपण केलेल्या मैदा आणि कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवावा व त्यानंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवावा. अशा पद्धतीने सगळे बॉल्स करून घ्यावेत. अर्धा ते एक तास डीप फ्रीजला रेफ्रिजरेट करावेत. गरम तेलात सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून टोमॅटो केचप किंवा मेयोनीज सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

पोटॅटो पॅनकेक्स विथ मेयो डीप
साहित्य - (आठ ते दहा पॅन केक्ससाठी) दोन मोठ्या आकाराचे उकडलेले बटाटे, १ कप तांदळाची पिठी, अर्धा कप बारीक रवा, १ टेबलस्पून दही, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २ टीस्पून मिक्स हर्ब्ज, २ टीस्पून काळी मिरी पूड, मीठ चवीनुसार, बॅटर तयार करण्यासाठी पाणी, पॅन केक भाजण्यासाठी तेल, मेयो डीपसाठी ४ टेबलस्पून मेयॉनीज सॉस, २ टेबलस्पून टोमॅटो केचप आणि १ टीस्पून मिक्स हर्ब्ज.
कृती - बटाटे उकडून साले काढून, कुस्करून त्यात पाणी घालावे व ब्लेंडर फिरवून त्याची छान पेस्ट करावी. बटाट्याची पेस्ट, तांदळाची पिठी, बारीक रवा, दही, हिरव्या मिरच्या, मिक्स हर्ब्ज, काळी मिरी पूड, चवीप्रमाणे मीठ आणि गरजेप्रमाणे पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करून घ्यावे. नॉनस्टिक पॅनवर किंचित तेल घालून पसरावे व उत्तप्पाप्रमाणे पॅन केक घालावेत. ३० सेकंद झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने चांगले शेकावे. मेयोनीज सॉस, टोमॅटो केचप आणि हर्ब्ज एकत्र करून डीप तयार करावे. या डीपबरोबर गरम गरम पॅन केक्स सर्व्ह करावेत.

ढिंगरी भुट्टा पुलाव विथ अनार रायता
साहित्य - (चार जणांसाठी) अडीचशे ग्रॅम बासमती तांदूळ, २०० ग्रॅम चकत्या केलेले मशरूम, १ मोठी चौकोनी चिरलेली शिमला मिरची, १०० ग्रॅम उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे, मीठ चवीनुसार, आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड आणि ओरिगानो, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, भात शिजवण्यासाठी पाणी
रायत्यासाठी - शंभर ग्रॅम डाळिंबाचे दाणे, १०-१५ पुदिन्याची पाने, ४०० ग्रॅम फेटलेले दही, चवीप्रमाणे मीठ आणि चाट मसाला.
कृती - बासमती तांदळाचा मोकळा भात शिजवून घ्यावा. एका नॉनस्टिक पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइलवर चकत्या केलेले मशरूम, शिमला मिरची, स्वीट कॉर्नचे दाणे मोठ्या आचेवर परतून घ्यावेत. चवीप्रमाणे मीठ, आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड आणि ओरिगानो घालून शिजवलेला भात हलक्या हाताने एकत्र करावा. मंद आचेवर झाकण ठेवून एक वाफ काढावी. फेटलेल्या दह्यामध्ये डाळिंबाचे दाणे, पुदिन्याची पाने, मीठ आणि चाट मसाला घालून छान एकत्र करावे आणि गरम गरम पुलावाबरोबर रायता सर्व्ह करावा.

सुपरफास्ट पनीर टिक्का
साहित्य - (चार जणांसाठी) अडीचशे ग्रॅम ताजे पनीर, ४ टेबलस्पून फेटलेले घट्ट दही, १ टेबलस्पून भाजलेले बेसनाचे पीठ, १ टीस्पून आले-लसणाची पेस्ट, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून चाट मसाला, १ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून तेल शॅलो फ्राय करण्याकरिता.
कृती - पनीरचे मध्यम आकाराचे चौकोनी क्युब्ज करून घ्यावे. पनीर मॅरिनेट करण्याकरिता दही, भाजलेले बेसन, आले लसणाची पेस्ट, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि तेल एकत्र करावे. त्यात पनीरचे क्युब्ज घालून पनीरच्या सर्व बाजूंनी मिश्रण कोट करावे. अर्धा तास मॅरिनेट केलेले पनीर फ्रीजमध्ये ठेवावे. तव्यावर थोडेसे तेल घालून पनीर दोन्ही बाजूंनी छान शॅलो फ्राय करून घ्यावे. आपल्या आवडीच्या सॅलडबरोबर आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर पनीर टिक्का सर्व्ह करावा.

न्युट्री ग्रीन क्रेप्स
साहित्य - (चार जणांसाठी) वीस ते पंचवीस पालकाची पाने, मुठभर कोथिंबीर, ३-४ हिरव्या मिरच्या, आले लसूण जिरे यांची पेस्ट, १ कप ओट्स पाण्यात भिजवून त्याची केलेली पेस्ट, अर्धा कप बेसन, अर्धा कप रवा, मीठ चवीनुसार, गरजेनुसार तेल. 
कृती - वरील सर्व साहित्य छान एकजीव करून अर्धा तास बाजूला ठेवून द्यावे. पळीने नॉनस्टिक तव्यावर किंचित तेल घालून डोशाप्रमाणे ग्रीन क्रेप घालावेत. दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यावेत. आपल्या आवडीच्या चटणी किंवा सॉसबरोबर गरम गरम सर्व्ह करावे.

राजस्थानी पापड की सब्जी
साहित्य - (चार जणांसाठी) दहा ते बारा उडदाचे पापड तुकडे करून घेतलेले, ४ टेबलस्पून घट्ट फेटलेले दही, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, २ टीस्पून आले लसूण पेस्ट, १ टीस्पून हळद, २ टीस्पून तिखट, २ हिरव्या मिरच्यांचे उभे काप, १ टीस्पून धने-जिरे पूड, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी तेल, हिंग आणि जिरे,
सजावटीसाठी कोथिंबीर.
कृती - उडदाच्या पापडाचे तुकडे तीस सेकंद पाण्यात ठेवून काढावेत. एका पॅनमध्ये फोडणीसाठी अनुक्रमे तेल, जिरे, हिंग, हळद ,आले-लसूण पेस्ट, कांदा, हिरवी मिरची, तिखट, धने जिरे पूड घालावी. दोन मिनिटे परतून त्यात दही घालावे. वरील ग्रेव्हीला तेल सुटले की त्यात भिजवलेले पापडाचे तुकडे घालून एकत्र करावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. एक वाफ आणावी. वरून भरपूर कोथिंबीर घालून गरम गरम पापडाची भाजी सर्व्ह करावी.

हेल्दी आणि चटपटीत चना चाट
साहित्य - (चार जणांसाठी) दोन कप रात्रभर भिजवून उकडलेले काबुली चणे, १ उकडून फोडी केलेला मोठा बटाटा, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, मूठभर डाळिंबाचे दाणे, एका लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, तिखट, चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मूठभर बारीक शेव.
कृती - एका बोलमध्ये काबुली चणे, बटाट्याच्या फोडी, कांदा, टोमॅटो आणि डाळिंबाचे दाणे एकत्र करावेत. त्यामध्ये लिंबाचा रस, तिखट, चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करावे. वरून कोथिंबीर आणि शेव घालून चना चाट सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या