उपासाचे खमंग पदार्थ

निर्मला देशपांडे
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

आपल्याकडे चातुर्मासाच्या काळात श्रावण, भाद्रपद, आश्‍विन व कार्तिक हे महिने येतात. या काळात भरपूर सणवार आणि उपास  असतात. घरात नेहमी होणाऱ्या साबुदाणा खिचडीशिवाय, मग इतर अनेक पदार्थ केले जातात. असेच काही नेहमीपेक्षा वेगळे उपासाचे पदार्थ...

खजूर अक्रोड शेक
साहित्य : अर्धा लिटर दूध, २ चमचे कस्टर्ड पावडर, साखर २ ते ३ चमचे, खजूर पेस्ट, स्ट्रॉबेरीचे तुकडे, व्हॅनिला आइस्क्रीम, अक्रोडचा चुरा.
कृती : दूध उकळत ठेवावे. कस्टर्ड पावडर थोड्या थंड दुधात कालवून त्यात घालावी. मंद गॅसवर हलवावे. शिजताना साखर घालावी. शिजल्यावर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर हे तयार कस्टर्ड ग्लासमध्ये घालावे. त्यात खजूर पेस्ट घालावी. स्ट्रॉबेरीचे तुकडे घालावेत. वर व्हॅनिला आइस्क्रीम घालावे. अक्रोडचा चुरा घालावा. स्ट्रॉबेरीचे काम लावून खजूर अक्रोड शेक सर्व्ह करावा.

शिंगाड्याची पौष्टिक खीर
साहित्य : अर्धा लिटर दूध, अर्धी वाटी शिंगाडा पीठ, वाटीभर खोबऱ्याचा चव, वाटीभर गूळ, केशर वेलची सिरप, फळांचे तुकडे एक वाटी. चमचाभर डाळिंब दाणे.
कृती : दूध उकळत ठेवावे. शिंगाडा पीठ थंड दुधात कालवून त्यात घालावे. व मंद आचेवर सतत हलवत शिजत ठेवावे. त्यात खोबरे, गूळ घालावा. घट्ट वाटल्यास दूध घालावे. गूळ विरघळल्यावर केशर वेलची सिरप घालावे व हलवावे. शिजल्यावर खाली उतरावे. त्यात कुठल्याही फळाचे एक वाटी तुकडे घालावेत. गरम अगर गार कसेही आवडीप्रमाणे सर्व्ह करावे. यात सफरचंद, केळी, चिकू, सीताफळ असे कुठलेही फळ चालेल.

राजगिऱ्याचा शिरा
साहित्य : वाटीभर राजगिऱ्याचे पीठ, वाटीभर साखर, दोन वाट्या दूध किंवा वाटीभर दूध, वाटीभर पाणी, २ टेबलस्पून तूप, वेलची पूड, सुक्‍यामेव्याचे काप.
कृती : तुपावर राजगिऱ्याचे पीठ खमंग भाजून घ्यावे. त्यात गरम दूध अगर दूध पाणी हलके हलवत घालावे. चांगले मिक्‍स करावे. मंद गॅसवर ठेवून चांगली वाफ आणावी. कढल्यात तुपावर सुकामेवा काप परतून घ्यावे. शिजलेल्या पिठात साखर घालावी. हलके हलवावे. साखर विरघळ्यावर खाली उतरावा. वेलची पावडर घालावी. कडेने थोडेसे तूप सोडावे. सुकामेवा काप भरभरून गरमागरम डिश सर्व्ह करावी.

मिसळीची भाजी
साहित्य : प्रत्येकी दोन रताळी, बटाटे व कच्ची केळी उकडून एक वाटी लाल भोपळा साल काढून, उकडून फोडी, दोन चमचे तूप, चिमूट  जिरे, ३ हिरव्या मिरच्या वाटून, नारळाचा चव अर्धी वाटी, दोन चमचे दाण्याचा कूट, मीठ, साखर, चवीप्रमाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : केळी, रताळी व बटाट्याची साली काढाव्यात व छोट्या फोडी कराव्यात. कढईत तूप जिऱ्याची फोडणी करावी. त्यावर या फोडी, भोपळ्याच्या फोडी टाकाव्यात. मीठ, मिरचीची पेस्ट, दाण्याची कूट घालावा. कपभर गरम पाणी घालून मध्यम गॅसवर भाजी शिजत ठेवावी. आवडत असेल तर चवीप्रमाणे साखर घालावी. निम्मा नारळचव घालावा. तयार भाजीवर खोबरे, कोथिंबीर पेरावी.

कटलेट
साहित्य : बटाटा, सुरण, कच्च्या केळ्यांचा प्रत्येकी एक वाटी कीस वाफवून, वाफवतानाच थोडे मीठ व लिंबाचा रस चोळावा. आलं व हिरव्या मिरचीचे वाटण २ चमचे, कोथिंबीर, साबुदाणा पीठ अर्धी वाटी तपू, (साखर ऐच्छिक).
कृती : वाफवलेल्या किसात वाटण, कोथिंबीर, चिमूट साखर, चवीप्रमाणे मीठ व साबुदाणा पीठ घालावे. कालवून गोळा करावा. लांबट अगर बदामाकृती गोळे बनवावेत व साबुदाणा पिठात घोळवावेत. तव्यावर थोड्या तुपावर शॅलोफ्राय करावेत. वरून ओले खोबरे कोथिंबीर भुरभुरुन कटलेट सर्व्ह करावेत.

रताळ्याचे थालिपीठ
साहित्य : दोन मध्यम रताळी, वाटीभर भिजवलेला साबुदाणा, वाटीभर वरईचे तांदूळ, वाटीभर दाण्याचे कूट, २-३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, चवीपुरती साखर, तूप.
कृती : वरईचे तांदूळ तीन तास भिजत ठेवावेत. रताळी उकडून घ्यावी. वरईचे चांगले भाजलेले तांदूळ निथळून मिक्‍सरवर बारीक करून घ्यावेत. मग त्या पिठात रताळी किसून घालावीत. भिजवलेला साबुदाणा दाण्याचे कूट, मीठ, बारीक केलेली मिरची, कोथिंबीर, चवीपुरती साखर घालून त्याचा गोळा करावा. तव्याला तूप लावून थालिपीठ लावावे. खमंग भाजावे. वरील साहित्यात २-३ थालिपीठ होतील. दह्यात कालवलेल्या दाण्याची चटणी बरोबर गरमागरम थालिपीठ द्यावे.

पातोळ्या
साहित्य : दोन वाट्या वरई तांदूळ, एक वाटी काकडीचा कीस, चिमूटभर मीठ, 
सारणाकरिता : दोन वाट्या खोबऱ्याचा चव, दीड ते पावणे दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, चमचाभर भाजलेली खसखस पूड, काजूची भरडपूड, वेलची, जायफळ पूड, तूप, पातोळ्या करण्यासाठी केळीची किंवा कर्दळीची पाने.
कृती : कढईत सारणाचे साहित्य घालून घट्टसर शिजवून घ्यावे. तांदूळ बेताचे पाणी घालून २-३ तास भिजत ठेवावेत. नंतर निथळून त्यात चवीपुरते मीठ घालून ते मिक्‍सरवर बारीक वाटून घ्यावेत. त्यात काकडीचा कीस घालावा व पीठ हलवून तयार करावे. कर्दळीचे उभे पान घेऊन निम्म्या पानांवर दोन चमचे पीठ गोलाकार पसरावे. त्यावर सारण पसरावे. पानाचा उरलेला भाग त्यावर दुमडून पातोळी झाकावी. चाळणीत किंवा मोदकपात्रात ठेवून वाफवून घ्यावी. कोमट असताना काढावी व तूप घालून द्यावी.

बटाट्याचा चिवडा
साहित्य : वेफर्सचे ३ बटाटे, काजू, भाजके शेंगदाणे, चेरी, बेदाणे, मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जिरे, पिठीसाखर, तूप.
कृती : बटाटे साल काढून मिठाच्या पाण्यात ठेवावेत. बटाट्याच्या किसणीने उभे किसावेत. म्हणजे कीस सरळ लांब पडेल. कढईत तूप तापत ठेवावे. बटाटे मिठाच्या पाण्यात किसावेत. एका वेळी थोडाच कीस किसावा व लगेच पिळून कढईत मोकळा करत सोडावा. तळून घ्यावा. बटाटे मिठाच्या पाण्यातच ठेवावेत. अशा तऱ्हेने सगळा कीस तळून घ्यावा. थोड्या तुपात दाणे, सुकामेवा तळून घ्यावा. मग हिरव्या मिरच्यांचे तुकडे तळून घ्यावे. चिमूट मीठ भुरभुरावे. जिरे घालून परतावे. गॅस मंद करावा. ड्रायफ्रुटस घालून हलवावे. तळलेला सगळा कीस घालावा. हलके हसडावे. पिठीसाखर घालावी. आवश्‍यक तर मीठ घालावे. चिमूट खसखस भुरभुरावी. मंद गॅसवर २ मिनिटे ठेवून चिवडा खाली उतरावा.

केळोऱ्या
साहित्य : वाटीभर नारळाचा चव, अर्धी वाटी गूळ, ३-४ बिया काढलेला खजूर, वेलची पूड, चमचाभर मिल्क पावडर, दोन चमचे सुकामेव्याची पूड, १ चमचा भाजलेली खसखस पूड, २ मोठी पिकलेली केळी, २ ते ३ चमचे साबुदाणा पीठ, चवीपुरते मीठ, तूप, सुकामेवा काप.
कृती : पॅनमध्ये नारळ चव घालावा. गूळ चिरून घालावा. खजुराची पेस्ट करून घालावी व परतावे. मंद गॅसवर त्यात मिल्क पावडर, सुकामेवा पूड, खसखस पूड, वेलची पूड घालून हलवून सारण बनवावे. केळी वाफवून घ्यावीत. सोलून किसावीत. त्यात साबुदाणा पीठ, चिमूट मीठ घालावे व तुपाच्या हाताने गोळा बनवावा. त्याच्या हाताने थापून पुऱ्या कराव्यात. एका पुरीच्या मध्यभागी सारण ठेवून त्यावर दुसरी पुरी ठेवावी. हलकेच कडाबंद कराव्यात. काट्याने किंचित दाब कडावर देऊन डिझाईन करावे. पॅनमध्ये थोडे तूप घालावे. त्यावर केळोऱ्या ठेवून शॅलोफ्राय कराव्यात. वर सुकामेव्याचे काप भुरभुरुन केळोऱ्या सर्व्ह कराव्यात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या