संत्र्याची गोडी

सुप्रिया खासनीस
सोमवार, 18 जानेवारी 2021

सध्या संत्र्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे बाजारात भरपूर संत्री उपलब्ध आहेत. संत्र्याच्या आंबटगोड चवीमुळे मनाला व शरीराला तृप्ती, ऊर्जा मिळते. संत्र्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरसबरोबर ‘क’ जीवनसत्त्व अधिक असते. अशा या औषधी गुणधर्म असलेल्या फळाच्या काही पाककृती...

संत्रा खंड (ऑरेंज खंड)
साहित्य : अर्धा किलो चक्का, अर्धा किलो साखर, साधारण वाटीभर संत्र्याच्या बारीक फोडी, काजू पिस्ते (ऐच्छिक), पुरेसा ऑरेंज इसेन्स.
कृती : प्रथम चक्का चांगला फेटून घ्यावा. नंतर साखर घालून चांगले एकसारखे करावे. थोड्या वेळाने त्यात संत्र्याच्या फोडी, थोडा ऑरेंज इसेन्स व काजू पिस्ते काप घालावेत व एकसारखे करावे. संत्र्याचा सुरेख स्वाद येऊन ऑरेंज खंडाचा रंगही छान दिसतो. ज्यावेळी संत्री उपलब्ध नसतील त्यावेळी पूर्णतः ऑरेंज इसेन्सचा वापर केला तरी चालतो.

शिरा
साहित्य : एक वाटी बारीक रवा, पाव वाटी तूप, २ वाट्या पाणी, पाऊण वाटी साखर, पाव वाटी चांगल्या केशरी रंगाच्या संत्र्याच्या फोडी, काजू, बदाम, चारोळ्या ऐच्छिक.
कृती : नेहमीप्रमाणे साधा शिरा करून घ्यावा. शिरा गार झाल्यावर त्यात फोडी मिसळाव्यात. हा शिरा जरा सैलसर असावा, म्हणजे त्यात फोडी व्यवस्थित मिसळता येतात. नंतर काजू, बदाम घालून शिरा एकसारखा करावा.

संत्रा भात
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, २ वाट्या साखर, अर्धी वाटी तूप, ५-६ लवंगा, बदाम काप, २ मोठी रसरशीत संत्री, खाण्याचा ऑरेंज रंग, १ लहान नारळ, वर्खाचे वेलदोडा दाणे.
कृती : संत्री सोलून त्याच्या कळ्या व्यवस्थित काढाव्यात. खोवलेले खोबरे साखरेबरोबर शिजवून त्यात अर्ध्या संत्र्याच्या सालीचे अगदी बारीक तुकडे घालावेत व पाक तयार करावा. साखरीभाताप्रमाणे भात तयार करून घ्यावा. तयार केलेल्या पाकात तो भात, संत्र्याच्या कळ्या व ऑरेंज कलर घालावा. थोडा संत्रा इसेन्स घालावा. मग भात मंदाग्नीवर चांगली वाफ आणून मोकळा होऊ द्यावा. बदाम काप, वेलची दाणे घालून एकसारखा करावा व वर चांगले तूप सोडावे. हा भात गारच चांगला लागतो.

ऑरेंज सॉस
साहित्य : एक मोठे संत्रे, ५५ ग्रॅम साखर, दीड चमचा कॉर्नफ्लोअर, २ कप पाणी.
कृती : साखरेत पाणी घालून उकळावे. थोड्या पाण्यात कॉर्नफ्लोअर मिसळून साखरेच्या पाण्यात ओतावे. भांडे खाली उतरवून त्यात संत्र्याचा रस घालावा. केकवर, पुडिंगवर सॉस घालून सर्व्ह करावे.

ऑरेंज मिल्क
साहित्य : चार वाट्या दूध, पाव वाटी साय, दीड ते दोन वाट्या संत्र्याचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस, ८ ते १० चमचे साखर, बर्फ.
कृती : गार दूध घेऊन त्यात साखर मिसळून घ्यावी. संत्र्याचा व लिंबाचा रस एकत्र करावा. एका मोठ्या काचेच्या बोलमध्ये बर्फाचा चुरा घालावा आणि त्यावर संत्र्याच्या व लिंबाच्या रसाचे मिश्रण घालावे. वर दूध ओतावे. ग्लासमध्ये तयार झालेले मिश्रण ओतून त्यावर थोडी साय घालून पिण्यास द्यावे.

जेली
साहित्य : सहा संत्र्याचा गर, गर जेवढा होईल त्याच्या पाऊणपट साखर, १ लिंबू.
कृती : संत्री सोलून त्याच्या बिया का‌ढून घ्याव्यात. त्यात चार कप पाणी घालून उकळायला ठेवावे. त्यात दोन संत्र्यांच्या साली घालाव्यात. साल नरम झाले की रसात साखर व लिंबाचा रस घालून गॅसवर ठेवावे. दाटसर होत आले की उतरवावे. जेली तयार!

बर्फी
साहित्य : पाच मोठी संत्री, ४०० ग्रॅम खवा, ४०० ग्रॅम साखर, एका संत्र्याचे पाकवलेले साल (दुकानात मिळते), पिवळा रंग, थोडा ऑरेंज कलर, वेलदोड्याची पूड.
कृती : प्रथम संत्र्याचा रस काढून घ्यावा. खवा हाताने सारखा करावा. साखरेत संत्र्याचा रस घालून गोळीबंद पाक करावा. नंतर त्यात केशरी रंग, वेलची पूड व संत्र्याचे पाकवलेले साल कुटून घालावे. जरा ढवळून खाली उतरवून चांगले घोटावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत ओतून थापावे व वड्या पाडाव्यात.

भोग
साहित्य : एक दिवस आधी तयार केलेले रसगुल्ले, केशर अगर केशरी रंग, संत्र्याचा इसेन्स.
कृती : रसगुल्ल्याच्या पाकात केशर अगर केशरी रंग घालावा. पाकात रसगुल्ले घालून पाक उकळून एकतारी होऊ द्यावा. नंतर भांडे खाली उतरवून पाक गार झाल्यावर त्यात संत्र्याचा इसेन्स घालावा. 

संत्रा बॉल्स
साहित्य : एक ते दीड वाटी संत्र्याच्या साली शिजवलेला गर, दीड वाटी साखर, १ वाटी बदामाची पूड, १ चमचा लिंबाचा रस, घोळण्यासाठी पुरेशी साखर.
कृती : संत्र्याच्या साली काढून घ्याव्यात. त्याच्या आतील बाजूस असलेले पांढरे धागे पूर्ण काढून टाकावेत. नंतर त्या साली कुकरमध्ये म‌ऊ शिजवून घ्याव्यात आणि त्याचा गर गाळून घ्यावा. असा गर एक ते दीड वाटी असावा. नंतर गर व साखर एकत्र मिसळून शिजावयास ठेवावे. म‌ऊसर गोळी होईल इतपत शिजवावे. नंतर भांडे खाली उतरवून त्यातील मिश्रण घोटावे. त्या मिश्रणाचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे गोल गोळे करावेत. जाड साखर घेऊ नये, मध्यम आकाराची साखर घ्यावी. तयार गोळे साखरेत घोळवावेत.

कुल्फी
साहित्य : दोन मोठी संत्री, २ कप दूध, अर्धा कप साखर, केशर. 
कृती : प्रथम संत्री घेऊन त्यातील बिया काढून टाकाव्यात. त्याचा रस काढून घ्यावा. एका पॅनमध्ये दूध उकळत ठेवावे. त्याला उकळी आली की त्यात अर्धा कप साखर व केशर घालून दूध निम्मे होईल इतपत आटवावे. मग त्यात संत्र्याचा रस घालून चांगले ढवळावे. चांगले ढवळले की गॅस बंद करून ते थंड होऊ द्यावे. थंड झाले की कुल्फीच्या साच्यामध्ये थंड करायला फ्रीजमध्ये ठेवावे. छान कुल्फी तयार होते.

संत्रा सार (रस्सम)
साहित्य : एक वाटी शिजवलेली तुरीची डाळ, २ संत्री, २-३ हिरव्या मिरच्या, हिंग, मोहरी, मीठ, साखर, कढीपत्ता, कोथिंबीर, १ वाटी नारळाचे खोबरे, तेल किंवा तूप.
कृती : एका संत्र्याचा रस काढावा. एक संत्रे सोलून त्यातील पांढरे तंतू पूर्ण काढावेत व त्याचे तुकडे करावेत. डाळ चांगली घोटून त्यात दोन ते तीन वाट्या पाणी घालावे. मिरच्या चिरून घालाव्यात. तसेच चवीनुसार मीठ, हिंग व कढीपत्ता घालावा आणि उकळी आणावी. नंतर त्यात संत्र्याचे तुकडे घालून पुन्हा उकळी आणावी. भांडे खाली उतरवून त्यात संत्र्याचा रस घालावा. ओले खोबरे बारीक वाटून घालावे. आवडत असल्यास साखर घालावी. नंतर तुपावर किंवा तेलावर मोहरीची फोडणी करून घालावी. तसेच कोथिंबीर बारीक चिरून घालावी.

संत्र्याच्या सालींची चटणी
साहित्य : दोन वाट्या पिकलेल्या संत्र्याच्या साली, ४-५ हिरव्या मिरच्या, २ चमचे तिखट, २ लिंबांचा रस, हिंग, १ चमचा मेथ्या, मीठ, तेल.
कृती : संत्र्याच्या साली घेऊन त्यातील पांढरे तंतू पूर्ण काढावेत. सालीचे बारीक तुकडे करून ते मिक्सरमधून भरडसर काढावे. मेथ्या तांबूस रंग येईपर्यंत तळून त्याची पूड करावी. मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. हिंग, मेथी पूड, तिखट, चवीनुसार मीठ सालीच्या भरडवर घालावे व त्यावर लिंबाचा रस घालून कालवावे. एक चमचा तेलाची फोडणी घालावी. ही चटणी बरेच दिवस टिकते.

संबंधित बातम्या