चटपटीत स्नॅक्स

आरती पागे
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

सध्या बहुतांश वेळा संध्याकाळी मुलांबरोबर इतर मंडळीही घरातच असतात. त्यामुळे संध्याकाळी ‘काहीतरी खायला हवंय,’ अशी मागणी नक्कीच होत असणार. नेहमीपेक्षा या वेगळ्या स्नॅक्सच्या रेसिपीज करून तर बघा...

शेवई इडली
साहित्य - १ वाटी शेवया, १ वाटी रवा, १ वाटी दही, १ वाटी पाणी, २ मोठे चमचे काजूचे तुकडे, २ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे तुकडे, १ मोठा चमचा चणा डाळ, १ मोठा चमचा उडीद डाळ, ८ ते १० पाने कढीपत्ता, १ छोटा चमचा मोहरी, २ छोटे चमचे इनो फ्रुट सॉल्ट, चवीनुसार मीठ, २ छोटे चमचे तूप/तेल आणि १ छोटा चमचा तेल ग्रीसिंगसाठी.
कृती - प्रथम एका पॅनमध्ये शेवया गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्याव्यात आणि बोलमध्ये काढून ठेवाव्यात. त्याच पॅनमध्ये २ छोटे चमचे तूप/तेल घालून त्यात दोन्ही डाळी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजाव्यात. मग काजू आणि शेंगदाण्याचे तुकडे घालावेत. कढीपत्ता आणि मोहरी घालावी. मोहरी छान तडतडल्यानंतर रवा घालावा. रव्याला छान गुलाबी रंग आल्यावर हे मिश्रण बोलमध्ये काढावे. त्यात शेवया एकत्र कराव्यात आणि मिश्रण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात दही आणि मीठ घालावे. नंतर पाणी घालून छान एकत्र करावे. मिश्रण झाकून २० मिनिटे ठेवून द्यावे. मिश्रणात इनो फ्रुट सॉल्ट घालून ढवळावे. इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये मिश्रण घालावे. इडल्या १२-१५ मिनिटे वाफवाव्यात. इडल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.

फ्रेंच फिंगर्स (बटाट्याशिवाय)
साहित्य - एक वाटी पाणी, १ वाटी तांदळाची पिठी, २ मोठे चमचे बेसन, तळण्यासाठी तेल. 
मसाल्यासाठी - चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा मिरेपूड, १ छोटा चमचा चाट मसाला, छोटा अर्धा चमचा तिखट, १ छोटा चमचा आमचूर पावडर.
कृती - कढईमध्ये पाणी आणि १ छोटा चमचा तेल गरम करून घ्यावे. त्यात तांदळाची पिठी आणि बेसन घालून ३० सेकंद झाकण ठेवावे. नंतर एका बोलमध्ये ही उकड काढून, हातांना तेल लावून, मळून घ्यावी. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करावेत. पोळपाटावर थोडी तांदळाची पिठी पसरून गोळा जाडसर लाटावा (पाव इंच जाड). त्याचे फ्रेंच फिंगर्ससारखे लांबट चौकोनी काप करावेत. कढईमध्ये तेल गरम करून खरपूस होईपर्यंत डीप फ्राय करावे. नंतर मसाल्यासाठीचे साहित्य एकत्र करावे. तळून झालेल्या फिंगर्सवर मसाला स्प्रिंकल करावा. बटाट्याशिवाय फ्रेंच फिंगर्स तयार.

स्टफ्ड वांगी
साहित्य - दोन भरताची वांगी, २ मोठे चमचे तेल, १ बारीक चिरलेला कांदा, ४ पाकळ्या बारीक चिरलेल्या  लसूण, १२ चेरी टोमॅटो (प्रत्येकी २ तुकडे केलेले), ५० ग्रॅम ग्रीन ऑलिव्ह (बी काढलेले), १०-२० बारीक चिरलेली तुळशीची पाने, १२५ ग्रॅम तुकडे केलेले मोझरेला चीझ बॉल्स, व्हाइट ब्रेड क्रम्ब्स गरजेनुसार, चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम ओव्हन २२० डिग्री सेल्सिअसला गरम करावा. वांग्याचे उभे २ भाग करून घ्यावेत, देठ काढू नये. छोट्या सुरीने वांग्याच्या तुकड्यांच्या बाहेरच्या बाजूपासून अर्धा ते एक सेंटिमीटर आत बॉर्डर करून घ्यावी. चमच्याने बॉर्डरच्या आतल्या बाजूचा गर काढावा. आता या खोलगट वाटीसारख्या तुकड्यांना ब्रशने आतल्या बाजूने तेल लावावे. बेकिंग ट्रेमध्ये ठेवून ॲल्युमिनियम फॉईलने झाकून २० मिनिटे बेक करावे. वांग्याचा गर बारीक चिरून घ्यावा. एका पॅनमध्ये उरलेले तेल घालावे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून छान परतावे. वांग्याचा गर घालून शिजवावे. त्यात बारीक चिरलेला लसूण आणि टोमॅटोचे काप घालून ३ मिनिटे शिजवावे. मग त्यात ऑलिव्ह, तुळशीची पाने आणि चीझचे तुकडे घालावेत. वांग्याचे तुकडे बेक झाल्यावर ओव्हनचे तापमान २०० डिग्री सेल्सिअस करावे. पॅनमधले स्टफिंग त्या तुकड्यांमध्ये एकसारखे भरावे. वरून थोडे तेल आणि ब्रेड क्रम्ब्स भुरभुरवे. १५-२० मिनिटे बेक करावे.

रवा फिंगर्स
साहित्य - दीड वाटी पाणी, १ वाटी रवा, १ बटाटा (उकडून मॅश केलेला), २ मोठे चमचे वाळलेल्या लाल मिरचीचे बारीक तुकडे, १  
मोठा चमचा लसूण पेस्ट, १ मोठा चमचा ओरिगानो, आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम एका कढईत पाणी उकळावे. मंद आचेवर थोडा थोडा रवा पाण्यात घालावा आणि ढवळावे. रव्याच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. रवा घट्ट झाल्यावर एका भांड्यात काढून घ्यावा. रवा थोडा थंड होऊ द्यावा (पूर्णपणे थंड नाही). बाकीचे साहित्य रव्यामध्ये एकत्र करावे. हाताला तेल लावून मिश्रण चांगले मळून घ्यावे. लिंबाएवढे गोळे करून त्याला बोटाचा (दंडाकृती) आकार द्यावा. तेलामध्ये तळून रवा फिंगर्स, सॉस किंवा चिंचेच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

पनीर सॅंडविच
साहित्य - आठ चौकोनी ब्रेड स्लाइस, २०० ग्रॅम पनीर, २ छोटे चमचे मिरेपूड, २ बारीक चिरलेले कांदे, १ बारीक चिरलेली ढोबळी मिरची, २ मोठे चमचे बटर, चवीनुसार मीठ. 
कृती - प्रथम एका भांड्यात पनीर, कांदा, ढोबळी मिरची एकत्र करावी. त्यात मिरेपूड आणि मीठ घालावे. ब्रेड स्लाइसला बटर लावावे. त्यावर वरील मिश्रण एकसारखे पसरावे. दुसरा स्लाइस त्यावर ठेवून तव्यावर किंवा टोस्टरमध्ये भाजावे. सॉसबरोबर गरमागरम सँडविच सर्व्ह करावे.

क्रिस्पी रवा पोटॅटो
साहित्य - चार बटाटे, २ छोटे चमचे तिखट, १ छोटा चमचा धणे पावडर, १ छोटा चमचा मीठ, १ छोटा चमचा चाट मसाला, अर्धा छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा आले लसूण पेस्ट, तेल; कोटिंगसाठी - अर्धी वाटी रवा, पाव छोटा चमचा हळद, पाव छोटा चमचा तिखट. 
कृती - बटाट्याचे साल काढून, छोटे काप करून पाण्यात ठेवावेत. एक बोलमध्ये लाल तिखट, धणे पावडर, मीठ, चाट मसाला, हळद, आले लसूण पेस्ट आणि दोन मोठे चमचे पाणी घालून छान एकत्र करावे. बटाट्याचे काप मिश्रणात घालून मसाला बटाट्याच्या तुकड्यांना सगळ्या बाजूंनी लागेल असे छान ढवळून घ्यावे. दुसऱ्या बोलमध्ये रवा, हळद आणि लाल तिखट घालून एकत्र करावे. एका पॅनमध्ये तेलाचे थेंब घालून मध्यम आचेवर गरम करावे. बटाट्याचे तुकडे रव्याच्या मिश्रणात घोळवून पॅनमध्ये ठेवावेत. तुकड्यांवर आणखी थोडे तेल घालून पॅनवर झाकण ठेवावे. ५ मिनिटे वाफवून घेतल्यावर बटाट्याचे तुकडे परतून घ्यावेत. बटाट्याचा रंग सोनेरी झाल्यावर प्लेटमध्ये काढावे. गरमागरम क्रिस्पी रवा पोटॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावेत. 

टोमॅटोची झटपट चटणी
साहित्य - दोन टोमॅटो, १ वाटी कोथिंबीर, ६ ते ८ पाकळ्या लसूण, चवीनुसार तिखट, चवीनुसार मीठ, १ मोठा चमचा लिंबाचा रस; फोडणीसाठी - २ वाळलेल्या लाल मिरच्या, ७-८ पाने कढीपत्ता, १ छोटा चमचा चणा डाळ, १ छोटा चमचा जिरे, १ मोठा चमचा तेल.
कृती - टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, तिखट, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. फोडणीपात्रात तेल कडक गरम करावे. त्यात जिरे, वाळलेली लाल मिरची, कढीपत्ता आणि चणा डाळ घालावी. छान तडतडल्यावर चटणीवर घालावी. टोमॅटोची झटपट चटणी तयार.

शेंगदाण्याची चिक्की
साहित्य – अडीचशे ग्रॅम शेंगदाणे, २५० ग्रॅम गूळ.
कृती - एका कढईमध्ये शेंगदाणे छान भाजावेत. साल काढून बोलमध्ये ठेवावेत. मग कढईमध्ये तूप आणि गूळ घालून गूळ वितळवून घ्यावा. गूळ करपू नये म्हणून एक मोठा चमचा पाणी घालावे. रंग बदलेपर्यंत परतावे. जर गुळाचे गोळे झाले तर जास्त वेळ परतावा. परतून झाल्यावर त्यात भाजलेले शेंगदाणे घालावेत. बटर पेपर किंवा एका प्लॅस्टिकच्या प्लेटला तूप लावून मिश्रण थापून घ्यावे. चाकूने किंवा पिझ्झा कटरने चौकोनी तुकडे करावेत. १५-२० मिनिटे थंड होऊ द्यावे.

संबंधित बातम्या